शिव-शंभू चरित्रासाठी आग्रही असलेले लोकनेते यशवंतराव चव्हाण [लेखक - अरुण बोऱ्हाडे ]

 शिव-शंभू चरित्रासाठी आग्रही असलेले लोकनेते यशवंतराव चव्हाण

      महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ज्यांना ओळखले जाते, ते कै.यशवंतराव चव्हाण हे इतर कोणत्याही राजकीय , सामाजिक नेत्यांपेक्षा खूपच वेगळे होते. सर्वसामान्यांविषयी असलेली कणव, त्यांच्या उत्कर्षासाठी शासनाच्या माध्यमातून राबविलेल्या विविध योजना, ई.बी.सी. सवलत ही तर त्यांनी गरीब शेतकरी, कामगार, कष्टकरी यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी दिलेली संजीवनी होती. त्याकाळी पैसा सहजतेने उपलब्ध होत नव्हता. खेडोपाडी शिक्षणाचा  अंधःकार होता. अशावेळी सामान्य माणसाला शिक्षणातून उभारी देण्याची गरज ओळखून त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात माध्यमिक विद्यालये सुरू करविली. शेती, सिंचन, सहकारी साखर कारखाने याच्याबरोबर कृषीशाळा सुरू केल्या. औद्योगिक विकासाला चालना देताना औद्योगिक प्रशिक्षणाची सर्वदूर सोय करून याच मातीतून कुशल तंत्रज्ञ तयार केले. विकासाच्या कक्षा रुंदावताना शेती, उद्योग, धरणे, यापलिकडे जावून त्यांनी कला, क्रिडा, नाट्य, चित्रपट कलावंत, लोककलावंत यांनाही बळ देण्याची कामगिरी केली. साहित्य संस्कृती मंडळाची निर्मिती, मराठी भाषेच्या सखोल ज्ञान- माहिती- संपादनासाठी  विश्वकोष मंडळाची स्थापना या त्यांच्या कामगिरीला तोड नाही. थोर विचारवंत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यावर ती कामगिरी सोपविली. मराठी भाषेसाठी केलेली ती सर्वोच्च कामगिरी  ठरली आहे. 
    कै. यशवंतराव चव्हाण हे दूरदृष्टीचे प्रज्ञावंत नेतृत्त्व होते. भौतिक विकासाबरोबर माणसाचा बौद्धिक विकास झाला तरच राज्याचा उत्कर्ष साधेल, ही त्यांची धारणा होती. मराठी भाषा, संस्कृती, मराठ्यांचा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि त्यांच्या पूर्वजांच्या इतिहासावर त्यांनी अधिक भर दिला. त्याविषयी त्यांनी काही लेखकांना, इतिहास  संशोधकांना व अभ्यासकांना प्रोत्साहन दिले, पाठबळ दिले. 
       छत्रपती शिवाजीमहाराज हे आपले स्फूर्तिस्थान आहे, त्यांच्या शौर्याची गाथा जनसामान्यांना समजली पाहिजे, यासाठी ते आग्रही होते. थोर इतिहास संशोधक व शिवचरित्राचे लेखक वा.सी.बेंद्रे सर यशवंतराव चव्हाण यांच्याविषयी आपल्या प्रत्येक पुस्तकाच्या प्रस्तावनेत अतिशय कृतज्ञतापूर्वक लिहितात. त्यातील काही भाग येथे संक्षिप्त रुपात देत आहे, "श्री. यशवंतरावजींच्या आदेशाप्रमाणे व सूचनान्वये शिवाजी महाराजांच्या चरित्र लेखनास सुरुवात केली. सन १९७१ च्या सुरुवातीस हे चरित्रलेखन पुरे झाले. ही हस्तलिखित प्रत श्री. यशवंतरावजींस दाखवावी म्हणून ते मुंबईस आले असता दाखविण्यास नेली. ती त्यांनी ठेवून घेतली व दुसरे दिवशी भेटण्यास सांगितले. दुसरे दिवशी माझी हस्तलिखित प्रत व माझी कल्पना नसताना, १५,००० रुपये माझे हाती दिले आणि छपाई जलद करून घेण्यास सांगितले.  प्रकाशनाची सर्व जबाबदारी श्री. वा. वि. भट यांचेवर सोपविली. त्यांनी आपल्या छापखान्यात शिवचरित्राचे दोनही खंड छापून घेतले. नंतर सन १९७२ च्या एप्रिल महिन्यात ते श्री. यशवंतरावजींनीच प्रकाशित केले."
     आज मान्यताप्राप्त शिवचरित्र म्हणून वापरली जातात, ते लिहिण्यासाठी सिद्धहस्त लेखक आणि संशोधक वा.सी.बेंद्रे यांना खरे पाठबळ यशवंतराव चव्हाण साहेबांनी दिले. तेच दुसऱ्या एका प्रस्तावनेत लिहितात, "....संभाजीच्या चरित्रप्रकाशनाचे कार्य आवाक्याबाहेरचे व त्यातील औत्स्युक्य मावळलेले असल्याने श्री. यशवंतरावांनी संभाजीचरित्र प्रकाशनाबाबत बोलणे काढले असताही चरित्र लिहून होण्यास अवधी आहे, नंतर विचार करता येईल असे सांगून पाहिले. ... थोड्याच दिवसांनी श्री. यशवंतरावांकडून निरोप आला. संभाजीचे चरित्र प्रथम पूर्ण करा व छपाईस लागणाऱ्या खर्चाचा अदमास कळवा. त्यावेळी ६००-६५० पानांचा अदमास धरून रु. ७००० लागतील म्हणून कळविले. थोड्याच दिवसांत समजले, की संभाजीचरित्र छपाईसाठी सरकारने सर्व रक्कम बिनशर्त मंजूर केली आहे. "

