ती जेव्हा परत येते...!

चिंतन शलाका 

ती जेव्हा परत येते...! © लेखक : अरुण बोऱ्हाडे ✍

बरेच दिवस भेट नाही, बोलणे नाही म्हणून सकाळी सहजच माझा मित्र सोमनाथला फोन केला. 'काय चाललेय, असे विचारले' तर तो म्हणाला, पोलीस स्टेशनला आलोय तक्रार नोंदवायला ! कोणाची तक्रार ! तर त्याच्या जावया विरुद्धची तक्रार द्यायला त्याची विवाहित मुलगी आणि तो पोलीस स्टेशनला गेले होते ! काय झाले, नेमके जाणून घ्यावे म्हणून मी प्रश्न केला. तो म्हणाला, 'दीड वर्ष झाले लग्न होऊन. मी तुम्हाला कोणाला बोललो नाही. परंतु मुलीचा सुरूवातीपासूनच छळ चालू आहे. सतत वाद चालू आहेत तिच्या कुटूंबात. मुलगा आणि मुलगी दोघेही इंजिनियर. त्याला चांगली नोकरी आहे. तिचा स्वतःचा व्यवसाय होता. लग्नानंतर व्यवसाय बंद केला आणि ती नोकरीच्या शोधात आहे. एक दीड वर्षाच्या संसारात इतकी भांडणे आणि छळवाद ! तीही शिकलेल्या पती-पत्नीमध्ये ! हे सारे ऐकून काळजात उभी चिर पडावी असे झाले, मनाला वेदना झाल्या. 

ही केवळ पती-पत्नीची भांडणे नाहीत. संसाराची चौकट मोडण्याची शक्यता आहे. हल्ली अशा सुशिक्षित पती-पत्नीमध्ये अनेक ठिकाणी संघर्ष किंवा वाद-विवाद होताना दिसून येतो. तोही अगदी टोकाचा ! खरे तर हा सामाजिक चिंतनाचा गंभीर विषय आहे. ही एकच घटना नाही. हल्ली सुशिक्षित किंवा नोकरी करणाऱ्या जोडप्यांच्या भांडणाची माझ्या एकट्याच्या संपर्कातील मागिल तीन-चार वर्षातील की पाचवी घटना आहे. प्रत्येक घटनेतील मुले मुली सुशिक्षित आहेत, उत्तम नोकरी करणारे आहेत. तरी देखील त्यांचे संसार किंवा वैवाहिक जीवन सुखी व सुरळीत का नाहीत असा प्रश्न पडतो.

सोमनाथ हा पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील माझा मित्र. नोकरीनिमित्त शहरामध्ये येवून स्थायिक झालेला. स्वतःचे शिक्षण कमी झाले तरी मुलींना चांगले शिक्षण मिळेल, याची त्यांनी काळजी घेतली. ती इंजिनियर झाल्यानंतर तिला तिच्या आवडीचा व्यवसाय काढून दिला. त्यांच्याच परिसरातील ग्रामीण भागातील पण सध्या पुण्यात स्थायिक असलेल्या इंजिनियर मुलाशी मुलीचे लग्न केले. त्यांचा हा विवाह पारंपरिक पद्धतीने, पाहण्याचा कार्यक्रम करून झालेला. कोरोना काळातही व्यवस्थित आणि थाटात लग्न केले. मात्र या नवऱ्या मुलाला दारूचे व्यसन लागले आणि त्याने पत्नीला त्रास द्यायला सुरुवात केली. लहानसहान कारणांवरून तिचा मानसिक छळ सुरू केला. मुलीने सहन करित बरेच दिवस कोणालाही काहीच सांगितले नाही. अती झाल्यावर आई-वडिलांना सांगितले. त्यांनी गेले वर्ष-दीड वर्ष एकमेकांना समजावून सांगून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु उपयोग झाला नाही. काहीही कारण नसताना भांडणे विकोपास गेली. अखेरीस काल मुलीने परत कधीही पतीच्या घरी जायचे नाही, अशा निश्चयाने माहेर गाठले. पतीच्या विरोधात पोलिसांत लेखी तक्रार केली !  

