यशवंतराव चव्हाण : इतिहासाचे चिरंतन पान © अरुण तुकाराम बोऱ्हाडे
यशवंतराव चव्हाण : इतिहासाचे चिरंतन पान © अरुण तुकाराम बोऱ्हाडे
महाराष्ट्राचे शिल्पकार, राज्याचे पहिले मुख्यमंत्री आणि भारताचे माजी उपपंतप्रधान स्व. यशवंतराव चव्हाण यांचा आज जन्मदिन. त्यानिमित्ताने त्यांना वाहिलेली ही शब्द सुमनांजली.
मी इयत्ता अकरावी मध्ये असताना मराठीच्या पुस्तकात "सोनहिरा" नावाचा एक धडा अभ्यासाला होता. सौ.कडूरकर मॕडम यांनी तो इतका तन्मयतेने शिकविला, की त्यातील व्यक्तिरेखा श्री. यशवंतराव चव्हाण आंम्हा विद्यार्थ्यांना अगदी घरातील व्यक्ती वाटू लागली. मी तर तेव्हापासूनच त्यांचा चाहता झालो. मॕडमकडून आणखी माहिती घेतली, शाळेच्या ग्रंथालयातून त्यांची पुस्तके मिळविली, वाचून काढली." यशवंतराव : इतिहासाचे एक पान" हे त्यांचे एक मोठ्ठे चरित्रपुस्तक मात्र लगेचच परत करावे लागल्याने वाचायचे राहून गेले. पुढे काही दिवसांनंतर मी एक पोष्टकार्ड आणले, "आदरणीय महोदय, मला आपले चरित्र वाचावयाचे आहे, परंतु पुण्यात पुस्तक उपलब्ध नाही. आपण मला पुस्तक पाठविले तर बरे होईल."असा मजकूर लिहून- "श्री. यशवंतराव चव्हाण, नवी दिल्ली -१" एवढ्याच पत्त्यावर पत्र पाठवून दिले. त्यानंतर काही दिवसांनी आमच्या मोशी गावचा पोष्टमन मारुती सस्ते, मी घराजवळच्या शेतात काहीतरी काम करीत होतो, तिथपर्यंत आला. पोष्टमन जोरजोरात ओरडून सांगत होता, 'अरे अरुण, लवकर ये, दिल्लीहून काहीतरी महत्त्वाचे पार्सल आलेय.! 'अर्थातच ते पार्सल म्हणजे चव्हाण साहेबांनी माझ्या पत्रास दिलेला प्रतिसाद होता ! माझा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना ! ते पार्सल दिल्लीहून श्री यशवंतराव चव्हाण साहेब यांच्याकडून आलेले होते ! "यशवंतराव इतिहासाचे एक पान" हे पुस्तक त्यांनी पाठविले होते.
किती महान व्यक्तिमत्त्व, एका सामान्य विद्यार्थ्याच्या पत्राची केवढी दखल त्यांनी घेतली ! मला खुप आनंद झाला. काय करावे, कुणाकुणाला सांगावे तेच कळेना ! ते पुस्तक मी अनेकदा वाचले. माझ्या अनेक मित्रांनीही ते वाचले. ते पुस्तक मी त्यांच्या पत्रासह आणि पार्सलच्या आवरणासह 'ऐतिहासिक ठेवा' म्हणून आजतागायत जतन केले आहे. नंतर माझा त्यांचा काहीवेळा पत्रव्यवहार झाला. त्याकाळी "अरुणला, यशवंतराव चव्हाण साहेबांची पत्रे येतात." असा बोलबाला माझ्या गावात आणि मित्र परिवारात सर्वत्र होता. असेच एकदा मी त्यांना पत्र पाठवून भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी तात्काळ पुण्यातील "श्री शिवाजी मिलीटरी स्कूल" च्या एका कार्यक्रमासाठी ते येणार होते, तिथे वेळ दिली. (१९८३). मी मोशीहून वीस किलोमीटर सायकल चालवत गेलेला एक पोरगा..! त्या व्ही.आय.पी. शामियान्यात सुरुवातीला प्रवेशच मिळत नव्हता. पण खिशातून घामाने ओलसर झालेले 'साहेबांचे पत्र ' काढून पोलिस अधिकाऱ्यांना दाखविताच माझे महत्त्व वाढले. त्या पोलिस अधिकाऱ्याने मला खूपच प्रेमाची वागणूक दिली. एका पोलिसाला सांगून माझी सायकल एका बाजूला लावली. मला 'फ्रेश' होण्यास सांगण्यात आले, मी तिथेच जवळच्या नळावर जावून तोंड धुतले. मला कार्यक्रमाच्या ठिकाणी पहिल्या रांगेत बसण्याचा सल्ला दिला. कार्यक्रमानंतर चहापानाचे वेळी साहेबांची भेट घालून देण्यात आली. साहेबांनी अगदी जवळ घेऊन माझी विचारपूस केली. मीही त्यांना कुटूंबातील मोठी व्यक्ती समजून मनमोकळेपणाने मनातले सर्व काही बोललो. ती एकमेव ऐतिहासिक भेट माझे अवघे आयुष्य व्यापून राहिली आहे !
