युवाशक्तिवर अढळ विश्वास असलेले समाजसेवक, पद्मविभूषण डॉ. बाबा आमटे © लेखक : अरुण बोऱ्हाडे
युवाशक्तिवर अढळ विश्वास असलेले समाजसेवक, पद्मविभूषण डॉ. बाबा आमटे
© लेखक : अरुण बोऱ्हाडे
सन १९८५ हे वर्ष युनोने म्हणजे संयुक्त राष्ट्र संघाने "आंतरराष्ट्रीय युवक वर्ष" म्हणून घोषित केले होते. सन १९४५ साली दुसरे महायुद्ध समाप्त झाले. संपूर्ण जगाला हादरविणाऱ्या घटना घडल्या. जपानमधील नागासकी आणि हिरोशिमा शहरे बेचिराख झाली. जग एका मोठ्या वावटळीतून बाहेर आले होते. त्यानंतर पुढील वीस वर्षांमध्ये जगाच्या पातळीवर निर्माण झालेली पिढी, एका वेगळ्याच विचारांमध्ये होती. सन १९४५ ते १९६५ या कालावधीमध्ये गुलामगिरीत असलेली अनेक राष्ट्रे स्वतंत्र झालेली होती. त्याची सुरुवात भारताच्या १९४७ साली झालेल्या स्वातंत्र्याने झालेली होती. पुढे १९६५ पासून उदयाला आलेली नवीन पिढी १९८५ मध्ये वीस वर्षांची झालेली होती. त्या अगोदर अनेक राष्ट्रांनी जागतिक पातळीवरती युवकांची स्थिती आणि जाणिवा शोधण्यासाठी आंतरराष्ट्रीय युवक वर्ष साजरे करावे, असा ठराव मांडलेला होता. या ठरावास युनोमध्ये मान्यता मिळाली आणि जगभरात १९८५ हे "आंतरराष्ट्रीय युवक वर्ष" म्हणून साजरे करण्यात आले.
आम्ही पिंपरी-चिंचवड शहरातील युवकांनी देखील चांगले संघटन करून कला सांस्कृतिक, सामाजिक आणि प्रबोधन पातळीवरती हे 'आंतरराष्ट्रीय युवक वर्ष' साजरे करण्याचा निश्चय केला. आम्ही काही मित्रांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या व युवाकार्यात रस असणाऱ्या युवकांना संघटीत करून "युवा कला संवर्धन" ही संस्था स्थापन केली. त्याद्वारे आम्ही युवकांच्या अभिव्यक्तिला चालना देण्याचा प्रयत्न केला. युवकांच्या अंगभूत कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबविले. अनेक अभ्यासू नामवंतांची व्याख्याने, युवक प्रबोधन शिबीरे, विविध स्पर्धा इत्यादी उपक्रमांचे आयोजन केले. आमच्या उपक्रमांना खूप चांगला प्रतिसाद मिळाला. हे करीत असताना मध्येच आमच्या वाचनात आले की थोर समाजसेवक डॉक्टर बाबा आमटे हे शंभर दिवसांची "भारत जोडो यात्रा" काढणार आहेत. देशभरातील युवकांना त्यांनी साद घातलेली आहे. काहीतरी वेगळं घडतंय या आनंदाने आम्ही युवक प्रेरित झालो होतो. खरे तर तो काळ आपल्या देशासाठी भयाण संकटातून आणि प्रचंड अस्वस्थतेतून चाललेला होता. दिनांक ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी भारताच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांची त्यांच्या अंगरक्षकांनीच केलेली हत्या आणि त्यानंतर दिल्लीसह भारतात अनेक ठिकाणी शीखांच्या विरोधात पेटलेल्या लोकभावना, विविध ठिकाणी झालेल्या दंगली, विशेषतः दिल्ली परिसरामध्ये असंख्य शिखांची झालेली कत्तल यातून देश कसाबसा सावरत होता. त्याच वेळेला वेगवेगळ्या कारणांसाठी देशात चाललेली आंदोलने. गुजरात मध्ये आरक्षणासाठी चाललेले आंदोलन, दक्षिणेमध्ये हिंदी विरोधी चाललेली चळवळ, आसाममधील बोडो आंदोलन, जम्मू-काश्मीर, पंजाबमधील जटील प्रश्न यांमुळे निर्माण झालेली अशांतता याने सर्वजण भयभीत आणि अस्वस्थ होते.
