श्रमशक्तिचा पाठीराखा : लोकनेते शरद पवार (लेखक - अरुण तुकाराम बोऱ्हाडे)

 श्रमशक्तिचा पाठीराखा : लोकनेते शरद पवार

@ अरुण तुकाराम बोऱ्हाडे 



महाराष्ट्राचे शिल्पकार आणि पहिले मुख्यमंत्री कै. यशवंतराव चव्हाण साहेब यांनी महाराष्ट्राच्या औद्योगिकीकरणाला चालना दिली. तसेच राज्यात एम.आय.डी.सी. ची निर्मिती करून रोजगाराची मोठ्या प्रमाणात संधी निर्माण केली. या उद्योगांना तंत्रज्ञ आणि कुशल कामगार उपलब्ध व्हावेत म्हणून प्रत्येक जिल्ह्यात आणि तालूक्यांत आय.टी.आय.चे जाळे ऊभे केले. कृषी-औद्योगिक धोरणाची अंमलबजावणी केली. ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना रोजगार निर्माण होतील, याची काळजी घेतली. हीच परंपरा पुढे घेऊन जाताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना आदरणीय शरद पवार साहेबांनी बदलत्या काळाशी सुसंगत असे मोठमोठे उद्योग महाराष्ट्रात आणले. संगणक युगाची गरज ओळखून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगांचे जाळे विणले. शेतीपूरक व्यवसायाला प्रोत्साहन दिले. त्यांच्या प्रयत्नांनी लाखोंच्या संख्येने नवीन रोजगार निर्माण झाले. 

मा. शरद पवार साहेब म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक कष्टकरी घटकाला आपला वाटणारा, आश्वासक आणि आस्था असणारा नेता. समस्यांच्या खोलात जाणारा, सकारात्मक दृष्टीने पाहणारा आणि समस्येचे  निराकरण करणारा कृतीशील नेता. देशात राजकारणाची दिशा आणि दशा काहीही असो, सामान्य माणसासाठी सदोदीत झिरपणारा झरा म्हणजे शरद पवार साहेब. माझ्यासारख्या सामान्य कुटूंबातील एका तरुणाला साहेबांनी दिलेले प्रेम आणि विश्वास, मागिल तीन तपे अर्थात छत्तीस वर्षे तसूभरही कमी झाले नाही. औद्योगिक क्षेत्रातील विविध कामगार संघटनांचे प्रश्नांसाठी मी अनेकदा साहेबांचे सहकार्य मागितले.  या सर्व काळात त्यांचा राजकीय प्रवासही अनेक दिशांनी बहरत गेला. मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, देशाचे संरक्षणमंत्री, पुन्हा मुख्यमंत्री, लोकसभेतील विरोधी पक्षनेता, तब्बल दहा वर्षे देशाचे कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या. त्याचबरोबर कबड्डी, कुस्तीबरोबरच भारतीय आणि जागतिक क्रिकेटचेही अध्यक्षपद लिलया पेलले ! या सर्व जबाबदाऱ्या सांभाळताना आणि राजकीय चढऊतार पेलताना साहेबांनी महाराष्ट्राचे एक सजग,  जबाबदार पालक म्हणून औद्योगिक घडामोडींवर विशेष लक्ष दिले. राज्याच्या आर्थिक परिस्थितीत परिणामकारक भूमिका असलेल्या उद्योग क्षेत्राची त्यांनी नेहमीच काळजी घेतली. उद्योगांना वेळोवेळी येणाऱ्या अडचणी साहेबांनी सोडवायच्या आणि कामगारांच्या समस्यांचेही निराकरण त्यांनीच करायचे. असे जणू सूत्रच बनून गेले आहे. कामगार, शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, पोलिस कर्मचारी, एस.टी. कर्मचारी, महापालिका आणि शासकीय व निमशासकीय कर्मचारी, बँक कर्मचारी, साखर उद्योगातील कामगार, औद्योगिक क्षेत्रातील कामगार, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगार, संघटीत- असंघटीत, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर आणि ऊसतोड कामगार इत्यादी सर्वच क्षेत्रांतील श्रमिकांचा अर्थात श्रमशक्तिचा पाठीराखा म्हणजे श्री शरद पवार साहेब होय. साहेबांनी सर्व क्षेत्रातील कामगारांसाठी केलेल्या कामाची नोंद घ्यायची म्हटले तरी अगणित पाने छापावी लागतील. 

