संवेदनशील मनाचे, सुसंस्कृत नेते : राजयोगी यशवंतराव चव्हाण [लेखक : अरुण तुकाराम बोऱ्हाडे]

संवेदनशील मनाचे, सुसंस्कृत नेते : राजयोगी यशवंतराव चव्हाण 

[लेखक : अरुण तुकाराम बोऱ्हाडे]✍

महाराष्ट्र राज्याने आजपावेतो दोन डझनाहून अधिक मुख्यमंत्री पाहिले आहेत. त्या प्रत्येकाचा कार्यकाळ  अनुभवला आहे. परंतु जनसामान्यांच्या अंतःकरणात बिंबलेले आणि  दीर्घकाळ स्मरणात राहिलेले, त्यांच्या कर्तबगारीबाबत आवर्जून सांगता येईल अशी दोनचारच नांवे घेता येतील. त्यामध्ये अर्थातच महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कै. यशवंतराव चव्हाण यांचे नांव अत्यंत आदराने घेतले जाते. आपल्या सर्वांगीण कर्तृत्वाने महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणूनही त्यांनी आढळस्थान निर्माण केले आहे. एक सुसंस्कृत, सौजन्यशील आणि दूरदृष्टीचे सामाजिक, राजकीय नेते म्हणूनही त्यांची सर्वदूर ख्याती आहे. आज १२ मार्च कै. यशवंतराव चव्हाण साहेबांचा जन्मदिवस, म्हणून त्यांचे स्मरण करण्यासाठी या शब्दपाकळ्या इथे एकवटल्या आहेत.

आजपासून बरोबर ११० वर्षांपूर्वी म्हणजे दि. १२ मार्च  १९१३ रोजी तत्कालीन सातारा जिल्ह्यातील देवराष्ट्रे या अगदी छोट्या गावात त्यांचा जन्म झाला. बळवंतराव चव्हाण हे त्यांच्या वडिलांचे नांव, तर विठाई आईचे नांव. अत्यंत गरीब शेतकरी कुटूंबात जन्मलेले यशवंतराव संस्कारांनी आणि बुद्धिमत्तेने अत्यंत संपन्न होते. पुढे उदरनिर्वाहाच्या निमित्ताने त्यांचे कुटूंब कराड येथे स्थायिक झाले. लहानपणीच पितृछत्र हरपलेल्या यशवंतराव यांचे संगोपन त्यांच्या आई विठाईने मायेच्या पदराखाली, संस्कारांचे अमृत पाजून केले. एका सर्वसामान्य कुटूंबात वाढताना शालेय शिक्षणाबरोबरच राष्ट्रभक्तीची शिकवण बालवयातच त्यांना मिळाली होती.   

तो काळ भारतीय स्वातंत्र्यचळवळीने मंतरलेला होता.  यशवंतराव शालेय शिक्षण घेत असताना देशात सर्वत्र महात्मा गांधींच्या अर्थात बापूजींच्या नावाचा प्रभाव जनसामान्यांमध्ये होता. बापूजींच्या आदेशाने स्वातंत्र्यचळवळ गावोगावी कार्यरत झालेली होती. त्याच चळवळीत कृतीशील सहभाग घेऊन यशवंतराव  यांनी सहकाऱ्यांना बरोबर घेऊन प्रभातफेरी काढली. भारतमातेचा जयघोष करीत सरकारी कचेरीवर तिरंगा फडकाविला. वंदे मातरमच्या निनादाने  राष्ट्रजागृती केली. ब्रिटिश अधिकारी डिवचले गेले, यशवंतरावांना अटक करण्यात आली. स्वातंत्र्य आंदोलनातील सहभागाबद्दल शालेय वयातच त्यांना तुरुंगात जावे लागले. राष्ट्रीय प्रेरणेने ओतप्रोत भरलेल्या आई विठाईने मुलाच्या सुटकेसाठी ब्रिटिशांच्या शरणागतीच्या प्रस्तावास साफ नकार दिला. याच घटनेने यशवंतराव नावाचे राष्ट्रभक्तीचे, धैर्यशील आणि सुसंस्कृत रोपटे या मातीत रुजले,  वाढले आणि बहरले ते कायमसाठी ! 'शुद्ध बीजापोटी, फळे रसाळ गोमटी' या संत तुकारामांच्या अभंगाचा खरा प्रत्यय अनुभवास आला. पुढे अनेकदा त्यांना स्वातंत्र्य चळवळीत तुरुंगवास भोगावा लागला. काही काळ त्यांनी भूमिगत राहूनही स्वातंत्र्य आंदोलनात सहभाग घेतला. विशेष म्हणजे घरची गरिबीची परिस्थिती आणि राष्ट्रीय चळवळीळील सहभाग या पार्श्वभूमीवरही त्यांनी कोल्हापूर येथे पदवीचे शिक्षण पूर्ण केलेच, शिवाय पुण्यातील आय.एल.एस. विधी महाविद्यालयातून कायद्याची पदवी मिळविली. मात्र पुढील संपूर्ण आयुष्य त्यांनी देशसेवेसाठीच वेचले.

