श्री नागेश्वर महाराज भंडारा : भक्तिमार्गातील शक्ती स्त्रोत [लेखक : अरुण बोऱ्हाडे]

 श्री नागेश्वर महाराज भंडारा : भक्तिमार्गातील शक्ती स्त्रोत.
@ लेखक : अरुण तुकाराम बोऱ्हाडे (मोशी)

बापरे ! केवढी ती तयारी ! सहा-सात फुट खोल आणि अडीच-तीन फुट रुंदीची मोठमोठी आखीव रेखीव आणि बांधीव अशी तीनचार चुलांगणे, त्यासाठी खास मागविलेली लाकूडफोड, पंचावन्न - साठ पोती बेसनपीठ, तेवढेच तेलाचे डबे, तशीच साखरेची पोती, शंभरावर बटाट्याची पोती आणि बरेच काही साहित्य सामग्री, सोबतीला राबणारे असंख्य हात ! हा सारा सरंजाम कशासाठी हे कळालेच असेल ! प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा मोशीगावचा पावन पवित्र सोहळा, अर्थात श्री नागेश्वर महाराजांचा भंडारा उत्सव ! प्रतिवर्षी महाशिवरात्री आली की दुसऱ्या दिवशी येणाऱ्या भंडाऱ्याची चाहूल लागते. एकाचवेळी पाचशे-हजार नव्हे, तर सत्तर- पंचाहत्तर हजारांहून अधिक भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. श्री नागेश्वर महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेल्या मोशीतील आमराईत हा पवित्र सोहळा मागिल सुमारे पावणेदोनशे वर्षांपासून अव्याहतपणे चाललेला आहे.

पुणे नाशिक राज्य महामार्गावरील मोशी हे आमचे गांव. पुण्याहून जेमतेम वीस किलोमीटर अंतर. सर्वसाधारण गावाची रचना असते, तसेच माझे गाव आहे. चार सहा वाड्या-वस्त्या, चार पाच मंदिरे, भैरोबा, हनुमान, दत्त वगैरे.. कोणत्याही गावाला असतो तसा पार, पारावर बसणारी दहा पाच कारभारी मंडळी.. तरुणांसाठी तालमी, सर्वत्र असते तसेच माझ्या गावात आहे. तरिही माझे गाव वेगळे आहे. या गावाच्या काही चांगल्या परंपरा आणि काही चांगल्या चालीरिती आहेत. आता शहरीकरणाने गावाला वेढले असले तरी, चांगल्या परंपरा जपणारे आणि वृद्धिंगत करणारे आमचे गांव आहे. त्या चांगल्या परंपरेतीलच हा भंडाऱ्याचा सोहळा आहे.


माझ्या गावाच्या शिवारी नदी इंद्रायणी वाहते. मावळच्या भूमीतून उगम पावणारी आणि भीमेच्या पात्रात एकरुप होवून पंढरीच्या पांडुरंगा चरणी आमची प्रार्थना पोहोचविणारी इंद्रायणी ही केवळ नदी नाही. ती एक संस्कारगंगा आहे, स्फूर्तीप्रवाह आहे आणि मायेचा पवित्र सागर आहे. तिच्या आसमंतात तुकोबांचे अभंग स्फुरलेले आहेत  आणि माऊलींच्या ओव्यांचा परिमळ दरवळत आहे. इथल्या मनामनांत संतवाणी वास करते. इथल्या मातीत मायेचा संस्कार आणि आपुलकीची संस्कृती बहरास येते. म्हणूनच या देहू आळंदीच्या परिसरात माणसांचा एक वेगळाच गोडवा, आपलेपणा उपजतच आहे. संतत्वाचा संस्कार इथल्या रोमारोमात भिनला आहे. श्री नागेश्वराच्या भक्तिने जातिधर्माच्या भींती विरून एकत्वाचा भाव प्रत्येकाच्या ठायी रुजला आहे. हाच आमचा वेगळेपणा आहे. गावात प्रवेश करताच एक डौलदार दगडी कमान किंवा प्रवेशद्वार आहे. अनेक गावांना वेस असते, या गावाला तशी ऐतिहासिक वेस नव्हती. म्हणून गावातील काही तरुणांनी छत्रपती तरुण मंडळाच्या माध्यमातून  सुमारे तीस वर्षांपूर्वी लोकवर्गणीतून हे इतिहासाला शोभेल असे प्रवेशद्वार बांधले. त्यावर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा स्थापित केला आहे. त्याच्या दोन्ही बुरुजावरील मावळे जणू गावचे रक्षण करीत आहेत. 

