एच.ए.च्या कामगार लढ्याची संस्मरणीय वीस वर्षे (२) श्रमिक साखळी आणि १४ नोव्हेंबरचे लाक्षणिक उपोषण - अरुण बोऱ्हाडे

 एच.ए.च्या कामगार लढ्याची संस्मरणीय वीस वर्षे (२)


श्रमिक साखळी आणि १४ नोव्हेंबरचे लाक्षणिक उपोषण 

© अरुण बोऱ्हाडे 

दिनांक १ नोव्हेंबर २००३ रोजी सुरु झालेले घंटानाद आंदोलन हळुहळू वाढत गेले. गेले बारा-तेरा दिवस नित्यनेमाने सकाळी, दुपारी आणि सायंकाळी शिफ्टड्युटीप्रमाणे कामगार सहकारी आंदोलन मंडपात येत. सकाळी कंपनी सुरु होण्यापूर्वी काहीवेळ, पुन्हा दुपारी जेवणाच्या सुट्टीत आणि सायंकाळी ४.३० वाजता कंपनीची सर्वसाधारण पाळी सुटल्यानंतर सहा- साडेसहा वाजेपर्यंत सर्वजण घंटानाद करून धरणे मंडपात बसायचे. वृत्तपत्रांतून दररोज येणाऱ्या बातम्या वाचून शहरातील विविध कारखान्यांतील कामगार संघटनांचे पदाधिकारी व कामगार गटागटाने आंदोलनस्थळी येवून आंम्हाला पाठिंबा जाहीर करीत होते. त्याचप्रमाणे सामाजिक संघटनांचेही पदाधिकारी येवून पाठिंबा म्हणून आमच्या धरणे आंदोलनात आमच्यासह बसत होते. दररोज कोणीतरी पाठिंबा देणारी भाषणे करायचे. विविध वृत्तपत्रांचे प्रतिनिधी येवून कामगारांच्या मुलाखती घेत, त्यावेळी आजच्या इतके इलेक्ट्रॉनिक वृत्त वाहिन्या नव्हत्या आणि पत्रकार प्रत्यक्षात जावून बातम्या करीत असत. पोलिस अधिकारी येवून माहिती घेऊन जात असत. शांततेने आणि अहिंसक मार्गाने चाललेले शिस्तबद्ध आंदोलन पाहून त्यांचेही सहकार्य मिळत होते. त्यामुळे साहजिकच आमच्या लढण्यातला उत्साह पदोपदी वाढत होता. मधल्या काळात एकेदिवशी आम्ही एच.ए. कंपनी ते पिंपरी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत आणि तिकडे यशवंतराव चव्हाण पुतळ्यापर्यंत मानवी साखळी अर्थात 'श्रमिक साखळी' तयार करून समाजाचे लक्ष वेधून घेतले. त्यामध्ये सर्व कामगार आणि कुटूंबीय सहभागी झाले होते. हातामध्ये हात घालून महामार्गावर उभे राहून आमची एकजूट दाखविली होती. यावेळी "एच.ए. कंपनी वाचवा, गरीबांचे आरोग्य वाचवा" असे फलक लावले होते. आमच्या आंदोलनाचा आता सर्वदूर गाजावाजा झाला होता. ज्येष्ठ कामगार नेते डॉ. प्रभाकर देशपांडे हेही या श्रमिक साखळीत सहभागी झाले होते.


या आंदोलनाचा संपूर्ण एक महिन्याचा आराखडा आमच्याकडे तयार होता. दररोज संध्याकाळी सातनंतर आम्ही काही पदाधिकारी आणि काही क्रियाशील सभासद कामगार संघटनेच्या कार्यालयात बसून आढावा घेत असू. आणखी काही सुधारणा, उद्याचे नियोजन, पोलिस परवाने, अन्य कामगार नेत्यांशी संपर्क, माध्यमांशी संपर्क अशा विविध कामांच्या जबाबदाऱ्या सोपविल्या जायच्या. आमचे पदाधिकारी ज्ञानेश्वर भूमकर, यशवंत गायकवाड हे कागदपत्रे व पुढील नियोजन करीत. इस्माईल आत्तार व चंद्रशेखर भैलूमे  इतर कारखान्यातील कामगार संघटनांशी संपर्कात राहत असत. तसेच बाबुराव लोंढे, शिवाजी निंबाळकर आणि कार्यकारिणीतील काही सहकारी, माजी पदाधिकारी आमच्याच कंपनीतील कामगारांचे एकूण नियोजन पाहत असत. सर्वजण नियोजनाप्रमाणे जबाबदारी पार पाडीत होते. मी स्वतः व्यवस्थापनाशी, पोलिस यंत्रणेशी, माध्यमांचे प्रतिनिधी व प्रमुख नेत्यांशी संपर्क ठेवून असे. घंटानाद व धरणे आंदोलनाची तीव्रता प्रत्येक दिवशी वाढत होती. तसतसा आमचा ताण वाढत होता, कामही वाढत होते. आंदोलनाच्या काळात कामगारांचे मनोधैर्य सांभाळणे व वाढविणे महत्त्वाचे असते. त्याचवेळी त्यांचा अतीउत्साह आवरणेही जरुरीचे असते. त्याबाबतही योग्य ती काळजी घेत होतो. कंपनीतील अधिकारी संघटनेचे पदाधिकारी श्री बी.एल. गेडाम, एस.टी. कोंबाडे, जी.जे. महाजन इत्यादींशी माझा नित्य संपर्क होता. सर्वांच्याच भवितव्याचा प्रश्न असल्याने अधिकारीही आंदोलनात सहभागी झाले होते. कंपनीतील उत्पादनप्रक्रिया चालू ठेवून, उद्याचा रोजगार टिकून रहावा, यासाठी चाललेले हे आमचे आंदोलन, कदाचित औद्योगिक क्षेत्रात असे प्रथमच घडले असावे.

