पवित्र, पावन तरिही प्रदुषित इंद्रायणी - अरुण बोऱ्हाडे
पवित्र, पावन तरिही प्रदुषित इंद्रायणी !🌿
अलिकडेच ऐन दिवाळीत वर्तमान पत्रांतून आणि समाजमाध्यमांतून इंद्रायणी नदीतील फेसाळलेल्या, दुर्गंधीयुक्त पाण्याची छायाचित्रे, बातमीपत्रे वाचनात आली. लहानपणापासून मनामध्ये वसलेल्या पवित्र, पावन इंद्रायणीचे हे प्रदुषित रुप काही नव्याने पाहिले असे नाही. कधी काळेकुट्ट तेलमिश्रित पाणी, कधी मैलामिश्रित पाणी, तर कधी असे फेसाळलेले दुर्गंधाने व्यापलेले पाणी आणि इतरवेळी त्या हिरव्या घनदाट जलपर्णीची वसने पांघरलेली प्रदुषित इंद्रायणी हे चित्र आता अधुनमधून प्रत्यक्षात पहायला मिळते. अनेकदा बातम्यांतून ऐकायला आणि छायाचित्रांतून बघायला मिळते. या सर्व परिस्थितीने मन अस्वस्थ होते, कधीकधी काळीज चिरत जाते. पण इंद्रायणीच्या प्रदुषण नियंत्रण अथवा निर्मूलनासाठी कधी कोणी भरीव काही केल्याचे ऐकिवात नाही.
माझ्या बालवयापासून घरामध्ये, समाजामध्ये, कीर्तनांतून, प्रवचनांतून इंद्रायणीचे पावित्र्य ऐकिवात आहे. कधी भल्या पहाटे आळंदीला ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनाला जावे आणि इंद्रायणीच्या घाटावर बसावे. त्या घाटावर वारकरी शिक्षणासाठी आलेले अनेक विद्यार्थी मन लावून मृदुंगाचा रियाज करीत असतात. प्रत्येकजण आपापल्या लयीत, नादात तल्लीन झालेला असतो. त्यावेळी कानावर येणाऱ्या असंख्य मृदुंगाच्या नादात मन हरपून जाते. मात्र क्षितिजावर सूर्य डोकावू लागला की नजरेत येणारे दृश्य पाहून मन हैराण होते. पहाटेला बरे दिसणारे नदीपात्रातील पाणी काळेकुट्ट दिसू लागते. घाटावरती जागोजाग कचऱ्यांचे ढीग, तर बऱ्याच ठिकाणी घाण आणून टाकलेली, ती एखाद्या जनावराने किंवा पक्षाने विसकटून विद्रुप केलेली दोन्ही तीरांवर आढळून येते. कधीकधी बेवारस जनावरांनी तिथेच कुठेतरी आपला ठिय्या लावलेला असतो. अशातच परगावाहून आलेले भाविकजण भक्तिभावाने या तीर्थक्षेत्री पवित्र स्नानासाठी नदीपात्रात उतरलेले असतात. कधीकधी न राहवून त्यांना सांगावे लागते, नका करू स्नान या पाण्यामध्ये. काहीजण ऐकतात, तर अनेकजण या अस्वच्छ 'तीर्थाचा' आनंद घेतात, तेव्हा मन अस्वस्थ होते. अखेर भावनेपुढे वास्तवाचे भान क्षुल्लक ठरते, अस्वच्छतेपेक्षा त्यांचा मनोभाव सरस ठरतो. आरोग्य की अनारोग्य यापेक्षा तीर्थातील स्नानाचे लाभलेले सद्भाग्य ते मोलाचे मानतात. खूप वर्षांपूर्वी मी इंद्रायणीबाबत काव्यरचना लिहिली होती.
