बुद्धिमत्तेला ध्येयवादाची साथ पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील - [लेखक - अरुण बोऱ्हाडे]

बुद्धिमत्तेला ध्येयवादाची साथ 

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील

@ लेखक : अरुण बोऱ्हाडे (मोशी, पुणे)

कोल्हापूरच्या मातीत जन्मलेले, लाल मातीच्या मुशीत घडलेले शिक्षणप्रेमी व्यक्तिमत्व, बिहार आणि त्रिपुराचे माजी राज्यपाल मा. ज्ञानदेव यशवंतराव तथा डॉ. डी. वाय. पाटील यांची आज सकाळी वयाच्या ९२ व्या वर्षी कोल्हापूर येथे प्राणज्योत मालवली. शैक्षणिक क्षेत्रात विशाल कामगिरी केलेले एक ध्येयवादी, कर्तबगार आणि दिलदार व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले. या लेखात त्यांच्या व्यक्तिमत्वाचा थोडक्यात धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

कोल्हापूर जिल्ह्यातील कसबा बावडा हे त्यांचे मुळगाव. दि. २२ ऑक्टोबर १९३५ रोजी एका सधन शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच हुशार आणि जिद्दी स्वभाव असलेले दादा शालेय जीवनात अभ्यासात गतिमान आणि आचरणात नीतिमान होते. अध्यात्माची गोडी असलेले वडील यशवंतराव यांनी 'ज्ञानदेव' हे नाव ठेवले. सुशील व सात्त्विक आई वत्सलाबाई. लहान असतानाच त्यांचे मातृछत्र हरपले. त्याही स्थितीत त्यांनी कसबा बावडा येथे शालेय शिक्षण आणि कोल्हापूर येथे बीए, एलएल.बी. आणि एमएपर्यंतचे शिक्षण घेतले. लहानपणापासूनच बुद्धिमान असलेल्या 'ज्ञानदेवांना' वाचनाची आणि कुस्तीची आवड होती. ती त्यांनी कायम जपली. सोबतीला सामाजिक क्षेत्रांतील आपली आवड जपायला सुरुवात केली. तारुण्याला आकार देताना गावातील शेतकऱ्यांची सहकारी सोसायटी, ऊसउत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न अशा सार्वजनिक विषयांत त्यांचे मन लक्ष घालू लागले. जीवनाची दिशा ठरविण्याच्या काळातच १९५४ मध्ये पितृछत्र हरपले. मात्र उगवत्या सूर्याच्या कक्षा हळूहळू विस्तारत जातात, त्याप्रमाणे या युवा कार्यकर्त्याची ख्याती पंचक्रोशीत वाढू लागली. त्याच वेळी युवक काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी आपली कार्यकक्षा जिल्हास्तरावर वाढविली. त्या काळातील उच्चशिक्षित आणि कार्यकुशल कार्यकर्ता म्हणून त्यांचा सर्वत्र लौकिक वाढला. मुळातच शिक्षणाची आवड असल्यामुळे कसबा -बावडा शिक्षण संस्थेचे अध्यक्षपद त्यांच्याकडे आले. तत्कालीन काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते राजारामबापू पाटील यांच्या संपर्कात राहून त्यांनी राजकारणात पायाभरणीला सुरुवात केली. कोल्हापूर नगरपालिकेच्या माध्यमातून सुरुवात करून त्यांनी राज्याच्या विधानसभेत प्रवेश मिळविला. सन १९६७ मध्ये आणि पुन्हा १९७२ मध्ये ते विधानसभेवर निवडून गेले. शांत, संयमी आणि प्रगल्भ वैचारिक क्षमता असल्याने अल्पावधीतच त्यांनी काँग्रेस पक्षातील सर्वोच्च नेत्यांपर्यंत आपली स्वतःची ओळख निर्माण केली. दरम्यान, १९७५ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध मौनी विद्यापीठाचे अध्यक्षपद त्यांच्याकडे आले. त्याकाळी अडचणीत असलेल्या शिक्षण संस्थेला सावरण्याची जबाबदारी दादांनी पेलली.

सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी करीत असताना राजकारण मात्र गढूळ होत गेले. सन १९७८ आणि १९८० मधील निवडणुकीतील काही राजकीय डावपेचांनी दादांना पराभव पत्करावा लागला. तेव्हाच त्यांनी राजकारणाचा पुनर्विचार केला आणि काही काळ थांबण्याचा निर्णय घेतला. उगवतीला प्रकाशकिरणे देणाऱ्या सूर्यालाही कधी कधी ढगाळ वातावरणात किंचित अंधुकता स्वीकारावी लागते. मनुष्याच्या जीवनप्रवासात देखील एखादी वेळ अशी येते, की तीच वेळ आयुष्याचे सप्तरंगी इंद्रधनुष्य बनून पुढे उभी राहते, फक्त ती वेळ जाणता आली पाहिजे. त्यासाठी संयम बाळगावा लागतो.

सन १९८३ मध्ये, तत्कालीन मुख्यमंत्री ना. वसंतदादा पाटील यांनी राज्यातील तरुणांसाठी अभियांत्रिकी शिक्षणाचे दालन खुले केले. महाराष्ट्रात खासगी अभियांत्रिकी महाविद्यालये आणि तंत्रनिकेतनांबाबत धोरणात्मक निर्णय घेतला. त्या निर्णयाच्या परिणामस्वरूप अनेकांनी खासगी अभियांत्रिकी महाविद्यालये सुरू करण्यासाठी प्रस्ताव दिले. मात्र, शिक्षणक्षेत्रात मनापासून काम करणाऱ्या डॉ. डी. वाय. दादांना स्वतः मुख्यमंत्री ना. वसंतदादा पाटलांनी बोलावून घेऊन खासगी विनाअनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालये चालू करण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यानुसार १९८३-८४ मध्ये त्यांनी प्रथमतः पिंपरी व कोल्हापूर येथे खासगी अभियांत्रिकी महाविद्यालये सुरू केली. पुढे १९८८ मध्ये खासगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालय सुरू केले. त्यानंतर ही शाखाविस्ताराची घोडदौड अखंडपणे सुरूच राहिली.

सन १९८०-९० च्या दशकातील महाराष्ट्रातील सामाजिक, आर्थिक परिस्थिती आणि सध्याची सामाजिक, आर्थिक परिस्थिती याचा विचार करता दोन्हींमध्ये प्रचंड तफावत आढळून येते. त्या काळी एकीकडे महाराष्ट्राच्या औद्योगिकीकरणाचा चढता आलेख आणि दुसरीकडे अभियांत्रिकी महाविद्यालयांचा तुटवडा असे व्यस्त प्रमाण होते. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची, कामगारांची, मध्यमवर्गीयांची मुले अभियांत्रिकी शिक्षणापासून वंचित राहू नयेत. तसेच ज्यांची शैक्षणिक क्षमता व आर्थिक कुवत आहे, अशांना या शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकारने खासगी विनाअनुदानित तत्त्वावर ही महाविद्यालये काढण्याचे धोरण राबविले. या विषयी मत-मतांतरे असू शकतात, मात्र काही सहकारी संस्थांनी विशेषतः सहकारी साखर कारखान्यांनी ही महाविद्यालये सुरू केल्याने असंख्य शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना याचा लाभ झाला. महाराष्ट्रात डॉ. पतंगराव कदम, डॉ. डी. वाय. पाटील, डॉ. कमलकिशोर कदम इत्यादी मंडळींनी पुढाकार घेऊन हे शिक्षणाचे जाळे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही पसरविले. देशातील लाखो विद्यार्थ्यांना याचा फायदा झाला. त्या माध्यमातून लक्षावधी अभियंते महाराष्ट्रामध्ये उपलब्ध झाले. महाराष्ट्रातच नव्हे, तर जगभर या मुलांना नोकरी आणि व्यवसायाची संधी उपलब्ध झाली. महाराष्ट्राच्या मागील तीस वर्षांतील आर्थिक, सामाजिक जडणघडणीत या खासगी अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालयांचा लक्षणीय वाटा आहे, हेही आपण लक्षात घेतले पाहिजे. म्हणूनच या क्षेत्रामध्ये डॉ. डी. वाय. दादा यांनी केलेली कामगिरीसुद्धा महत्त्वपूर्ण आहे. सारासार विचार करता महाराष्ट्रातील आणि देशातील विद्यार्थ्यांना बदलत्या काळानुरूप व्यावसायिक शिक्षण देण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे, याची नोंद घ्यावी लागेल. किंबहुना डॉक्टर डी. वाय. दादा हे तर या शिक्षण क्षेत्रातील अध्वर्यूच म्हणावे लागतील.


