आठवणीतील प्रतिमा : ग्रामीण शब्दशैलीचा कथाकार, प्राचार्य रा. रं. बोराडे सर
आठवणीतील प्रतिमा :
ग्रामीण शब्दशैलीचा कथाकार, प्राचार्य रा. रं. बोराडे सर
तीन चार दिवसांपूर्वी महाराष्ट्र शासनाच्या यशवंतराव चव्हाण साहित्य गौरव पुरस्कारांतर्गत *जीवन गौरव पुरस्कार* प्रा. रा. रं. बोराडे सरांना जाहीर झाल्याचे समजले आणि त्यांच्या अभिनंदनासाठी मी त्यांना फोन केला. सरांनी फोन घेतला नाही आणि पुन्हा फोन आला नाही.
मध्यंतरी काही वर्षांपूर्वी मी, प्रसिद्ध गझलकार संतोष घुले आणि एव्हरेस्टवीर श्रीहरी तापकीर जालना- औरंगाबादला (आताचे संभाजीनगर) एका कार्यक्रमासाठी गेलो होतो. एखाद्या भागात गेल्यावर वेळ असेल तर आपल्या परिचित साहित्यिक किंवा कलाकार व्यक्तिला भेटावे, विचारपूस करावी अशी माझी सवय आहे. त्याप्रमाणे परतीच्या प्रवासात मी सुप्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक प्राचार्य रा. रं. बोराडे सर आणि डॉ. यु. म. पठाण सरांना फोन करून संभाजीनगरमध्ये भेटावयास गेलो.
मी शाळेत असताना रा.रं. बोराडे यांची एक कथा आम्हांला अभ्यासाला होती. ग्रामीण शैलीतील ती कथा शिकविताना आमच्या सरांनी थेट लेखकाशी जवळीक करुन दिली होती. तेव्हापासून लेखक म्हणून बोराडे सर माझ्या मनात वास्तव्यास आहेत. पुढे योगायोगाने मी साहित्य- सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असताना अनेक साहित्यिकांना कारणपरत्वे भेटायचा योग आला. प्राचार्य बोराडे सरांना मी खूप वर्षांपूर्वी भेटून परिचय करून घेतलेला होता. मध्यंतरी पुण्यामध्ये त्यांना आवर्जून भेटलेलो होतो. तरिही एवढ्या मोठ्या लेखकाला त्याच्या घरी जाऊन भेटावे, त्यांच्याशी गप्पागोष्टी कराव्यात ही एक वेगळीच ओढ असते.
संभाजीनगरमध्ये पत्ता विचारत आम्ही बोराडे सरांच्या घरी गेलो, सरांना भेटलो. काही साहित्यिक किंवा कलावंत त्यांच्या क्षेत्रातील कर्तबगारीने खूप मोठे असतात, पण राहणीमानात एकदम साधेपणा असतो. बोराडे सरांचेही राहणे, बोलणे एकदम साधेपणाचे. मात्र वयाच्या पंच्च्याहत्तरीतही चालण्या बोलण्यात कमालीचा उत्साह आणि चपलता दिसून आली. अजूनही नित्याचे वाचन, चिंतन, लेखन चाललेले आहे. सरांशी बोलताना त्यांनी काही गंमतीदार, मार्मिक किस्सेही सांगितले. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम करताना अनुभवलेला एक मोठा प्रसंग त्यांनी सांगितला. त्यांच्या गप्पांतून या प्रतिभासंपन्न साहित्यिकाचा अनुभवसंपन्न ज्ञानयज्ञ आणि प्रगल्भतेचा एकेक पदर उलगडत गेला. आमच्या कुवतीप्रमाणे आम्ही समजून घेतला.
या ग्रामीण लेखकाचा शैक्षणिक प्रवासही मोठ्या जिद्दीचा आहे. स्वतःच्या जिद्दीने अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत त्यांनी शिक्षण पूर्ण केले. मराठवाड्यात लातूर जिल्ह्यातील काटगाव या लहानशा खेड्यात दि. २५ डिसेंबर १९४० रोजी त्यांचा जन्म झाला. काटगाव हे त्याकाळी अतिशय लहानसे मागासलेले खेडेगाव होते. त्यागावात प्राथमिक शिक्षणाची साधी सोय नव्हती. खाजगी शिक्षक ठेवून मुलांना शिक्षण दिले जायचे. रा.रं. बोराडे यांचे इयत्ता चौथीपर्यंतचे शिक्षण असेच खाजगी शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली झाले. इयत्ता पाचवीसाठी त्यांना बार्शीला जावे लागले, तिथे त्यांचे मॕट्रिकपर्यंतचे शिक्षण झाले. दहावीत शिकत असतानाच त्यांना लेखनाची गोडी लागली. पुढे सोलापुरातील दयानंद महाविद्यालयातून त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले व औरंगाबादला मराठवाडा विद्यापीठातून मराठीमध्ये एम.ए. केले. शिक्षणाची ओढ मनी असली की, सर्व अडचणींचा सामना करीत पुढे जाता येते, हे सरांनी स्वतःच्या शैक्षणिक प्रगतीने दाखवून दिले.
