हिरव्या बोलीतील कवी पद्मश्री ना. धों. महानोर [लेखक © अरुण बोऱ्हाडे]
अक्षरप्रतिमेतील प्रज्ञावंत : हिरव्या बोलीतील कवी पद्मश्री ना. धों. महानोर
लेखक © अरुण बोऱ्हाडे 🌿
आज सकाळी कविवर्य ना. धों. महानोर गेल्याची बातमी वाचली अन् मनात धस्स झाले. नुकतेच माझे "अक्षरप्रतिमेतील प्रज्ञावंत" हे पुस्तक प्रकाशित झाले. त्यामधे मी साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील काही व्यक्तिरेखा शब्दबद्ध केल्या आहेत. ज्यांच्या काव्यातील मधाळ, हिरव्या, रसरशीत आणि लडिवाळ शब्दांनी लहानपणापासून माझ्या मनावर अधिराज्य केले आहे, असे रानकवी ना. धों. महानोर या प्रज्ञावंताविषयी मी त्यामध्ये लिहिले आहे. हे पुस्तक त्यांना समक्ष भेटून द्यावे, असा माझा विचार होता. मध्यंतरी कळाले की त्यांची प्रकृती बिघडली आहे, इतक्यात भेटता येणार नाही.
आता त्यांना बरे वाटल्यावर जाऊन भेटू, असे ठरविले होते. तथापि नियतीने मला ती संधी दिली नाही. महाराष्ट्रातील एका आगळ्या वेगळ्या प्रतिभेचा चिरंजीवी अक्षरझरा, शब्दफुलांशी, लतावेलींशी, काळ्या मातीशी, धनधान्याशी, समाजाच्या सुखदुःखाशी समरस झालेला रानफुलांत रमणारा प्रज्ञावंत कवी, मराठी साहित्यातील एक मानदंड आणि शेतीमातीशी एकरूप झालेला निगर्वी मोठा माणूस आज हरपला आहे. त्यांना श्रद्धांजली म्हणून माझ्याच पुस्तकातील लेख याठिकाणी पुनःप्रसारित करीत आहे.
हिरव्या बोलीतील कवी
पद्मश्री ना.धों. महानोर
''या शेताने लळा लावला असा असा की,
सुख दुःखाला परस्परांशी हसलो रडलो
आता तर हा जीवच अवघा असा जखडला
मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो.''
या हिरव्या बोलीच्या ओळी आहेत, सुप्रसिद्ध शेतकरी कवी ना.धों.महानोर यांच्या ! मी शिक्षण घेत असल्यापासून कवी ना.धों. महानोर यांचा चाहता आहे. एक अस्सल ग्रामीण शैलीतील, त्यातही मराठवाडी बोलीतील त्यांच्या कविता आणि चित्रपट गीते हे वाचनीय, श्रवणीय आणि चिंतनीय असतात. कवी ना.धों. महानोर यांना मी अनेकदा ऐकले आहे. ज्या ज्या वेळी ते पुण्यामध्ये येतात, त्या त्या वेळी मी त्यांना ऐकायला जातो. अर्थात, इतर अनेक प्रख्यात साहित्यिकांशी माझा जसा संवाद होतो, तसा माझा संवाद श्री ना.धों. महानोर यांच्याशी फारसा झाला नाही. खरे तर अनेकदा त्यांना समक्ष भेटूनही मी त्यांना केवळ त्यांच्या कवितेची दाद देत असतो. एकदा मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये भेट झाली, परंतु बोलणे झाले नाही. त्यांना निवांत भेटून बोलावे, त्यांचे व्यक्तित्व समजून घ्यावे, म्हणून खूप वर्षांपूर्वी मी त्यांच्या गावी पळसखेड्याला गेलो होतो. तेव्हाही त्यांची भेट झाली नाही ते बाहेरगावी गेले होते. त्याला आता वीसबावीस वर्षे झाली. मध्यंतरी पुन्हा एकदा अजिंठ्याला गेल्यानंतर मी आवर्जून त्यांच्या गावी जाऊन आलो. त्यांच्यासोबत त्यांच्या रानात शेतात भेटून बोलावे अशी इच्छा मनी बाळगली होती. मात्र तेव्हाही योग जुळून आला नाही. अर्थात कवितांच्या माध्यमातून मी त्यांची शब्दप्रतिभा आणि विचार आवर्जून ऐकत असतो किंवा वाचत असतो. मराठीच्या साहित्य विश्वामध्ये स्वतःचा असा वेगळा ठसा निर्माण केलेले, चाकोरी बाहेरच्या लेखनामुळे स्वतःचे वैशिष्ट्य जपलेले जे काही मोजके साहित्यिक आहेत, त्यामध्ये ना.धों. महानोर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.