आज आपल्याला त्यांचे वैभव किंवा साम्राज्य आणि एकूणच शैक्षणिक संस्थांचा विस्तार दिसत असला, तरी पस्तीस-चाळीस वर्षांपूर्वीची परिस्थिती निश्चितच अनंत अडचणींना सामोरे जाऊन उभे राहण्याची होती, हेही लक्षात घेतले पाहिजे. विशेषतः डी. वाय. दादा यांच्याबाबतीत विचार केला, तर त्यांची काही गुणवैशिष्ट्ये आपल्या लक्षात येतील. त्यांच्या बुद्धिमत्तेबरोबर दूरदृष्टी आणि कमालीची चिकाटी आहे. त्यांचे ध्येय आणि ध्यास दोन्हीही विशालतम आहे! माझा त्यांच्याशी अनेक वर्षांचा वैयक्तिक जिव्हाळा होता. अनेकदा त्यांच्याशी सहज गप्पांचा योग आला. भेटीनंतर विविध विषयांवर मनमोकळी चर्चा करायचे. दादा मूलतः अध्यात्म मानणारे, मैत्रीला महत्त्व देणारे आणि माणुसकी जपणारे होते. राजकारणात राहून कदाचित जे शक्य झाले नसते, ते त्यांनी शिक्षण क्षेत्रात राहून साध्य केले. त्यांच्याशी बोलताना एक शांत आणि संयमी व्यक्तिमत्त्व आपल्या लक्षात येते. सुदैवाने मला दादांना अनेकदा भेटण्याचा, संवाद साधण्याचा योग आला आहे.

साधारणपणे सन २००४ मध्ये पिंपरीगावात माझे मित्र डॉ. अमरसिंह निकम यांच्या नव्याने सुरू झालेल्या आदित्य होमिओपॅथी हॉस्पिटलमध्ये दादा आले होते. केवळ होमिओपॅथीचे उपचार करणारे डॉ. अमरसिंह निकम यांच्या कर्तृत्वाचा भारतभर असलेला लौकिक ऐकून आवर्जून त्यांचे कौतुक करायला आलेले आणि त्यांच्या विषयी सखोल माहिती घेणारे डॉ. डी. वाय. दादा हे एक आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व, त्या वेळेपासून माझ्या मनात कायमचे घर करून राहिले आहेत. त्या घरगुती मैफिलीत बोलताना त्यांनी त्यांच्या आयुष्याचा पट उलगडला होता. मी, डॉ. निकम आणि माझे मित्र ज्ञानेश्वर वायकर एवढीच आमची मैफल, हॉस्पिटलच्या वरच्या मजल्यावरील डॉ. निकमांच्या घरात आम्ही कॉफी घेत बसलो होतो. त्यावेळी खूप दिलखुलास गप्पा रंगल्या होत्या. उत्तुंग व्यक्तिमत्त्व असलेले दादा अतिशय शालीनतेने त्यांच्या जीवनातील काही पैलू उलगडून सांगत होते."कोल्हापूरला शाळेत असतानाच माझी खरी जडणघडण झाली. नियमित व्यायामाने शरीरप्रकृती सुदृढ झाली आणि नियमित अभ्यासाने बुद्धिमत्ता विकसित झाली. गणितासारख्या कठीण विषयात दोनशेपैकी १९८ गुण मिळाले, तरी शिक्षकांची बोलणी खाणारा मी विद्यार्थी आहे...!" दादा त्यांच्या जुन्या आठवणींना स्पर्श करीत शांतपणे आमच्याशी बोलत होते. 