माय माझी इंद्रायणी, जन्म तिच्या कुशीतला
कानी माझ्या संतवाणी, आत्मा इथे सुखावला l
तीर्थक्षेत्र अलंकापुरीची ही पवित्र, पावन सरिता म्हणून इंद्रायणीचे महात्म्य खूप मोठे आहे. माझ्याही मनात इंद्रायणीविषयी अपार श्रद्धाभाव आहे. मी तर तिला अंतःकरणातूनच 'माय' मानतो, तिच्यावर काव्ये लिहितो. त्याच भावनेने सदासर्वदा मी तिला पूजतो. माझ्या एका काव्यसंग्रहाला मी "माय माझी इंद्रायणी" असे नांव दिलेले आहे. देहू-आळंदी पंचक्रोशीतील आम्ही साहित्यप्रेमी मंडळींनी तिच्याच नावाने 'इंद्रायणी साहित्य संमेलन' सुरू केले आहे. आमच्या जीवनातील श्वासाइतकेच अनन्यसाधारण असे तिचे महत्त्व आहे. म्हणूनच इंद्रायणीच्या पात्रातील प्रदुषण, दुर्गंधी आणि काठावरील अस्वच्छता पाहून मनाला अतीव वेदना होतात.
सह्याद्रीच्या कुशीत, मावळभूमीत उगम पावलेली ही इंद्रायणी म्हणजे केवळ नदी नाही, तर महाराष्ट्राच्या अध्यात्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्राचा आत्मा आहे. खरे तर उगमापासून भीमेमध्ये विलीन होईपर्यंतची तिची वाट अवघी १००-११० किलोमीटरची आहे. स्वराज्यनिर्मितीतील मावळची पुण्याई, पुढील वाटेत संतभूमी देहू- आळंदीत अधिक पवित्र होते. पुढे तुळापूरी भीमेशी एकरुप होऊन पंढरीला जाताना ती अधिकच पावन होते. पंढरीशी जाताना तिच्या वाटेतील प्रत्येक गावातील मातीचे कण जणू ती ओंजळीत घेऊन जाते आणि विठूरायाच्या चरणी अर्पिते. त्यावर मी फार पूर्वी लिहिले होते -
माझ्या गावाची रे माती, इंद्रायणी संगे जाते
वाहत्या रे पाण्यामध्ये, चंद्रभागेला मिळते l
चंद्रभागेच्या पाण्यात, वैष्णवांची भेट होते
पंढरीच्या राण्यासाठी, तीच कधी वीट होते ll
संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराजांच्या सानिध्याने, वास्तव्याने आणि तपश्चर्येने इंद्रायणीच्या दोन्ही काठावरील पंचक्रोशीचे महात्म्य संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर भारतभर उजळले आहे. हेच तिचे महात्म्य, पावित्र्य, पुण्यत्व आणि पावनत्व जपणे ही स्थानिक प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि परिसरातील नागरिकांची सामुदायिक जबाबदारी आहे, असे मी मानतो. या इंद्रायणीचा कोंडलेला श्वास मुक्त करण्यासाठी कोणीही कोणाकडे बोट न दाखविता राज्यकर्ता अर्थात प्रशासन, नेता म्हणजे लोकप्रतिनिधी आणि जनता म्हणजेच नागरिक या सर्वांनी मिळून जबाबदारीने कार्याची दिशा ठरवावी आणि इंद्रायणी प्रदुषणमुक्तीचा निर्धार करावा, असे एक नागरिक म्हणून माझे ठाम मत आहे.
महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर पिंपरी चिंचवडला औद्योगिक विस्तार वाढत गेला. औद्योगिक वसाहतींच्या शेजारील गावांतूनही विशेषतः इंद्रायणी नदीच्या दक्षिणेकडील गावांत लहानमोठ्या उद्योगांची, औद्योगिक कंपन्यांची वाढ होत गेली. साधारणपणे मागिल पंचवीस तीस वर्षांपासून इंद्रायणीच्या उत्तर बाजूनेही म्हणजे निघोजे-चाकण औद्योगिकीकरणाचा विस्तार होवून नदीपर्यंत येवून पोहोचला आहे. तळवडे, चिखली आणि मोशी परिसरात असंख्य लहानमोठ्या उद्योगांनी जाळे विणले आहे. कुरुळी, चिंबळी परिसरात मोठमोठी गोडाऊन झालेली आहेत. त्यात भर म्हणजे कुदळवाडी आणि चिखली - मोशी रस्त्यावरील भंगारच्या दुकानांचा झालेला प्रचंड विस्तार, त्यातील अनेक छूपे ज्ञात-अज्ञात व्यवसाय, परिसरातील काही रासायनिक कंपन्यांनी सोडलेले सांडपाणी, महानगरपालिकेच्या मैलानिःस्सारण प्रक्रियेची कमतरता या सर्व गोष्टींनी नदीच्या वाहत्या पाण्याला अक्षरशः घेरले आहे. त्यातून होणाऱ्या विविध प्रकारच्या प्रदुषणाने या नदीचाच श्वास कोंडला आहे. याशिवाय काठावरच्या नागरिकीकरणाने होणारे प्रदुषण वेगळेच ! याचाच अर्थ असा की, या प्रदुषणाला औद्योगिक घटक, रसायने आणि वाढते नागरिकीकरण असे सर्वच घटक जबाबदार आहेत. म्हणूनच सर्वांनीच या विषयाकडे अत्यंत गांभीर्याने पहायला हवे. प्रत्येकाने जर मला काय त्याचे, सरकार बघून घेईल, अशी भूमिका घेतली तर, आज नदीला आलेला फेस भविष्यात आपल्या प्रत्येकाच्या तोंडालाही येवू शकतो. म्हणूनच इंद्रायणीचे पावित्र्य जपणे हेच आपल्यापुढील खरे आव्हान आणि जबाबदारी आहे. त्या आव्हानाला सामोरे जाताना नागरिकांनी प्रथम आपली जबाबदारी ओळखावी. आपण ज्या परिसरात राहतो, त्या भूमीविषयी कृतज्ञता म्हणून, ज्याला जसे शक्य आहे, तसे त्याने तन-मनाचे योगदान द्यावे. लोकप्रतिनिधींनी इथे तरी आपली प्रामाणिक इच्छाशक्ती दर्शवावी. प्रशासनाने नेहमीप्रमाणे केवळ कागदी पत्रावळ्यांत वेळ न दवडता थोडेफार पुण्याईचे काम यानिमित्ताने करावे..jpeg)
एकीकडे महानगरपालिकेला कधी स्वच्छतेसाठी "बेस्ट सिटी पुरस्कार" मिळतो, कधी कुठला गौरव होतो. स्वच्छतेसाठी प्रत्येकवर्षी शेकडो कोटी त्यावर खर्ची पडतात. मात्र शहरातून वाहणाऱ्या पवना, मुळा, इंद्रायणी या नद्या त्याचप्रमाणे या नद्यांना जावून मिळणारे अनेक ओढे-नाले यातील कचरा व राडारोडा याकडे पद्धतशीरपणे दुर्लक्ष केले जाते. शहरात प्रचंड संख्येने होणारी बांधकामे, त्यातून निर्माण होणारा राडारोडा आणि कचरा बेकायदेशीरपणे नदीच्या आश्रयाने टाकला जातो. शहरातील अनेक बांधकाम प्रकल्प आणि महानगरपालिकेचे डोळेझाक करणारी यंत्रणा यांमुळे शहरातील अनेक लहानमोठे ओढेनाले आतापावेतो गायब झालेले आहेत. नद्यांच्या काठावर, कधी पात्रामध्ये शहरातील राडारोडा टाकण्यात येतो. कधीतरी