श्री. ना.धों. म्हणजेच नामदेव धोंडो महानोर यांचा जन्म १६ सप्टेंबर १९४२ रोजी संभाजीनगर (पूर्वीचे औरंगाबाद) जिल्ह्यातील पळसखेडे येथे एका शेतकरी कुटुंबात झाला. प्रख्यात कवी असले तरी ते स्वतः एक कर्तबगार शेतकरी आहेत. महाराष्ट्राच्या विधान परिषदेचेही नियुक्त सदस्य होते. असे असले तरी ते सहसा राजकारणात रमले नाहीत. मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी, ग्रामीण भागातील पाणी प्रश्नांसाठी त्यांनी आपल्या राजकीय पदाचा आणि परिचयाचा उपयोग करून दिला. ते वयाच्या अठराव्या वर्षापासूनच शेती करीत आहेत.
केवळ स्वतःची शेती नाही तर त्यांच्या पळसखेड्याच्या परिसराच्या विकासासाठी त्यांनी अनेक दगडी बंधारे, सिमेंटचे बंधारे आणि तलाव बांधून घेतले आहेत. 'पाणी आडवा, पाणी जिरवा' ही संकल्पना त्यांनी प्रत्यक्षात राबविली आणि यशस्वी करून दाखविली आहे. सुमारे २०० एकर जमिनीवर सामाजिक वनीकरणाचा कार्यक्रम राबवला. सुमारे ३६००० झाडे लावली आणि ती जगवली. त्यानंतरही दीड लाख झाडे लावण्याचे काम त्यांनी हाती घेतलेले आहे. परिसरातील शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी त्यांनी प्रसिद्धीविना मोलाची कामगिरी केली आहे. त्यांच्यातील कवीपेक्षा खरा सज्जन व संवेदनशील माणूस मला अधिक भावतो. शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर चर्चा करण्यापेक्षा किंवा शासनावर अवलंबून राहण्यापेक्षा त्यांनी स्वतः शेतीचे प्रयोग राबविले आहेत. 'शेती आत्मनाश व नव संजीवन' हे त्यांचे पुस्तक शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरले आहे. 'शेतीसाठी पाणी', 'सीताफळाची गोष्ट', 'या शेताने लळा लाविला' ही त्यांनी लिहिलेली पुस्तके शेतकरी वर्गात दिशादर्शी ठरली आहेत. त्यांच्या कविता आणि गाणी देखील शेती, माती, शिवार, सिंचन याच विषयावर लिहिलेली असतात. ते म्हणतात, 'या जगात शेती सारखी सुंदर, पवित्र आणि लाभदायी गोष्ट दुसरी अस्तित्वात नाही'. त्यांच्या वागण्यातील साधेपणा, वाणीतील सत्यता आणि संवेदनशीलता कोणालाही आपलेसे करतात.
श्री ना.धों. महानोर यांची 'रानकवी' म्हणून सर्वदूर ओळख आहे. त्यांच्या कवितांनी बालकवी आणि बहिणाबाईंचा वारसा समृद्ध केला आहे. त्यांच्या 'रानातल्या कवितांना' खरा रानशिवाराचा आणि काळ्या मातीचा गंध येतो आणि ऐकणारा तृप्त होतो. मराठवाड्यात "वही" हा अत्यंत लोकप्रिय लोकगीतांचा प्रकार आहे. कवी महानोर यांना लोकसाहित्याबद्दल अपार प्रेम व जिव्हाळा आहे. या प्रेमापोटी त्यांनी आपल्या भागातील लोकगीते व लोककथा एकत्रित करून मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे. त्यांनी लिहिलेल्या वह्या त्यांच्या "वही" या काव्यसंग्रहात आहेत. जसे -
"चांद केवड्याची रात आलिया सामोरा,
राजा माझ्या अंबाड्याला बांधाया गजरा"
अशी मधाळ आणि लडिवाळ शब्दकळा लाभलेल्या ओळी 'वही' मध्ये वाचावयास मिळतात. महाराष्ट्राचे शिल्पकार आणि पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हेही त्यांच्या कवितांचे चाहते होते. चव्हाण साहेबांनी त्याकाळी महानोरांच्या घरी प्रत्यक्ष दिलेली भेट कोणाही राजकीय व्यक्तिला आदर्शवत आहे. केवळ साहित्याच्या प्रेमापोटी एका छोट्या गावात यशवंतराव चव्हाण त्यांना जावून भेटले होते. पुढील काळात माननीय शरदराव पवार यांच्याशी असलेले त्यांचे ऋणानुबंध सर्वश्रृत आहेत. खरे तर मी स्वतःही या दोन्ही नेत्यांचा वैचारिक अनुयायी असल्याने ना.धों. महानोर हे मला परिवारातीलच वाटतात.
