शिव-शंभू चरित्रासाठी आग्रही असलेले लोकनेते यशवंतराव चव्हाण [लेखक - अरुण बोऱ्हाडे ]
शिव-शंभू चरित्रासाठी आग्रही असलेले लोकनेते यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ज्यांना ओळखले जाते, ते कै.यशवंतराव चव्हाण हे इतर कोणत्याही राजकीय , सामाजिक नेत्यांपेक्षा खूपच वेगळे होते. सर्वसामान्यांविषयी असलेली कणव, त्यांच्या उत्कर्षासाठी शासनाच्या माध्यमातून राबविलेल्या विविध योजना, ई.बी.सी. सवलत ही तर त्यांनी गरीब शेतकरी, कामगार, कष्टकरी यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी दिलेली संजीवनी होती. त्याकाळी पैसा सहजतेने उपलब्ध होत नव्हता. खेडोपाडी शिक्षणाचा अंधःकार होता. अशावेळी सामान्य माणसाला शिक्षणातून उभारी देण्याची गरज ओळखून त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात माध्यमिक विद्यालये सुरू करविली. शेती, सिंचन, सहकारी साखर कारखाने याच्याबरोबर कृषीशाळा सुरू केल्या. औद्योगिक विकासाला चालना देताना औद्योगिक प्रशिक्षणाची सर्वदूर सोय करून याच मातीतून कुशल तंत्रज्ञ तयार केले. विकासाच्या कक्षा रुंदावताना शेती, उद्योग, धरणे, यापलिकडे जावून त्यांनी कला, क्रिडा, नाट्य, चित्रपट कलावंत, लोककलावंत यांनाही बळ देण्याची कामगिरी केली. स...