या स्मारकाच्या उजवीकडे श्री दत्तात्रयाचे मंदिर आहे. दत्तजन्माचा सोहळा इथे पारंपारिक रितीने थाटात साजरा केला जातो. गावातील मुख्य चौकात उजव्या हाताला भले मोठे मारुतीचे मंदिर आहे. गावोगाव असते तशीच येथील हनुमान जयंतीही जल्लोषात असते. कुस्तीवर आणि लाल मातीवर प्रेम करणारी गावची युवापिढी यामध्ये पुढाकार घेते. समोरच उत्तरेकडे भैरवनाथाचे उंच चौथऱ्यावर बांधलेले भव्यतम मंदिर आहे. गावातील रामजन्माचा सोहळाही विलोभनीय असतो. वर्षभर भजन, किर्तन, पारायणात रममाण असणारा हा गाव प्रत्येकाची ख्यालीखुशाली विचारत, आपापला उद्योग व्यवसाय सांभाळत सुखाने नांदत आहे.

गावातील मुख्य चौकात पूर्वाभिमुखी विशाल असे श्री नागेश्वर महाराजांचे मंदिर आहे. हे गावचे मुख्य दैवत. पूर्वीदेखील सागवानी लाकूड वापरून बांधलेले, चौपाखी लाल कौलारू वैभवशाली भव्य मंदिर होते. बदलत्या काळाबरोबर गावातील सर्वच मंदिरे आता सिमेंट काँक्रीटमध्ये बांधली आहेत. श्री नागेश्वर महाराजांचेही मंदिर आता अधिक भव्य आणि सुरेख बांधले आहे. श्री नागेश्वर म्हणजे गावचे खरे श्रद्धास्थान, गावाला एकत्र गुंफून ठेवणारा, गावाला सुखी समृद्ध ठेवणारा हा शक्ती स्त्रोत. असे सांगितले जाते, की नाशिकला कुंभमेळ्यासाठी देशभरातील, विविध सांप्रदायातील साधूजण जातात. त्यापैकीच एका आखाड्यातील काही साधूजण कुंभमेळ्याहून परतत असताना, एका साधू महाराजांना अस्वस्थ वाटू लागले. तेव्हा ते सर्वजण मोशीगावात काही काळ थांबले. नंतर प्रमुख गांवकरी मंडळींना सांगून त्या साधूमहाराजांना विश्रांतीसाठी गावातच  ठेवून बाकीचे पुढील प्रवासाला निघून गेले. हेच ते नागेश्वर महाराज. गावकरी मंडळींनी गावाजवळच त्यांच्यासाठी गवत बांबूच्या सहाय्याने साधा मठ किंवा वसतिस्थान तयार करून दिले. अर्थात साधूमहाराजांचे राहणे ही निश्चितच सामान्य बाब नव्हती. त्यांचे आचरण, नियम, तप, ध्यान वगैरे बाबी होत्या. नित्य पाच घरी माधुकरी मागत. पीठ, तांदूळ वगैरे न शिजविलेले पदार्थ घेऊन गावाजवळील एका आमराईत स्वहस्ते शिजवून ते खात असत. तिथेच जप-तप करीत असत. सामान्य माणसाचे जीवन म्हणजे सुख-दुःखाची विण असते. अशावेळी  गावकरी मठामध्ये त्यांच्या दर्शनाला जात असत. ते आशिर्वाद आणि सल्ला देत. त्यांच्या आशिर्वादाने जगण्याला एक शक्ती मिळे. असे काही दिवस गेल्यानंतर एकदा माधुकरी मागताना कोणी एका महिलेने जाणिवपूर्वक किंवा नकळत शिजविलेले अन्न वाढून त्यांचा अवमान केला. महाराजांना ते सहन झाले नाही. त्यांनी त्याचक्षणी गावातून जाण्याचा निर्णय घेतला. गावकऱ्यांनी खूप विनवणी केली, माफी मागितली. त्यांनी सर्वांना क्षमा केली, 'सर्वकल्याणभवतुः' आशिर्वाद दिला. पण आपला कार्यकाळ संपुष्टात आल्याने निघायला हवे, असे सांगून पूर्व दिशेने ते चालू लागले. सूर्य अस्ताला जाईपर्यंतच आपला प्रवास असेल असे त्यांनी सांगितले. मोशीपासून पूर्व दिशेला, सुमारे  दहाबारा किलोमीटर अंतरावर इंद्रायणीच्या तिरावर वसलेल्या काकडे वडगांव मध्ये हे योगीमहाराज पोहचले आणि सूर्य अस्ताला गेला. त्याच ठिकाणी महाराजांनी संजीवन समाधी घेतली. आपले जीवनकार्य संपविले. त्याठिकाणी पुढील काळात मोठे मंदिर बांधण्यात आले.


