कामगार क्षेत्रातील तळपता तारा : कॉ. दादा रुपमय तथा आर.एम. चटर्जी स्मृतिदिन. [© लेखक : अरुण तुकाराम बोऱ्हाडे]

निःस्वार्थी, नितळ मनाचे आणि लढाऊ बाण्याचे थोर कामगार नेते, दिवंगत कॉम्रेड  रूपमय तथा आर. एम. दादा  चटर्जी यांचा आज स्मृतिदिन. 

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या राष्ट्रीय विचार आणि कार्याशी बांधिलकी मानून कामगार क्षेत्रामध्ये "त्याग, तपस्या, बलिदान" हे ब्रीद वाक्य अंगिकारून,  "टी.यू.सी.सी." म्हणजेच "ट्रेड युनियन कोऑर्डिनेशन सेंटर" ही राष्ट्रीय मान्यता प्राप्त कामगार संघटना कार्यरत आहे. पुणे जिल्ह्यात आणि पिंपरी चिंचवड शहरातील विविध कामगार संघटनेत कार्यरत असणाऱ्या सर्वांना याविषयी माहिती आहे. विशेषतः कॉ. दादा रुपमय तथा आर.एम. चटर्जी यांनी यासाठी दिलेले योगदान सर्वश्रृत आहे.

मी कामगार चळवळीत काम करण्यासाठी जी काही कारणे असतील, त्यामध्ये दादा रूपमय चटर्जी यांच्या नेतृत्वाचा प्रभाव हे देखील एक कारण आहे. मी त्याकाळी नव्यानेच पत्रकारितेत काम करीत होतो. पिंपरीतील महिंद्रा सिंटर्ड या कंपनीतील कामगारांचा दीर्घकाळ संप चाललेला होता. मी वृत्तांकनासाठी आवर्जून त्या ठिकाणी जात असे. कॉम्रेड आर. एम.  चटर्जी यांची अनेक भाषणे मी ऐकली. मी समक्ष भेटून त्यांची वृत्तपत्रासाठी मुलाखतही घेतली होती. त्यांचे सुस्पष्ट विचार, कणखरपणा आणि लढाऊबाणा यांमुळे दादा चटर्जींच्या नेतृत्वाने मला आकर्षित करून घेतले होते. 

