पवनाकाठचा कर्मयोगी : पिंपरी चिंचवडचे भाग्यविधाते 'अण्णासाहेब मगर' (लेखक : अरुण बोऱ्हाडे )
पवनाकाठचा कर्मयोगी : पिंपरी चिंचवडचे भाग्यविधाते 'अण्णासाहेब मगर'.
(लेखक @ अरुण बोऱ्हाडे )
🌿
पिंपरी-चिंचवड शहराच्या उभारणीच्या पायाभूत कारकिर्दीतील प्रमुख शिल्पकार, पहिले नगराध्यक्ष कै. अण्णासाहेब मगर यांचा आज दि.२५ जून स्मृतिदिन. देशामध्ये "बेस्ट सिटी" म्हणून पुरस्कार मिळविलेल्या पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासाची मुहूर्तमेढ कै. अण्णासाहेबांनी रोविली. कै. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रयत्नांतून पिंपरी-चिंचवड परिसरामध्ये अनेक मोठ-मोठे कारखाने आले, उद्योगधंदे आले. त्यामुळे परिसरात कामगार, रहिवासी यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. वाढत्या लोकसंख्येमुळे मूलभूत गरजाही वाढल्या. नागरिकांच्या मुलभूत नागरी सोयी-सुविधांच्या पूर्ततेसाठी तत्कालीन हवेली तालुक्याचे आमदार कै. अण्णासाहेब मगर यांनी या परिसरात नगरपालिका व्हावी म्हणून पाठपुरावा केला. देशाचे नेते यशवंतराव चव्हाण साहेबांच्या औद्योगिकीकरणाच्या प्रयत्नांना पुरेपूर साथ देताना, स्थानिक गावकरी, उद्योजक आणि सरकारमध्ये सुयोग्य समन्वय साधण्याची मौलिक कामगिरी त्यांनी कुशलतेने निभावली.
राज्य सरकारने दि. ४ मार्च १९७० रोजी पिंपरी वाघेरे, चिंचवड, भोसरी आणि आकुर्डी-निगडी या गावांच्या ग्रामपंचायती बरखास्त करून पिंपरी-चिंचवड नव-नगरपालिका स्थापन केली. आमदार अण्णासाहेब मगर यांची सरकारने पहिले नगराध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. तेव्हा केवळ नगराध्यक्ष म्हणूनच नव्हे, तर एखाद्या सुजाण पालकाच्या भूमिकेतून अण्णासाहेबांनी रात्रीचा दिवस करून या शहराच्या जडणघडणीमध्ये लक्ष घातले. तत्कालीन स्थानिक नेते ज्ञानेश्वर लांडगे, भिकू वाघेरे पाटील, शंकर भाऊ मुथा, पांडुरंग काळभोर, मामासाहेब पिंपळे इत्यादी स्थानिक नेतृत्वाला विश्वासात घेऊन विकासाचे एक एक पाऊल पुढे टाकले. राज्याच्या आणि देशाच्या विविध भागांतून आलेल्या प्रत्येक नागरिकास या शहरात सुखाने राहता यावे, या दृष्टीने स्वच्छ पाणीपुरवठा, सार्वजनिक आरोग्य, दवाखाने, शाळांसाठी चांगल्या दर्जेदार इमारती, रस्ते, उद्याने, क्रीडांगणे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था (पी.सी.एम.टी.) इत्यादी विकासकामे त्यांनी स्वतः जातीने लक्ष घालून करून घेतली. निस्वार्थी भावनेतून आणि एखाद्या ध्येयवेड्या माणसाप्रमाणे अहोरात्र काम करून कै. अण्णासाहेबांनी या शहराला नावलौकिक मिळवून दिला. त्यांनी केलेल्या पायाभूत कामांवरच आज पिंपरी चिंचवड शहराचा जागतिक पातळीवर लौकिक आहे. बदलत्या काळानुसार आणि गरजेनुसार आवश्यक त्या बदलांसह आज शहराच्या विकासाचा कळस डौलाने झळकतो आहे. कै.अण्णासाहेब म्हणजे सार्वजनिक विकासासाठी एक झपाटलेले व्यक्तिमत्व होते. त्यांचे मुळगाव हडपसर. एका सधन शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला.
'मार्तंड धोंडीबा मगर' हे त्यांचे पूर्ण नाव. बी. एस्सी. (ॲग्रीकल्चर ) झाल्यानंतर त्यांनी समाजकार्यात झोकून दिले. भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे ते एक सुजाण साक्षीदार होते. काँग्रेसच्या चळवळीचा, गांधी-नेहरूंच्या विचारांचा पगडा त्यांच्यावर होता. सन १९४८ मध्ये ते जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून काम करू लागले. काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणजे सामाजिक बांधिलकी असणारा, देशभक्त, समाजसेवक अशी त्याकाळी ओळख असायची, असे जुने लोक सांगतात. सन १९५२ मध्ये ते हवेलीचे आमदार झाले, विधानसभेवर निवडून गेले. त्याकाळी हवेली तालुक्याचा आणि मतदार संघाचा विस्तार मोठा होता. १९५७ चा अपवाद वगळता ते सातत्याने विधानसभेवर निवडून गेले. ते कुशल संघटक होते. शहरी आणि ग्रामीण विकासासाठी आवश्यक दृष्टी त्यांच्याकडे होती. त्यासाठीच त्यांचा ध्यास होता. त्यांचे कार्यक्षेत्र केवळ पिंपरी-चिंचवड नव्हते.