दरम्यान दिनांक १३ नोव्हेंबरला आम्ही पुण्यातील कामगार आयुक्त कचेरीवर सहकुटूंब मोर्चा काढण्याचे नियोजन केले होते. त्याप्रमाणे कचेरीच्या एकदीड किलोमीटर अलिकडे आम्ही बसने व स्वतःच्या वाहनाने जमलो. आमच्या मोर्चामध्ये पाठिंबा देण्यासाठी इतर काही संघटनांचे प्रतिनिधीही सहभागी झाले होते. हजारोंच्या संख्येने असूनही सर्वजण शिस्तीत घोषणा देत कामगार आयुक्तांच्या कचेरीसमोर मोर्चाने गेलो. सहआयुक्तांना निवेदन दिले आणि मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. माझ्यासह तीनचार जणांनी भाषणे केली. आमच्या लढ्याचे नेमके कारण विषद केले. "एच.ए. कंपनी जगली तर गरीबांना परवडणाऱ्या किंमतीत औषधे मिळतील, सामान्य माणसांसाठी ही कंपनी वाचवा." ही आमची मध्यवर्ती सरकारकडे मुख्य मागणी होती. त्यावेळी झालेल्या भाषणात मी भूमिका स्पष्ट केली आणि एच.ए. कंपनी केंद्रसरकारची असली तरी राज्यसरकारने बघ्याची भूमिका घेऊ नये, असेही स्पष्ट शब्दात सांगितले.

संपूर्ण पुणे शहरात व परिसरात मोर्चाची खूपच चांगली चर्चा झाली. आता थांबून चालणार नव्हते. आमचे आंदोलन नेमके कशासाठी आहे, हे सर्व  नागरिकांना समजणे आवश्यक होते. म्हणून आम्ही वेळोवेळी वृत्तपत्रांतून लेख व बातम्या देण्याची व्यवस्था केली. दरम्यान आमच्या कंपनीतील नाट्यकलाकार प्रकाश पारखी, मुकूंद कानडे, पौर्णिमा जाधव इत्यादींच्या माध्यमातून पथनाट्याची संकल्पना पुढे आली, आम्हांला ती पटली. त्यांच्या संपूर्ण टीमने अल्पावधीत ती संकल्पना यशस्वी करून दाखविली, शहरात विविध ठिकाणी 'आई विकणे आहे' या पथनाट्याद्वारे जनजागृती करण्याचा आम्ही प्रयत्न केला.

आता दिवस उजाडला लाक्षणिक उपोषणाचा, अर्थात १४ नोव्हेंबर २००३. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस. याच दिवशी उपोषण करण्यामागे काही प्रयोजन होते. पंडित नेहरू यांच्या संकल्पनेतून पिंपरीतील हा पेनिसिलीनचा कारखाना (एच.ए.) उभा राहिला होता. देशातील सामान्य जनतेला परवडणाऱ्या किंमतीत जीवनदायी औषधे उपलब्ध व्हावीत, हा त्यामागील त्यांचा उद्देश होता. या कारखान्यात सुरुवातीला साडेतीन ते चार हजार कामगार होते. त्याशिवाय या उद्योगावर अवलंबून असलेल्या इतर सुमारे पाच हजार लोकांना विविध प्रकारे रोजगार मिळत होता. देशात वेळोवेळी आलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या काळात या कारखान्यातील औषधांची मोठी मदत झालेली होती. या कंपनीच्या नफातोट्याशी काहीच संबंध नव्हता. पण सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रीय कर्तव्य बजावित असलेल्या या उद्योगाला काही सरकारी यंत्रणांनी नफ्यातोट्याचे परिमाण लावले आणि कंपनी तोट्यात असल्यामुळे बंदचा फतवा काढला. म्हणून आम्हांला आंदोलनाची भूमिका घ्यावी लागली. याच दरम्यान पंडित नेहरूंचा जन्मदिवस आल्याने आम्ही त्यांना स्मरून लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला.

