युगे अठ्ठावीस विटेवरी उभा... - अरुण बोऱ्हाडे
युगे अठ्ठावीस विटेवरी उभा...
पहाटे लवकर ऊठून एच.ए. वसाहतीतील विठ्ठल मंदिरात काकड आरतीसाठी जाताना, थंडगार हवेच्या झुळकींबरोबर आठवणींचे असंख्य तरंग मनात उमटत होते. माझ्या आयुष्यातील सुखाचे, आनंदाचे क्षण त्या तरंगावर अलगद उजळत होते. मंदिरापासून काहीशा अंतरावर असतानाच अभंगाचे सूर कानावर येवू लागले. मन आठवणींतून वास्तवाकडे धावले, मंदिराच्या भोवती सुरेख रांगोळी रेखिली होती. शिखरावर रंगीबेरंगी चिमुकल्या विद्युत दिव्यांची रोषणाई नयनांना सुखावत होती. टाळ पखवाजाचे बोल भाविकांच्या कंठातून येणाऱ्या शब्दसूरांशी मिसळत होते. विठ्ठल रुक्मिणीचे ते गोजिरे रुप मनाला सुखवित होते. श्वसन, श्रवन, नयन आणि भक्तिरसात चिंब झालेले मन जणू विश्वातील सारे सुखाचे क्षण माझ्यासाठी प्रसवत होते. कार्तिकस्नानानिमित्त नित्य होणारी काकडआरती ही काही नवीन गोष्ट नाही. कोजागिरी पौर्णिमेपासून प्रत्येक गावोगाव असलेल्या मंदिरात हे आरतीचे सूर उमटत असतात. आमच्या देहू आळंदी पंचक्रोशीत तर सर्वदूर गावांतील मुख्य मंदिरात आणि वाड्यावस्त्यांवर हे भजनाचे सूर ऐकू येत असतात. शेतकरी, गावकरी, भाविकजण या भक्तिरसात तल्लीन होत असतात. विठ्ठल भक्तीसाठी प्रत्येकजण आसुसलेला असतो. याविषयी मी खूप वर्षांपूर्वी काही ओळी लिहिल्या होत्या. त्या पुन्हा येथे उद्घृत करतो.
देवा तुझ्या आरतीला
गाव सारा जागा झाला,
पहाटेच्या प्रहराला
हा काकडा चेतविला l
विठूनामाचा गजर
पंचक्रोशीत घुमला,
शिवारीचा शेतकरी
भजनात दंग झाला l
अर्थात, केवळ शेतकरी किंवा गावखेड्यातील लोकच भक्तिरसात चिंब होतात असे नाही. शहरातील कामगार, कष्टकरी, व्यापारी प्रत्येकाला विठूरायाच्या भक्तिची आस असते, दर्शनाची ओढ असते. पिंपरीतील एच.ए. वसाहतीमध्ये असलेल्या विठ्ठल मंदिराचा महिमा मोठा आहे. दरवर्षी पंढरीला जाणारी संतश्रेष्ठ तुकोबारायांची पालखी येथे विसावते. त्यावेळी परिसरातील हजारो भाविकांची इथे दर्शनासाठी गर्दी उसळते. एच.ए. कंपनीतील सर्व कामगार, विशेषतः वसाहतीत राहणारे कामगार कुटूंबीय दोन दिवस वारकऱ्यांना अन्नदान आणि स्वागतासाठी सज्ज असतात. गेली अनेक दशके या मंदिराशी असंख्य भाविकांचे आणि कामगारांचे नाते घट्ट रुजलेले आहे.
पिंपरीगावच्या या शेतशिवारात भारत सरकारने सन १९५२ मध्ये पेनिसिलीन (एच.ए.) या औषधनिर्मिती करणाऱ्या कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली. सुमारे तीनशे एकर जमिनीवर हा प्रकल्प सुरू करण्यात आला. मुंबई पुणे रस्त्याच्या एका बाजूला कारखाना सुरू केला आणि दुसऱ्या बाजूला सुमारे शंभर एकर जागेत कामगारांना व अधिकाऱ्यांना राहण्यासाठी टूमदार घरांची आखीव रेखीव वसाहत बांधण्यात आली. या वसाहतीत अनेक टूमदार दगडी बंगले, शाळेची भव्यतम इमारत, सुसज्ज रुग्णालय, विविध खेळांच्या सुविधा, व्यायामशाळा, तालीम, खुले नाट्यगृह, वसतीगृह, व्यापार विनिमय केंद्र, टपाल कार्यालय, बँक, पेट्रोल पंप अशा सर्व नागरी सुविधा आहेत. अशा या वसाहतीमध्ये महामार्गाला लागूनच ऐसपैस जागेत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरही बांधण्यात आले आहे. कामगार आणि अधिकारी मिळूनच या मंदिराची शास्त्रशुद्ध रितीने देखभाल करून, चाकोरीबद्ध जीवनाला अध्यात्माचे अधिष्ठान देण्याचा प्रयत्न करतात.