विविध क्षेत्रातील कामगार किंवा कर्मचारी वर्गाचे प्रश्न वेळीच सुटले नाहीत की आंदोलने, संप आणि मोर्चा ही लोकशाहीतील आयुधे बाहेर येतात. ही आयुधे वापरताना कधी परिस्थिती हाताबाहेर जाते आणि चिघळते. अशावेळी राजकीय नेतृत्व परिपक्व असेल तर दोन्ही बाजू समजावून घेऊन समन्वय साधला जातो. माननीय साहेबांनी याबाबतीत एक कानमंत्र आंम्हा कार्यकर्त्यांना दिलेला आहे. कंपनी जगली, उद्योग टिकला तरच कामगारांच्या मागण्या पूर्ण होतील. नेतृत्वाने सर्व परिस्थितीचे भान ठेवावे, तुटेल इतके ताणू नये. राजकारणाची आणि कामगार संघटनांची गल्लत करू नये. याच भूमिकेतून त्यांनी अडचणीत असलेल्या कामगारांना नेहमी मदत केली आहे. त्याठिकाणी कुठली संघटना काम करते, ती संघटना कोणत्या राजकीय पक्षाशी संलग्न आहे, याचा विचार त्यांनी कधीही मनात आणला नाही. राजकारणाच्या पलिकडे जावून कष्टकरी, कामगारांचे प्रश्न त्यांनी सोडविले आहेत. आपल्याकडे प्रश्न आला तर तो हाताळायचा, आपले शब्दचातुर्य वापरून संबंधित उद्योजकाला समजावयाचे, कामगारांना लाभ मिळवून देऊन समाधानी ठेवायचे, शिवाय दोन्ही बाजूंना आपापल्या जबाबदारीची जाणीव करून देण्याचे कौशल्य साहेबांकडे आहे.  

आपल्या राजकीय स्वार्थासाठी किंवा कधी गैरसमजातून काही विरोधी नेत्यांनी साहेबांना नेहमीच कामगार विरोधी असल्याचे चित्र रंगविले आहे. पण त्याबाबत कधीही 'ब्र' शब्द न काढता, त्यांनी आपली जबाबदारी सांभाळली आहे. कामगार क्षेत्रातील माझा नि साहेबांचा थेट संबंध सन १९९६ साली मी हिंदुस्थान अँटिबायोटिक्स कामगार संघटनेच्या  सरचिटणीस पदावर निवडून आल्यावर आला. अर्थात त्यापूर्वीपासून त्यांनी विविध ठिकाणी कामगार संघटनांना प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष केलेली मदत मी पाहिली आहे. अनेकदा वर्तमानपत्रांतूनही वाचलेले आहे. त्यांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि साहेबांनी ऊसतोड कामगारांचे प्रश्न एकत्रितपणे बसून सोडविले आहेत, त्यांचे पगार निश्चित केले आहेत. साखर कामगारांचे नेते किशोर पवार नेहमीच साहेबांची मदत घेत असल्याचे मी पाहिले आहे. महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांचे पगार पूर्वी खूपच कमी असायचे, साहेबांनी प्रयत्नपूर्वक त्यांना सुस्थितीत येतील अशी वाढ मिळवून दिली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना तर त्यांनी नेहमीच झुकते माफ दिले आहे. केवळ कामगार कर्मचारी वर्गाचे पगार वाढवून नव्हे, तर त्यांच्या इतरही अडचणी दूर करण्यासाठी साहेब नेहमी तत्पर असतात. एस.टी. कर्मचारी संघाच्या अधिवेशनात साहेबांनी अनेक वर्षे सातत्याने उपस्थित राहून मार्गदर्शन केले आहे. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्याही अधिवेशन अथवा शिबिरांना उपस्थित राहून साहेब त्यांच्याशी नेहमी संवाद करतात, त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आग्रह धरतात. साहेब सत्तेत असो अथवा नसो, राजकीय चर्चा त्यांच्या नावाभोवतीच फिरत असते, असे मागिल किमान तीनचार दशके तरी आपण पाहत आहोत. नेमके मागिल तीन दशकांत साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात अधिक मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे आले. अर्थातच रोजगारांच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या. विशेषतः पुणे जिल्ह्यात चाकण, तळेगाव, रांजणगांव, बारामती, जेजुरी इत्यादी औद्योगिक वसाहती नव्याने निर्माण केल्या. तळवडे, खराडी, हडपसर आणि हिंजवडी येथे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगधंदे, अर्थात आय.टी. पार्कची मुबलक प्रमाणात उभारणी केली. या क्षेत्रात लक्षावधी हातांना रोजगार उपलब्ध झाले. एक मोठा उद्योग आला की त्याचा सकारात्मक  परिणाम संपूर्ण अर्थचक्रावर होतो. औद्योगिक प्रगतीच्या अनुषंगाने परिसरातील बांधकाम व्यवसाय तेजीत आले. त्या व्यवसायात कुशल व अकुशल मनुष्यबळासाठी रोजगार उपलब्ध झाले. वाढता औद्योगिक परिसर आणि नवीन विकसित झालेले असंख्य रहिवासी प्रकल्प यामुळे त्यावर आधारित व्यापार, उद्दीम, हॉटेल्स, हॉस्पिटल्स, मॉल्स, शाळा, कॉलेजेस, वाहतूक, बाजार, मनोरंजनाची ठिकाणे आदी जीवनातील सर्वच क्षेत्रातील व्यावसायिक संधी खूप मोठ्या प्रमाणात वृद्धिंगत झाल्या. याचे सर्व श्रेय प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे माननीय शरद पवार साहेबांच्या दूरदृष्टीयुक्त प्रयत्नांना आणि सर्वव्यापी नेतृत्वाला आहे. रोजगार निर्माण करणारी ही साधनसंपत्ती म्हणजेच श्रमशक्तिचा ऊर्जास्त्रोत होय. हा ऊर्जास्त्रोत चेतविण्याची, जपण्याची आणि वृद्धिंगत करण्याची कर्तबगारी साहेबांनी करून दाखविली आहे. हा ऊर्जास्त्रोत जपताना प्रत्येक क्षेत्रातील कष्टकरी  वर्गाला, श्रमिकाला शक्ती देणारा, त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारा आणि त्याला योग्य दिशा देणारा पाठीराखा म्हणूनही माननीय शरद पवार साहेबांचे मोलाचे योगदान आहे. समाजातील सर्व घटकांना आधार देणारे नेते, म्हणूनच त्यांना "लोकनेता" ही बिरुदावली शोभते.