हवेली तालुक्यातील अनेक गावांतील शेतजमिनी ओलीताखाली आणण्यासाठी, गावोगावी सिंचनाच्या योजना त्यांनी राबविल्या. त्यांच्याच पुढाकाराने थेऊरचा यशवंत सहकारी साखर कारखाना सुरु केला. पुण्याच्या गुलटेकडीवर संपूर्ण आशिया खंडात विशाल अशी "कृषी उत्पन्न बाजार समिती"चे आणि त्या आगळ्या-वेगळ्या बाजार संकुलाचे निर्माते आणि शिल्पकारही अण्णासाहेबच. पिंपरी चिंचवड मधील आर्थिक विकासाला साथ देताना त्यांनी "पवना सहकारी बँकेची" स्थापना केली. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी मोठे योगदान दिले आहे. त्यांनी सुरु केलेल्या सर्व संस्था नावारूपाला पोहोचल्या. अविकसित परिसरामध्ये दूरदृष्टीच्या हत्याराने, कर्तृत्वाचे लेणे कोरून, त्यांनी नेतृत्वाचे सोने केले. शेती, सहकार, शिक्षण, नागरी विकास, ग्राम विकास अशा विविध क्षेत्रात त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला. सन १९७७ मध्ये देशात सर्वत्र काँग्रेसचा पराभव होत असताना, खेडमधून अण्णासाहेब खासदार म्हणून लोकसभेवर निवडून गेले. त्यांच्या कर्तृत्वाचा प्रभाव संपूर्ण जिल्हाभर होता. ते काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि आमदार- खासदार असले तरी अजातशत्रू होते.
अण्णासाहेब मगर यांच्याविषयीची एक मौलिक आठवण सामाजिक कार्यकर्ते श्री किरीटी मोरे यांनी मला सांगितली आहे. तत्कालीन प्रजा समाजवादी पक्षाचे नेते, आमदार शामकांत मोरे हे त्याकाळी महाराष्ट्रातील एक मान्यवर विचारवंत आणि चळवळीतील नेते होते. अण्णासाहेब मगर यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्यातील कामगारांचे काही प्रश्न प्रलंबित होते. त्यामध्ये लक्ष घालून ते सोडवावेत म्हणून शामकांत मोरे पाठपुरावा करीत होते. व्यवस्थापनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही, म्हणून त्यांनी कारखान्याचे अध्यक्ष आमदार अण्णासाहेब मगर यांच्या घरासमोर उपोषण करण्याचा निर्णय घेतला. त्यास अण्णासाहेबांनी कुठलाही प्रतिरोध केला नाही. उलट उपोषण करताना उन्ह लागू नये म्हणून, मांडव घालण्याच्या सूचना केल्या, मांडव घालून दिला. एक दिवसाचे उपोषण पूर्ण झाले. त्यादिवशी सायंकाळी त्यांनी कामगारांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. त्यानंतर अण्णासाहेबांनी शामकांत मोरे यांना आपल्या घरी सहकुटुंब जेवणाचे निमंत्रण दिले. जेवण आटोपल्यावर उभयतांनी कारखान्यात जावून पाहणी केली. केवढा हा परस्परांविषयी आदर आणि लोकशाहीचा सन्मान ! अण्णासाहेब काँग्रेस पक्षाचे नेते, तर शामकांत मोरे विरोधी पक्षाचे नेते. आपल्याविरोधात उपोषण करणाऱ्या नेत्याचा आदरसत्कार करणारे अण्णासाहेब मगर किती महान विचारांचे लोकनेते होते, तितकेच त्यांना प्रतिसाद देणारे मोरे साहेब देखील निर्मळ वृत्तीचे नेते होते, हेच यातून स्पष्ट होते. आजच्या राजकीय नेत्यांना यातून खूप काही शिकता येण्यासारखे आहे.
