एच. ए. कामगारांच्या ऐतिहासिक लढ्याची संस्मरणीय वीस वर्षे! (१) [लेखक - अरुण बोऱ्हाडे]
एच. ए. कामगारांच्या ऐतिहासिक लढ्याची संस्मरणीय वीस वर्षे! (१) © अरुण बोऱ्हाडे 🌿
आज १ नोव्हेंबर, बरोबर वीस वर्षे झाली, हिंदुस्तान अँटिबायोटिक्स (एच. ए.) कंपनीच्या बंद प्रक्रियेविरोधात आम्ही कामगारांचा लढा उभा केला होता. घंटानाद, धरणे आंदोलन, मानवी साखळी, पथनाट्ये, मोर्चा, उपोषण अशा विविध पद्धतीने, मात्र काम चालू ठेऊन शांततेच्या मार्गाने आम्ही हे आंदोलन सुरू केले होते. जवळजवळ एक महिन्याचा आमचा कार्यक्रम निश्चित ठरविलेला होता. त्याप्रमाणे पूर्णही केला, त्याहीपुढे जाऊन संभाव्य खाजगीकरणास विरोध दर्शवित पंचेचाळीस दिवस हा घंटानाद चालू होता. कुठेही हिंसक वळण लागणार नाही, याची पुरेपूर दखल घेण्यात आली होती. या आंदोलनात सर्व कामगार बंधू भगिनींचा सहभाग होता. व्यवस्थापनानेही पाठिंबा दिला होता. प्रश्न प्रत्येकाच्या भवितव्याचा होता. त्यामुळे कामगार अधिकारी एकाच छताखाली लढत होते. हळुहळू पिंपरी चिंचवड परिसरातील अनेक कामगार संघटना, सामाजिक संस्थांनी आम्हाला स्वयंस्फूर्तीने पाठिंबा दर्शविला होता. साहजिकच आमचे सर्वांचे मनोधैर्य वाढत होते. विशेषतः त्याकाळातील सर्व वृत्तपत्रांनी खूप चांगले सहकार्य केले. कोणत्याही लढ्याला प्रसार माध्यमांचे बळ मोलाचे ठरते. जनतेला सत्यता पटते आणि सरकारला प्रश्नाची तीव्रता समजते. सुरुवातीला "घंटानाद" या शब्दाची काहीजणांनी थट्टा केली. पण आम्ही डगमगलो नाही. ईश्वराच्या मंदिरात वाजविलेली घंटा जर त्याला ऐकू जात असेल, तर आमच्या हजारो श्रमिकांच्या अंतःकरणातील आर्त त्याला नक्कीच समजणार होती. सरकारलाही ती कळणार होती, यावर आमचा विश्वास होता. हजारोंच्या संख्येने सहकुटूंब काढलेला मोर्चा आजही नजरेसमोरून जात नाही. हातात हात घालून महामार्गावरील ती मानवी साखळी आमच्या एकमुखी मागणीची प्रतिरूप होती. खरे तर श्री विठ्ठलाला साकडे घालून सुरू केलेले हे आंदोलन संपूर्णतः अध्यात्मिक पायावर उभे होते. दिनांक १४ नोव्हेंबरच्या दिवशी लाक्षणिक उपोषण करण्यात आले. उपोषणाच्या वेळी कुठलीही घोषणाबाजी न करता टाळ मृदंगाच्या गजरात अभंगाचे सूर आळविले होते. हेतू शुद्ध होता, लढा प्रामाणिक होता, कामगार अधिकारी सारे मिळून लढत होतो. कंपनी बंद न करता ती टिकली पाहिजे, सुरळीत चालली पाहिजे हीच आमची भावना होती. शहरातील असंख्य कामगार संघटनांचे मिळालेले पाठबळ मौलिक होते. म्हणून आम्ही आजही उभे आहोत. एच. ए. हे नाव अजूनही कामगारांनी जिवंत ठेवले आहे. त्याकाळी लढ्याला साथ दिलेले आमचे काही सहकारी मात्र आज आमच्यात राहिले नाहीत. त्यांचीही याक्षणी तीव्रतेने आठवण येते. इतिहास घडत असतो, काळ पुढे जात असतो. जीवनाच्या टप्प्यावर मैलाचा दगड तुम्हाला तुमच्या कामगिरीचे स्मरण करून देत असतो. आमचा एच.ए.चा कामगार लढला म्हणून कंपनी जगली आणि एक इतिहास घडला. सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील अशा प्रकारचे पहिलेच आंदोलन ठरले.
एच. ए. कामगारांच्या त्या ऐतिहासिक लढ्याने पिंपरी चिंचवड मधील कामगार चळवळीला एक नवीन आयाम दिला. कामगार वर्गात नवा आत्मविश्वास निर्माण केला. हा लढा एच.ए. साठी संजीवनी देणारा ठरलाच, त्याचबरोबर देशभरातील सरकारी कंपन्यांसाठी प्रेरणादायी ठरला. म्हणूनच तो लढा संस्मरणीय ठरला आहे.
आज वीस वर्षांनी ते सारे दिवस ताजे होऊन पुढे उभे राहिले, म्हणूनच हा शब्द प्रपंच !
जयहिंद ! वंदे मातरम् !!
👍👍👍
@ अरुण बोऱ्हाडे ...✍️ (दि. १ नोव्हेंबर २०२३)


Comments
Post a Comment