श्री महानोर यांनी लिहिलेली ग्रामीण बोलीतील चित्रपट गीते ही मराठी माणसाच्या मनामनात आणि अनेकांच्या ओठावरती रेंगाळताना आपण पाहतो. 'जाळीमध्ये झोंबतोय गारवा', 'श्रावणाचे ऊन मला झेपेना'... अशा अनेक गीतांनी मराठी भावविश्व समृद्ध केले आहे. त्यांच्या 'दूरच्या रानात, केळीच्या बनात' मधील गाणी लोकप्रिय ठरली आहेत. खरे तर महानोर म्हणजे दिलखुलास साहित्यिक, मातीत राबणारा शेतकरी, संवेदनशील माणूस आणि बोलीभाषा जपणारा अस्सल कलावंत आहे. निसर्ग कवी म्हणूनही त्यांचे स्थान खूपच वरचे आहे. मुळातच पळसखेडे हे गाव अजिंठ्याच्या पायथ्याशी वसलेले आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या अजिंठ्याला चिरंजीवी अक्षयशिल्प लाभले आहे. कवी महानोर यांनी आपल्या शब्दांतून, काव्यांतून आणि मातीतून चिरंतन अक्षरशिल्पे साकारली आहेत.
आपल्या कवितेत ते म्हणतात,
ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे
आणि या मातीतून चैतन्य गावे,
कोणती पुण्ये अशी येती फळाला
जोंधळ्याला चांदणे लखडून जावे...
दुसऱ्या एका कवितेत ते म्हणतात-
नदीकाठावर कर्दळीचे बन पाण्यात निथळे
बांधाला लागून गव्हाचे पिवळे शेत सळसळे,
आंब्याच्या झाडाला मोहोराचा वास झेपता झेपेना
गाभुळ्या चिंचेला नवतीचा भार पोटी धरवेना,
माघातले ऊन झेलताना अंग झाले निळेभोर
पाणमळ्यातील शेलाट्या वेलींचे नव्याने उभार,
कोण्या बसंतीचे पाऊल लचके इथे चंद्रगौर
डोळ्यात फुलांच्या राजसपणाचा झडे शिणगार,
कुसुंब्या रात्रीची स्वप्ने वेटाळून होते फुलवण
नदीकाठावर शब्दांत बावरे लयवेडी धून l
अस्सल ग्रामीण बोली आणि कृषी संस्कृतीचे मनोहारी वैभव समर्थपणे शब्दांतून चितारणारे कवी महानोर हे खरे तर निसर्ग चित्रकारच..! त्यांच्या कवितांविषयी किती लिहावे, किती सांगावे ! म्हणूनच की काय त्यांच्या प्रत्यक्ष भेटीमध्ये मी कधीही त्यांच्याशी इतर गप्पागोष्टी केल्या नाहीत. या माणसाचे राहणीमान खऱ्या शेतकऱ्यापेक्षाही साधे आहे. त्यांच्या भेटीमध्ये कधी लौकिकाचा स्पर्श नसतो, पुढारपणाचा आव नसतो, साहित्यिकाचा आविर्भाव नसतो. एक साधा सरळ माणूस उभा राहतो आणि प्रेक्षकांशी बोलू लागतो. आपण फक्त ऐकत रहावे आणि मनमुराद आनंदात डुंबून जावे. त्यांच्या तोंडून बाहेर येणारा एक एक शब्द म्हणजे जणू दाणेदार मोत्यांनी भरलेले एक एक कणीस असते.