मुळातच नि:स्वार्थी आणि मनापासून लोकसेवा करण्याचा त्यांचा पिंड होता. राजकारणापेक्षा समाजकारण त्यांना प्रिय होते. सत्तेपेक्षा सेवेमध्ये ते रमत असत. सर्वांगीण विकासासाठी, सर्वांना बरोबर घेऊन काम करणे. सार्वजनिक हितासाठी त्याग करणे आणि त्यायोगे गरिबांचे अश्रू पुसणे हे त्यांचे ध्येय होते. शहरात कारखाने स्थिरावले पाहिजेत आणि त्यासाठी त्यांना नगरपालिकेचे व शासनाचे योग्य ते सहकार्य दिले पाहिजे, कारखाने चालविताना कामगारांचेही हित जपले पाहिजे अशी त्यांची धारणा होती . म्हणूनच त्यांनी "इंटक"च्या माध्यमातून शहरातील कामगारांचेही नेतृत्व केले. समाजकारण, राजकारण करताना त्यांनी सदैव सामान्य माणूस मध्यवर्ती ठेवून काम केले. त्यांनी जिल्हाभर कार्यकर्ते घडविले. खरे तर अण्णासाहेब म्हणजे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची चालती फिरती कार्यशाळाच होती. त्यांनी घडविलेले अनेकजण पुढे विविध पदांवर जावून पोहोचले. अशा या लोकनेत्याची दिनांक २५ जून १९७९ रोजी प्राणज्योत मालविली. जिल्हाभर काम केले असले तरी, पिंपरी-चिंचवड शहरासाठी त्यांनी केलेले काम अद्वितीय स्वरूपाचे आहे. ते पिंपरी चिंचवड शहराचे भाग्यविधातेच आहेत. या परिसराच्या विकासासाठी ते अहोरात्र आणि नि:स्वार्थ भावनेने झटले आहेत. एकाअर्थी ते पवानाकाठचे कर्मयोगीच होते. ते अविवाहित होते. त्यांच्या कुटुंबातील कोणीही राजकारणात नाहीत. समाजालाच त्यांनी कुटुंब मानले. आज सार्वजनिक जीवनात त्यांच्या नंतरची तिसरी पिढी समाजकारणात, राजकारणात कार्यरत आहे. म्हणूनच त्यांच्या स्मृतीदिनी सार्वजनिक जीवनात कार्यरत असणाऱ्या प्रत्येकानेच त्यांचे स्मरण करणे गरजेचे आहे.
अण्णासाहेब मगर यांच्या कार्यकर्तृत्वाची हवी तेवढी दखल पिंपरी चिंचवड शहरातील राजकीय मंडळींनी घेतली नाही. मध्यंतरी त्यांची जन्मशताब्दी साजरी करण्याची मागणी करूनही, सत्तेच्या धुंदीत मश्गूल असणाऱ्या मंडळींनी त्याकडे दुर्लक्ष केले. एरवी नको तिथे करोडो रुपयांचा चुराडा करणाऱ्या स्थानिक नेत्यांना व महापालिका प्रशासनाला आपल्या मुळ नेतृत्वाच्या शताब्दी निमित्ताने एक फुल अर्पण करता आले नाही, यापरीस दुर्दैव नाही. महानगरपालिका भवनासमोरील त्यांचा एकमेव पुतळा वगळता अण्णासाहेबांचे एकही मोठे स्मारक नाही. त्यांच्या नावाचे एकमेव स्टेडियम होते, तेही आता नवीन बांधण्यासाठी जमीनदोस्त झाले आहे. महापालिकेतील शाळेला असलेले त्यांचे नाव बदलण्याचा कृतघ्नपणा शहरातील मंडळींनी अलिकडे केला आहे. या शहरातील सर्वच राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांना, उद्योजकांना, व्यापाऱ्यांना, वृत्तपत्रांना, कामगार नेत्यांना अण्णासाहेब मगर यांच्या कर्तृत्वाचा विसर पडला आहे. ज्या झाडाची फळे आपण चाखतोय त्याची जाणिव ठेवणे आपले कर्तव्य असते, हेच त्यांना उमगत नाही.
ज्यांच्या नेतृत्वाने आणि कर्तृत्वाने या समाजाला, शहराला दिशा दिली, त्यांची स्मृती जपण्याची वृत्ती असावी. एखाद्या मोठ्या प्रकल्पाला अथवा महापालिकेतील एखाद्या लोकोपयोगी योजनेला अण्णासाहेबांचे नाव देऊन त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त व्हायला हवी. अण्णासाहेबांच्या कर्तृत्वातून उभ्या राहिलेल्या सर्वच संस्था ही त्यांची स्मारके आहेत. त्या संस्थांचा नावलौकिक वाढविणे, त्यांच्या कर्तृत्वाचा वसा आणि विचारांचा वारसा जपणे हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल.
आज त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त माझी विनम्रपणे भावपूर्ण श्रद्धांजली.
🙏
© लेखक - अरुण बोऱ्हाडे (मो. ९८८१३०१३३९)

भावपूर्ण आदरांजली
ReplyDeleteमाहितीपूर्ण लेख.
ReplyDeleteसाहेबांना आदरांजली.
भावपुर्ण श्रध्दांजली...
ReplyDeleteअत्यंत सुंदर , आदरणीय अण्णा साहेबांबद्दल खूपच छान माहिती . पिंपरी चिंचवडचे कर्म विधाते यांच्याबरोबर काम केलेल्या सर्व नेत्यांचे आपण उल्लेख केल्याबद्दल धन्यवाद . अण्णा साहेबांना एवढा मोठा थोर नेता पिंपरी चिंचवडला लाभला हे आपले भाग्य .
Deleteत्यांचा यथोचित सन्मान झाला पाहिजे ह्या विचाराला माझा पाठिंबा .
डॉ . नंदकुमार दुगड , निगडी ,पुणे .
खूप खूप आभार
Delete