वृत्तपत्रांतून बातम्या प्रसिध्द होतात. पण प्रशासन ठोस उपाययोजना करीत नाही. एखाद दुसरी कारवाई झाली की पुन्हा 'ये रे माझ्या मागल्या !' या प्रकारामुळे शहरात पंचवीस-तीस वर्षांपूर्वी असलेले कित्येक ओढेनाले आठवावे लागतात. त्याचप्रमाणे प्रदुषणाचा नैसर्गिक आविष्कार म्हणजे बेभान वाढणारी जलपर्णी. पवना, मुळा आणि इंद्रायणी या तीनही नदीपात्रांत वाढणाऱ्या जलपर्णीसंदर्भात फार गांभीर्याने कोणी पाहतेय, असे वाटत नाही. प्रतिवर्षी ही जलपर्णी काढण्यासाठी करोडो रुपयांची कंत्राटे दिली जातात. त्यावर कितीजण मालामाल झाले असतील ठाऊक नाही, मात्र जलपर्णी कधी हटली नाही. वास्तविक विज्ञानाची दालने खूप विस्तारली आहेत. जलपर्णीसंदर्भात एखाद्या शास्त्रज्ञांच्या गटाला कामगिरी सोपविली तर, संशोधनातून काही निष्पन्न होवू शकते. एकतर ही वनस्पती कायमची हद्दपार व्हावी किंवा तिच्यावर काही संकरण करून तिची उपयुक्तता शोधावी. एक दीर्घकालीन महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून हे काम हाती घ्यावे. प्रदुषणाच्या मार्गातील ते एक मोठे आव्हान आहे.
मागिल वीस वर्षांमध्ये शहरातील विशेषतः इंद्रायणीच्या परिसरातील नागरिकीकरण झपाट्याने वाढत गेले. अधिकृत गृहप्रकल्प आणि अनधिकृत बांधकामेही मोठ्या प्रमाणात झाली. शहरातील जलनिःस्सारण योजनेची वाढत्या लोकसंख्येच्या आणि वाढलेल्या बांधकामांच्या तुलनेत पुनर्रचना आणि विस्तार करण्याची गरज आहे. अनेक नवीन वसाहतींच्या ठिकाणी या सुविधांची वाणवा आहे, त्यामुळेच नागरिकांनी घरातील स्वच्छतागृहातील मैला व सांडपाणी एकत्रितपणे जोडून मोकळे झालेले आहेत. परिणामी कळत नकळत नदीपात्रांत मैलामिश्रीत पाणी मिसळले जाते. त्याने मोठ्या प्रमाणात पाणी दुषित झालेले आहे, हेही लक्षात घेतले पाहिजे. याप्रकारच्या प्रदुषणाने रोगराईला निमंत्रण दिले जाते. नदीच्या प्रदुषणातील महत्त्वाचा भाग म्हणजे रसायनमिश्रीत सांडपाणी. नदीकाठापासून जवळ असलेल्या किंवा एखाद्या नाल्याच्या परिसरात असलेल्या उद्योगाच्या माध्यमातून रसायनमिश्रीत सांडपाणी सोडले जाते. तेच पाणी अधूनमधून इंद्रायणी, पवनेत डोकावते. त्यामुळेच कधीकधी नदीतील मासे व इतर जलचर मरतात, कधी वनस्पती जळतात. याबाबतीत पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेची यंत्रणा कमकुवत असावी किंवा कामचुकार असावी. विशेषतः देहूपासून थोड्याफार अंतरावर नदीचे पाणी प्रदुषित व्हायला सुरुवात होते. याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना आहे की नाही, हेच कळायला मार्ग नाही. इंद्रायणीचे पाणी आळंदीपर्यंत पांढऱ्या फेसांनी डबडबले असताना महापालिकेची यंत्रणा निद्रीस्त होती काय, असा प्रश्न मनाला भेडसावतो. नदीशेजारील गावांत रसायनांशी संबंधित किती उद्योगधंदे आहेत, त्यांपैकी किती अधिकृत आहेत आणि