भीमाशंकर -भोरगिरी भटकंती, आनंददायी, अवर्णनीय अनुपम - अरुण बोऱ्हाडे



सागरमाथा गिर्यारोहण संस्थेने नुकतेच भीमाशंकर ते भोरगिरी या गिरीवन भटकंती मोहिमेचे आयोजन केले होते. पाच वर्षाच्या बालकापासून पासष्टीच्या ज्येष्ठांपर्यंत सुमारे तीसजण या भटकंती मोहिमेत सहभागी झाले होते. नेहमीप्रमाणेच वेळेचे नियोजन आणि योग्य ती दक्षता, यामुळे ही मोहिम सुरक्षित आणि सुरळीतपणे यशस्वी झाली. संस्थेचे अध्यक्ष श्री प्रविण हरपळे आणि पांडुरंग शिंदे यांनी उत्तम नियोजन केले होते.

भल्या पहाटे ठरलेल्या वेळेत एकेकाला घेत गाडी वेळेवर निघाली. पेठच्या पठारावर सकाळची न्याहारी आटोपून मंचर बायपासने घोडेगाव, शिनोली, डिंभे मागे टाकून नागमोडी वळणे घेत गाडी भीमाशंकरच्या डोंगररांगा चढू लागली, तसा आसमंतात काळ्या- जांभळ्या मेघांनी स्वागताचा जणू मंडप ऊभारला. हवेतील गारव्याने आणि मातीतील गंधाने वातावरणात वेगळीच प्रसन्नता आणली. घनदाट हिरवाईतून जंगलाच्या पोटात जाणारा रस्ता जसजसा पुढे जात होता, तसतसा भीमाशंकरच्या गर्दीचा अंदाज येवू लागला. भीमाशंकरला देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीने सुमारे दोन किलोमीटर अलिकडेच असंख्य गाड्या थांबविण्यात आल्या होत्या. त्याचवेळी मेघराजाने बरसायला सुरुवात केली. रस्तावरून पाण्याचे ओहोळ नाल्याच्या दिशेने झेपावत होते.आम्ही वेळ न दवडता गाडीतून उतरण्याचा निर्णय घेतला. सर्वांनी सोबत  आणलेले रेनकोट परिधान केले. ज्यांच्याकडे रेनकोट नव्हते त्यांच्यासाठी स्थानिक विक्रेत्यांनी पावसापासून संरक्षणासाठी छान प्लॅस्टिकच्या रेनकोटची स्वस्तात सोय केलेली होती. तेही काहीजणांनी विकत घेतले. रस्त्यावर खोळंबून पडलेल्या वाहनांच्या गर्दीतून वाट काढत तेथूनच आमची भटकंती सुरू झाली. जसजशी पावले पुढे चालू लागली, तसतशी पावसाची धार वाढू लागली. चौफेर पसरलेल्या हिरव्यागार जंगलाचा नेत्रसुखद आस्वाद घेत, वर्षाविहाराचा आनंद घेत पावलांनी भीमाशंकरच्या मंदिराला पश्चिमेकडे सोडून डाव्या बाजूने डोंगर उतरायला सुरुवात केली. थोड्याशा उतरणीवरील एक ओढा ओलांडून आम्ही घनदाट जंगलाच्या उदरात घुसलो. आभाळाला भिडलेल्या उंच झाडांतील पावसाच्या सरींची सळसळ आणि पायाखालील वाटेवरून झुळझूळ वाहणाऱ्या पाण्याचा नादमधुर काही औरच होता. प्रत्येक पावलागणिक लालओल्या मातीतून येणारी आवाजाची रवरव आणि झाडांच्या फांदी फांदीवर बसलेल्या वानरांचा मध्येच धपकन इकडून तिकडे उडी मारताना येणारा आवाज नकळत दचकून नादभंग करीत होता. तर एखादे वानर विचित्र आवाज काढून त्याच्या बांधवांना काहीतरी संदेश देत असावा. एकमेकांशी गप्पागोष्टी करीत, निसर्गाचा वेगळा आविष्कार पाहत चालताना आमच्या आनंदाला भरते येत होते. खरे तर या भटकंतीला वर्षाविहार म्हणावे, वनभ्रमंती म्हणावी की गिरीभ्रमंती हेच समजत नव्हते. एकाचवेळी गिरी-वन-वर्षाभ्रमंती म्हणावी लागेल. अचानक पायाजवळ रस्त्यावर आडवी गेलेली झाडाची भली मोठी  मुळी दिसली आणि प्रत्येकजण एकदुसऱ्याला सांभाळून या रे, अशा सूचना देऊ लागला. पुन्हा एकदोन ठिकाणी भल्या मोठ्या फांद्या आडव्या गेलेल्या होत्या. त्याखाली थोडे ओणवे होवून पुढे जाता येत होते. बरसत्या पाऊसधारांनी भटकंतीचा आनंद आणि उत्साह शतपटींनी वाढविला होता. निसर्गरम्य वातावरणात, उंच झाडांच्या गर्दीतून, नागमोडी वाटेवरून, अंगावर पाऊस घेत चालताना होणारा आनंद शब्दातीत होता. भीमाशंकरच्या या  अभयारण्य परिसरात दरवर्षी सुमारे सहा ते सात हजार मिलिमीटर पाऊस पडतो. याच जंगलातील डोंगरराजीच्या उदरात भीमा नदीचा उगम होतो. याच भीमेवर पुढे चासकमान, उजनीसारखे महाराष्ट्राला जगविणारे विशाल धरण प्रकल्प आहेत. हीच भीमा पंढरपुरात चंद्रभागा होते. ती पुढे कर्नाटकात कृष्णामाईमध्ये विलीन होते.