लग्न करून दिलेली मुलगी वर्ष दोन वर्षांमध्ये माहेरी निघून येणे, ही गोष्ट कोणत्याही आईवडिलांसाठी अत्यंत क्लेशकारक असते. योगायोगाने त्याचदिवशी राजमाता जिजाऊंचा स्मृतिदिन होता. एकेकाळी जुलमी आक्रमकांकडून होणारा छळ आणि गुलामगिरीविरोधात एक महिला पेटून ऊठते आणि स्वतःच्या पुत्राच्या हातून, शिवरायांच्या हातून स्वराज्याची निर्मिती करते. साडेतीनशे वर्षांपूर्वी अन्यायाविरूद्ध पेटून ऊठलेल्या जिजाऊंच्या महाराष्ट्रात, आजच्या प्रगतीच्या युगात अनेक घरांमधून या ना त्या प्रकारे महिलांचा छळवाद मांडल्याचे कानावर येते, तेव्हा सखेद आश्चर्य वाटते, दुःख होते !

माझा दुसरा मित्र प्रशांत. त्याची मुलगी आयटी इंजिनियर झालेली. मागील वर्षी एका आयटी इंजिनियरशी लग्न करून देण्यात आले. कोरोनाचा काळ असूनही मर्यादित लोकांच्यात पण चांगल्या पद्धतीने लग्न करून दिले. तिचे सासरे शासकीय नोकरीतून निवृत्त झालेले अधिकारी, सासू अतिशय कडक स्वभावाची. पहिल्या आठवड्यापासूनच सासूने कडक शिस्तीचा बडगा उगारला. सकाळी सातला जायचे असेल तर पहाटे चार वाजता उठून घरातील सर्वांचे नाष्टा जेवण वगैरे घरकामे आटोपूनच तिने स्वतःची नोकरी सांभाळायची. पदवीधर व नोकरी करीत असूनही त्या मुलीला स्वातंत्र्य नाही, मोकळेपणा नाही आणि कहर म्हणजे तिने माहेरी जायचेच नाही, असा दंडक पहिल्या दिवसापासून ! शिस्त हवी, पण तुरूंगातील कैद्यासारखी कशासाठी ! आश्चर्य याचे की, तिच्या पतीने काहीही बोलायचे नाही, आज्ञाधारक मुलगा म्हणे..! पत्नीबाबत आई- वडिलांना एका अक्षराने विचारू शकत नव्हता. जवळपास सहा महिने हा प्रकार चालला होता. त्या सुमारास 'वर्क फ्रॉम होम' म्हणजे घरातूनच कंपनीचे कामकाज चालू होते. पण सासूबाई सुनेला तेही करू देत नव्हती. सासरे अगदी ठरवूनच तिला मानसिक त्रास देत होते. अखेर त्या मुलीने स्वतःच्या आई-वडिलांना फोन केला आणि सर्व छळवाद सांगितला. तिच्या   वडिलांनी जावून सासरच्या मंडळींशी बोलून पाहिले. नातेवाईकांना सांगून सासू- सासर्‍यांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण काहीच उपयोग झाला नाही. त्यांचा तोरा असाच होता, 'आम्ही सांगू तीच शिस्त, आम्ही सांगू तीच नियमावली !' 

काय प्रकार आहे हा ! आश्चर्य म्हणजे त्या मुलाची बहिण देखील इंजिनियर झालेली, तीदेखील आयटी क्षेत्रामध्ये नोकरी करीत आहे. तिला मात्र घरातील सर्व सवलती. तिची सर्व प्रकारे काळजी घेतली जाते ! दोघीही एकाचवेळी घरी येतात. आई मुलीला चहा करून देते, कधीकधी सूनेला करून द्यायला सांगतात. का, तर ती या घरची मुलगी आहे, थोडे दिवसांची पाहूणी आहे. हा भेदभाव कशासाठी ! केवळ सासू - सासऱ्यांना आपले वर्चस्व आणि अधिकार दाखविण्यासाठी ! 

अलिकडे मुले-मुली चांगले शिकतात, विविध क्षेत्रांमधील पदव्या घेतात चांगल्या नोकऱ्या मिळतात. अशावेळी नोकरी करणाऱ्या महिलेने घर कामासाठी पर्यायी व्यवस्था केली तर बिघडले कुठे ! पण मुलगी शिकलेली हवी, तिला चांगली नोकरी हवी, तिचा पगारही हवा. तिला कुठलेही स्वातंत्र्य नाही, सौख्य नाही, असा मोगली प्रकार पाहावयास मिळाला. त्याही मुलीला  सासर सोडून माहेरी यावे लागले. मुलीच्या सालस, सुशिक्षित आणि सुसंस्कृत आई-वडिलांना झालेल्या यातना आयुष्यभर विसरता येणार नाहीत.