पिंपरी चिंचवड औद्योगिक वसाहती मधील अनेक लहान- मोठ्या कंपन्यांमध्ये दादा चटर्जी यांची "पुना वर्कर्स फेडरेशन" ही कामगार संघटना कार्यरत होती. ती टी.यू.सी.सी. संघटनेला संलग्न होती. दादा रुपमय चटर्जी हे अतिशय साधे सरळ आणि सचोटीने काम करणारे कामगार नेते होते. त्याकाळी सायकलवर संपूर्ण शहरात विविध कारखान्यांत चर्चा, बैठका व वाटाघाटी करण्यासाठी ते जात असत. सफेद किंवा किरमीजी रंगाचा सुती कुर्ता, सफेद पायजमा आणि सफेद टोपी असा त्यांचा पेहराव असे.  बोलताना हिंदी, इंग्रजी, मराठी या सर्व भाषांमध्ये ते बोलत असत. कामगारांना समजून घेत भाषणामध्ये  व्यवस्थापनाच्या चुकीच्या गोष्टींवर बोट ठेवून शब्दांचा भडीमार करीत असत.  दादा रुपमय चटर्जी हे मुळचे पश्चिम बंगालमधील. त्यांचे शिक्षण पदवीपर्यंत झाले होते. डमडम-काशीपुर येथील केंद्र सरकारच्या संरक्षण विभागातील दारुगोळा कारखान्यात ते नोकरी करीत होते. त्या   कारखान्यातील कामगारांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध त्यांनी आवाज उठविला. कामगारांना संघटीत करून व्यवस्थापनाला जाब विचारला. व्यवस्थापनाने काही गोष्टी मान्य करून कामगारांना दिलासा दिला. मात्र दादा चटर्जींनी केलेले कामगारांचे नेतृत्व व्यवस्थापनाला मुळीच आवडले नाही. खरे तर ते स्वतः चांगल्या हुद्द्यावर होते. तरीही त्यांनी अन्यायाविरुद्ध दाद मागितलीच. अन्यायग्रस्त कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी दादांनी त्यांना संघटित केले. त्यांची संघटना बांधली. कामगारांना न्याय, हक्क व अधिकारांची त्यांनी  जाणीव करून दिली. कामगारांच्या आत्मप्रेरणा आणि आत्मभान जागृत केले. त्यांना निर्भीड बनवले. इथेच दादा रुपमय तथा आर. एम. चटर्जी यांच्यातील कामगार नेत्याचा  जन्म झाला.  कोणत्याही कारखान्यातील व्यवस्थापनाला नवीन जन्माला आलेला नेता वाढू द्यायचा नसतो, वेळीच  खुडायचा असतो. रोपटे वाढण्यापूर्वीच खुडले म्हणजे त्याची वाढ होत नाही. परंतु काही रोपटी ही खुडण्यासाठी नव्हे, तर वाढण्यासाठीच जन्माला आलेली असतात. एका बाजूने नाही तर दुसऱ्या बाजूने त्याला कोंब फुटतो. त्याचा हळूहळू वृक्ष तयार होतो आणि तो प्रस्थापितांना न्याय हक्कासाठी जाब विचारतो, इतरांना न्याय मिळवून देतो. दादा रुपमय  चटर्जी यांच्याबाबतीतही असेच घडले. कामगारांचे संघटन करतात म्हणून त्यांची डमडम-काशीपूर येथून थेट पुण्याला खडकी येथील ॲम्युनिशन फॅक्टरीमध्ये बदली करण्यात आली. अर्थात बदलीने दादा हरले नाहीत. खडकीतील कामगारांची संघटना त्यांनी बांधली आणि त्यांच्या न्यायासाठी ते व्यवस्थापनाशी संघर्ष करू लागले. कामगारांना न्याय मिळवून देण्याच्या त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नात अडथळे आणण्याचे काम अर्थातच व्यवस्थापनाने केले. त्यांना अवमानित करण्यात आले, प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे छळ करण्यात आला. त्यांना तुरुंगातही पाठवण्यात आले. १९६० मध्ये देशातील सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामध्ये केंद्र सरकारच्या वटहुकूमाविरुद्ध अॅम्युनिशन फॅक्टरीतील कामगारांनी दादा रुपमय चटर्जी यांच्यासह संपात भाग घेतला.  त्यावेळी फॅक्टरी मधील काही कामगारांना बडतर्फ करण्यात आले. दादांनी सरकारशी संघर्ष आणि वाटाघाटी करून बडतर्फ कामगारांना पुन्हा कामावर घेण्यास भाग पाडले. मात्र त्याच वेळी त्यांना स्वतःची नोकरी गमवावी लागली. स्वतःच्या नोकरीची पर्वा न करता त्यांनी यापुढे  कामगारांचे संघटन आणि त्यांचे नेतृत्व करण्याचा निश्चय केला आणि तो आयुष्यभर पाळला. स्वतःची नोकरी गेली तरी आपल्याकडे असलेले ज्ञान, ऊर्जा, प्रेरणा, निस्वार्थीपणा आणि लढाऊबाणा या अलंकारांचे काय ! खरा नेता हेच अलंकार परिधान करीत असतो. दादांनी "पुना वर्कर्स फेडरेशन" ही संघटना स्थापन केली. खडकी पासून पुणे-पिंपरी- चिंचवड औद्योगिक क्षेत्रामध्ये असंख्य कामगार संघटना त्यांच्याशी संलग्न झाल्या. काही कारखान्यांमध्ये पुना वर्कर्स युनियनच्या युनिट नव्याने बांधण्यात आल्या आणि दादा रुपमय चटर्जी यांची  