भारताच्या स्वातंत्र्यासाठी शालेय वयातच तुरुंगात गेलेल्या, चव्हाण साहेबांनी जीवनाच्या अखेरपर्यंत देशसेवा केली. ते निरपेक्ष वृत्तीचे निस्सीम देशभक्त होते. सामान्य जणांची त्यांना कणव होती. राज्याच्या विकासाची विशाल दृष्टी त्यांना लाभली होती. सातारा जिल्ह्यातील देवराष्ट्रे या लहानशा गावात, एका अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या यशवंतराव चव्हाण यांनी गरिबीचे चटके सहन करीत त्या प्रतिकूल परिस्थितीतही कराड, कोल्हापूर आणि पुण्यात बी.ए.एल.एल.बी. पर्यंत शिक्षण घेतले. त्यांची आई विठाबाई यांनी मोलमजुरी करून मुलांना घडविले. स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी झालेले यशवंतराव स्वातंत्र्यानंतर राजकारणात आले. जनतेने त्यांना भरघोस पाठबळ दिले. ते मंत्री झाले. तत्कालीन मुंबई राज्याचे आणि संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्याच्या उभारणीसाठी नियोजनपूर्वक आणि दूरदृष्टीने केलेल्या मूलभूत कामगिरीवर आज महाराष्ट्र राज्य सर्व क्षेत्रात अग्रेसर आहे. महाराष्ट्राच्या विकासाची जननी ठरलेल्या कोयना धरणाची निर्मिती ही त्यांच्या कर्तृत्वाची सर्वात मोठी देणगी ठरली. कोयना धरणामुळे महाराष्ट्र हे देशातील शेती, सिंचन, सहकार, वीजनिर्मिती आणि औद्योगिक क्षेत्रात आघाडीचे राज्य ठरले. कृषी औद्योगिक समाजरचनेचा पाया त्यांनी घातला. शेतकऱ्यांची मुले शिकली तरच प्रगती शक्य आहे, या धारणेतून त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले आणि माध्यमिक शिक्षणासाठी आर्थिक दुर्बल वर्गासाठी (ई.बी.सी.) सवलत योजना सुरू केली. आजही ती महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यात राबविली जाते. त्यामुळे शिक्षणाची गंगा शहरी आणि ग्रामीण भागात घरोघरी पोहोचली. कारखानदारीला चालना देण्यासाठी त्यांनी एम.आय.डी.सी.ची स्थापना केली. त्याचबरोबर राज्यात सर्वत्र औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे (आय.टी.आय.) जाळे विणले. त्यातून उद्योगांसाठी हजारो कुशल तंत्रज्ञ निर्माण झाले. सहकाराला चालना देण्यासाठी सहकारी साखर कारखाने, सहकारी दुग्ध संस्था, विविध कार्यकारी सोसायट्या सुरू केल्या. आज कदाचित काही गोष्टींचे महत्त्व कमी वाटत असेल, मात्र सत्तर-पंच्याहत्तर वर्षांपूर्वीच्या अविकसित महाराष्ट्राला विकासाच्या रुळावर आणण्यासाठी चव्हाण साहेबांनी राबविलेल्या अनेक योजना आणि धोरणांचे मोल आजही अतुलनीय आहे. संपूर्ण देशाला दिशा देणारा महाराष्ट्र घडविण्याची महान कामगिरी त्यांच्या नेतृत्वाने केलेली आहे. एवढेच नव्हे मराठी संस्कृती, साहित्य, कला आणि भाषेच्या विकासासाठी त्यांनी साहित्य संस्कृती मंडळाची निर्मिती केली. त्याहीपुढे जाऊन मराठी विश्वकोश मंडळाची निर्मिती आणि त्यानुषंगाने झालेले कार्य मराठीसाठी सर्वात मौलिक ठरले आहे. एखादे वैचारिक उंचीचे प्रगल्भ नेतृत्व लाभल्यानंतर राज्याला किती उंची प्राप्त होऊ शकते हे स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याकडे पाहिल्यावर लक्षात येते. कला, क्रीडा, साहित्य, कृषी, सिंचन, उद्योग, शिक्षण, दळणवळण अशा जीवनाच्या सर्वच क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटविला आहे. म्हणूनच खऱ्या अर्थाने ते महाराष्ट्राचे शिल्पकार ठरले आहेत.
राजकीय पटलावरही एक सुसंस्कृत नेता म्हणून त्यांची ओळख देशभर आहे. त्यांनी नेहमी बेरजेचे राजकारण केले. लोकशाही व्यवस्थेत विरोधकांनाही सन्मानाने वागविण्यासाठी ते आग्रही राहिले. महाराष्ट्रात ग्रामपंचायत, तालुका पंचायत आणि जिल्हा परिषदांची निर्मिती करून, सत्तेचे विकेंद्रीकरण करण्यासाठी त्यांनी पंचायत राज व्यवस्था निर्माण केली. त्यामुळे ग्रामीण भागातून असंख्य कार्यकर्ते निर्माण झाले, सत्तेच्या उच्चस्थानी पोहोचले.
