दुर्गसंपदेतील 'मुक्त विद्यापीठ' दुर्गमहर्षी प्रमोदभाऊ मांडे : अरुण बोऱ्हाडे
दुर्गसंपदेतील 'मुक्त विद्यापीठ' दुर्गमहर्षी प्रमोदभाऊ मांडे
© अरुण बोऱ्हाडे
दुर्गमहर्षी प्रमोद मारुती मांडे अर्थात गडप्रेमी युवकांमधील सर्वांचे आदरणीय 'भाऊ'. महाराष्ट्रातील गडकोट किल्ल्यांचे व छत्रपती शिवरायांच्या विविध पैलूंचे आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांचे अभ्यासक म्हणून ते सर्वत्र ओळखले जातात. इतिहास संशोधक, व्याख्याते आणि लेखक म्हणूनही त्यांची ओळख आहे. स्वराज्याची खरी संपदा अर्थात 'दुर्गसंपदा' असलेल्या सह्याद्रीच्या रांगांमधील गडकिल्ल्यांची भ्रमंती करून त्यांनी महाराष्ट्रातील तरुणांच्या हृदयात या जाज्वल्य इतिहासाची ज्योत चेतविण्याचे महान कार्य केले आहे.
श्री प्रमोद मांडे यांचा जन्म दि. १९ डिसेंबर १९५४ रोजी झाला. तब्बल चार दशके त्यांनी सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तसेच भारतभर भ्रमंती करून दोन हजारांहून अधिक किल्ले पाहिले, त्यांचे छायाचित्रण केले, त्याविषयीच्या नोंदी ठेवून लेखन केले.
भाऊंचा आणि माझा परिचय १९८९-९० च्या सुमारास झाला. त्यावेळी आम्ही एच.ए. कंपनीमधील काही सहकारी विविध गड किल्ल्यांवर भटकंतीसाठी जात होतो. त्या दरम्यान भटकंतीसंदर्भात 'प्रमोद मांडे' हे नाव मित्रमंडळींच्या चर्चेत आले. त्यानंतर आम्ही काही मित्र त्यांना भेटण्यासाठी पिंपरीतील अजमेरा कॉलनीतील त्यांच्या घरी गेलो होतो. पहिल्याच भेटीत खूप गप्पा झाल्या. त्याचवेळी गडकिल्ल्यांबाबत आपल्यापेक्षा ते अधिक सूक्ष्मपणे अभ्यास करतात, हे माझ्या लक्षात आले. प्रमोदभाऊ टाटा मोटर्समध्ये तर मी हिंदुस्थान अँटिबायोटिक्स मध्ये नोकरीला होतो. माझ्या जाण्यायेण्याच्या रस्त्यावरच त्यांचे घर असल्याने मी कधीमधी आवर्जून त्यांना भेटायला जात असे. मात्र, अनेकदा ठरवून देखील मला त्यांच्याबरोबर कधीही किल्ल्यावर भटकंतीला जाण्याचा योग आला नाही. आमच्या किल्ल्यांच्या मोहिमा आखल्यानंतर जाण्यापूर्वी, आम्ही त्यांच्याकडे जात असू. यामध्ये गिर्यारोहणातील माझे ज्येष्ठ सहकारी सोमनाथ साठे यांचा पुढाकार असे. माहितगार माणसाला विचारूनच एखादी मोहीम असलेली बरी, म्हणून आम्ही अनेक वेळा मांडे सरांचा सल्ला घेत असू. त्यांचे वैशिष्ट्य हे होते, आपली पाठीवरची सॕग कशी असावी, तिची रचना कशी असावी, पिण्याच्या पाण्याची बाटली कोणत्या बाजूला असावी, इत्यादी बारकावे ते आम्हाला समजावून सांगत असत. किल्ले पाहताना किल्ल्याच्या टप्प्यात गेल्यापासून ते परत येईपर्यंत काय काय पाहिले पाहिजे. याचेही प्रशिक्षण वजा माहिती ते देत असत.
पुढे काही वर्षांनी ते पुण्यामध्ये राहण्यासाठी गेले. मी कामगार संघटनेच्या कामात व्यस्त असे. मग मात्र आमचा संपर्क कमी झाला. दरम्यान आम्ही कंपनीत ट्रेकिंग क्लबची स्थापना केलेली होती. ट्रेकिंग क्लबच्या काही कार्यक्रमांना आम्ही त्यांना निमंत्रित करीत असे. कोणत्याही कामात सातत्य आणि पाठपुरावा असेल, सखोल चिंतन असेल आणि अपार कष्ट घेण्याची तयारी असेल, तर माणूस उच्च शिखरापर्यंत पोहोचू शकतो. याचे चालते बोलते उदाहरण म्हणजे 'दुर्गमहर्षी ' प्रमोदभाऊ मांडे होत. त्यांनी तरुण वयापासूनच प्रत्येक किल्ल्याकडे, गढीकडे संशोधनात्मक वृत्तीतूनच पाहिले. प्रत्येक किल्ला पाहण्यापूर्वी आणि पाहिल्यानंतर त्यांनी ऐतिहासिक संदर्भ त्याच्याशी जोडून पाहिले. अनेक ठिकाणी प्रचलित वाटा खूपच कठीण आहेत. मग पूर्वी म्हणजे शिवकाळात कुठल्या वाटा होत्या, त्या कशा नाहीशा झाल्या, यावर त्यांनी संशोधनातून उत्तर शोधलेले असे.