सुरुवातीपासूनच ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात  सक्रीय होते, किंबहुना ते काँग्रेस पक्षातील महत्त्वाचे नेते होते. त्यांचा विविध क्षेत्रातील सखोल अभ्यास आणि चौफेर वाचन होते. अनेक भारतीय आणि जागतिक विचारवंतांचे विचार त्यांनी अभ्यासले होते. महात्मा गांधी यांचा राजकीय प्रभाव, तसेच राजर्षी शाहूमहाराज, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, मानवेंद्रनाथ रॉय, महात्मा फुले, महर्षी वि. रा. शिंदे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक कार्याचा त्यांना प्रचंड आदर  होता. 

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांच्या कर्तृत्वाला अधिक उजाळा मिळाला. मुंबई प्रांतिक विधानसभेवर ते निवडून गेले. तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या मंत्रिमंडळात त्यांना संधी मिळाली. पुढे १९५६ मध्ये द्वैभाषिक मुंबई राज्याचे ते मुख्यमंत्री झाले.  संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर दि. १ मे १९६० रोजी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा बहुमान त्यांना  मिळाला. मुख्यमंत्री म्हणून कामगिरी बजावताना  महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी पायाभूत असंख्य गोष्टी त्यांनी केल्या. त्याच सक्षम पायावर महाराष्ट्राने विविध क्षेत्रात केलेल्या प्रगतीमुळे, भारतातील एक सशक्त, समृद्ध आणि सामर्थ्यशाली राज्य म्हणून गेली अनेक वर्षांपासून महाराष्ट्र राज्याचा देशात लौकिक आहे.

यशवंतराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना अत्यंत दूरदृष्टीने कोयना प्रकल्प ऊभा केला. त्यामुळे महाराष्ट्रात वीजनिर्मिती, सिंचन, शेती, सहकार,  शिक्षण आणि औद्योगिक प्रगतीला चालना मिळाली. त्यानंतर त्यांनी उजनी धरणाची पायाभरणी केली. लाखो एकरातील शेती ओलिताखाली आली. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी विविध सिंचन योजनांना गती दिली. सहकाराला चालना दिली. त्यांच्या कारकिर्दीत आठराहून अधिक सहकारी साखर कारखाने सक्षमपणे ऊभे राहिले. 

शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, हा महात्मा फुले यांचा विचार त्यांनी कृतीत आणला. महाराष्ट्रात मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण देण्यावर त्यांनी भर दिला. आजही राज्याच्या कानाकोपऱ्यात, वाडीवस्तीवर, आदिवासी पाड्यांवर दुर्गम भागात दिसणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळा आणि आश्रमशाळा ही यशवंतराव चव्हाण यांच्या कर्तृत्वाची निशाणी आहे. ते तिथेच थांबले नाहीत. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात माध्यमिक शिक्षणाची वाणवा होती. शेतकरी, कष्टकरी, मजूर यांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी त्यांनी गावोगाव माध्यमिक शाळा काढण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्याकाळी अनेक सेवाभावी संस्थांनी त्या शैक्षणिक कार्याला प्रतिसाद दिला. त्याकाळात माध्यमिक शिक्षण सर्वांना घेता यावे म्हणून चव्हाण साहेबांनी आर्थिकदृष्ट्या मागास वर्गासाठी शालेय शुल्कामध्ये सवलत योजना (ई.बी.सी.योजना) सुरू केली. याचा विनियोग  कोट्यावधी गरीब व मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना झाला. आजही या योजनेचा लाभ अनेकांना होत आहे. ही योजना भारतातील अनेक राज्यांसाठी पथदर्शी योजना म्हणून स्वीकारली गेली. कोणत्याही घोषणांपेक्षा मुलभूत योजना मंजूर करणे आणि राबविण्यावर त्यांनी भर दिला.