     'शहाणे करूनी सोडावे सकलजन ' या उक्तीप्रमाणे त्यांनी अंधकारात चाचपडणाऱ्या समाजाला आपल्या समृद्ध इतिहासाविषयी ज्ञानाच्या प्रकाशवाटा दाखविण्याची महान कामगिरी केली आहे. केवळ छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज नव्हे, तर मालोजीराजे, शहाजीराजे यांचाही इतिहास आणि त्यांची कामगिरी प्रकाशात आणण्यासाठी त्यांनी संशोधकांकडे आग्रह धरला. वा.सी.बेंद्रे सर आणखी एका प्रस्तावनेत लिहितात - "तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्यवर श्री. यशवंतराव चव्हाण यांना, माझे मित्र श्री दत्तोपंत गोसावी यांचेसमवेत जाऊन भेटलो. परंतु मला तुकाराम महाराजांच्या कार्यात मदत देण्यापूर्वी शिवकालीन इतिहास पुरा करण्याचा त्यांनी आग्रह धरला. मी या कामास लागणारा खर्च करण्याची ताकद नसल्याने संभाजी चरित्राचा अभ्यास सोडला, बाकी तयारी झाली होती, असे सांगितले. माझे या इतिहासाकडे पुन्हा मन वळविण्यात श्री. यशवंतरावानी आपले दोन तास खर्च केले. नंतर मला ते करणे खचर्वांचे म्हणून जड वाटत होते. नंतर महिन्या दीड महिन्याने शिक्षणाधिकारी याजकडून मला पत्र आले की, प्रकाशनार्थ श्री. यशवंतरावजींनी सात हजार रुपयांची सरकारी देणगी दिली असून ती ताबडतोब घेण्याची व्यवस्था करावी.
        "ही काही वानगीदाखल उदाहरणे एका ज्येष्ठ इतिहास संशोधकाच्या शब्दांत दिली आहेत. याशिवाय तत्कालीन अनेक मराठी साहित्यिकांना त्यांनी लेखनास प्रोत्साहन दिले. साहित्य, कलेवर नितांत प्रेम असलेले चव्हाण साहेब स्वतः एक संवेदनशील साहित्यिक होते. सजग आणि सुजाण लोकनेता होते. राज्यकर्त्यांनी समाजाला दिशा देण्याचे आणि सकळ समाज ज्ञानसंपन्न करण्याचे कार्य करायला हवे. महाराष्ट्र ही संतांची, विचारवंतांची, राष्ट्रपुरुषांची जन्मभूमी व कर्मभूमी आहे. येथील समृद्ध इतिहास आणि विचार लोकमानसात रुजविण्यासाठी त्यांनी हयातभर प्रयत्न केले. खरा लोकनेता हा लोकशिक्षक असतो, ही भूमिका त्यांनी समर्थपणे निभावली. म्हणूनच अशा या प्रज्ञावंत लोकनेत्याचे चिरंतन स्मरण होत राहील. या थोर लोकनेत्याच्या जयंतीदिनी त्यांना विनम्र अभिवादन.

@ अरुण तुकाराम बोऱ्हाडे.

(बोऱ्हाडेवाडी, पो. मोशी, ता. हवेली, जिल्हा पुणे. 

मो. ९८८१३०१३३९)

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

श्री नागेश्वर महाराज भंडारा : भक्तिमार्गातील शक्ती स्त्रोत [लेखक : अरुण बोऱ्हाडे]

'शरद पवार : दुःखातही मनाला उभारी देणारा अलौकिक लोकनेता'' : अरुण बोऱ्हाडे

"कष्टकरी कामगारांची, एक अधुरी कहाणी..! सामाजिक चिंतनाचा विषय" लेखकः अरुण बोऱ्हाडे