भारतावर चीनने आक्रमण केल्यावर पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना भारताचे संरक्षणमंत्री म्हणून पाचारण केले. हिमालयाच्या रक्षणार्थ सह्याद्री धावला, हा वाक्प्रचार तेव्हापासून रूढ झाला. त्यावेळी प्रत्यक्ष सीमेवर जाऊन त्यांनी सैन्यदलाचे आत्मबल वाढवून आवश्यक सुविधा पुरविल्या. सैन्यदलाच्या मजबुतीकरणासाठी त्यांनी परिश्रम घेतले. पुढे याच सैन्याने भारत पाक युद्धात लाहोरपर्यंत मजल मारली. दिल्लीमध्ये केंद्रीय अर्थ, गृह आणि परराष्ट्र मंत्री म्हणूनही त्यांनी दीर्घकाळ कामगिरी केली. प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. सन १९६९ मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला. भारतीय अर्थव्यवस्था मजबूत होण्यास त्यामुळे मदत झाली. आठव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी लक्षणीय कामगिरी केली आहे. मुळातच भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक लढाऊ सेनानी असलेल्या या देशभक्त नेत्याने प्रत्येक क्षेत्रात निरपेक्षपणे आपले भरीव योगदान दिलेले आहे.
पुढील काळात चरणसिंग यांच्या नेतृत्वाखाली देशाचे उपपंतप्रधान पदही त्यांनी भूषविले. कोणत्याही पदावर असले तरी त्यांनी आयुष्यभर कृतार्थपणे राष्ट्रसेवा केली. दिनांक २५ नोव्हेंबर १९८४ रोजी कृष्णाकाठच्या या सुपुत्राची जीवनज्योत अनंतात विलीन झाली. महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणारा, एक सर्वज्ञ, संवेदनशील, वैचारिक आणि सुसंस्कृत लोकनेता काळाच्या पडद्याआड गेला. एक तत्त्वनिष्ठ, त्यागी आणि सामान्य जणांची जाण असणारा द्रष्टा लोकनेता म्हणून महाराष्ट्राला त्यांची आठवण कधीच विसरता येणार नाही. म्हणूनच ते देशाच्या आणि राज्याच्या इतिहासाचे एक चिरंतन पान सदैव स्मरणात राहतील.
मी त्यांच्या जीवनावर मनापासून अभ्यास केला. आजही मी शाळा, महाविद्यालयांतून नव्या पिढीला "कै. यशवंतराव चव्हाण साहेब आणि महाराष्ट्राची जडणघडण " याविषयी भरभरून सांगत असतो. त्यांच्या देवराष्ट्रे, सागरेश्वर, कराड- प्रीतीसंगम या ठिकाणांना मी अनेकदा भेटी दिल्या आहेत. कराड येथील कृष्णा कोयनेच्या संगमाला 'प्रीतिसंगम' म्हणतात. याच ठिकाणी स्व.चव्हाण साहेबांचे समाधीस्थान आहे. ते स्थळ म्हणजे सामाजिक राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा ऊर्जास्त्रोत आहे. मी जेव्हा कधी कराड कोल्हापूर भागात जातो, तेव्हा आवर्जून प्रीतिसंगमी जावून या समाधीवर नतमस्तक होतो.
अशा या महान देशभक्त, स्वातंत्र्य सेनानीला जयंतीनिमित्त विनम्र आदरांजली.
@ अरुण बोऱ्हाडे
(मोबाईल -९८८१३०१३३९)
**

स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब आपणास विनम्र अभिवादन, आजच्या महाराष्ट्राची राजकीय दुर्दशा आपणास नक्कीच वेदनादायक वाटत असेल, आपली महाराष्ट्राची कल्पना दृष्टी आणि दूरदृष्टी याविपरीत सर्व काही घडत आहे. पुन्हा एकदा यशवंताची गरज महाराष्ट्राला आहे.
ReplyDeleteपुन्हा एकदा यशवंताची गरज महाराष्ट्राला आहे.
ReplyDeleteExcellent information
ReplyDeleteखुप छान अपरिचित माहिती भेटली
ReplyDeleteसंयम आणि राजकीय शिस्त यांचा प्रीतिसंगम असलेला कृष्णे काठचे उत्कृष्ठ नेतृत्व असणारा सह्याद्री चा कणखर देशभक्त हिमालयाच्या संरक्षणासाठी तत्पर महान व्यक्तिमत्वला कोटी कोटी प्रणाम आणि आदरांजली 🌹🌹🌹🙏🏼🙏🏼🙏🏼
Deleteमहाराष्ट्राचा नव्हे देशाचा मानबिंदू असलेल्या चव्हाण साहेबांना विनम्र आदरांजली 💐💐💐🇭🇺🙏🏿
ReplyDeleteयशवंतराव चव्हाण यांचे विचार आजच्या महाराष्ट्राला गरजेचे आहेत
ReplyDeleteअप्रतिम
ReplyDeleteविनम्र अभिवादन
ReplyDeleteVery nice memories,No words ,,,,,👌👌🙏🙏 साहेबांना विनम्र अभिवादन🙏🙏
ReplyDelete