भीमाशंकरची भटकंती म्हणजे निसर्गवेड्या गिर्यारोहकांसाठी मोठी पर्वणी असते. कितीही वेळा गेले तरी नाविन्याची ओढ कमी होत नाही. भीमाशंकरचे जंगल म्हणजे सह्याद्री पर्वतराजीच्या अंगावरील मौल्यवान आभुषणच म्हणावे लागेल. सुमारे तेरा हजार हेक्टर परिसरात पसरलेल्या या घनदाट अभयारण्यात नानाविध प्रकारची विपुल वनसंपदा, असंख्य प्रकारचे अगणित पशूपक्षी येथे वास्तव्यास आहेत. आकाशाला खुणविणारे उंच उंच मनोहारी डोंगरकडे आणि नयनरम्य खोल खोल दऱ्या यांचा अनुपम मिलाप या जंगलात पहावयास मिळतो. शेखरू ही विशिष्ट प्रकारची मोठ्या आकाराची खार हे या अभयारण्याचे वैभव आहे. खरे तर शेखरूचे हे हक्काचे जंगल आहे. शेकरूला महाराष्ट्राचे मानचिन्ह म्हणून मान्यता मिळालेली आहे. भीमाशंकर अभयारण्य हे ‘डेसिडियस फॉरेस्ट’ या वनप्रकारात गणले जाते. येथील जंगलात हिरडा, करवंदे, लोहारी, साग, मोह, बांबू, आंबा, जांभूळ, उंबर, अंजन, शेंद्री, पिसा आणि आईन अशा वैविध्यपूर्ण वनस्पती आणि अनेक दुर्मिळ औषधी वनस्पती आढळतात. याशिवाय अनेक औषधी वेली, मुळ्या असणाऱ्या वनस्पती आढळून येतात. तसेच वाघ, बिबट्या, लांडगा, वानर, तरस, सांबर, हरीण, कोल्हा, साळिंदर, भेकर, काळवीट, मोर असे अनेक प्रकारचे वन्यजीवदेखील या विशाल  अभयारण्यात पाहायला मिळतात. या परिसरात गवळी धनगर तसेच आदिवासी महादेव कोळी समाज राहतात. हे लोक अत्यंत कष्टाळू आणि वनवत्सल आहेत. येथील जैववैविध्याशी तेच खरे एकरुप झालेले आहेत. भीमाशंकरच्या अभयारण्यात शेकडो वर्षे जुन्या सुमारे चौदा देवराया आहेत. जगातील जंगलसंपत्ती अथवा वनस्पती संशोधनासाठी, तसेच गिरिभ्रमंती आणि पदभ्रमंतीसाठी, विशेषतः पावसाळ्यात या परिसरात अनेक गिरीप्रेमी आणि पर्यटक येत असतात.बराच वेळ बरसत्या पावसाचा आनंद घेत, लहानमोठ्या पाऊलवाटेने आम्ही गुप्त भीमाशंकर जवळ येऊन पोहोचलो. रस्त्यामध्ये जागोजागी दगडांवर खुणा करून आणि झाडांना चिंधी बांधून दिशादर्शकाची सोय केलेली होती. भीमानदीचा प्रवाह मोठा आवाज करीत खडकावरून खाली कोसळत होता. तिथे पंधरावीस फूट खोलीवर महादेवाचे लिंग दगडात कोरलेले आहे. शेजारीच जोराचा जलप्रपात पहायला मिळतो. वास्तविक कोसळत्या पावसात अशा ठिकाणी जाणे हे धोकादायक ठरू शकते. पर्वतशिखरावर किती प्रमाणात पाऊस पडतोय, याचा आपल्याला अंदाज नसतो. ऐनवेळी पाण्याचा प्रवाह वाढला तर बचाव करणे कठीण असते. म्हणून आम्ही त्याठिकाणी वेळ न दवडता त्वरेने परत निघालो. अर्थात निसर्गाचा अप्रतिम रंगसोहळा नेत्रसुखद वाटतो. प्रत्येकाच्या नजरेतील आणि मुद्रेवरील ते सुख लपत नव्हते. पुन्हा ट्रेकच्या मुख्य रस्त्यावर येवून आम्ही उजवीकडे  भोरगिरीच्या दिशेने निघालो.  वाट आता उतरणीची होती. मात्र झाडांची गर्दी, वाहणारे छोटे ओहोळ, शेवाळलेले दगड यातून चालताना लक्षपूर्वक पावले टाकली जात होती. मध्येच एखादा पक्षी कंठातून सूर आवळून आपल्या रानात नवीन कोणी आल्याचा इशारा जंगलातील अन्य जीवांना देत असावा. त्याचवेळी पावसात झाडाची फांदी धरून बसलेली वानरे अंग झटकून चिर्रर्रर आवाज देत होती. चहूबाजूंना सजलेल्या हिरव्यागार डोंगररांगा, भवताली हिरवी पोपटी पाने अंगावर पांघरलेला दाट झाडोरा, बरसून झालेल्या मेघांचा आभाळातील नजारा... सारेच अनुपम, अवर्णनीय होते. आता पाऊस थोडा कमी झाला होता. पुष्कळ अंतर चालून आल्यानंतर पायांना उभ्याऊभ्याच आम्ही  थोडा आराम दिला. सर्वजण एकत्रित जमले. नकळत प्रत्येकजण भटकंतीची प्रतिक्रिया देऊ लागला. शब्दविशेषणांच्या कोट्या झाल्या. खूपवेळ पावसात दडून बसलेले मोबाईल आता फोटोसाठी चमकू लागले. येथून आता पुष्कळ चालायचे आहे, याची नवख्यांना कल्पना नव्हती. थोडा वेळ चालत राहिलो, एका वळणावरती झाडाच्या फांदीवर आमच्याकडे कटाक्ष टाकून एक तांबूस रंगाचे शेकरू डौलात बसलेले होते. आम्ही पुढे असलेल्या तीनचार जणांनी त्याला न्याहाळले. मात्र पाठीमागून आलेल्या आमच्या सहकाऱ्यांना पाहून ते झाडावरून खाली उतरून लपून बसले.