अर्थात, अनेकांचा कलुषित राजकीय दृष्टिकोन आणि अज्ञान यांमुळे कित्येक उद्योग व्यवसाय करणारांना आणि रोजगार संधी मिळालेल्यांना ही रोजगार संधी साहेबांमुळे मिळाली, हेच समजत नाही. जागतिक पातळीवरील कोणताही उद्योगधंदा भारतात किंवा महाराष्ट्रात आपोआप येत नसतो. त्याला विकसनशील वातावरण असावे लागते. त्या प्रदेशातील सरकारने उद्योगांना आवश्यक सोयीसुविधा देण्याची तयारी दाखवावी लागते, सुलभ दळणवळण, मुबलक वीज आणि पाणीपुरवठा, कुशल- अकुशल आणि जबाबदार मनुष्यबळ इत्यादी बाबी त्या परिसरात असाव्या लागतात. तसेच चांगले औद्योगिक वातावरण असेल तरच कोणताही नवीन उद्योग येतो, सुरू होतो आणि स्थिरावतो. कामगार वर्गालाही संघर्षाऐवजी समन्वयातून योग्य मोबदला आणि भविष्यकाळातील शाश्वती असेल तर कोणताही कामगार स्वतःहून संघर्षाच्या मार्गाने जात नाही. 