अशीच घटना भारत नावाच्या मित्राच्या घरी घडली. तीही मुलगी लग्नानंतर सहा महिन्यातच सासरच्या छळाला कंटाळून, नवऱ्याच्या मौनाला विटून आणि अनेक मध्यस्थांनी समन्वयाचा प्रयत्न करूनही सासरच्यांनी समजून न घेतल्यामुळे माहेरी परत आली. माहेरी आली म्हणजे मुलगी सुखी झाली असे मुळीच नाही. परंतु जाणीवपूर्वक मांडलेल्या छळवादाला आणि अरेरावीला कंटाळून या मुलींना आईकडे जाण्याशिवाय पर्याय उरत नाही.

मी अनुभवलेल्या बहूतेक घटनांमध्ये सासूची भूमिका काहीशी वादाला फुंकर घालणारी, नवऱ्याची स्थिती अस्पष्ट, गोंधळलेली आणि चुकीची असूनही शेवटी आईवडिलांना सांभाळून घेणारी राहिली. 

सध्याच्या समाजामध्ये मोठ्या संख्येने कमी कालावधीमध्ये संसार मोडकळीस येण्याचे प्रकार चिंतनीय आहेत. एकेकाळी समाजात शिक्षणाची वाणवा होती. मुली शिकत नव्हत्या. शिकून काय दिवे लावणार, असे बोलले जायचे. अलीकडे शिक्षणाचा प्रसार झालेला आहे. शिक्षणाचे महत्त्व सर्वजण जाणतात. विशेषतः मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण कौतुक करण्याइतके वाढलेले आहे. सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची चेतविलेली ज्योत आता कुठे समाजामध्ये मनामनात रुजली आहे. मुलींच्या शिक्षणाचा अभिमान वाटत असतानाच, काही मुलांच्या बाबतीत   पुरुषी अहंकार मनात घर करून बसलेला दिसतो. शिकलेल्या प्रत्येक मुलाने आपल्या जुन्या विचारांचे आई-वडील आणि नवीन विचारांची पत्नी यांच्यामध्ये दुवा म्हणून काम केले पाहिजे. नोकरी करताना जर दोघेही बरोबर नोकरी करत असतील, तर केवळ पत्नीकडून गृहिणी म्हणून पूर्ण जबाबदारी सांभाळण्याची अपेक्षा का करावी ! एखादी आई आपल्या नोकरी करणाऱ्या मुलीला एक न्याय देते आणि सुनेला मात्र दुसरा न्याय लावते, असे कसे घडू शकते. 

वरील तीनही प्रकारातील सासरे एक तर सूनेच्या पुर्णतः विरोधात अथवा काहीच घेणे देणे नाही अशा मनःस्थितीत कसे वागू शकतात ! कुटूंबप्रमुख म्हणून मध्यवर्ती भूमिका आणि योग्य न्याय द्यायला नको का ? यामध्ये चुकते कोणाचे हा मोठा प्रश्न आहे. विषय तसा खूपच गंभीर आहे. आज सहज वाटणाऱ्या या घटना भविष्यामध्ये संपूर्ण समाज पोखरुन काढू शकतात. समाजधुरीणांनी यावर वेळीच विचार केला नाही तर, लग्नसंस्था अडचणीत येवू शकते. आपण सर्वजण शिक्षण आणि पैशाने सुधारलो असलो, तरी संस्कारांनी मागासलेलेच आहोत की काय असे वाटू लागले आहे. 

माझा मित्र माधवने त्याच्या मुलीविषयी फोनवरून सांगताना, त्याचा चिरकलेला आवाज काळजाला भोके पाडून गेला.  प्रतिकूल परिस्थितीत  घर प्रपंच उभे करताना मुलांच्या भवितव्याचे आणि सुखाचे पाहिलेले स्वप्न स्वतःच्या डोळ्यांसमोर कोलमोडताना पाहिले कि किती यातना आई-वडिलांना होत असतील. 