पूर्वी या मंदिराच्या मागिल बाजूस, उजव्या कोपऱ्यात मुळ शेतकऱ्याची एक विहिर होती. रस्त्याने जाणारा थकला भागला जीव घोटभर पाणी पिऊन तृप्त होत होता. बहुधा महामार्गाच्या रस्तारुंदीकरणात ती विहिर बुजली गेली. नव्वदच्या दशकात येथील जुन्या मंदिराचे नुतनीकरण करण्यात आले. मुख्य मंदिराच्या गर्भगृहात विठ्ठल रुक्मिणीची अत्यंत प्रसन्न आणि मनमोहक मुर्ती विराजमान आहे. समोर छानसा सभामंडप, उजवीकडे श्रीदत्त मंदिर, डावीकडे श्री गणेश मंदिर, नैऋत्य दिशेला महादेव मंदिर, ईशान्येला नवगृह मंदिर बांधले असून, सभामंडपात समोरच गरुड - हनुमंत सदैव उभे ठाकले आहेत. खरे तर मंदिरात वायव्य कोपऱ्यात महालक्ष्मी मंदिराचे प्रयोजन होते, ते अद्याप झालेले नाही. मंदिराच्या शिखरावरील देवदेवतांची शिल्पे आणि नक्षीकाम अप्रतिम आहे. केवळ एच.ए.चे कामगारच नाहीत, तर बाजुला असलेल्या खराळवाडी व हाफकिन वसाहतीतील अनेक भाविक या मंदिरात नित्यनेमाने येत असतात. काकडआरती, ज्ञानेश्वरी- गाथा पारायण, किर्तन सप्ताह, श्रावणमासातील किर्तनसेवा, रामनवमी, कृष्ण जन्माष्टमी, झुंजूरमास, महाशिवरात्री उत्सव असे विविध कार्यक्रम या मंदिरात वर्षभर चालू असतात. सर्व भाविक मोठ्या उत्साहाने यामध्ये सहभागी होतात.
विठ्ठल हा लोकदेव आहे. इथे सर्वजण समभावाने येतात, वागतात. विठूराया प्रेमळ, प्रसन्न आणि पावन आहे. घरी वारकरी सांप्रदायाची पार्श्वभूमी असल्याने मी स्वतः आपसूकच विठ्ठलाचा भक्त आहे. मी या वसाहतीत रहायला आल्यापासून तर या मंदिराशी माझे नाते अधिकच दृढ झाले. सकाळी ड्युटीवर जाताना अथवा सायंकाळी आवर्जून विठ्ठलाच्या पायरीवर लीन व्हायचे, हे सवयीचे झालेले. संकटसमयी या कारखान्याला आणि येथील हजारो कामगारांच्या परिवाराला या विठ्ठलाने तारलेले आहे, अशी माझी श्रद्धा आणि विश्वास आहे. योगायोग असा की वीस- बावीस वर्षांपूर्वी जेव्हा केंद्र सरकारने हा कारखाना बंद करण्याच्या हालचाली सुरू केल्या, तेव्हा आम्ही कामगारांनी खूप मोठे, दीर्घकालीन आंदोलन केले. त्या आंदोलनातील महत्त्वाचा भाग होता, घंटानाद. दररोज सकाळी, दुपारी, सायंकाळी कामगार सहकारी कंपनी प्रवेशद्वारासमोरील मंडपात घंटानाद करीत असत. पंचेचाळीस दिवस हे आंदोलन चालू होते. काही लोक आम्हांला हसायचे, 'इथे घंटा वाजवून काय होणार, सरकारला आवाज कसा ऐकू जाणार' असे म्हणायचे. त्यांचेही काहीअंशी खरे होते. पण या आंदोलनाचा गाभा विठ्ठलभक्ती दडलेला होता. आम्ही विठूरायाला साकडे घालूनच हे आंदोलन सुरू केले होते, हे त्यांस ठाऊक नव्हते. मंदिरात दर्शनार्थ गेल्यावर आपण घंटा का वाजवतो. मंदिरातील घंटानाद