तसे पाहिले तर, भाऊ म्हणजे नोकरी करणारा एक सामान्य कामगार. कामगार जीवनातून वेळ काढून, वारंवार सुट्टी घेऊन दूरवर किल्ले फिरत बसणे, त्यांचा अभ्यास करणे, माहिती जतन करून ठेवणे हे काम वाटते तेवढे सोपे नव्हते. आज आधुनिक पद्धतीच्या मोबाईलमध्ये सहजपणे कुठलेही फोटो घेता येतात. व्हिडीओ रेकॉर्डिंग करता येते. पंधरा-वीस वर्षांपूर्वी फोटोग्राफी म्हणजे मोठे कौशल्य होते. शिवाय ते काम खूपच खर्चिक होते. महागडे कॕमेरे घेणे परवडणारे नव्हते. एकंदरीतच आपला भटकंतीचा छंद सांभाळताना भाऊंनी प्रपंचाकडे पुरेपूर दुर्लक्ष केले असणार, हेही सुस्पष्ट आहे. नोकरी, प्रपंच आणि छंदाची कसरत करताना त्याला कुशलतेने संशोधनाची जोड दिली. हे त्यांच्या कर्तृत्वाचे वेगळेपण आहे. त्याच्याही पुढे जावून विचार केला तर, प्रमोदभाऊ केवळ गडकोट, गढ्या आणि किल्ल्यांतच रमले असे नाही. तर देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये प्राणांची आहुती दिलेल्या असंख्य क्रांतिकारकांची माहिती त्यांनी मिळविली. त्यावरही अभ्यास केला आणि नवीन पिढीला प्रेरणा मिळावी, राष्ट्रभक्तिची ज्योत त्यांच्या मनामनात चेतवावी म्हणून क्रांतिकारकांच्या माहितीची प्रदर्शने लावली. त्यावर अभ्यासपूर्ण व्याख्याने दिली. शिवछत्रपतींचा इतिहास, आझादी के दिवाने हा क्रांतिकारकांच्या जीवनावरील कार्यक्रम, शिवरायांची आग्रा मोहीम असे अनेक कार्यक्रम व हजारो व्याख्याने भाऊंनी दिली आहेत. तसेच वरिल विषयांवर दोनशेहून अधिक प्रदर्शने केली आहेत. कधीमधी गडकोट किल्ल्यांविषयीची त्यांनी लावलेल्या प्रदर्शनाची बातमी वाचली की त्यांचे कौतुक वाटायचे. भाऊंचे हे कार्य फारच मौलिक आहे. कधीतरी कार्यक्रमात भेटी झाल्यानंतर आमचे बोलणे होत असे.
मध्यंतरी बऱ्याच कालावधीनंतर एव्हरेस्टवीर श्रीहरी तापकीर आणि गझलकार संतोष घुले यांच्यासह मी भाऊंना भेटण्यासाठी पुण्यातील त्यांच्या धनकवडी येथील सदनिकेत गेलो होतो. खूप निवांत वेळ आमच्या गप्पा झाल्या. त्यांचे अनुभव कथन ऐकले. किल्ल्यांविषयीची माहिती, हजारोंच्या संख्येत असलेली छायाचित्रे, स्लाइड्स, क्रांतीकारकांची माहिती, त्यांची छायाचित्रे हा सर्व 'संसार' त्यांनी स्वतः राहत असलेल्या सदनिकेतील कपाटामध्ये व्यवस्थितपणे लावलेला होता. त्यांच्याकडे सुमारे पाच हजार इतिहास विषयक पुस्तके, सुमारे तीन हजार स्लाईड्स, गडकोट किल्ल्यांचे व भटकंतीचे हजारो फोटो. सुमारे ४५० क्रांतिकारकांची दुर्मिळ छायाचित्रे व तैलचित्रे होती.