पुणे-पिंपरी-चिंचवड परिसरातील औद्योगिक पट्ट्यामध्ये एक 'लढवय्या कामगार नेता' म्हणून ओळख झाली. अनेक कामगारांनी दादांचे नेतृत्व स्विकारले. कामगारांच्या प्रश्नांसाठी व्यवस्थापनाला रोखठोक जाब विचारणारा, निःस्वार्थी आणि नीडर नेता, कायद्याचे ज्ञान आणि परिस्थितीचे भान असलेला नेता. वाटाघाटी अथवा बोलणी करताना लबाडी नाही, लाचारी नाही. कामगारांच्या हक्कासाठी लढताना भय अथवा भ्रष्टाचार नाही. अशा प्रकारे दादांची ख्याती वाढत गेली. पिंपरी चिंचवड शहरातील कामगार चळवळीला संघर्ष आणि संघटीतपणाचा आयाम देण्याचे कार्य दादा रुपमय चटर्जी यांच्यामुळे घडले. त्यांची महिंद्रा कंपनीतील कामाची पद्धती, संघर्षाची भूमिका आणि विचारांचा परखडपणा मी स्वतः जवळून पाहिला आणि अनुभवला आहे. दादांनी या शहरात कामगार चळवळीत अनेक कामगार नेते घडविले आहेत. टी.यू.सी.सी. कामगार संघटनेचा पुणे-पिंपरी-चिंचवड परिसरातील विस्तार हा केवळ दादा रुपमय चटर्जी यांच्या नेतृत्वामुळेच झाला. खडकी आणि देहूरोडच्या संरक्षण विभागातील अनेक कारखान्यांत आजही टी.यू.सी.सी. कार्यरत आहे, त्याचेही कारण दादा रुपमय चटर्जी यांच्या नेतृत्वाचा प्रभाव अजूनही टिकून आहे.नेताजी सुभाषचंद्र बोस यांनीही भारतीय कामगार चळवळीत आपले योगदान दिलेले आहे. हे मला यानिमित्ताने नमूद करावेसे वाटते. जमशेदपूर येथील "टाटा स्टील वर्कर्स युनियन"चे नेताजी सन १९२८ ते १९३७ अशी नऊ वर्षे अध्यक्ष होते. त्या कालावधीत त्यांनी कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडून कामगारांच्या  न्याय हक्कांसाठी वाटाघाटी केलेल्या होत्या. कामगार चळवळीत काम करणाऱ्या प्रत्येकासाठी ही घटना प्रेरणादायी आणि भूषणावह आहे. नेताजी सुभाषबाबूंचीच प्रेरणा घेऊन दादा रुपमय चटर्जी कामगार लढ्यात कार्यरत झाले होते. 

सन १९६० च्या दशकामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील औद्योगिकीकरण झपाट्याने वाढू लागले. मात्र त्याच वेळी काही भांडवलदारांनी, कारखानदारांनी मनमानी आणि पिळवणूक सुरू केली होती. अगदी त्याच सुमारास दादा रूपमय चटर्जी यांनी कामगार क्षेत्रामध्ये आपले नेतृत्व उभे केले. अनेक ठिकाणी दादांना पोलिसांकडून आणि काही भांडवलदारांकडून विविध प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न झाला. तो काळ म्हणजे एक प्रकारे संगनमताने होत असलेली दडपशाही, पिळवणूक होती. कामगारांवर होणाऱ्या  अन्यायाविरुद्ध कष्टकरी श्रमिकांच्या न्यायासाठी, हक्कासाठी दादांनी पुकारलेला तो महासंघर्षच होता. त्यांच्या झुंजार आणि निःस्वार्थी नेतृत्वाने पिंपरी-चिंचवड औद्योगिक क्षेत्रामध्ये एक कणखर, निश्चयी आणि बाणेदार नेतृत्व कामगारांच्या हक्कांसाठी उभे राहिले. त्यावेळी एमआयडीसी क्षेत्रामधील लघु उद्योगातील कामगारांना शासनाने ठरवून दिलेले किमान वेतन मिळत नव्हते. तसेच त्यांच्या मुलभूत सुविधा आणि दैनंदिन समस्या यांकडे दादांनी विशेष लक्ष दिले. दादांकडे नेतृत्व असलेल्या एमआयडीसीतील अनेक कंपन्यांमधील कामगारांना किमान वेतन आणि मुलभूत सुविधा प्राप्त झाल्या. काही कारखान्यांमध्ये कामगारांनी संघटना बांधल्या होत्या, परंतु त्यांना  व्यवस्थापनाने मान्यता देण्यास टाळाटाळ केलेली होती. अशा ठिकाणी दादांनी नेतृत्व केल्यानंतर, प्रसंगी मोठा संघर्ष करावा लागला. 