साखर कारखाने प्रगतीपथावर आसताना त्यांच्या कार्यक्षेत्रात अनेक शैक्षणिक संस्था उदयाला आल्या. महाराष्ट्रातील लक्षावधी शेतकऱ्यांच्या मुलामुलींना त्यांच्या परिसरातच दर्जेदार माध्यमिक व उच्च शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध झाल्या. शिक्षणाची ज्ञानगंगा खेड्यापाड्यांत वाहू लागली. सिंचनाने शेतमळे फुलू लागले, त्याचवेळी शिक्षणामुळे ज्ञानमळेही फुलू  लागले. पुढील काळातील महाराष्ट्राच्या प्रगतीची बीजे त्यामध्ये रुजली होती.

सह्याद्रीच्या विविध लहरी, सातपुड्याच्या विविध छटा, कोकण, मराठवाडा, विदर्भातील विविधता, कोल्हापूरपासून चंद्रपूर   पर्यंतच्या बदलणारी भाषा, संस्कृती आणि परंपरा, गरजा यांचा सुनियोजित मेळ घालण्यासाठी त्यांनी परोपरी प्रयत्न केले. केवळ शेतीव्यवसायाने महाराष्ट्र पुढे जाणार नाही याची त्यांना जाणीव होती. म्हणून त्यांनी औद्योगिक विकासाचे धोरण अवलंबिले. मुंबई- ठाणे याबाहेर उद्योगधंदे वाढले तर, शहरातील रहिवासी लोंढे कमी होतील. शिवाय नागरी सुविधांचा ताण पडणार नाही. म्हणून त्यांनी या शहराबाहेर औद्योगिकीकरणास चालना दिली. आज सहज वाटणाऱ्या गोष्टी त्याकाळी सहजसोप्या नव्हत्या. शेतकऱ्यांच्या जमिनी, विशेषता माळराने संपादित करून, त्याठिकाणी रस्ते, पाणी, वीज आदि मुलभूत सोयीसुविधा आणि सवलती उपलब्ध करून दिल्या. अनेक मोठमोठया उद्योगपतींना भेटून त्यांची मनधरणी केली, त्यांच्यात विश्वास निर्माण केला. तेव्हा महाराष्ट्रातील औद्योगिक विकासाला चालना मिळाली. इथेच थांबून चालणार नव्हते. या उद्योगांसाठी कुशल प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी अनेक ठिकाणी औद्योगिक  तंत्रशिक्षण संस्था (आय.टी.आय.) ची निर्मिती केली. आज संगणकीय काळातील पिढीला याचे महत्त्व कदाचित कळणार नाही. परंतु १९६० पासून पुढील सर्व पिढ्यांना एस.एस.सी. पास होणे, आय.टी.आय. पास होणे, अॕप्रेंन्टिसशिप मिळणे, एनसीटीव्हीटी पास होणे आणि त्यानंतर चांगल्या कंपनीत कायम नोकरी मिळणे याचे महत्त्व समजले आहे. महाराष्ट्र घडविताना इतक्या बारकाईने या पायाभूत गोष्टी व सुविधा चव्हाण साहेबांनी करून ठेवल्या आहेत. याची नोंद महाराष्ट्रातील नवीन पिढीने आवर्जून ठेवली पाहिजे.