आपले वैभवशाली कर्तृत्व, नावलौकिक आणि अमाप ऐश्वर्य याचा लवलेशही त्यांच्या वागण्यात नसतो. पिंपरीतील भेटीपूर्वी मला त्यांना मुंबईत भेटीचा योग आला होता. त्यानंतर काहीवेळा मी त्यांना भेटत असे. मध्यंतरी तीनचार वर्षांपूर्वी मी, श्रीकांत जाधव आणि संतोष घुले दादांना भेटायला मुंबईला गेलो होतो. त्यानंतरच्या एका भेटीच्या वेळी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील हेही उपस्थित होते. तेव्हाही या दोन्ही मोठ्या व्यक्तित्वांच्या अनुभवाच्या पोतडीतून अनेक गोष्टी ऐकता आल्या. विशेष म्हणजे प्रत्येक वेळी दादांनी आमच्याबरोबर बसून चहा-नाश्ता केला. आपुलकीने संवाद केला.


डॉ. डी. वाय. दादांनी आयुष्यभर केलेल्या सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरीबद्दल भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याचा मुलगा; स्वतः शिक्षण घेऊन शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांनी घेतलेली भरारी निश्चितच अभिमानास्पद आहे. त्यांनी स्थापित केलेल्या शैक्षणिक संस्थांचा कार्यभार आता विद्यापीठांमध्ये रूपांतरित झाला आहे. 'पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठां 'मध्ये सर्व प्रकारच्या आधुनिक शैक्षणिक शाखा व सुविधा उपलब्ध आहेत. त्यांच्या नावाची तीन स्वतंत्र विद्यापीठे कार्यरत आहेत. त्यांच्या शैक्षणिक संस्थांच्या केवळ आकडेवारीवर नजर फिरविली, तरी आश्चर्य वाटते. एकाच जन्मात एक माणूस काय काय निर्माण करू शकतो. नव्हे, शिक्षण क्षेत्रात एक वेगळे विश्वच उभे केलेले पाहून त्यांच्या कर्तबगारीपुढे आपसूक माथा झुकतो. आपल्या बुद्धिमत्तेला ध्येयवादाची, जिद्दीची आणि अथक परिश्रमाची साथ देऊन त्यांनी कर्तबगारी सिद्ध केली आहे. आता त्यांनी सर्व कार्यभार आणि जबाबदारी पुढील पिढीकडे सुपूर्त केली आहे. त्यांचे सुपुत्र सतेज ऊर्फ बंटी पाटील, अजिंक्य पाटील आणि कन्या सौ. भाग्यश्रीताई पी. डी. पाटील यांच्याकडे कारभार विभागून देण्यात आला आहे. त्या सर्वांनीच दादांच्या लौकिकाला साजेसे योगदान दिले आहे.

 'पद्मश्री ज्ञानदेव यशवंतराव पाटील' यांनी नावाप्रमाणेच 'ज्ञानदाना'च्या क्षेत्रात 'यशवंत' कामगिरी करून, भारतभर शिक्षणाची 'पाटीलकी' गाजविली आहे, ही निश्चितच भूषणावह बाब आहे. शिक्षण क्षेत्रात लौकिक मिळविलेल्या डॉ. डी. वाय. दादांची नोव्हेंबर २००९ मध्ये त्रिपुरा राज्याचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली. सन २०१३ पर्यंत त्यांनी ही जबाबदारी सांभाळली. त्याच दरम्यान बिहार आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणूनही त्यांच्याकडे जबाबदारी होती. आपल्या कारकिर्दीत दादांनी तिथेही आपल्या कामगिरीचा ठसा उमटविला आहे. विशेषतः बिहारमधील शिक्षण संस्थांना शिस्त लावण्याची कामगिरी त्यांनी केली आहे. राज्यपाल म्हणून त्यांनी नाममात्र फक्त एक रुपया मानधन स्वीकारले होते, हे कोणाला ठाऊक नसेल. 

