बुद्धिमत्तेला ध्येयवादाची साथ देणारे कर्तबगार व्यक्तिमत्त्व : पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील - लेखक : अरुण बोऱ्हाडे
बुद्धिमत्तेला ध्येयवादाची साथ देणारे कर्तबगार व्यक्तिमत्त्व : पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील
🌿
"कोल्हापूरला शाळेत असतानाच माझी खरी जडणघडण झाली. नियमित व्यायामाने शरीरप्रकृती सुदृढ झाली आणि नियमित अभ्यासाने बुद्धिमत्ता विकसित झाली. गणितासारख्या कठीण विषयात दोनशेपैकी १९८ गुण मिळाले, तरी शिक्षकांची बोलणी खाणारा मी विद्यार्थी आहे..." महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशातील शिक्षण क्षेत्रातील आभाळाएवढे उत्तुंग व्यक्तिमत्त्व डॉ. डी.वाय. दादा पाटील त्यांच्या जुन्या आठवणींना स्पर्श करीत शांतपणे आमच्याशी बोलत होते. माझे लहानपणीचे मित्र डॉ.अमरसिंह निकम यांच्या पिंपरीतील जुन्या हॉस्पिटलमध्ये स्वतः डी. वाय. दादा यांनी आवर्जून भेट दिली होती. त्यावेळी डॉ.अमरसिंह निकम, ज्ञानेश्वर वायकर आणि मी हॉस्पिटलच्या वरच्या मजल्यावरील डॉ. निकमांच्या घरात कॉफी घेत बसलो होतो.उत्तुंग व्यक्तिमत्त्व असलेले दादा अतिशय शालीनतेने त्यांच्या जीवनातील काही पैलू उलगडून सांगत होते. त्या घरगुती मैफिलीत बोलता बोलता त्यांच्या समोरील कॉफी कधीच थंड झाली होती. साधारणपणे २००४-०५ मधील ही घटना असेल. केवळ होमिओपॕथीचे उपचार करणारे डॉ. अमरसिंह निकम यांच्या कर्तृत्वाचा भारतभर असलेला लौकिक ऐकून आवर्जून त्यांचे कौतुक करायला आलेले आणि त्यांच्या विषयी सखोल माहिती घेणारे डॉ.डी.वाय. दादा हे एक आगळेवेगळे व्यक्तिमत्व, त्यावेळेपासून माझ्या मनात कायमचे घर करून राहिले आहेत. त्याअगोदर काही वर्षांपूर्वी मुंबईत डी.वाय. दादांना भेटण्याचा योग आला होता.
कोल्हापूर जिल्ह्यातील कसबा-बावडा हे त्यांचे गांव. दिनांक २२ अॉक्टोबर १९३५ रोजी एका सधन शेतकरी कुटूंबात त्यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच हुशार आणि जिद्दी स्वभाव असलेले दादा शालेय जीवनात अभ्यासात गतिमान आणि आचरणात नीतिमान होते. अध्यात्माची गोडी असलेले वडील यशवंतराव यांनी 'ज्ञानदेव' हे नांव ठेवले. सुशिल व सात्विक आई वत्सलाबाई, 'ज्ञानदेव' लहान असतानाच त्यांचे मातृछत्र हरपले. त्याही स्थितीत त्यांनी कसबा बावडा येथे शालेय शिक्षण आणि कोल्हापूर येथे बी.ए. एल.एल.बी. आणि एम.