सन १९४७ साली स्वतंत्र झालेला भारत देश प्रगतीच्या दिशेने काम करीत असताना, एकात्मतेच्या घोषणा सर्वत्र होत असताना, विविध प्रांत भाषा धर्म यामध्ये निर्माण होणारे वाद आणि हरवत चाललेला संवाद ही बाब चिंतनीय होतीच, पण विचारी माणसाला अस्वस्थ करीत होती. अशा या पार्श्वभूमीवर थोर समाजसेवक डॉ. बाबा आमटे यांनी हा देश पुन्हा सांधला पाहिजे, विचारांनी जोडला पाहिजे. राष्ट्रीय एकात्मतेची पताका हाती घेऊन प्रसार केला पाहिजे. नव्या पिढीतील युवकांना या देशाच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारकांनी केलेले बलिदान, महापुरुषांनी झिजवलेल्या आयुष्यवेदी, दिलेला लढा याचे महत्त्व सांगितले पाहिजे आणि मातृभूमीच्या सुपूत्रांना एका विचाराने राहण्याची शिकवण दिली पाहिजे. हे आवाहन करण्यासाठी डॉ. बाबा आमटे यांनी ही शंभर दिवसांची "भारत जोडो यात्रा" जाहीर केली होती. कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत सुमारे १४ राज्यांतून ही यात्रा जाणार होती. त्यांच्यासोबत विविध भाषा प्रांत आणि धर्माचे १२५ युवक युवती सायकल घेऊन सहभागी होणार होते. यात्रेची घोषणा झाली आणि आम्ही काही तरुण आपल्याला वेगळं काही करण्याची संधी मिळणार, या आशेने सुखावलो होतो. प्रांतवाद, भाषावाद, धर्मवाद हे पाहून आम्ही देखील खूप अस्वस्थ होतो. परंतु करायचे काय हे मात्र समजत नव्हते. खरे तर या यात्रेमध्ये मोठ्या टप्प्यात सहभागी होण्याची आमची इच्छा होती. परंतु त्यावेळी आमचे वय आणि इतर मर्यादांचा विचार करता किमान पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात आपण या यात्रेमध्ये सहभागी होऊ शकतो, हा विचार करून आम्ही नियोजन केले. युवकांच्या कलागुण अभिवृद्धीसाठी कार्यरत असलेली आमच्या "युवा कला संवर्धन'' संस्थेने युवक वर्षांमध्ये राबविलेल्या विविध उपक्रमांपैकीच हा एक उपक्रम समजून आम्ही निर्णय घेतला. त्यावेळी आम्ही ज्याला जसे जमेल तशी वर्गणी जमा केली. भारत जोडोचे स्टीकर्स आणि बिल्ले विकत आणले. या यात्रेसाठी दिलेल्या घोषणांचे फलक आम्ही तयार करून घेतले. "जोडो जोडो भारत जोडो", "काश्मीर हो या कन्याकुमारी - भारत माता एक हमारी" अशा विविध घोषणांचे फलक आम्ही जागोजागी लावले. काही शाळा आणि महाविद्यालयीन युवकांना आवाहन केले. दिनांक २४ डिसेंबर १९८५ ला कन्याकुमारीहून निघालेली ही भारत जोडो यात्रा ९ एप्रिल १९८६ ला सुमारे शंभर दिवसांनी काश्मीरपर्यंत पोहोचली. आम्ही केलेल्या नियोजनानुसार सुमारे १०० ते १२५ युवक आपापल्या सायकली घेऊन या यात्रेमध्ये सक्रीय सहभागी झाले होते. असे अनेक संस्था संघटनांचे गट जागोजागी सहभागी झाले होते. पुणे शहरातून ही यात्रा पिंपरी-चिंचवड मार्गे मुंबईकडे रवाना होणार होती. आम्ही सर्वजण सायकलवरून या यात्रेमध्ये घोषणा देत उत्स्फूर्तपणे सहभागी झालो. स्वतः बाबा आमटे हे प्रकृती ठीक नसतानाही एका ॲम्बुलन्समधून या 'भारत-जोडो अभियानाचे' नेतृत्व करीत होते. ही यात्रा काढली त्यावेळेस त्यांचे वय सुमारे ७१ वर्षांचे होते. या वयातही देशाच्या एकतेचा विचार करून तरुणांना संदेश देण्यासाठी, मातृभूमीचे ऐक्य अबाधित ठेवण्यासाठी तारुण्याच्या आवेशात निघालेले बाबा आमटे ही युवकांसाठी मोठी प्रेरणाशक्ती होती. तीच आमच्यासाठी परिवर्तनाची पर्वणी होती. देशभर विविध राज्यात यात्रेला मिळत