१९७० च्या दशकामध्ये शहरातील काही कारखान्यांमध्ये औद्योगिक अस्वस्थता निर्माण झालेली होती. पगारवाढ, बोनस, इतर सुविधा  इत्यादींच्या मागणीसाठी सतत कुठे ना कुठे संप, घोषणाबाजी, द्वारसभा, लाल झेंडे, काळे झेंडे इत्यादी घटना घडत होत्या. कधीकधी संघटना वेगळी असली तरी दादा रुपमय चटर्जींना कामगार नेते बोलावून घेऊन त्यांचा सल्ला व मार्गदर्शन घेत असत. महिंद्रा ओवेन, डेव्हिड ब्राऊन, एस.के.एफ., स्वस्तिक रबर, बकाऊ वुल्फ इत्यादी कारखान्यांमध्ये संघर्ष व तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. काही ठिकाणी पोलिसांनी कामगारांवर लाठीचार्ज करून कामगार लढे मोडून काढण्याचे प्रयत्न केले. एका लाठीचार्जमध्ये स्वतः दादा रुपमय चटर्जी जखमी झाले होते. सन १९७९ साली बजाज ऑटो मधील कामगार लढ्यात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन कामगार व एका नागरिकाला प्राण गमवावे लागले होते. अशावेळी नेतृत्वाला आपले ज्ञान आणि परिस्थितीचे भान ठेवून, कौशल्य वापरून योग्य निर्णय घ्यावा लागतो. निःस्वार्थीपणे काम करणाऱ्या नेतृत्वाची ही एक कसोटी असते. दादांनी अशा अनेक कसोट्या हाताळल्या होत्या. कधी त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. कधी अपमानितही व्हावे लागले. आपल्या संघर्षमय वाटचालीत ऊन-पावसाच्या अनेक छटा त्यांनी अनुभवल्या. आणीबाणीच्या काळात दादा रुपमय चटर्जी यांना कामगार नेता म्हणून तुरुंगवासही भोगावा लागला होता. दादा रुपमय चटर्जी यांचे जीवन म्हणजे एक समर्पित जीवन होते. एक सायकल, निरोगी शरीर, कणखर मन, काखोटीला विचारांनी भरगच्च भरलेली पिशवी, समोरच्याला शब्दांनी जिंकण्याची ताकद असलेली जीभ, पाणीदार डोळे आणि पारदर्शक स्वच्छ प्रतिमा एवढीच त्यांची संपदा होती. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे राष्ट्रीय विचारांचे मूल्य घेऊन जगणाऱ्या कामगार नेत्याचा निःस्वार्थी संघर्ष, लढाऊबाणा आणि कणखरपणा काही भांडवलशाही विचारांना मानवणारा आणि पेलवणारा नव्हता. हजारो कामगारांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी प्रामाणिकपणे केले. औद्योगिक क्षेत्रात अनेक कामगार कार्यकर्ते त्यांच्या सानिध्यात तयार झाले. अशा या झुंजार आणि निःस्वार्थी कामगार नेतृत्वाची कर्तबगारी काही तत्वहीन भांडवलदारांना रुचली नव्हती. काही मतलबी व स्वार्थी मंडळींना त्यांचे नेतृत्व त्रासदायक वाटत होते. त्यामुळे नकळत दादांचे हितशत्रूही तयार झाले होते.

दिनांक ३० डिसेंबर १९८३ यादिवशी भोसरीतील एका कारखान्यात वाटाघाटींसाठी नेहमीप्रमाणे सायकलवरून जात असताना समोरून येणाऱ्या एका  वाहनाशी त्यांचा अपघात झाला आणि दादा चटर्जी गंभीर जखमी झाले. अपघातानंतर त्यांना पुण्यातील रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथून  मुंबईला बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. आठवडाभर मृत्यूशी झुंज देत हा कणखर कामगार नेता तिथेही नियतीशी लढत राहिला. डॉक्टरांची सर्वोतोपरी प्रयत्नांची पराकाष्ठा चालू होती, हजारो कामगार दादांच्या जीवनासाठी प्रार्थना करीत होते. तथापि असंख्य कष्टकरी कामगारांच्या जीवनात प्रकाशाचे चांदणे पेरणारा हा तारा अखेरीस मावळतीला गेला. नियतीच्या खेळामध्ये त्यांना हार पत्करावी लागली आणि दिनांक सहा जानेवारी १९८४ रोजी या उत्तुंग नेतृत्वाचा श्वास कायमसाठी थांबला. कॉम्रेड दादा रुपमय चटर्जी अनंताच्या प्रवासाला गेले. हजारो कामगारांनी साश्रूनयनांनी त्यांना श्रद्धांजली अर्पिली. अनेक कारखान्यांसमोर श्रद्धांजली सभा झाल्या. 'शहीद कॉम्रेड दादा चटर्जी अमर रहे ' च्या घोषणांनी आसमंत दुमदुमला.