केवळ शेती, सिंचन, सहकार, शिक्षण आणि नोकऱ्या मिळून समाज ऊभा राहत नाही. त्यासाठी सुसंस्कृत, संवेदनशील मनाची मशागत व्हावी लागते. कला, भाषा, साहित्य, रंजन, क्रीडा इत्यादी अंगांचाही विचार करावा लागतो. मुळातच स्वतः सुसंस्कृत व संवेदनशील असलेल्या यशवंतरावांनी साहित्य कला क्रीडा क्षेत्रासाठी अतुलनीय योगदान दिले आहे. मुळातच त्यांना साहित्याच्या प्रांतातही विपुल रस होता. वि.स. खांडेकर, ह.ना.आपटे, ग.दी. माडगूळकर, साने गुरुजी इत्यादींच्या साहित्याचे ते व्यासंगी होते. आचार्य प्र.के. अत्रेंपासून अलिकडे  कवी ना.धों. महानोरांपर्यंत सर्वांशी त्यांच्या साहित्यिक मैफली घडत होत्या. त्यातूनच त्यांनी मराठी भाषा विकास आणि संवर्धनासाठी विशेष योजना आखली. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाची निर्मिती केली. मराठी विश्वकोश महामंडळाची निर्मिती केली. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करून, अनेक भाषातज्ञ व संशोधकांना ती जबाबदारी दिली. मराठी भाषेच्या हजारो वर्षांच्या  वाटचालीत विश्वकोशाची निर्मिती ही सर्वात महान कामगिरी मानली जाते. त्याशिवाय मराठी साहित्य, नाट्य, चित्रपट निर्मिती यांसाठीही त्यांनी केलेले कार्य व दिलेले प्रोत्साहन मोलाचे आहे महाराष्ट्रातील कुस्ती, कबड्डी, खो-खो इत्यादी खेळाडूंसाठीही त्यांचे मौलिक  योगदान आहे. 

राज्याचा कारभार करताना मानवी जीवनाच्या प्रगतीसाठी आवश्यक असणाऱ्या प्रत्येक क्षेत्रात यशवंतराव चव्हाण साहेबांनी मोलाची कामगिरी  बजावली आहे. त्यांचा प्रत्येक क्षेत्रातील निर्णय हा महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी दूरगामी परिणाम साधणारा आहे. त्यांनी शैक्षणिक संशोधन कार्यालाही महत्त्व दिले. कोल्हापूरचे शिवाजी विद्यापीठ आणि आताचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या त्यांच्याच निर्णयाच्या फलश्रूती आहेत. कृषी विद्यापीठ आणि कृषी संशोधनातही त्यांनी पुढाकार घेतला. पुणे पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसर ही तर यशवंतराव चव्हाण यांच्या निर्मितीची सर्वात मौल्यवान फळे आहेत. आज पिंपरी चिंचवडचे नांव जागतिक  पातळीवर पोहचले आहे. त्यासाठी यशवंतराव चव्हाण यांची दूरदृष्टी व प्रामाणिक कामगिरी कारणीभूत आहे.

यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रात 'पंचायत राज' या त्रिस्तरीय (जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत) व्यवस्थेची सुरुवात केली. सत्तेचे विकेंद्रीकरण केले तरच सर्वसामान्य माणूस निर्णयप्रक्रियेत येईल. त्याच्या विचारानेच विकासयोजना खोलवर रुजतील, असा त्यांचा उद्देश होता. त्याशिवाय त्यांनी राज्यासाठी पंचवार्षिक योजनांचा प्रारंभ केला होता. शेतीसिंचनासाठी त्यांनी कोल्हापूर प्रकारच्या बंधाऱ्यांचा प्रचार केला, प्रोत्साहन दिले. त्यांनी शेतकऱ्यांविषयी खूप विचार केला होता. शेती व्यापारी तत्त्वाने केली पाहिजे. शेतीच्या आधुनिकीकरणाच्या मार्गातील अडथळे दूर केले पाहिजेत. नद्यांच्या पाण्याचा शेतीसाठी वापर केला पाहिजे. नद्यांवर धरणे बांधली पाहिजेत. धरणे बांधल्याने विस्थापित होणाऱ्या लोकांचे पुनर्वसन केले पाहिजे. अशी त्यांची भूमिका होती. शेतकऱ्यांनी कृषीशास्त्राचा अभ्यास केला पाहिजे, यासाठी ते आग्रही असत.