असलेला उत्स्फुर्त प्रतिसाद आम्ही वृत्तपत्रांतून वाचत होतो. ही सायकल यात्रा पुण्यातून आमच्या पिंपरी-चिंचवड शहरात आली तेव्हा हजारो युवकांनी- नागरिकांनी यात्रेचे स्वागत केले. ॲम्ब्युलन्समध्ये असलेले बाबा बसच्या दरवाज्यात येऊन उभे राहिले, तेव्हा सर्वांनी त्यांना अभिवादन केले. टाळ्यांच्या कडकडाडात स्वागत केले. त्यांनी दरवाजातूनच छोटेखानी संदेश दिला. "देशातील ऐक्यासाठी या युवापिढीने पुढे सरसावले पाहिजे. युवा कोण ! संकटांना खांद्यावर घेऊन चालतो तो युवा ! आव्हानांना सामोरे जातो, तो युवा ! या देशाच्या ऐक्यासाठी प्रांतभेद, भाषाभेद, धर्मभेद विसरून युवकांनी एकत्र आले पाहिजे" असे आवाहन ते करीत होते. या यात्रेतील आमचा एक दिवसाचा सहभाग हा फार मोठा नव्हता, परंतु संपूर्ण आयुष्यभर समाजसेवा केलेले डॉ. बाबा आमटे यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून आम्ही मनापासून या भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्याचा आम्हांला सर्वाधिक आनंद होता, तो आजही आहे. तो एका दिवसाचा सहभाग आमच्या आयुष्याला व्यापून राहिला आहे.
देशहितासाठी दिलेल्या ऐक्याच्या संदेशानुसार वागण्याची, राहण्याची प्रेरणा भारतीय तरुणांना या यात्रेने दिली. भारत जोडो यात्रा यापूर्वी कोणी केली होती की नाही हे आम्हांला ठाऊक नाही. नंतरही अनेक यात्रा झाल्याचे वाचनात आले. मात्र देशात अस्थिरता, अशांतता व अस्वस्थतेची परिस्थिती असल्याच्या पार्श्वभूमीवर झालेली ही यात्रा देशासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरणारी होती. त्यासाठी ७१ वर्षीय डॉ. बाबा आमटे यांनी देशातील युवाशक्तिला, तरुणाईला साद घातलेली होती आणि देशभरातील तरुणाईने त्यास लक्षणीय प्रतिसाद दिलेला होता. या सायकल- यात्रेमध्ये आम्ही एकाच दिवसासाठी सहभागी झालो, मात्र मातृभूमीच्या ऐक्याचा निनाद, वंदे मातरमचा जयघोष, एकतेचा जयजयकार आजही कानात घुमत आहे. त्यातूनच मिळालेली समाजसेवेची वा ऐक्याची प्रेरणा आयुष्यभर ऊर्जा देत राहिली. त्या एका दिवसासाठी एका थोर समाजसेवकाच्या सानिध्यात राहता आले, यासाठी आम्ही भाग्यवान आहोत. आतापर्यंतच्या संपूर्ण आयुष्यात सार्वजनिक जीवनात विविध ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली. परंतु १९८५-८६ मध्ये झालेली "भारत जोडो - सायकल यात्रा" कायमची स्मरणात राहिली आहे. राष्ट्रप्रेम, राष्ट्रनिष्ठा, राष्ट्रसेवा यासाठी ही भारत जोडो यात्रा अनेकांना राष्ट्रभक्तिची, राष्ट्रीय एकात्मतेची प्रेरणा देऊन गेली. मातृभूमीच्या राष्ट्रीय ऐक्यासाठी दक्षिण- उत्तर सायकल यात्रा झाल्यानंतर, डॉ. बाबा आमटे यांच्या प्रेरणेने पुन्हा एकदा देशात पूर्व-पश्चिम सायकल यात्रेचे नियोजन करण्यात आले. दि. १ नोव्हेंबर १९८८ ते २६ मार्च १९८९ या पाच महिन्यांच्या कालावधीत भारताच्या पूर्वेकडील अरुणाचल राज्यातील इटानगर येथून पश्चिमेला गुजरात मधील ओखा शहरापर्यंत डॉ. बाबा आमटे यांच्या नेतृत्वाखाली ही सायकल यात्रा काढण्यात आली. त्यातही बाबांसोबत अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि शेकडो युवक-युवती सामील झाले होते. राष्ट्रीय एकता, बंधुभाव व शांततेसाठी युवकांची ही एक ऐतिहासिक चळवळ होती. बाबांची जिद्द, दृढनिश्चय आणि अथक परिश्रम देशातील प्रत्येक तरुणासाठी प्रेरणादायी होते.
