बुद्धिमत्तेला ध्येयवादाची साथ पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील - [लेखक - अरुण बोऱ्हाडे]
बुद्धिमत्तेला ध्येयवादाची साथ पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील @ लेखक : अरुण बोऱ्हाडे (मोशी, पुणे) कोल्हापूरच्या मातीत जन्मलेले, लाल मातीच्या मुशीत घडलेले शिक्षणप्रेमी व्यक्तिमत्व, बिहार आणि त्रिपुराचे माजी राज्यपाल मा. ज्ञानदेव यशवंतराव तथा डॉ. डी. वाय. पाटील यांची आज सकाळी वयाच्या ९२ व्या वर्षी कोल्हापूर येथे प्राणज्योत मालवली. शैक्षणिक क्षेत्रात विशाल कामगिरी केलेले एक ध्येयवादी, कर्तबगार आणि दिलदार व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले. या लेखात त्यांच्या व्यक्तिमत्वाचा थोडक्यात धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न. कोल्हापूर जिल्ह्यातील कसबा बावडा हे त्यांचे मुळगाव. दि. २२ ऑक्टोबर १९३५ रोजी एका सधन शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच हुशार आणि जिद्दी स्वभाव असलेले दादा शालेय जीवनात अभ्यासात गतिमान आणि आचरणात नीतिमान होते. अध्यात्माची गोडी असलेले वडील यशवंतराव यांनी 'ज्ञानदेव' हे नाव ठेवले. सुशील व सात्त्विक आई वत्सलाबाई. लहान असतानाच त्यांचे मातृछत्र हरपले. त्याही स्थितीत त्यांनी कसबा बावडा येथे शालेय शिक्षण आणि कोल्हापूर येथे बीए, एलएल.बी. आणि एमएपर्यंतचे शिक्षण घेतले. लहानप...