यशवंतराव चव्हाण हे समतोल विकासाचे पुरस्कर्ते होते. विकास योजना आखताना अविकसित विभागांचा आधी विचार केला पाहिजे. ग्रामीण औद्योगिकीकरणाबाबत ते म्हणतात की, ग्रामीण भागात उद्योग सुरू करून शेती आणि उद्योगांची सांगड घातली जावी. यासाठीच त्यांनी कृषीऔद्योगिक धोरणाची अंमलबजावणी केली. शहरी व ग्रामीण अर्थव्यवस्थेची सांगड घालून शहरांकडे धाव घेणारा श्रमिकांचा लोंढा थोपविता येईल. औद्योगिक विकासासाठी नियोजन महत्त्वपूर्ण आहे. देशाचा संतुलित आर्थिक विकास व्हावा यासाठी औद्योगिक विकासाच्या मास्टर प्लानची कल्पना त्यांनी मांडली होती. ग्रामीण व अविकसित भागातील विकासासाठी त्यांनी संयुक्त औद्योगिक क्षेत्राची कल्पना मांडली.   भारताच्या आर्थिक विकासासाठी राष्ट्रीय पातळीवर त्यांनी सहकाराचा पुरस्कार केला. भारतासारख्या कृषिप्रधान देशाच्या विकासासाठी सहकारी तत्त्वे अधिक उपयुक्त ठरतील, अशी त्यांची भूमिका होती.नागपूर येथे दीक्षा भूमीवर डॉ. आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याचा निर्णय, तसेच त्यांच्या आदरापोटी डॉ. आंबेडकर जयंतीची सुट्टी (१४ एप्रिल) देण्याची प्रथा यशवंतरावांनी महाराष्ट्रात सुरू केली.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी त्यांच्या मनात केवळ आदरच नव्हता, तर त्यांचे विचार कृतीत आणण्यासाठी ते आटोकाट प्रयत्नशील होते. तसेच  छत्रपती शिवाजी महाराज, शहाजीराजे भोसले आणि  मालोजीराजे भोसले यांच्या चरित्रलेखनासाठी त्यांनी वा.सी. बेंद्रे या ज्येष्ठ इतिहास संशोधकाकडे आग्रह धरला होता. छत्रपती संभाजी महाराजांची चुकीची माहिती खोडून सत्य इतिहास उजेडात आणण्यासाठी त्यांनी इतिहास संशोधक विजयराव देशमुख व अन्य अभ्यासकांकडे आग्रह धरला. इतिहास संशोधकांच्या लेखन व संशोधन कार्यासाठी आवश्यक ते पाठबळ त्यांनी दिले. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रत्येक कार्याची व विचारशैलीची नोंद या एका लेखात घेता येणे अशक्यप्राय बाब आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वावर शेकडो पुस्तके लिहिली गेली आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांनी भ्रमंती केली होती.

एखाद्या शेतकऱ्याच्या मोठ्या एकत्रित कुटूंबातील थोरल्या कारभाऱ्याचे जसे लहान सहान गोष्टीवर बारकाईने लक्ष असते, घराण्याची इभ्रत व लौकिक वाढावा म्हणून त्यांचा आटोकाट प्रयत्न असतो. अगदी त्याप्रमाणे यशवंतराव हे महाराष्ट्राचे थोरले कारभारी होते. या राज्याचा लौकिक जगभर वाढत जावा म्हणून त्यांनी तितक्याच पालकत्वाने आपली जबाबदारी  निभावली आहे. 

महाराष्ट्राची घडी बसविल्यानंतर पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यांना दिल्लीला भारताचे संरक्षणमंत्री म्हणून जबाबदारी दिली. संरक्षणमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाचे देशभर कौतुक झाले. त्यानंतर पुढील सर्व कारकीर्द त्यांनी देशपातळीवरील विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. पंडित नेहरूनंतर श्रीमती इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात त्यांनी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. देशाचे अर्थमंत्री असताना त्यांनी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले. तो निर्णय भारताची आर्थिक पाया भक्कम होण्यासाठी उपयुक्त ठरला. भारताचे परराष्ट्रमंत्री असताना जगातील विविध राष्ट्रांशी  त्यांच्या मुत्सद्देगिरीने भारताची प्रतिमा उंचावली. केंद्रीय गृहमंत्री म्हणूनही त्यांची कारकीर्द मोलाची ठरली. सन १९७७ मध्ये काँग्रेसचा पराभव झाल्यावर त्यांनी लोकसभेत विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सांभाळली. त्यानंतरच्या राजकीय घडामोडींत ते भारताचे उपपंतप्रधान झाले.