डॉ. बाबा आमटे हे मुळातच देशभक्त होते. त्यांचा जन्म दि. २६ डिसेंबर १९१४ रोजी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे एका सधन जमीनदार कुटूंबात झाला होता. त्यांचे नांव मुरलीधर देवीदास आमटे, मात्र बाबा या नावानेच त्यांची ओळख आहे. नागपूर येथे बी.ए.एल.एल.बी. पर्यंत शिक्षण घेऊन, त्यांनी काहीकाळ वकिलीही केली. महात्मा गांधीजींच्या विचारांनी प्रभावित होवून त्यांनी स्वातंत्र्य आंदोलनात सहभाग घेतला. सन १९४३ मध्ये त्यांना तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागली. मातृभूमीवर त्यांची नितांत श्रद्धा होती. महात्मा गांधींच्या वर्धा येथील आश्रमात त्यांनी वास्तव्य केलेले होते. त्यांना मानवतेची, माणूसकीची आस होती, कणव होती. अन्याय, अत्याचार, असत्याची त्यांना प्रचंड चीड होती. वर्धा येथील आश्रमात वास्तव्याला असताना, रेल्वे प्रवासात त्यांच्या डोळ्यांसमोर घडलेला एक प्रसंग खूप बोलका आहे. काही ब्रिटिश तरुण अधिकारी रेल्वे प्रवासात एका तरुणीची छेड काढत असताना बाबांनी पाहिले, त्यांना ते सहन झाले नाही. त्यांनी त्या तरुणांना जाब विचारला. प्रकरण तापल्यावर एकट्याने त्यांच्याशी दोन हात केले, त्यांना चोप दिला. तरुणीला संकटातून वाचविले. ही घटना आश्रमात बापूजींना कळल्यावर त्यांनी 'अभय साधक', 'निर्भय योद्धा' अशा शब्दांत शाबासकी दिली. देशातील तरुणाईवर त्यांचा प्रचंड विश्वास होता.
स्वातंत्र्यानंतर कुष्ठरोग सेवेत रमलेल्या बाबांनी विविध उपक्रमांतून उभे केलेले कार्य भारताला ललामभूत, तर जगासाठी दिशादर्शी ठरले. कोणत्याही गोष्टींसाठी केवळ सरकारवर अवलंबून न राहता आपण पुढाकार घेऊन, असहाय्य माणसाला ताकद देऊन त्याला स्वतःच्या हिंमतीवर उभे करता येते, हे बाबांनी कृतीतून जगाला दाखवून दिले. जगण्याची उमेद संपुष्टात आलेल्या हजारोजणांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून त्यांना जगण्याची दिशा देण्याचे काम निश्चितच अतुलनीय आहे. म्हणून तर आनंदवन, सोमनाथ इत्यादी प्रकल्प मानवतेची तीर्थक्षेत्रे बनली आहेत.