आंदोलनाच्या मंडपामध्ये आम्ही सुमारे तीनशे स्त्री-पुरुष कामगार व काही अधिकारी कंपनीतून रजा भरून देऊन काळ्या फिती लावून एक दिवसाचे सामुदायिक उपोषण केले. पंडित नेहरूंची एक मोठी पुर्णाकृती प्रतिमा समोर लावली होती. कंपनीच्या उद्घाटनाच्या वेळेच्या काही प्रतिमा समोर लावल्या होत्या. त्यादिवशी आमच्या सहकाऱ्यांनी तिथेही  पथनाट्य सादर केले. एच.ए. शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी आम्हांला पाठिंबा म्हणून काही राष्ट्रभक्तीपर गीते सादर केली. आमच्याच काही कामगार सहकाऱ्यांनी विठ्ठल नामाचा जयघोष करीत टाळ- मृदुंगाच्या निनादात भजने सादर केली. तो संपूर्ण दिवस राष्ट्रभक्ती, ईश्वरभक्ती आणि एकप्रकारे आमची आई असलेल्या एच.ए. कंपनीच्या भक्तीरसाने ओथंबून गेला होता. सायंकाळी आंदोलनाचा संपूर्ण परिसर तुडूंब भरुन गेला होता. लोक कामगार एकजूटीच्या घोषणा देत होते. पाठिंबा देण्यासाठी आलेले इतर कामगार नेते व सामाजिक कार्यकर्त्यांनी आमचे मनोधैर्य व बळ वाढविले होते. जेव्हा जेव्हा असे कुठलेही आंदोलन असते, तेव्हा काही मंडळी 'रस्ता रोको', 'रेल्वे रोको' अशा खूप सुचना देतात, काहीजण आंदोलकांना पेटवून देतात. बोलणारे निघून जातात, आंदोलनकर्त्यांना दीर्घकाळ चटके सोसावे लागतात. असे अनुभव आमच्या डोळ्यांसमोर होते. म्हणून आम्ही योग्य ती काळजी घेतली होती. आंदोलनाचे कारण आणि उद्दिष्ट कामगार वर्गाला पुर्णपणे समजले असल्याने आणि आम्ही सर्व पदाधिकारी सातत्याने त्यांच्याशी संवाद साधून वातावरण आवाक्यात ठेवत होतो. त्यामुळे बाहेरून कितीही गर्दी वाढली किंवा भाषणात कोणी कितीही रक्त पेटविले तरी आमच्या कामगार सहकाऱ्यांनी संघटनेची ठरलेली चौकट कधी ओलांडली नाही. एकूणच आंदोलनात काहीजणांनी तर वृत्तपत्रांतून चुकीच्या बातम्या छापून विचलीत करण्याचा प्रयत्न केला. पण आम्ही कधीही संयम ढळू दिला नाही. आम्हांला सरकारला जागे करायचे होते, आमचे म्हणणे सरकारपर्यंत प्रभावीपणे पोहोचवायचे होते. त्यादृष्टीने आम्ही आंदोलनाची परिणामकता, व्यापकता आणि गांभीर्य वाढवित होतो. त्यादृष्टीने पंडित नेहरूंच्या जन्मदिनी झालेले लाक्षणिक उपोषण हा महत्वाचा टप्पा आम्ही यशस्वीपणे पार पाडला होता. आज त्या गोष्टीला वीस वर्षे पुर्ण झालीत. सर्व आठवणी जाग्या होवून पुढे उभ्या राहिल्या आहेत. आनंद याचाच आहे की, त्या सर्व स्थित्यंतरातून पुढे जात, अनेक हेलकाव्यातून मार्ग काढीत आमची एच. ए. कंपनी आजही चाललेली आहे.

 जयहिंद, वंदे मातरम 

@ अरुण बोऱ्हाडे...✍

(दि. १४ नोव्हेंबर २०२३)

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

श्री नागेश्वर महाराज भंडारा : भक्तिमार्गातील शक्ती स्त्रोत [लेखक : अरुण बोऱ्हाडे]

'शरद पवार : दुःखातही मनाला उभारी देणारा अलौकिक लोकनेता'' : अरुण बोऱ्हाडे

"कष्टकरी कामगारांची, एक अधुरी कहाणी..! सामाजिक चिंतनाचा विषय" लेखकः अरुण बोऱ्हाडे