सन १९६३ साली रा.रं. बोराडे हे वैजापूर येथील महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. पुढे त्याचठिकाणी ते प्राचार्य झाले. आपल्या कर्तृत्वाने वैजापूरसारख्या छोट्या गावाला त्यांनी महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक नकाशावर आणले. त्यानंतर ते औरंगाबाद मधील सुप्रसिद्ध देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य झाले. तिथे त्यांच्या कर्तृत्वाला अधिक वाव मिळाला. किंबहूना मराठवाड्याच्या या सांस्कृतिक राजधानीत आपल्या प्रज्ञेचा प्रकाश पाजळला. महाविद्यालयात शिकत असतानाच त्यांना लेखनाची गोडी लागली होती. त्यातूनच पुढे रावसाहेब रंगराव बोराडे हे नाव मराठी भाषेतील कथाकार, कादंबरीकार म्हणून लौकिकास पोचले. सरांचा 'नातीगोती' हा कथासंग्रह मला खूप भावला. त्यातील एक एक पात्र बोलताना आपण भान हरपून जातो. साधी-सोपी आणि वाचकांच्या हृदयाचा ठाव घेणारी लेखनशैली हे त्यांचे वैशिष्ट्य समजले जाते. त्यांच्या कथांचा शेवट धक्कादायक असतो. शेवटच्या धक्क्याने वाचक स्तंभित होतात. त्यांच्या कथांमधून ग्रामीण भागातील वैशिष्ट्यपूर्ण व्यक्ती भेटतात. त्यांनी लिहिलेल्या 'पाचोळा’ या कादंबरीवरून त्यांना 'पाचोळाकार बोराडे' हे नामाभिधान मिळाले आहे. या साहित्यातून मराठवाडी बोलीचे अनेक विशेष प्रगट झाले आहेत.
"पाचोळा" ची नुकतीच पन्नाशी पुर्ण केली. मराठी साहित्यात मैलाचा दगड ठरलेली 'पाचोळा' ही ग्रामीण कष्टकरी कारागिराच्या वेदनेवर आधारीत कादंबरी मौज प्रकाशनाने १९७१ मध्ये प्रकाशित केली होती. ग्रामीण पटलावरील कादंबरीचे येणे ग्रामीण साहित्य चळवळीला बळकटी देणारे ठरले होते. शहरीकरण आणि नवीन तंत्रज्ञानात उद्ध्वस्त झालेल्या कारागिराची होरपळ कादंबरीत उत्कटपणे मांडली आहे. पाचोळाने ग्रामीण साहित्य चळवळीला बळकटी मिळाली. माझ्या वाचनात ही कादंबरी फार पूर्वी आली. लेखक म्हणून माझ्या मनात घर करून राहिलेले रा.रं. बोराडे मला अधिकच जवळचे वाटू लागले. ही गावगाड्यातील कष्टकरी जीवाची व्यथावेदना माझ्या मनात चिरंतन तेवत राहिली. योगायोग असा की पुढील आयुष्यात मी कष्टकरी कामगारांच्याच चळवळीत कार्यरत राहिलो.
सन १९६७ साली 'मळणी' हा त्यांचा दुसरा कथासंग्रह आला. त्याला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा पुरस्कार मिळाला. मळणीसह त्यांच्या पाचोळा (कादंबरी १९७१), पाच ग्रामीण नाटिका (नाटिका १९८८), कणसं आणि कडबा (कथासंग्रह १९९४), चोरीचा मामला (एकांकिका १९९७) या पाच पुस्तकांना एकूण ५ राज्य पुरस्कार मिळाले आहेत. प्राचार्य रा.रं. तथा रावसाहेब रंगनाथ बोराडे यांची साहित्यिक कामगिरी थक्क करणारी आहे. फार कमी कालावधीत सरांचा सिद्धहस्त ग्रामीण कथाकार, कादंबरीकार म्हणून सर्वदूर परिचय झाला. मराठी साहित्यविश्वात त्यांचा नांवलौकिक झाला.
शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमात त्यांच्या साहित्याचा समावेश झालेला असून, ग्रामीण साहित्य परिषदेचे अध्यक्षपद त्यांनी सांभाळले आहे. नाशिक येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय कृषी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी, तसेच जळगाव येथे झालेल्या राज्यस्तरीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली होती.
कोणत्याही साहित्य संमेलनाची निवडणूक लढवायची नाही, असा दृढनिश्चय रा. रं. बोराडे सरांनी फार पूर्वीच केला होता. त्यामुळे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदापासून ते अद्याप वंचित राहिले. सरांनी निवडणूक लढवावी यासाठी त्यांच्या चाहत्यांनी अनेक वर्षांपासून त्यांच्याकडे आग्रह धरला होता. तथापि, त्यांनी आपला निर्णय बदलला नाही. साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद सन्मानपूर्वक प्रदान केले जावे, अशी त्यांची भूमिका आहे. आपल्या भूमिकेवर ते आजही ठाम आहेत. स्वतःच्या तत्वांशी सर कधीही तडजोड करीत नाहीत.
प्राचार्य पदावरून सन २००० साली सर सेवानिवृत्त झाले. त्याच वर्षी त्यांची महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी शासनाने नियुक्ती केली. अध्यक्षीय कार्यकालात त्यांनी आपल्या कामाचा अमीट ठसा उमटविला. सरकारी गोदामांत बांधून पडलेली हजारो पुस्तके त्यांनी ग्रंथालयांपर्यंत पोहोचविली. खेड्यापाड्यांतील ग्रंथालयांना आणि तेथील वाचकांना या योजनेचा फायदा झाला.
प्राचार्य रा. रं. बोराडे हे एप्रिल २०१३ पासून मराठवाडा साहित्य परिषदेच्या विश्वस्त मंडळावर नियुक्त झाले आहेत. नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडियाने त्यांच्या साहित्याचा हिंदी व इंग्रजी अनुवाद केला आहे.
त्यांच्या साहित्याला भैरूरतन दमाणी पुरस्कार (१९८९), मराठवाडा गौरव पुरस्कार (२००१), जयवंत दळवी पुरस्कार (२००३), मराठवाडा साहित्य परिषदेचा नरहर कुरुंदकर पुरस्कार, साहित्यवैभव पुरस्कार (२०११) इत्यादी असंख्य पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या समग्र साहित्य सेवेबद्दल राज्यस्तरीय सूर्योदय पुरस्कार मिळाला आहे.
साहित्यिक म्हणून सरांचे कर्तृत्व फार मोठे आहे. त्यांना मिळालेले पुरस्कार आणि मानसन्मानही असंख्य आहेत. सर्वात महत्वाची बाब ही की सरांनी ग्रामीण मातीची, मराठवाडी बोलीची, तेथील संस्कृतीची नाळ कधी सोडली नाही. सहजतेने दिलखुलास गप्पांत रमणारा हा ग्रामीण लेखक अस्सल मराठवाडी बाज टिकवून आहे. हेच या साहित्यिकाचे खरे यश आहे.
_शब्द सालस मनातून, शब्द झरा हृदयातून_
_शब्दमाधुर्य कंठातून, माणूस उभा शब्दातून l_
सदैव शब्दांची पूजा मांडून माणूस उभा करणारे आणि माणूसपण जपणारे बोराडे सर शब्दप्रभू आहेत.
आदरणीय प्राचार्य रा.रं. बोराडे सरांना अधिक निरोगी आरोग्य लाभो. त्यांच्या हातून मराठी साहित्यात अजून मोलाची भर पडो, याच हार्दिक सदिच्छा.
शब्द हेचि माझे धन, शब्दांमध्ये तत्त्वज्ञान
शब्दांमध्ये रमताना, शब्द माझा अभिमान l
🙏
@ अरुण बोऱ्हाडे ...✍
#
(पूर्वप्रसिद्धी : अक्षरप्रतिमेतील प्रज्ञावंत (लेखक : अरुण बोऱ्हाडे ) संवेदना प्रकाशन, पुणे
छान लेखन
ReplyDelete