मोशीकरांनी महाराज राहत असलेल्या मठाचे मोठ्या श्रद्धेने मंदिरात रुपांतर केले. ते अन्न शिजवून खात असलेल्या आमराईत कायमस्वरुपी नंदादीप प्रज्वलित केला. त्याला तपोभूमी म्हणतात. एवढेच नव्हे, महाराजांच्या समाधीचा दिवस माघ अमावस्येला सर्व गावकरी याठिकाणी अन्न शिजवून प्रसाद सेवन करतात. त्याला भंडारा म्हणतात. हा भंडारा मोशीकरांच्या जीवनातील एक महत्त्वाचा अविभाज्य भाग बनून राहिला आहे. गावातून उद्योग नोकरीसाठी इतस्ततः गेलेले सर्वजण आवर्जून यादिवशी या सोहळ्यास येतात. एरवी वर्षभर न येणाऱ्या सासूरवाशिणी, माहेरवाशिणी लेकी-सूना हा भंडारा उघड्या नयनांनी, श्रद्धाभावनेने अनुभवतात. हा सोहळा गांवच्या एकोप्याचा, एकविचारांचा सोहळा असतो. इथे कोणी लहान नाही, मोठा नाही. गटातटाचा, तुझा-माझा आविर्भाव नाही की कोणाच्या श्रीमंतीचा आविष्कार नाही. आमराईच्या शेतात हजारोंच्या पंगती ऊठताना, सर्व सोहळा गावकऱ्यांच्या स्वयंशिस्तीत पार पडतो. मागिल वर्षी सुमारे पाऊणलाख भाविकांनी या प्रसादाचा आनंद घेतला. वैशिष्ट्य म्हणजे याला कोणी आयोजक अथवा प्रायोजक नाहीत. कुठलीही 'इव्हेंट मॕनेजमेंट' नाही. मोशीचे गावकरी हेच आयोजक आणि तेच प्रायोजक. सरव सोहळा एका आदरयुक्त शिस्तीत, ठरलेल्या वेळेत पार पडतो. सर्व जातीजमातींचे लोक यामध्ये सहपरिवार सहभागी होतात. प्रत्येकजण स्वतःहून आपली वर्गणी भरतात. हा सोहळा पिढ्यानपिढ्या चाललेला आहे. कदाचित हा महाराष्ट्रातील एकमेव आगळावेगळा एकोप्याचा, गावकऱ्यांच्या एकविचारांचा सोहळा असेल. त्यामध्ये कधीही खंड नाही. कोणी कोणास बोलावित नाहीत, निमंत्रण देत नाहीत. पंढरीच्या वारीसाठी जशी स्वयंप्रेरणेने लाखोंची पाऊले पडतात. तशीच या नागेश्वर महाराजांचा भंडारा अनुभवण्यासाठी आमच्या मोशीवासियांची पाऊले आमराईकडे वळतात. विशेष म्हणजे आज चौफेर वाढलेल्या शहरीकरणातही ही सामुदायिक प्रसादसेवनाची आणि मातीवरिल पंगतीचा आस्वाद घेण्याची  परंपरा अव्याहत चालू आहे. म्हणूनच माझे गाव इतर हजारो गावांपेक्षा वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. या गावाला इंद्रायणीचा गोडवा आणि आपुलकीचा ओलावा आहे. ज्ञानदेव तुकोबांच्या सानिध्याचा वारसा आहे. श्री नागेश्वर महाराजांच्या वास्तव्याचा कृपाप्रसाद आहे. म्हणूनच मोशीचा गावकरी ऐश्वर्य संपन्न आहे, सुखात आणि समाधानात आहे. अशा अनेक उल्लेखनीय परंपरा व प्रथा या गावामध्ये आहेत.


