कुठे हरवली शहरातील ती हरनामसिंहांची हिरवाई ! [लेखक : अरुण बोऱ्हाडे]
कुठे हरवली शहरातील ती हरनामसिंहांची हिरवाई !
पुणे मुंबई रस्ता सोडून आपण नाशिकफाट्याकडे वळलो की जवळपास एक कि.मी.चा प्रवास एखाद्या दाट वनराईतून किंवा हिरव्यागार बोगद्यातून केल्यासारखे वाटत असे. हे हिरवेगार वैभव अनेकजणांना आजही आठवत असेल. अगदी अलीकडे दहाबारा वर्षांपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा ही हिरवीगार दाट झाडी आपल्याला सुखावत होती. सन १९८२ च्या ऑक्टोबरमध्ये पिंपरी चिंचवड नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झाले. त्यावेळी भारतीय प्रशासन सेवेतील श्री हरनामसिंह नावाचे अधिकारी प्रशासक म्हणून नेमले गेले. एक धाडसी, करारी, सुजाण, प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष प्रशासक म्हणून अल्पावधीतच जनमानसांत त्यांनी आपली प्रतिमा सिद्ध केली. आता महानगरपालिकेला चाळीस वर्षे होऊन गेली. मात्र सुरुवातीच्या काळात श्री हरनामसिंह यांनी राबविलेल्या अनेक पायाभूत योजना व प्रकल्प आजही मार्गदर्शक ठरतात. सध्याची मनपा भवनाची टोलेजंग आणि देखणी इमारत, निगडीतील आखीवरेखीव वाहतूकनगरी, दुर्गादेवी टेकडीवरील नियोजनबध्द वृक्षारोपण अशा अनेक गोष्टी त्यांच्या कर्तबगारीच्या खुणा आजही जपत आहेत.
प्रत्येक वर्षी पावसाळा आला की मला श्री हरनामसिंह यांची आठवण होते. शहरातील रस्त्याच्या कडेला असणाऱ्या अनेक रिकाम्या जागा महापालिकेच्या ताब्यात घेऊन त्यांनी वृक्षारोपणाचा मोठा उपक्रम राबविला होता. ताब्यात घेतलेल्या जागांना तारकुंपण घालून सुरक्षित केले. औद्योगिक क्षेत्रातील रिक्त जागेवरही त्यांनी असेच मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले होते. विशेष म्हणजे या वृक्षारोपण कार्यक्रमात त्यांनी सर्व सामाजिक संस्था, सार्वजनिक मंडळे आणि नागरिकांनाही सहभागी करून घेतले होते. अनेक लहानमोठ्या औद्योगिक आस्थापनांना विश्वासात घेऊन अक्षरशः लाखोंच्या संख्येने झाडे त्यांच्या कार्य काळात लावण्यात आली. त्यांची निगा आणि नियमित पाण्याची देण्याची यंत्रणा निश्चित केली. तत्कालीन उद्यान अधिकारी शांताराम भोंडवे व त्यांच्या विभागातील सहकाऱ्यांनी त्यांना सक्षमपणे साथ दिली. शहरातील हजारो नागरिक, कार्यकर्ते, मंडळांचे पदाधिकारी, तत्कालीन कर्मचारी आणि पत्रकार या उपक्रमाचे साक्षीदार आहेत. त्याकाळी अल्पावधीतच या शहराने हिरवाईचा शालू पांघरलेला दिसत होता. प्रत्येक रस्त्याला दुतर्फा वाढलेली डौलदार झाडी पाहिली की मनाची प्रसन्नता फुलायची. अनेक चांगली उद्याने त्यांनी विकसित केली. त्याशिवाय दुर्गादेवी टेकडीवरील सुसूत्रपणे जपलेली हिरवाई आणि त्यातील वळणदार रस्त्यावरून सकाळच्या गारव्यातून चालण्याचा आनंद आजही हजारो नागरिक घेत आहेत. या प्रत्येक ठिकाणी श्री हरनामसिंह यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. त्यांच्या कामगिरीची दखल घेऊन केंद्र सरकारने त्यांना प्रियदर्शिनी वृक्षमित्र पुरस्काराने गौरविले होते.