जर ईश्वराला ऐकू जात असेल, तर हजारो कामगारांनी अंतःकरणातून वाजविलेला घंटानाद सरकारपर्यंत ऐकू का जाणार नाही. याबाबतीत माझा दृढभाव अढळ होता. अखेर सरकारला आमचा आवाज ऐकू आला. तत्कालीन पंतप्रधान मा. अटलजींनी आमच्या कामगार संघटनेला चर्चेसाठी दिल्लीत बोलावून घेतले. त्यानंतर आमचा आशावाद अधिक बळकट झाला, आमचा कारखाना बंद झाला नाही. त्या काळात ज्या ज्या वेळी कामगार संघटनेचे प्रतिनिधी म्हणून चर्चेसाठी आम्ही दिल्लीला किंवा कुठेही जात असू, त्या त्या वेळी या विठूरायाच्या चरणी लीन होवूनच आम्ही निघत असू. त्याची सकारात्मक प्रचिती आम्ही वेळोवेळी घेतली आहे. बंद होण्याच्या प्रक्रियेतील या कारखान्याच्या पुनर्रज्जीवनासाठी सरकारने घोषणा केली आणि मोठा मदतनिधी दिला, त्या दिवशी आम्ही कामगारांनी आनंदोत्सव साजरा केला. हीच ती विठ्ठलभक्तीची प्रचिती होती. अर्थात 'श्रद्धा आणि विश्वास' हा ज्याच्या त्याच्या वैयक्तिक अनुभूतीचा भाग आहे, याचे मला भान आहे. या यशासाठी अनेकांची मदत घेतली, विविध मार्गांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, पण प्रत्येक प्रयत्नांना भक्तीचे अधिष्ठान होते.
मागिल जवळपास पंचवीस वर्षे एच.ए.तील विठ्ठल मंदिरात कार्तिकस्नान पर्वात एक दिवस विठ्ठल रुक्मिणीची सपत्नीक महापूजा करण्याचे भाग्य मला प्रतिवर्षी लाभले आहे. मी स्वतःला यासाठी भाग्यवान समजतो. माझ्या जीवनातील भक्तीमय आनंदाचा तो दिवस असतो. संत तुकाराम महाराजांची पालखी या मंदिरात काही काळ विसावते, तोही दिवस आमच्या सर्वांसाठी उत्साह, आनंद आणि चैतन्याचा असतो. अलिकडे आमची तरुण मंडळीही मंदिराच्या उपक्रमांत सहभागी झाली आहेत. खराळवाडीतील सर्व ग्रामस्थ, विशेषतः महिला मंडळी अधिक संख्येने मंदिराच्या सर्वच उपक्रमांत सहभागी होताना दिसत आहेत, याचाही मला आनंद वाटतो. परवा पहाटे काकडआरतीनिमित्त मी महापूजेसाठी मंदिरात गेलो, तेव्हा या सर्व गोष्टींचे तरंग मनःपटलावर उमटले, मनात अनेक आठवांची पखरण झाली. म्हणून हे सारे शब्दांत इथे प्रकटले. तो विठूराया प्रसन्न मुद्रेने, अनंतकाळ भक्तांच्या अध्यात्मिक पायावर आणि निरलस भक्तिच्या वीटेवर उभा आहे. विठ्ठलाच्या आरतीतील
'युगे अठ्ठावीस, उभा वीटेवरी' या ओळी कानात सदैव रुंजी घालतात.
माझ्याच कवितेतील शब्द बोलू लागतात -
अभंगात पहाटेच्या
शब्द शब्द ओलावला,
टाळ मृदूंग चिपळीचा
सूर कानी विसावला l
शब्द सूर आरतीचा
साद घाली विठ्ठलाला,
दव ओल्या मातीतला
बिंदू बिंदू शहारला l
ll जय जय राम कृष्ण हरी ll
@ अरुण तुकाराम बोऱ्हाडे
(मोबाईल : ९८८१३०१३३९)




*जय जय रामकृष्ण हरी*
ReplyDelete