पवित्र, पावन तरिही प्रदुषित इंद्रायणी - अरुण बोऱ्हाडे
पवित्र, पावन तरिही प्रदुषित इंद्रायणी ! 🌿 अलिकडेच ऐन दिवाळीत वर्तमान पत्रांतून आणि समाजमाध्यमांतून इंद्रायणी नदीतील फेसाळलेल्या, दुर्गंधीयुक्त पाण्याची छायाचित्रे, बातमीपत्रे वाचनात आली. लहानपणापासून मनामध्ये वसलेल्या पवित्र, पावन इंद्रायणीचे हे प्रदुषित रुप काही नव्याने पाहिले असे नाही. कधी काळेकुट्ट तेलमिश्रित पाणी, कधी मैलामिश्रित पाणी, तर कधी असे फेसाळलेले दुर्गंधाने व्यापलेले पाणी आणि इतरवेळी त्या हिरव्या घनदाट जलपर्णीची वसने पांघरलेली प्रदुषित इंद्रायणी हे चित्र आता अधुनमधून प्रत्यक्षात पहायला मिळते. अनेकदा बातम्यांतून ऐकायला आणि छायाचित्रांतून बघायला मिळते. या सर्व परिस्थितीने मन अस्वस्थ होते, कधीकधी काळीज चिरत जाते. पण इंद्रायणीच्या प्रदुषण नियंत्रण अथवा निर्मूलनासाठी कधी कोणी भरीव काही केल्याचे ऐकिवात नाही. माझ्या बालवयापासून घरामध्ये, समाजामध्ये, कीर्तनांतून, प्रवचनांतून इंद्रायणीचे पावित्र्य ऐकिवात आहे. कधी भल्या पहाटे आळंदीला ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनाला जावे आणि इंद्रायणीच्या घाटावर बसावे. त्या घाटावर वारकरी शिक्षणासाठी आलेले अनेक विद्यार्थी मन लावून मृदुंगा...