भीमाशंकर ते भोरगिरी ही भटकंती म्हणजे एक अभूतपूर्व निसर्गयात्राच आहे. आता भीमेला उजवीकडे ठेवून, सोबतीला लहानसा ओढा बरोबर घेऊन आम्ही हिरव्या रानवाटा तुडवत भोरगिरीकडे निघालो. उजव्या आणि डाव्या बाजूची गगनभेदी उंच शिखरे आम्हांला न्याहाळीत होती. थोड्या रुंद सपाट रानवाटेने गप्पागोष्टी करीत जवळपास दोन तासांची वाट तुडवून आम्ही भोरगिरी गावात पोहोचलो. पाऊस जवळजवळ थांबला होता. चिंबहिरव्या आसमंतावर सूर्यकिरणांचा नाजूक शिडकावा पसरला होता. पण इतका वेळ शांत असलेला भूकेचा कावळा कुरकुरू लागला होता. परंतु अगोदर भोरगिरी किल्ला चढायचा आणि नंतर भूकेचा हल्ला करायचे नियोजन ठरलेले होते. दरम्यान आमच्या बरोबर भीमाशंकर पासून सोबत केलेल्या एका श्वानाने त्याला भूक लागल्याचे अक्षरशः घशातून विचित्र आवाज करून सांगितले, आम्ही ते ताडले. सततच्या पावसाने त्याला खायला मिळाले नसावे. श्रीकांतने सॕगमधून बिस्कीटे काढून त्याच्यापुढे ठेवताच, त्याने ती क्षणार्धात संपविली. आम्हांला भारी कौतुक वाटले, प्राण्यांना वाणी दिली नसली तरी, हावभाव आणि आवाजाच्या लकबीने ते माणसाशी संवाद साधू शकतात ! हिरव्यागार भातशेतीच्या कडेने असलेल्या लहानशा वाटेने आम्ही किल्ल्याकडे कूच केले. उजव्या बाजूच्या ओढ्यातील नितळ पाणी वेगाने भीमेच्या प्रवाहाकडे धावत होते. त्याच्या पाठीमागील डोंगररांग असंख्य लहानमोठ्या धबधब्यांनी चिंब भिजली होती, ती सतत आमचे लक्ष वेधून घेत होती. तितक्यात डाव्या हाताला किल्ल्याची वाट सुरू झाली. दोन्ही बाजूंनी बांधलेल्या लोखंडी संरक्षक कठड्यांमधील पायाखालच्या दगडी पायऱ्या नेहमीच्या मुसळधार पावसाने केव्हाच वाहून नेलेल्या होत्या. पण कठड्यांमुळे चालणे सुरक्षित  झाले होते. किल्ल्यावरील पाण्याने भरलेल्या गुहेतील देवीचे सुंदर प्रतिबिंब   मनोवेधक होते. त्याचवेळी शेजारील गुहेत मात्र पाणीच नव्हते. निसर्गाची किमया सारी ! त्यावेळी सभोवताली  दूरवर नजर टाकल्यावर दिसणारे निसर्गाचे विलोभनीय दृश्य कधीही विसरता येणार नाही. चौफेर हिरव्यागार डोंगरराजी, मध्येच दिसणारे शुभ्रधवल धबधबे, हिरवीगार पोपटी रंगाची भातखाचरे आणि दुधडी भरून वाहणारी भीमानदी जणू पंढरीला जाण्यासाठी तिची लगबग सुरू होती. 