पुणे, खडकी, भोसरी, पिंपरी, चिंचवड, देहूरोडपर्यंत सायकलवरून निर्धास्तपणे फिरणारे कॉम्रेड दादा रुपमय तथा आर. एम. चटर्जी पुन्हा कुठेही दिसले नाहीत. कामगार क्षेत्रातील एक तळपता तारा कायमचा मावळला होता.पुढे अनेक वर्षे औद्योगिक क्षेत्रामध्ये कॉम्रेड दादा रुपमय तथा आर. एम. चटर्जी यांच्या अपघाताविषयी  उलट सुलट चर्चा कानावरती येत होत्या. परंतु सर्वच गोष्टींना न्याय मिळतोच असे नाही. शहीद दादा चटर्जी यांच्या अपघाती मृत्यूला कोण जबाबदार होते, याचे उत्तर काळाच्या उदरातच राहिले, ते आजपर्यंत मिळाले नाही. पुढे काही वर्षांनी टी.यू.सी.सी.च्या कामगारांनी पुढाकार घेऊन भोसरी औद्योगिक क्षेत्रामध्ये, पूर्वीच्या फिलिप्स कंपनीच्या चौकात दादांचा पूर्णाकृती पुतळा उभारून त्यांच्या स्मृती जपण्याचे काम केले आहे. प्रत्येक वर्षी सहा जानेवारी रोजी शहरातील हजारो कामगार त्या ठिकाणी जमतात आणि शहीद दादा रुपमय चटर्जींना आदरांजली अर्पण करतात. आपल्या कार्याप्रति तेथून प्रेरणा घेऊन जातात. कामगार क्षेत्रातील एक कार्यकर्ता म्हणून मीदेखील दरवर्षी त्या ठिकाणी जात असतो. मध्यंतरी तीन नोव्हेंबर २०१८ रोजी पिंपरी चिंचवड शहरातील आणि पुणे जिल्ह्यातील सर्व उद्योगांतील कामगारांच्या प्रश्नांसाठी आयोजित केलेल्या पहिल्या कामगार परिषदेच्या व्यासपीठाला ''कॉम्रेड दादा रुपमय चटर्जी व्यासपीठ'' असे नामकरण करून, दादांच्या कामगिरीला आणि स्मृतींना आम्ही कार्यकर्त्यांनी त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली. कामगारांच्या न्याय व हक्कांसाठी निःस्वार्थीपणे लढलेल्या या निःस्वार्थी, निर्भयी आणि निश्चल  कामगार नेत्याला माझा 'लाल सलाम' आणि विनम्र आदरांजली. 

@ अरुण बोऱ्हाडे (कामगार नेते)

* * *

पूर्वप्रसिद्धी : अक्षरप्रतिमेतील प्रज्ञावंत, 

लेखक -अरुण बोऱ्हाडे, संवेदना प्रकाशन, पुणे दि.२४/१२/२०२२

संपर्क : 9881301339 

मेल : atborhade@gmail.com

Comments

Popular posts from this blog

श्री नागेश्वर महाराज भंडारा : भक्तिमार्गातील शक्ती स्त्रोत [लेखक : अरुण बोऱ्हाडे]

'शरद पवार : दुःखातही मनाला उभारी देणारा अलौकिक लोकनेता'' : अरुण बोऱ्हाडे

"कष्टकरी कामगारांची, एक अधुरी कहाणी..! सामाजिक चिंतनाचा विषय" लेखकः अरुण बोऱ्हाडे