ए. पर्यंतचे शिक्षण घेतले. लहानपणापासूनच बुद्धिमान असलेल्या 'ज्ञानदेवांना' वाचनाची आणि कुस्तीची आवड होती, ती त्यांनी कायम जपली. सोबतीला सामाजिक क्षेत्रांतील आपली आवड जपायला सुरूवात केली. तारुण्याला आकार देताना गावातील शेतकऱ्यांची सहकारी सोसायटी, ऊसउत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न अशा सार्वजनिक विषयांत त्यांचे मन लक्ष घालू लागले. जीवनाची दिशा ठरविण्याच्या काळातच १९५४ साली त्यांचे पितृछत्र हरपले. मात्र उगवत्या सूर्याच्या कक्षा हळुहळू विस्तारत जातात, त्याप्रमाणे या युवा कार्यकर्त्याची ख्याति पंचक्रोशीत वाढू लागली. मुळातच शिक्षणाची आवड असल्यामुळे कसबा-बावडा शिक्षण संस्थेचे अध्यक्षपद त्यांच्याकडे आले. त्याचवेळी युवक काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी आपली कार्यकक्षा जिल्हास्तरावर वाढविली. त्या काळातील उच्चशिक्षित आणि कार्यकुशल कार्यकर्ता म्हणून त्यांचा सर्वत्र लौकिक वाढला. तत्कालीन काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते राजारामबापू पाटील यांच्या संपर्कात राहून त्यांनी राजकारणात पायाभरणीला सुरुवात केली. कोल्हापूरच्या नगरपालिकेच्या माध्यमातून सुरुवात करून त्यांनी राज्याच्या विधानसभेत प्रवेश मिळविला. सन १९६७ साली आणि पुन्हा १९७२ साली ते विधानसभेवर निवडून गेले. शांत, संयमी आणि प्रगल्भ वैचारिक क्षमता असल्याने अल्पावधीतच त्यांनी काँग्रेस पक्षातील सर्वोच्च नेत्यांपर्यंत आपली स्वतःची ओळख निर्माण केली. दरम्यान १९७५ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध मौनी विद्यापीठाचे अध्यक्षपद त्यांच्याकडे आले. अडचणीत असलेल्या शिक्षण संस्थेला सावरण्याची जबाबदारी दादांनी पेलली.सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी करीत असताना राजकारण मात्र गढूळ होत गेले. सन १९७८ आणि १९८० मधील निवडणूकीतील काही राजकीय डावपेचांनी दादांना पराभव पत्करावा लागला. तेव्हाच त्यांनी राजकारणाचा पुनर्विचार केला आणि काही काळ थांबण्याचा निर्णय घेतला.
मनुष्याच्या जीवनप्रवासात कधीकधी एखादी वेळ अशी येते, की तीच वेळ आयुष्याचे सप्तरंगी इंद्रधनुष्य बनून पुढे उभी राहते, फक्त ती वेळ जाणता आली पाहिजे. सन १९८३ साली, तत्कालीन मुख्यमंत्री ना. वसंतदादा पाटील यांनी महाराष्ट्रात खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालये आणि तंत्रनिकेतनांबाबत धोरणात्मक निर्णय घेतला. त्या निर्णयाचा परिणामस्वरुप अनेकांनी खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालये सुरू करण्यासाठी प्रस्ताव दिले. मात्र, शिक्षणक्षेत्रात मनापासून काम करणाऱ्या डॉ.डी.वाय. दादांना स्वतः मुख्यमंत्री ना. वसंतदादा पाटलांनी बोलावून घेऊन खाजगी विनाअनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालये चालू करण्यासाठी प्रोत्साहीत केले. त्यानुसार १९८३-८४ मध्ये त्यांनी प्रथमतः पिंपरी व कोल्हापूर येथे खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालये सुरू केली. पुढे १९८८ मध्ये खाजगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालय सुरु केले. त्यानंतर ही शाखाविस्ताराची घोडदौड अखंडपणे चालूच राहिली.