पक्षांचे लक्ष थवे, गगनाला पंख नवे
वाऱ्यावर गंधभार भरलेले होते,
झाडातून दबदबले क्षण बहर कांचनाचे
घन वाजत थेंब अमृताचे l
किती सहज सोप्या ओळी आहेत, पण वाचताना आणि ऐकताना अंगातून एक काटा निघून जातो, अशा या रानकवींच्या निसर्ग आणि कृषीतील कविता ऐकताना मन वेडावून जाते. आपल्या शब्द सामर्थ्याच्या वैभवावर त्यांना अनेक पुरस्कार आणि मानसन्मान मिळाले आहेत. भारत सरकारने सन १९९१ मध्ये "पद्मश्री पुरस्कार" देऊन या साहित्यिकाचा गौरव केला आहे. त्याशिवाय महाराष्ट्र शासनाने त्यांच्या कृषी क्षेत्रातील कामगिरीबद्दल १९८५ मध्ये "कृषी भूषण", तर १९९१ मध्ये पाणलोट पर्यावरण क्षेत्रातील कार्याबद्दल "वनश्री" आणि २००४ मध्ये शेती क्षेत्रातील कामगिरीबद्दल "कृषिरत्न पुरस्कार" देऊन गौरविले आहे. त्यांच्या 'पानझड' या पुस्तकाला सन २००० मध्ये 'साहित्य अकादमी पुरस्कार' मिळाला होता.
त्याशिवाय पंजाबराव देशमुख गौरव पुरस्कार, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार, मराठवाडा भूषण पुरस्कार इत्यादी असंख्य पुरस्कारांनी महानोर यांच्या कवितेचा आणि लेखनाचा सन्मान झाला आहे. औदुंबर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली होती. यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी स्मृती साहित्य संमेलनाचेही ते अध्यक्ष होते. पुण्यातील पहिल्या पर्यावरण प्रेमी साहित्य संमेलनाचेही ते अध्यक्ष होते. अशा अनेक साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. ना. धों. महानोर यांची गद्य लेखणी तितक्याच ताकदीची आणि वेगळ्या धाटणीची आहे. महाराष्ट्रातील अनेक नामवंत गायक आणि संगीतकारांनी महानोर यांच्या शब्दांना जिवंत केले आहे. कथा, कविता, गीतलेखन, लोकगीते, व्यक्तिचित्रण, शेतीविषयक विविध प्रकारचे साहित्य निर्मिती त्यांनी केली आहे. जैत रे जैत, एक होता विदूषक, अबोली, मुक्ता, सर्जा, दूरच्या रानात केळीच्या बनात अशा अनेक चित्रपटांसाठी त्यांनी गीते लिहिली आहेत. ते म्हणतात, "कोणत्याही प्रकारचे दुःख असो, ते हरण करण्याचे बळ कविता आणि गीते देतात." अशा या निसर्गभान जागविणाऱ्या संपन्न आणि तरल मनाच्या ग्रामीण संवेदनशील कवीच्या 'रानातल्या कविता', 'वही', 'पावसाळी कविता' हे कवितासंग्रह तसेच 'गांधारी' ही कादंबरी 'गावातल्या गोष्टी' हा कथासंग्रह आणि 'पळसखेडची गाणी' प्रसिद्ध झाली आहेत. आज वयाच्या ऐंशीव्या वर्षीही सतेज वृत्तीचा, तरल मनाचा हा कवी आणि शेतकरी तितक्याच उत्स्फूर्तपणे लेखन आणि शेती दोन्हीमध्ये सजग आहेत, सक्रिय आहेत.
आदरणीय श्री ना.धों. महानोर यांच्या शतायुषी वाटचालीसाठी माझ्या मनःपूर्वक सदिच्छा. माझ्या एका कवितेतील दोन ओळी, या शेती मातीत राबणाऱ्या शेतकरी कवीसाठी -
"माझं ईमान मातीशी,
मातीतल्या माणसांशी
ज्याच्या ठायी माणूसकी,
माझी भावकी त्याच्याशी ll"
🙏
@ अरुण बोऱ्हाडे...✍
(मोबाईल : ९८८१३०१३३९)

Comments
Post a Comment