संत तुकोबाराय पंढरीनाथाचे वर्णन करताना म्हणतात-

_कमलनयना कमलापती l कामिनीमोहना मदनमुर्ती_

_भवतारका धरित्या क्षिती l वामनमूर्ती त्रिविक्रमा l_

मला वाटते तो निसर्गाचा सर्वोत्कट, सर्वोत्तम, सर्वांगसुंदर सृष्टीचा देखावा पाहताना यापेक्षा वेगळे शब्द सुचणार नाहीत. निसर्गाचा तो अनुपम सोहळा म्हणजे साक्षात पांडुरंगच भासत होता.

भोरगिरीचा किल्ला पाहून  थंडगार हवेचा आस्वाद घेत पुन्हा गावात आलो. त्यानंतर  बहरलेल्या ओल्याचिंब निसर्गाचा आनंद घेत, राजम्याची पातळ भाजी, कुर्डूची पालेभाजी, ज्वारीच्या भाकरी आणि इंद्रायणी भातासह भरड डाळीची आमटी यावर ताव मारत भूकेल्या पोटातील कावळ्यांना शांत केले. सर्वजणांनी आनंदमुद्रेने सायंकाळी पुन्हा घरच्या दिशेने परतीचा प्रवास सुरू केला. भीमाशंकर - भोरगिरी भटकंती अनुपम, आनंददायी, अवर्णनीय आणि अविस्मरणीय ठरावी.

#

@ लेखक : अरुण बोऱ्हाडे

मोशी, ता. हवेली, जि.पुणे

मोबाईल : 9881301339

...

Comments

  1. अप्रतिम वर्णन 👌👍

    ReplyDelete
  2. भाऊ खूप भारी वाटलं प्रत्यक्ष तुमच्यासोबतच आम्ही पण भीमाशंकर ते भोरगिरी प्रवास केला असे इतके सुंदर वर्णन व सहज सोप्या भाषेत प्रवास वर्णन केलेत तुम्ही तिथे जलधारात चिंब झालात आणि आम्ही हे वाचताना अरुणधारे चिंब झालो खूप खूपच भारी

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

श्री नागेश्वर महाराज भंडारा : भक्तिमार्गातील शक्ती स्त्रोत [लेखक : अरुण बोऱ्हाडे]

'शरद पवार : दुःखातही मनाला उभारी देणारा अलौकिक लोकनेता'' : अरुण बोऱ्हाडे

"कष्टकरी कामगारांची, एक अधुरी कहाणी..! सामाजिक चिंतनाचा विषय" लेखकः अरुण बोऱ्हाडे