एक अत्यंत अभ्यासू , संयमी, समतोल वृत्तीचे संवेदनशील मनाचे सुसंस्कृत नेते म्हणून त्यांची सर्वत्र ख्याती होती. उत्कृष्ट संसदपटू, उदारमतवादी व अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ख्याती आहे. ते रसिक व साहित्यिकही होते. “युगांतर”, “सह्याद्रीचे वारे”, “कृष्णाकाठ”, “ऋणानुबंध” ही त्यांची साहित्यसंपदा आजही लोकप्रिय आहे. ते अजातशत्रू विचारवंत राजकीय नेते होते. एक मातृभूमीसाठी लढलेले स्वातंत्र्यसेनानी, देशभक्त आणि महाराष्ट्राच्या व भारताच्या प्रगतीसाठी आयुष्यभर सेवा केलेल्या या महान व कणखर देशभक्त नेत्याने दिनांक २५ नोव्हेंबर १९८४ रोजी दिल्लीमध्ये अखेरचा श्वास घेतला. हिमालयाच्या रक्षणासाठी गेलेले सह्याद्रीचे सुपूत्र, कृष्णाकाठचे यशवंतराव हिमालयाएवढी कर्तबगारी निभावून जणू विठाईच्या भेटीसाठी गेले.

चार दशके सत्तेच्या केंद्रस्थानी राहिलेल्या या महान नेत्याच्या मृत्यूपश्चात त्यांच्या संपत्तीची मोजदाद करण्यात आली. तेव्हा त्यांच्याकडे सुमारे तीस हजार पुस्तके मिळाली. तीच त्यांची संपत्ती, तेच त्यांचे ऐश्वर्य. कराड येथील वेणूताई चव्हाण स्मृतीसंग्रहालयात त्यांची सर्व संपदा अभ्यासू चातकांसाठी जतन करण्यात आली आहे. म्हणूनच ते  खरे देशभक्त, राजयोगी होते. जनमानसांसाठी सदैव कर्तव्य बजावताना भौतिक वैभव व विलासापासून ते खूप दूर राहिले. 

यशवंतरावांनी घडविलेल्या महाराष्ट्रात रोज ठायी ठायी त्यांची चिरस्मृती संजीवन आहे. त्यांनी मशागत केलेल्या महाराष्ट्र भूमीतून नित्य प्रगतीचे मळे फुलत आहेत. त्यांच्या कर्तृत्वाचा गंध अव्याहतपणे दरवळत आहे. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या कर्तबगार स्मृतींना माझे विनम्र अभिवादन.साहेब गेले त्यावेळी मी उत्फूर्तपणे एक कविता केली होती. त्यातील या चार ओळी येथे देत आहे.


सह्यगिरी स्तब्ध झाला

हिमगिरीही गहिवरला,

कृष्णाईचा श्वास रोखला

यशवंत सूर्य मावळला ll

* * *

@ अरुण तुकाराम बोऱ्हाडे 

बोऱ्हाडेवाडी, मोशी, ता.हवेली, जि.पुणे

Email : atborhade@gmail.com

Comments

  1. चव्हाण साहेबांना विनम्र अभिवादन

    ReplyDelete
  2. विनम्र अभिवादन

    ReplyDelete
  3. विनम्र अभिवादन

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

श्री नागेश्वर महाराज भंडारा : भक्तिमार्गातील शक्ती स्त्रोत [लेखक : अरुण बोऱ्हाडे]

'शरद पवार : दुःखातही मनाला उभारी देणारा अलौकिक लोकनेता'' : अरुण बोऱ्हाडे

"कष्टकरी कामगारांची, एक अधुरी कहाणी..! सामाजिक चिंतनाचा विषय" लेखकः अरुण बोऱ्हाडे