आज काळ मागे गेला आहे. पुन्हा एखादा शहरात एखादा हरनामसिंह येण्याची गरज आहे. नागरिक, मनपा कर्मचारी, अधिकारी, कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी या सर्वांचीच पर्यावरणाकडे डोळेझाक झालेली दिसते.सुरुवातीला उल्लेख केलेल्या नाशिक फाट्यावरील झाडांची दाटी आता काहीशी विरळ होऊ लागली आहे. वेळीच आवर घातला नाही तर तिथे उजाड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या परिसरात कुठे कुठे सपाटीकरण झालेले दिसतेय. त्याच पट्ट्यात एकेठिकाणी वाहतूक पोलिसांचे कार्यालय झाले आहे. मध्यंतरी टोलनाका झाला होता. त्यात वाढलेली झाडे गायब झाली आहेत. काही ठिकाणी आता दुतर्फा फेरीवाले, विविध प्रकारचे विक्रेते यांनी आपले अस्तित्व विस्तारले आहे. शहरात अनेक ठिकाणी ही परिस्थिती निर्माण झाली आहे. एकेकाळी हिरवाईने नटलेले अनेक रस्ते उजाड झाले आहेत. हिरवाई नाहीशी करून, परिसर उजाड करून अनेकांची "दुकानदारी" चालू आहे. औद्योगिक क्षेत्रात तर काही ठिकाणी तारेचे कुंपण तोडून अतिक्रमण झालेले दिसते. औद्योगिक क्षेत्रातील रिक्त जमिनींवर काहीजणांनी ताबे ठोकून नवनवे उद्योग व्यवसाय सुरू केलेले आहेत. लोकांनी वृक्षतोड करून, जागा बळकावून स्थिर होईपर्यंत महापालिका प्रशासन, वृक्षसंवर्धन विभाग आणि लोकप्रतिनिधी डोळे उघडे ठेऊन पाहत आहेत. काही कंपनी मालकांनी या वृक्षवल्लीला मूठमाती देऊन कर्मचाऱ्यांसाठी पार्किंगची सोय केली आहे. तर काही ठिकाणी झोपडपट्टी सांभाळली गेली आहे. त्यांना वीज, पाणी अशा सर्व सुविधा देऊन कायमखुष करण्यात आले आहे. अर्थात यामध्ये लावलेली, जतन केलेली आणि वाढलेली झाडी कुठे हरवली याचे उत्तर कोणाकडेही नाही.
शहरात काही ठिकाणी म्हणजे निगडी प्राधिकरण, चिंचवडमधील काही भाग, नवविकसित पिंपळे सौदागरचा काही भाग अशा ठराविक ठिकाणी हिरवीगार झाडी जपलेली आहेत. त्या परिसरातून जाताना निश्चितपणे मन सुखावते, ताजेतवाने होते. पण हे प्रमाण खूप कमी आहे.शहर सुधारणा म्हणजे तरी काय, केवळ रस्ते, फूटपाथ, इमारती, आधुनिक दिवाबत्ती, मोठमोठे प्रकल्प, मेट्रो सुविधा म्हणजेच सुधारणा अशी आमची धारणा झाली आहे. पर्यावरण, वृक्षारोपण, स्वच्छ्ता, भूजल संरक्षण याचा विचार कोणी करायचा ? कोणी म्हणतील आम्ही नेहमी वृक्षारोपण करतो. खरे आहे, अनेकजण वृक्षारोपणाचे कार्यक्रम राबवितात, बातम्या छापून आणतात. कधीकधी तर हसू येते, दरवर्षी त्याच त्या खड्ड्यात नव्याने वृक्षारोपण केले जाते, फोटो छापले जातात आणि रोपे सुकून जातात. आपण लावलेली रोपे जबाबदारीने जपणार कोण, वाढविणार कोण ?