सन १९८०-९० च्या दशकातील महाराष्ट्रातील सामाजिक, आर्थिक परिस्थिती आणि सध्याची सामाजिक, आर्थिक परिस्थिती याचा विचार करता दोन्हींमध्ये प्रचंड तफावत आढळून येते. त्याकाळी एकीकडे महाराष्ट्राच्या औद्योगिकीकरणाचा चढता आलेख आणि दुसरीकडे अभियांत्रिकी महाविद्यालयांचा तुटवडा असे व्यस्त प्रमाण होते. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची, कामगारांची, मध्यमवर्गियांची मुले अभियांत्रिकी शिक्षणापासून वंचित राहू नयेत. तसेच ज्यांची शैक्षणिक क्षमता व आर्थिक कुवत आहे, अशांना या शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकारने खाजगी विनाअनुदानित तत्त्वावर ही महाविद्यालये काढण्याचे धोरण राबविले. अर्थात याविषयी मतमतांतरे असू शकतात, मात्र काही सहकारी संस्थांनी विशेषतः सहकारी साखर कारखान्यांनी ही महाविद्यालये सुरू केल्याने असंख्य शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना याचा लाभ झाला. महाराष्ट्रात डॉ. पतंगराव कदम, डॉ. डी.वाय.पाटील, डॉ. कमल किशोर कदम इत्यादी मंडळींनी पुढाकार घेऊन हे शिक्षणाचे जाळे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही पसरविले. देशातील लाखो विद्यार्थ्यांना याचा फायदा झाला. त्या माध्यमातून लक्षावधी अभियंते महाराष्ट्रामध्ये उपलब्ध झाले. महाराष्ट्रातच नव्हे तर जगभर या मुलांना नोकरी आणि व्यवसायाची संधी उपलब्ध झाली. महाराष्ट्राच्या मागील तीस वर्षांतील आर्थिक, सामाजिक जडणघडणीत या खाजगी अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालयांचा लक्षणीय वाटा आहे, हेही आपण लक्षात घेतले पाहिजे. म्हणूनच या क्षेत्रामध्ये डॉक्टर डी.वाय.दादा यांनी केलेली कामगिरी सुद्धा महत्वपूर्ण आहे. सारासार विचार करता महाराष्ट्रातील आणि देशातील विद्यार्थ्यांना बदलत्या काळानुरूप व्यावसायिक शिक्षण देण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे हे नाकारून चालणार नाही. डॉक्टर डी.वाय.दादा हे तर या शिक्षण क्षेत्रातील अध्वर्यूच म्हणावे लागतील.
आज आपल्याला त्यांचे वैभव किंवा साम्राज्य आणि एकूणच शैक्षणिक संस्थांचा विस्तार दिसत असला तरी, पस्तीस-चाळीस वर्षांपूर्वीची परिस्थिती निश्चितच अनंत अडचणींना सामोरे जाऊन उभे राहण्याची होती, हेही लक्षात घेतले पाहिजे. विशेषतः डी.वाय. दादा यांच्याबाबतीत विचार केला तर त्यांची काही गुणवैशिष्ट्ये आपल्या लक्षात येतील. त्यांच्या बुद्धिमत्तेबरोबर दूरदृष्टी आणि कमालीची चिकाटी आहे. त्यांचे ध्येय आणि ध्यास दोन्हीही विशालतम आहे ! दादा मूलतः अध्यात्म मानणारे, मैत्रीला महत्त्व देणारे आणि माणुसकी जपणारे आहेत. राजकारणात राहून कदाचित जे शक्य झाले नसते, ते त्यांनी शिक्षण क्षेत्रात राहून साध्य केले आहे. त्यांच्याशी बोलताना एक शांत आणि संयमी व्यक्तिमत्त्व आपल्या लक्षात येते. सुदैवाने मला दादांशी अनेकदा भेटण्याचा, संवाद साधण्याचा योग आला आहे. आपले वैभवशाली कर्तृत्व, जागतिक नावलौकिक आणि अमाप ऐश्वर्य याचा लवलेशही त्यांच्या वागण्यात नसतो. अलिकडेच दोन वर्षांपूर्वी मी, श्रीकांत जाधव आणि संतोष घुले दादांना भेटायला गेलो होतो. पुन्हा नुकताच काही महिन्यांपूर्वी त्यांना मुंबईत भेटलो. प्रत्येकवेळी दादांनी आमच्या बरोबर बसून चहानास्ता केला. आपुलकीने संवाद केला.