आज दिनांक १९ फेब्रुवारी २०२३ रोजी प्रतिवर्षाप्रमाणे हा आनंदसैहळा संपन्न होत आहे. गावकऱ्यांनी, कारभारी मंडळींनी सर्व तयारी पूर्ण केली आहे. खरे तर सकाळपासूनच दर्शनासाठी दूरदूरचे भाविक येत आहेत. श्री नागेश्वर चरणी लीन होताना, जणू पुढील जीवनासाठी सुख, समृद्धी, समाधानाची शिदोरी घेऊन जात आहेत. आयुष्यभर पुरेल एवढी ऊर्जा याठिकाणी मिळते, फक्त मनात श्रद्धा हवी, आचारात शुद्धता हवी आणि विचारात संपन्नता हवी. श्री नागेश्वर महाराजांची ऊर्जा स्त्रोत सदैव आपल्या पाठीशी असतो. 


परमभक्तिचा नंदादीप :

श्री नागेश्वर महाराजांविषयी या पंचक्रोशीत परमआदर व भक्तिभाव पहावयास मिळतो. गावातीलच श्री नामदेव काशिबा आल्हाट यांची श्री नागेश्वराचे परमभक्त म्हणून ख्याति आहे. शेतकरी कुटूंबातील नामदेवराव हे जुन्या काळातील सातवी (फायनल) पर्यंत शिकलेले होते. त्यांना व्यायामाची अर्थात कुस्तीक्षेत्राची आवड होती. शिकलेले असल्याने  त्याकाळात त्यांना मुंबईला शासकीय नोकरी मिळाली होती. परंतु त्यांचा भक्तिभाव श्री नागेश्वर चरणी लीन होता. ते मुंबई सोडून पुन्हा मोशीमध्ये आले. नागेश्वरांची तपोभूमी असलेल्या आमराईत नंदादीप प्रज्वलित केला. तिथेच सेवा करू लागले. त्यांनी नोकरी केली पण घर-कुटूंब, शेतीवाडी या पाशांतून ते अलिप्त झाले. एकप्रकारे त्यांनी गृहस्थाश्रमाची विरक्ती घेतली होती. त्यांनी एक व्रत म्हणून या तपोभूमीची सेवा केली. ती करताना ते आयुष्यभर अनवाणी राहिले, तसेच कधीही केस-दाढी केली नाही. निळावंती या दुर्मिळ ग्रंथाचे त्यांनी वाचन केले होते. श्री नागेश्वरांच्या नंदादीपाची देखभाल, आमराईतील निगा आणि ईश्वराचे नामस्मरण यामध्ये ते अहोरात्र तल्लीन होते. विशेष म्हणजे अहंकाराचा लवलेश नव्हता, कुठेही मीपणा नव्हता. ते निर्विकार त्यागमूर्ती होते. श्री नागेश्वर महाराजांचे परमभक्त म्हणून लोक आदराने त्यांच्याकडे पहायचे. सन १९९२ मध्ये त्यांनी देह सोडला, त्यावेळी त्यांचे वय अंदाजे ८४-८५ वर्षांचे होते. त्यानंतर त्यांचे धाकटे पुत्र श्री भरत यांनी ही नंदादीप सेवा अखंडपणे चालू ठेवली आहे. कौतुकाची बाब म्हणजे या आल्हाट परिवाराने २०१८-१९ मध्ये लाखो रुपये खर्च करून या तपोभूमीचे शिवकाळानुसारसु शोभिकरण केले आहे. संपूर्ण काळ्या पत्थरात सुंदर कोरीवकाम करून शिल्पकला साकारली आहे. नंदादीप परिसर अतीव सुरेख आणि प्रेक्षणीय केला आहे. आता भंडारा उत्सवानिमित्त तिथे आणि गावातील सर्वच परिसरात केलेल्या नेत्रदिपक विद्युत रोषणाईने आसमःत उजळून निघाला आहे. या, सहभागी व्हा आणि हा अप्रतिम आनंद सोहळा आवर्जून पहा.


लेखक @ अरुण तुकाराम बोऱ्हाडे (मोबाईल : ९८८१३०१३३९)

Comments

  1. ❤️❤️❤️❤️❤️👍

    ReplyDelete
  2. सुंदर माहितीपुर्ण लेख.

    ReplyDelete
  3. खुप भारी

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

'शरद पवार : दुःखातही मनाला उभारी देणारा अलौकिक लोकनेता'' : अरुण बोऱ्हाडे

"कष्टकरी कामगारांची, एक अधुरी कहाणी..! सामाजिक चिंतनाचा विषय" लेखकः अरुण बोऱ्हाडे