महापालिकेच्या बांधकाम नियमावलीत प्रत्येक गृहप्रकल्पात झाडे लावण्याची कायदेशीर तरतूद आहे. अर्थात ती कागदावरच शोभून दिसते. कधीतरी मनपा अधिकाऱ्यांनी प्रत्येक गृहप्रकल्पात प्रत्यक्ष जावून पाहणी करावी, तेव्हा शहरात किती घरे आणि किती झाडी आहेत याचे सत्य समोर येईल.पिंपरी चिंचवड शहर व परिसर झपाट्याने वाढत आहे, सुधारणांना गती देऊन प्रगती करीत आहे. शहरात मोठमोठे गृहप्रकल्प आणि असंख्य शिक्षण संस्था आल्या आहेत. लोकसंख्येत दिवसेंदिवस प्रचंड वाढ होत आहे. तरीही आपण पर्यावरणाकडे डोळेझाक करीत आहोत, हेही एक कटूसत्य आहे.
श्री. हरनामसिंह यांची आठवण ठेऊन महापालिका कर्मचारी, अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी याकामी पुढाकार घेऊन शहरातील हिरवाईचा वसा आणि वारसा जपावा. नव्याने वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन करून या वैभवात भर घालावी, एवढीच माफक अपेक्षा.
@ अरुण बोऱ्हाडे...✍️
( दिनांक : २५ जुलै २०२३)
#




श्री हरनामसिंह (आय.ए.एस.) हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे पहिले प्रशासक होते. स्वयंशिस्त असलेले एक सुजाण, प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांचा लौकिक होता. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनासाठी सखोल कार्य केले. शहरात उद्याने विकसित केली. त्याकाळात केंद्रशासनाने "प्रियदर्शिनी वृक्षमित्र पुरस्काराने" गौरविलेले ते बहुधा एकमेव प्रशासकीय अधिकारी होते. पुढे काही वर्षांनी दिल्लीमध्ये पंतप्रधान कार्यालयात महत्वाच्या पदावर त्यांची नियुक्ती झाली होती.
ReplyDelete@ अरुण बोऱ्हाडे...✍️
खुप छान लेख आहे. हरनामसिंग हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील एक कर्तबगार प्रशासकीय अधिकारी होते.
Deleteआपण त्यांच्या कार्याची माहिती दिली. आपले अभिनंदन.
🙏
Deleteछान संदर्भ व मागोवा
ReplyDelete🙏
Deleteत्यावेळेस ज्यांनी ज्यांनी पिंपरी चिंचवड चे प्रथम प्रशासकीय अधिकारी व आयुक्त हरणामसिंग यांचा कार्यकाळ पाहिला , अनुभव घेतला आहे... ते आज ही हृदय आठवण करतात त्यांची ... खरेच नाशिकफाटा परिसर त्यांचे कामाचे.. एक अनमोल ठेवा .. असल्याचे उदाहरण होते
ReplyDelete👍
Delete👍👍
ReplyDeleteखुप छान लेख आहे. हरनामसिंह हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील एक कर्तबगार प्रशासकीय अधिकारी होते.
ReplyDeleteआपण त्यांच्या कार्याची माहिती दिली. आपले अभिनंदन.
🙏
DeleteRespected Arun Ji,
ReplyDeleteNamaskar.
I have gone through your write-up today. I am happy that you wrote about our program of environmental protection initiated exactly 40 years back on Pune Nashik Highway, Durga Devi Tekadi, and all other vacant places in the PCMC area with late Shri Shantaram Ji Bhondve Ji and his team of garden department along with local residents. I wish to talk to you on the phone for a minute, if you are free. Best regards.
Harnam Singh IAS Retd Mumbai.
🙏
Deleteदर वर्षी नवरात्रीत आमच्या शिवनेरी शेजारी असलेल्या अंबा अंबिका या सह्याद्री च्या कुशीत हिरव्या डोंगरातील देवीला जाताना हिरवाईचा सुरवात नाशिक रोड च्या सुरवातीपासून सुरु व्हायची
ReplyDeleteअप्रतिम लेख आजही कुणीतरी हरनाम सिंह सारख्या निसर्ग प्रेमी व्यक्तीची PCMC ला अत्यंत आवश्यकता आहे तरच हिरवाई फुलेल