एखाद्या विद्यापीठातील संदर्भ ग्रंथालयात जावे आणि त्या ठिकाणी विहीत क्रमांकाप्रमाणे दिलेल्या पुस्तकांना हात घालावा, इतक्या सहजतेने भाऊंकडे सर्व किल्ल्यांची माहिती जपून ठेवलेली होती. संगणकावरही त्यांनी व्यवस्थितपणे फोल्डर्सला नांवे देऊन ही माहिती जतन केलेली आम्ही पाहिली. एखाद्या शासकीय यंत्रणेने किंवा एनजीओने लाखो रुपये खर्च करून जे काम एवढे नेटके केले नसते, ते भाऊंनी वैयक्तिक पातळीवर करून ठेवले आहे. याची मोजदाद कशातही करता येणार नाही. म्हणूनच ते कार्य महान आणि अतुलनीय आहे. भाऊंच्या या अथक परिश्रमाची दखल समाजमनाने घेतली. त्यांना "दुर्गमहर्षी " हा किताब दिला, तो उगीच नाही ! तसेच "सह्याद्रीपुत्र" या उपाधीनेही भाऊंना गौरविण्यात आले आहे.
प्रमोदभाऊंनी टाटा मोटर्समध्ये २२ वर्षे नोकरी केल्यानंतर केवळ छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचा, गडकिल्ल्यांचा अभ्यास करता यावा यासाठी त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. गडकिल्ल्यांचा ध्यास, अभ्यास, भटकंती आणि संशोधन यातून त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. १११ क्रांतिकारकांचे संक्षिप्त चरित्र, गड किल्ले महाराष्ट्राचे, महाराष्ट्रातील रत्नभांडार, स्वातंत्र्य संग्रामातील अंगार, स्वातंत्र्य संग्रामातील अग्निशलाका, स्वातंत्र्य संग्रामातील समिधा इत्यादी प्रेरणादायी पुस्तकांचे भांडार त्यांनी निर्माण केले आहे. भाऊंची नोंद घेण्यासारखी बाब म्हणजे, राजगड ते आग्रा व आग्रा ते राजगड असा छत्रपती शिवाजी राजांनी सात राज्यांतून केलेल्या तब्बल ६ हजार ३०० किलोमीटरच्या प्रवासमार्गावर त्यांनी दोन वेळा प्रवास केला. या मार्गाचे आणि मार्गातील प्रमुख स्थळांचे संशोधनपूर्वक अभ्यास करून छायाचित्रीकरण त्यांनी केलेले आहे. पुढील अनेक पिढ्यांसाठी तो मोलाचा दस्तावेज ठरणार आहे. पुढच्या पिढ्यांना मराठ्यांच्या इतिहासाची माहिती व्हावी, त्याविषयी जागृती असावी, राष्ट्रभक्तिचा विसर पडू नये यासाठी भाऊ सदैव कार्यरत राहिले. पुणे व्हेंचर्स, श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळ, वडवानल प्रतिष्ठान, भारत इतिहास संशोधक मंडळ, लोकसेवा प्रतिष्ठान, गडकिल्ले सेवा समिती इत्यादी अनेक संस्थांच्या माध्यमातून ते शेवटपर्यंत कार्यरत राहिले. भाऊंच्या आणखी एका महान आणि प्रेरक कार्याची नोंद येथे घ्यावी लागेल. भाऊ केवळ चारआठ जणांना घेऊन किल्ले फिरले नाहीत. तर उमलत्या तरुणाईला त्यांनी प्रोत्साहित केले, प्रेरणा दिली, बोलते केले आणि किल्ले कसे पहावेत याचे ज्ञान दिले. अशा शेकडो अभ्यासू तरुणांची फळी त्यांनी महाराष्ट्रभर उभी केली. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत फिरताना, गड कोट किल्ले पाहताना एक अभ्यासू नजर आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणा या तरुणांच्या मनामध्ये भाऊंनी रुजवली. आपण समाजामध्ये विविध सांप्रदायांच्या चाहत्यांचे संघटन पाहतो. तसेच राजकीय पक्ष संघटनांतील कार्यकर्त्यांचे संघटन पाहतो. राजकीय किंवा धार्मिक पातळीवर संघटन करणे तसे सोपे असते. परंतु दुर्गवेड्या प्रमोदभाऊंनी इतिहासाची गोडी असणारे, गडकोट किल्ले आणि ऐतिहासिक स्थळांची सुक्ष्म माहिती घेणारे, ती माहिती शास्त्रशुद्ध रितीने इतरांना सांगणारे, त्यावरती चर्चा करणारे अशा इतिहासप्रेमी, राष्ट्रप्रेमी निःस्वार्थी तरुणांची फळी उभी केली. त्यांना संशोधनाची दिशा दिली. ते सर्वजण भाऊंना गुरुस्थानी मानून, त्यांचे कार्य निष्ठेने पुढे घेऊन जाण्यासाठी कटीबद्ध आहेत. भाऊ स्वतः चालता बोलता ज्ञानकोश होते. पण त्यांनी तयार केलेल्या या ज्ञानकोशाच्या पारंब्या लाखमोलाच्या आहेत. या कामाची गणती कशातही करता येणार नाही. म्हणूनच ते "दुर्गमहर्षी " या उपाधीला पात्र ठरतात. नव्हे, ते दुर्गसंपदेतील चालते बोलते "मुक्त विद्यापीठ" होते, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. इतिहास, राष्ट्रभक्ती आणि परंपरा जतन करण्यासाठी भाऊंनी दिलेले योगदान लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने त्यांना मरणोत्तर "महाराष्ट्र भूषण पुरस्कार" द्यायला पाहिजे. एवढे त्यांचे कार्य व्यापक व परिणामकारक आहे.