औदार्य आणि दातृत्व हे तर दादांचे मोठे गुण आहेत. माझ्यासारखा लहान कार्यकर्ता दादांच्या प्रेमात पडतो आणि सहजतेने त्यांना भेटू शकतो. तरुण पिढीच्या कर्तृत्वाचे त्यांना विलक्षण कौतुक वाटत असे. एखाद्या क्षेत्रात चांगली कामगिरी केलेल्या तरुणांना दादा खूप प्रेमाने जवळ करत, ही गोष्ट मीही अनुभवली आहे. मध्यंतरी गिर्यारोहक श्रीकांत जाधव याच्यासह मी मुंबईला दादांना भेटायला गेलो. त्या वेळी त्यांनी स्वतःहून त्याच्या परदेशातील गिर्यारोहण मोहिमेसाठी आर्थिक साहाय्य देऊ केले. त्याची जडणघडण कुठे झाली, ती माहिती विचारली. त्यानेही कृतज्ञपणे त्याच्या गावातील शाळेची माहिती दिली. डी. वाय. दादांनी तात्काळ त्या शाळेसाठी काय मदत करता येईल, ती माहिती घेऊन अहवाल देण्याच्या सूचना त्यांच्या संस्थेच्या संबंधित व्यक्तीला दिल्या. खेड्यापाड्यातील मुलांनी स्वतःला घडविले पाहिजे, हा त्यांचा दृष्टिकोन. त्यांच्यातील संवेदनशील माणूस सदैव जागृत असे. माणुसकीचा झरा ओथंबलेला असे. माणसांत राहणे, माणूसपण जपणे, माणसांना प्रेम देणे ही त्यांची गुणवैशिष्ट्ये कायमसाठी आपल्या स्मरणात राहतात. गेले काही महिने प्रकृती अस्वस्थ असल्याने ते कोल्हापूरलाच राहत होते. आज सकाळी आदरणीय डी. वाय. दादा गेल्याची बातमी ऐकली आणि त्यांच्या सर्व आठवणी स्मृतिपटलावर उमटल्या.

महाराष्ट्रातील या कर्तबगार व्यक्तिमत्वाला भावपूर्ण श्रद्धांजली.

--@ अरुण बोऱ्हाडे (मोशी, पुणे) [ईमेल - atborhade@gmail.com]

Comments

  1. मा. नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते अरुण तुकाराम बोऱ्हाडे यांच्या वतीने डॉ. डी. वाय. पाटील यांच्या जीवनकार्याला उजाळा देणारा माहितीपूर्ण लेख आणि
    ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, माजी राज्यपाल आणि समाजसेवक पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील (ज्ञानदेव यशवंतराव पाटील) यांना
    भावपूर्ण श्रद्धांजली...

    ReplyDelete
  2. धन्यवाद सर आपल्या लेखणीतून शिक्षणतज्ञ पद्मश्री डॉ. डी.वाय पाटील सर यांच्या जीवनाचे अनेक पैलू समजून घेता आले.🙏

    ReplyDelete
  3. नितीन कळमशेरे, शेगाव5 August 2026 at 19:38

    आपण दिलेल्या पद्मश्री डी. वाय.दादांचा जीवन परिचय व त्यांचे महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रातील मोलाचे योगदान प्रेरणादायी व्यक्तिमत्व पाहून त्यांच्या कर्तुत्वाला मनापासून आदर करून त्यांना भावपूर्ण शद्धांजली 🌷

    ReplyDelete
  4. माहिती पूर्ण लेख ,अनेक लोकांना डी वाय पाटील यांची माहिती नसेल त्यांच्यासाठी फारच परिपूर्ण माहिती देणारा लेख.
    भावपूर्ण श्रद्धांजली

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

श्री नागेश्वर महाराज भंडारा : भक्तिमार्गातील शक्ती स्त्रोत [लेखक : अरुण बोऱ्हाडे]

'शरद पवार : दुःखातही मनाला उभारी देणारा अलौकिक लोकनेता'' : अरुण बोऱ्हाडे

"कष्टकरी कामगारांची, एक अधुरी कहाणी..! सामाजिक चिंतनाचा विषय" लेखकः अरुण बोऱ्हाडे