डॉ. डी.वाय. दादांनी आयुष्यभर केलेल्या सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरीबद्दल भारत सरकारने त्यांना "पद्मश्री पुरस्कार" देऊन गौरविले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याचा मुलगा, स्वतः शिक्षण घेऊन शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांनी घेतलेली भरारी निश्चितच अभिमानास्पद आहे. त्यांनी स्थापित केलेल्या शैक्षणिक संस्थांचा कार्यभार आता विद्यापीठांमध्ये रूपांतरीत झाला आहे. 'पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ' त्यामध्ये सर्व प्रकारच्या आधुनिक शैक्षणिक शाखा व सुविधा उपलब्ध आहेत. त्यांच्या नावाची तीन स्वतंत्र विद्यापीठे कार्यरत आहेत. त्यांच्या शैक्षणिक संस्थांच्या केवळ आकडेवारीवर नजर फिरविली, तरी आश्चर्य वाटते. एकाच जन्मात एक माणूस काय काय निर्माण करू शकतो. नव्हे, शिक्षण क्षेत्रात एक वेगळे विश्वच उभे केलेले पाहून त्यांच्या कर्तबगारीपुढे आपसुक माथा झुकतो. आपल्या बुद्धिमत्तेला ध्येयवादाची, जिद्दीची आणि अथक परिश्रमांची साथ देऊन त्यांनी कर्तबगारी सिद्ध केली आहे. आता त्यांनी सर्व कार्यभार आणि जबाबदारी पुढील पिढीकडे सुपूर्द केली आहे. त्यांचे सुपूत्र सतेज ऊर्फ बंटी पाटील, अजिंक्य पाटील आणि कन्या सौ. भाग्यश्रीताई पी.डी. पाटील यांच्याकडे कारभार विभागून देण्यात आला आहे. त्या सर्वांनीच दादांच्या लौकिकाला साजेसे योगदान दिले आहे.असे हे ' पद्मश्री ज्ञानदेव यशवंतराव पाटील' नावाप्रमाणेच 'ज्ञानदाना'च्या क्षेत्रात 'यशवंत' कामगिरी करून, भारतभर शिक्षणाची 'पाटीलकी' गाजवित आहेत. ही निश्चितच भूषणावह बाब आहे. शिक्षण क्षेत्रात लौकिक मिळविलेल्या डॉ. डी.वाय.दादांची नोव्हेंबर २००९ मध्ये त्रिपुरा राज्याचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली. सन २०१३ पर्यंत त्यांनी ही जबाबदारी सांभाळली. त्याच दरम्यान बिहार आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणूनही त्यांच्याकडे जबाबदारी होती. आपल्या कारकिर्दीत दादांनी तिथेही आपल्या कामगिरीचा ठसा उमटविला आहे. विशेषतः बिहारमधील शिक्षण संस्थांना शिस्त लावण्याची कामगिरी त्यांनी केली आहे. राज्यपाल म्हणून त्यांनी नाममात्र फक्त एक रुपया मानधन स्वीकारले.
औदार्य आणि दातृत्व हे तर दादांचे मोठे गुण आहेत. माझ्यासारखा लहान कार्यकर्ता दादांच्या प्रेमात पडतो आणि त्यांना भेटू शकतो. दादाही तितक्याच प्रेमाने जवळ करतात, ही गोष्ट माझ्यासाठी खूप मौलिक आहे. मध्यंतरी गिर्यारोहक श्रीकांत जाधव याच्यासह मी मुंबईला दादांना भेटायला गेलो. त्यावेळी त्यांनी स्वतःहून त्याच्या परदेशातील गिर्यारोहण मोहिमेसाठी आर्थिक सहाय्य देऊ केले. त्याची जडणघडण कुठे झाली, ती माहिती विचारली. त्यानेही कृतज्ञपणे त्याच्या गावातील शाळेची माहिती दिली. डी.वाय. दादांनी तात्काळ त्या शाळेसाठी काय मदत करता येईल, ती माहिती घेऊन अहवाल देण्याच्या सूचना त्यांच्या संस्थेच्या संबंधित व्यक्तिला दिल्या. खेड्यापाड्यातील मुलांनी स्वतःला घडविले पाहिजे, हा त्यांचा दृष्टिकोन. त्यांच्यातील संवेदनशील माणूस सदैव जागृत असतो. माणूसकीचा झरा ओथंबलेला असतो. माणसांत राहणे, माणूसपण जपणे, माणसांना प्रेम देणे ही त्यांची गुणवैशिष्ट्ये कायमसाठी आपल्या स्मरणात राहतात.
आपल्या उत्तुंग कर्तृत्वाला, माणूसकीचे कोंदण दिले की ते व्यक्तिमत्व आभाळाहूनही मोठे दिसते. आज दिनांक २२ अॉक्टोबर २०२२ आदरणीय डी.वाय. दादांचा ८७ वा वाढदिवस आहे. दादांना निरामय आरोग्य लाभो, ते शतायुषी व्हावेत, याच त्यांना माझ्या भरभरून शुभेच्छा.


कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व
ReplyDelete