साहेबांनी एच. ए. कामगारांच्या संघटनेचे अनेक वर्षे नेतृत्व केले. त्यादरम्यान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खूप काही शिकायला मिळाले. राज्य सरकारशी बोलायचे असो की केंद्रसरकारशी, साहेबांनी नेहमी पुढाकार घेऊन, आंम्हा प्रतिनिधींना बरोबर घेऊनच सरकारशी चर्चाविनिमय केला आहे. साहेब सरकारमध्ये असोत की विरोधात. आम्ही जाणार ते केवळ साहेबांकडेच ! असे एकदोनदा नव्हे, पंचवीस वर्षांत शेकडोवेळा अनुभवले आहे. अगोदर प्रश्न समजावून घेणार, त्याच्या मुळाशी जाणार, त्याला काय उपाययोजना करायची याचा विचार करणार. मगच पुढील पावले उचलणार, ही   त्यांची कार्यपद्धती. चर्चेला बसल्यावर समस्यांचे निराकरण करूनच ते उठतात. हिंदुस्थान अँटिबायोटिक्सच्या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उद्योगमंत्री, केंद्रीय रसायनमंत्री, अर्थमंत्री आणि कधीकधी देशाच्या पंतप्रधानांसह साहेबांनी बैठका घेतल्या, चर्चा केल्या आणि मार्ग काढले. अर्थात एच.ए. कंपनीचे प्रश्न म्हणजे शेतातील खुरपणीसारखेच आहेत. पुढे खुरपणी केली तरी पाठीमागे दुसरे तण वाढलेलेच दिसते. त्याची पुन्हा खुरपणी करावी लागते. एच.ए.चे तसेच झाले आहे. त्यामुळेच प्रश्न कधी कायमचा सुटू शकला नाही. कधीकधी दिवस बदलले की सरकार बदलते आणि सरकार बदलले की धोरण बदलते. त्याचेच चटके सरकारी उद्योगांना बसले. अर्थात सरकार कोणतेही आले, तरी साहेबांनी कधीच माघार घेतली नाही. त्याशिवाय संरक्षण खात्यातील विविध उद्योगांतील कामगारांच्या प्रश्नांत त्यांनी लक्ष दिले. बजाज ॲटो आणि बजाज टेंपो, सध्याची फोर्स मोटर्स येथील कामगारांच्या प्रश्नांची सोडवणूक करतानाही मी एक  साक्षीदार आहे. आम्ही आंदोलन केले, शिष्टमंडळे, निवेदने इत्यादी सोपस्कार करून झाले. शेवटी माननीय पवार साहेबांनी लक्ष घातले, तेव्हाच कामगारांना दिलासा मिळाला. तीच परिस्थिती सेंच्यूरी एन्का कामगार संपाच्यावेळी अनुभवली. तेथील कामगार संघटनेच्या प्रतिनिधींना घेऊन दिल्लीमध्ये साहेबांना भेटलो. खरे तर तेथील संघटना भारतीय मजदूर संघाची, मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता तरिही साहेबांनी विषय समजुन घेतला आणि क्षणार्धात कंपनीच्या मालकांना फोनवरून संपर्क साधला. पुढील काही दिवसांत सेंच्युरी एन्काच्या कामगारांना भरीव पगारवाढ मिळाली, संप मिटला. अशी एक ना दोन अनेक उदाहरणे देता येतील. 

कुठल्याही कामगारांच्या, कष्टकरी वर्गाच्या समस्या  व अडचणी ऐकून ते व्यथित होतात. कधीकधी स्वतःहून विचारणा करून परिस्थितीची माहिती घेतात. कोणाचाही पक्ष, पंथ, धर्म याचा आधार न घेता, राजकीय लाभाचा विचार न करता ते अनेकांना मदत करतात. कारखाने बंद होता कामा नये. म्हणून त्यांच्या अडचणीही जाणून घेतात. योग्य पद्धतीने त्यांच्या अडचणीही दूर करतात आणि कष्टकरी, कामगारांच्या हिताचे ते रक्षण करतात. मुंबईतील कष्टकरी माथाडी कामगारांना वेळोवेळी  खरा आधार दिला तो माननीय पवार साहेबांनी. त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी धोरणात्मक निर्णय घेतले. घरबांधणीसाठी राज्यसरकारच्या माध्यमातून मुंबईत आणि नव्या मुंबईत जमिनी उपलब्ध करून दिल्या. सत्तास्थानी असो अथवा नसो, माथाडी कामगारांच्या पाठीशी ते कायम उभे असतात. 

महाराष्ट्रातील ऊसतोड मजूर, माथाडी कामगार, औद्योगिक क्षेत्रातील कामगार, सरकारी कर्मचारी आदी सर्व क्षेत्रातील कष्टकरी वर्गासाठी एक पाठीराखा म्हणून माननीय शरद पवार साहेबांनी दिलेले योगदान आणि पाठबळ शब्दातीत आहे. त्यांच्या पाठबळाने अनेकांचे संसार प्रकाशमान झाले आहेत. म्हणूनच ते श्रमिकांचा पाठीराखा ठरतात, पोशिंदा ठरतात. आदरणीय लोकनेते शरद पवार साहेबांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या सर्व कष्टकरी, श्रमिक, कामगारांच्या वतीने कृतज्ञतापूर्वक लक्षलक्ष शुभेच्छा. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो, याच मनःपूर्वक सदिच्छा.

@ लेखक : अरुण तुकाराम बोऱ्हाडे 

(ई-मेल : atborhade@gmail.com)

* * *

Comments

  1. 🙏🏻🙏🏻🙏🏻 लेख आवडला

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

श्री नागेश्वर महाराज भंडारा : भक्तिमार्गातील शक्ती स्त्रोत [लेखक : अरुण बोऱ्हाडे]

'शरद पवार : दुःखातही मनाला उभारी देणारा अलौकिक लोकनेता'' : अरुण बोऱ्हाडे

"कष्टकरी कामगारांची, एक अधुरी कहाणी..! सामाजिक चिंतनाचा विषय" लेखकः अरुण बोऱ्हाडे