युवापिढीवर अढळ विश्वास असलेल्या बाबांनी युवकांची व्याख्या सांगितली होती. 'युवा कोण ! संकटांना खांद्यावर घेऊन पेलणारा तो युवक'. या वाक्याने युवकांमध्ये प्रचंड धैर्य व आत्मविश्वास निर्माण होत असे. देशात काही सकारात्मक बदल घडवायचे असतील तर युवापिढीकडूनच ते होऊ शकेल, यावर त्यांचा दृढ विश्वास होता. त्यादृष्टीने त्यांनी प्रयत्नही केले. युवाशक्तिचा देशनिर्माणासाठी सुयोग्य उपयोग करण्यासाठी ते आग्रही असत. युवापिढीला सकारात्मक दृष्टिकोनातून कृतिशील करण्यासाठी त्यांनी सोमनाथ प्रकल्पावर ‘आंतरभारती श्रमसंस्कार छावणी’ सुरू केली. पर्यावरण संरक्षण आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी युवकांच्या वृक्षदिंड्या, सायकल यात्रा इत्यादी उपक्रम राबविले. त्यांनी कुष्ठरोग्यांच्या उद्धारासाठी केलेल्या कार्याची जगाने दखल घेतलेली आहे. आनंदवन, अशोकवन, सोमनाथ प्रकल्प, हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्प ही त्यांनी सुरू केलेली सामाजिक कार्याची आणि मानवतेची जणू तीर्थक्षेत्रे आहेत. त्याविषयी मी येथे वेगळे लिहीण्याची गरज नाही. त्याशिवाय 'नर्मदा बचाव आंदोलन' आणि 'वन्य जीवन संरक्षण' चळवळीतही त्यांनी सहभाग घेतला होता. नर्मदा बचाव आंदोलनात त्यांनी सुमारे बारा वर्षे नर्मदेकाठी मुक्काम करून आंदोलनाला पाठबळ दिले होते. पर्यावरण रक्षणातही बाबांनी मोठे योगदान दिले आहे.
डॉ. बाबा आमटे हे संवेदनशील मनाचे साहित्यिकही होते. 'उज्ज्वल उद्यासाठी' आणि 'ज्वाला आणि फुले' हे काव्यसंग्रह आणि इतर पुष्कळ लेखन त्यांनी केले आहे. त्यांचे समाजकार्य, विचार आणि लेखन जगातील युवकांना सदैव प्रेरणादायी ठरले आहे. त्यांनी गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांच्या 'शांतिनिकेतन' लाही भेट दिली होती. संपूर्ण आयुष्य देशकार्यासाठी आणि समाजसेवेसाठी झिजविलेल्या भारतमातेच्या या सुपूत्राने दिनांक ९ फेब्रुवारी २००८ रोजी जगाचा निरोप घेतला. चंद्रपूर जिल्ह्यातील आनंदवनात हा चंदनाचा देह कायमसाठी विसावला आहे. त्यांची मुले डॉ. विकास आणि प्रकाश आमटे यांनी हा निःस्पृह लोकसेवेचा वारसा तितक्याच आत्मियतेने पुढे चालविला आहे.
डॉ. बाबा आमटे यांच्या कार्याची शेकडो ग्रंथातून नोंद घेण्यात आली आहे. भारतात आणि जगात शेकडो नामांकित पुरस्कारांनी वेळोवेळी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. सामाजिक सुधारणांसाठीचा डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार, रॅमन मॅगसेसे पुरस्कार, डेमियन डट्टन पुरस्कार अमेरिका, संयुक्त राष्ट्रे यांचा मानवी हक्क पुरस्कार, (१९९८) आंतरराष्ट्रीय जिराफे पुरस्कार, अमेरिका, पर्यावरण विषयक कामासाठी संयुक्त राष्ट्रे यांचा रोल ऑफ ऑनर (१९९१) इत्यादी. त्याशिवाय गांधी शांतता पुरस्कार (१९९९), महाराष्ट्र भूषण पुरस्कार (२००४ ), मध्य प्रदेश सरकारचा इंदिरा गांधी पुरस्कार, राजा राम मोहनराय पुरस्कार (१९८७) असे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कारांसह भारत सरकारने १९७१ साली पद्मश्री, तर १९८६ साली पद्मविभूषण पुरस्कार देऊन त्यांना गौरविले आहे.
डॉ. बाबा आमटे म्हणत, "जात धर्म प्रांत भाषा असे अनेक वाद असू शकतात, हे वाद जीवनामध्ये कधीही मिटविता येतील, परंतु देशाची एकता व अखंडता हे देशातील नागरिकांचे प्राधान्य असले पाहिजे. संपूर्ण युवाशक्तीचे सर्वोच्च ध्येय देशाची एकता हेच असले पाहिजे." देशातील युवाशक्तिवर त्यांचा अढळ विश्वास होता. आमच्या पिढीतील लाखो तरुणांच्या आयुष्यामध्येही हीच शिकवण व विश्वास विचारांची ज्योत बनून चिरंतन तेवत राहिली आहे. त्यांचे अनमोल विचार मनाच्या कोंदणात कायमचे कोरले गेले आहेत.
मातृभूमी आणि मानवतेसाठी आयुष्य झिजविलेल्या या महान समाजसेवकास माझे विनम्र अभिवादन.
* *
ई-मेल : atborhade@gmail.com


Comments
Post a Comment