भाऊंना लाभलेल्या आयुष्यातील चाळीस वर्षांहून अधिककाळ दुर्गभ्रमंती, दुर्गसंशोधन, वाचन, लेखन करण्यासाठी तन, मन, धन घालून काम करताना स्वतःचा देह झिजविणारे भाऊ कधीच थकले नाहीत. मात्र निसर्गाने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. एका दुर्धर व्याधीने भाऊंना गाठले. तेव्हा काही काळ ते निसर्गाच्या सानिध्यात फुलगांव येथील नेताजी सुभाष सैनिकी स्कुलच्या वसतिगृहात विश्रांती घेत होते. एका रात्री उशिरा मला श्रीहरी तापकीर यांनी याबाबत कळविले. तात्काळ आम्ही मित्रमंडळी त्यांना भेटायला गेलो. तेव्हाही हा शिवरायांचा मावळा, चेहऱ्यावर तोच उत्साह दाखवित अगत्याने आमच्याशी बोलत होता. खरे तर भाऊंनी खूप काम उभे केलेले होते. मात्र, आकाशी झेपावलेल्या गरुडालाच त्याचे ध्येय ठाऊक असते. आपल्या नजरेत तो दिसतही नाही आणि तो मात्र थांबण्याचे नांव घेत नाही. असेच काहीसे प्रमोदभाऊंचे झाले होते. मी जन्माला आलोय तर, उद्याच्या पिढीसाठी काही बीज पेरले पाहिजे. ही ज्ञानगंगा त्यांच्यापर्यंत गेली पाहिजे. नव्या पिढीला इतिहासाचा वारसा सांगताना, राष्ट्रभक्तीचा जाज्ज्वल्य मंत्रही त्यांना द्यायला हवा. असा त्यांचा आग्रह होता. म्हणून तर केवळ किल्ले सांगून भाऊ थांबले नाहीत, 'आझादीके दिवाने' अर्थात क्रांतिकारकांच्या बलिदानावर ते बोलत राहिले. अनेक पुस्तके लिहिली, हजारो व्याख्याने दिली, शेकडो स्लाईड शोज दाखविले, या कार्यासाठी शेकडो तरुणांची फळी घडविली, तरी भाऊ मात्र भटकंती करीतच राहिले. नित्य नव्याचा शोध घेत राहिले.
अखेरच्या क्षणी अॉक्टोबर २०१७ मध्ये आम्ही रुग्णालयात भेटायला गेलो, तेव्हाही ते ऊठून बोलत होते. उद्या निरोप घेतील असे किंचितही वाटले नाही. रुग्णालयात सर्वत्र त्यांचे शेकडो तरुण सहकारी काळजीपूर्वक लक्ष पुरवित होते, आवश्यक तिथे धावपळ करीत होते. पण दिनांक १७ अॉक्टोबर २०१७ चा दिवस भाऊंच्या अखेरच्या प्रवासाची तयारी करूनच उगवला. पूर्वेकडील सूर्यदेव आला आणि या 'सह्याद्रीपुत्रा'ला घेऊन मावळतीला गेला. एक 'दुर्गमहर्षी' सह्याद्रीच्या कुशीत विसावला. आगळेवेगळे कार्य केलेल्या दुर्गमहर्षी प्रमोदभाऊंना विनम्र अभिवादन.
@ अरुण बोऱ्हाडे ...✍
( मु.पो. बोऱ्हाडेवाडी, मोशी, ता.हवेली, जिल्हा पुणे, पिन-४११०७०)
मोबाईल : ९८८१३०१३३९, ई-मेल- atborhade@gmail.com
.jpg)
.jpg)
छान👌
ReplyDeleteखुपच ह्रदयस्पर्शी ध्येय पूर्ती चा जीवनप्रवास
Delete||शतकोटी प्रणाम दूर्गमहर्षीना _सहयाद्रीपूत्राला||
ReplyDelete