कितीजणांनी रसायने किंवा त्यांचे रसायनमिश्रीत पाणी थेट नदीच्या पात्रात सोडले आहे. त्यांच्यावर आतापर्यंत काय कारवाई केली होती, हेही यानिमित्ताने कळायला हवे. अर्थात सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आता डोक्यावरून पाणी गेले आहे. कोणावरही दोषारोप करण्यापेक्षा नागरिकांनी आपल्या या पवित्र भूमीशी प्रतारणा करू नये. नदीपात्रात कुठल्याही प्रकारचा कचरा, राडारोडा टाकू नये, याची काळजी घ्यावी. उद्योजकांनी विशेषतः रासायनिक प्रक्रिया वा तत्सम उद्योगांनी आपले रसायनमिश्रीत किंवा तेलमिश्रीत पदार्थ सांडपाण्यात अथवा नदीनाल्यात सोडू नये. त्याऐवजी योग्य त्या शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करावा. प्रश्न केवळ शुद्ध, निर्मळ पाण्याचा नाही. पाण्यातील अनेक जलचरांचाही आहे. निसर्ग नियमाने वाढणाऱ्या वनस्पतींचा आहे. त्यांचीही जपणूक व्हायला हवी. महापालिका, नगरपालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ या शासकीय यंत्रणांनी सतर्क असायला हवे. या यंत्रणांनी वेळोवेळी याची दक्षता घेऊन, संबंधितांना समज द्यावी. आवश्यक वाटल्यास योग्य ती कारवाई करावी. लोकप्रतिनिधींनी प्रदुषण होवू नये म्हणून शासकीय पातळीवर आवश्यक ते नियोजन करावे. नदी बारमाही वाहील यासाठी योजना तयार करावी. नदीचे धार्मिक, अध्यात्मिक महत्व जाणून किमान देहू ते तुळापूर पर्यंत दोन्ही पात्रांकाठी सुशोभीकरण करण्यासाठी पावले टाकावीत. प्रदुषणमुक्त नदीसाठी स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून जनजागृती करावी. जनजागृती झाली तरच नागरिक प्रदुषण होणार नाही याची दक्षता घेतील. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांनी इंद्रायणी स्वच्छ पाण्याने वाहू लागली, तर देहू-आळंदीच्या भूमीत चालणारी किर्तने, प्रवचने आणि भक्तिमार्गाची गोडी अधिकच वाढेल. मला वाटते तीच खरी संतसेवा घडेल. प्रत्येकाने काळजी घेतली तरच पुन्हा एकदा इंद्रायणी निर्मळ रुपाने खळाळत राहील आणि खऱ्या अर्थाने ती स्वच्छ, सुंदर, पावन, पवित्र होऊन पंढरीच्या विठूरायाच्या चरणी जाईल. त्यानंतरच म्हणता येईल-
माय माझी इंद्रायणी, शुद्ध भाव निर्मळ पाणी
भाग्यवान आम्ही सारे, विठूरायाच्या चरणी ll
@ अरुण बोऱ्हाडे (दि. : ३० नोव्हेंबर २०२३)
.jpeg)
Really something to think about and to take action...Nice article
ReplyDeleteमी देखिल पवना माईच्या सानिध्यातच लहानाची मोठी झाले पूर्वी नदीच्या पाण्यात खेळने डुंबने तिच्या पवित्र व शुद्ध पाण्याचा स्पर्श मी अनेकदा अनुभवला आहे परंतु आज तिची झालेली दुरवस्था पाहावत नाही आपल्या लेखनातून माझीच व्यथा मांडली आहे असे वाटते
ReplyDeleteThoughtfull
ReplyDeleteThanks. प्रतिक्रिया देताना कृपया आपले नाव व मोबाईल क्रमांक लिहा.
ReplyDelete