पूर्वी कधीकाळी मुली कमी शिकलेल्या असायच्या. सुख सुविधा मर्यादित होत्या. अनेक गावांना जाण्यासाठी रस्ते अथवा साधने नव्हती. करमणुकीची कोणतीही साधने नव्हती. तरिही संसार यशस्वी झाले असल्याचे आपण पाहत आहोत. आज बहूतांश गावांमध्ये रस्ते, गाड्या इत्यादी वाहतुकीची साधने पोहोचली आहेत. किंबहुना खेड्यांचे रूप पालटले आहेत. दुर्गम भागातही दूरदर्शन आणि त्याही पुढे जाऊन मोबाईल व इंटरनेटचे जाळे दूरवर पोहोचले आहे. पूर्वी कधीतरी जोडप्याने शहरात जाऊन थिएटरला सिनेमा पाह्यला मिळायचा. तोच आनंद अनेक दिवस मनामध्ये रुंजी घालायचा. शेतातील कामांमध्ये किंवा घर कामांमध्ये रमलेली मुलगी माहेरपणालाही दुर्मिळ असायची. आज काळ बदलला आहे. बहूतांश हातांमध्ये स्मार्टफोन आलेले आहेत. व्हाट्सॲप, इंस्टाग्राम, फेसबुक इत्यादी माध्यमातून संपर्क यंत्रणा गतिमान झालेली आहे. अर्थात ही माध्यमे सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही कामे करतात. 

अलिकडे लग्न झालेल्या प्रत्येक मुलीशी तिच्या आईचा बहुतेक दररोज संपर्क होत असतो. (महिलावर्गाची माफी मागून) घरातील, समाजातील, कुटूंबातील लहानसहान गोष्टींची ताबडतोब चर्चा होत असते. हे जसे मुलींच्या बाबतीत घडते, तसेच मुलांच्याही बाबतीत घडते. त्यांचा मित्रमंडळींशी किंवा अॉफिसमधील सहकाऱ्यांशी सततचा संवाद आणि संपर्क पत्नीकडे दुर्लक्ष करतो की काय असे वाटते. समाजमाध्यमे जसे फायदेशीर, तसेच  नुकसानीचेही ठरतात.

माझ्याकडे आलेल्या आणखी एका प्रकरणांमध्ये एकाच आयटी कंपनीमध्ये नोकरी करीत असलेल्या मुला-मुलींनी आपल्या परिचयातूनच लग्न ठरविले. दोघांच्याही घरच्यांनी संमती दिली. साधारणपणे वर्षभर सुरळीत चालेला संसार थोड्याशा गैरसमजातून हळुहळू उसवत गेला, पुढे जावून फाटला. या घटनेतील त्या मुलाने त्याच्या ऑफिसमध्ये असलेल्या आपल्या पत्नीला मेलवरूनच 'तुझे माझे पटत नाही, पटणार नाही. आपण लग्न मोडत असल्याचे' कळवून टाकले ! किती भयंकर गोष्ट आहे, लग्न जुळवणारे तुम्हीच, मोडणारेही तुम्हीच ! आई-वडिल, नातेवाईक यांना काहीही स्थान नाही !  परिचयातून झालेली मैत्री, इंटरनेटच्या माध्यमातून फुलत गेली, बहरत गेली. त्यातूनच लग्नापर्यंत मजल गेली आणि लग्नानंतर इंटरनेटच्या माध्यमातूनच तिला सोडून दिली ! हे कशाचे प्रतीक आहे ? सुधारणावादाचे की अर्धवट विचारांचे ? त्या प्रकरणात आम्ही दोघांनाही एकत्र बसवून समजावण्याचा प्रयत्न केला. नातेवाईकांशी बोललो, पण  दुर्दैवाने त्याला यश आले नाही. एखाद्या चाफ्याच्या झाडाला लगडलेली, एकाच फांदीवरील फुले अलगदपणे गळून खाली पडावीत आणि दूर व्हावीत. अशा सहजतेने ही जोडपी दूर होतात. पण आपले कुटूंबीय व  नातेवाईक यांच्या भावभावनांचा कुठेही विचार होत नाही. लग्नसंस्थेला सुरूंग लागतो, याचाही विचार होत नाही. खरे तर या नवीन पिढीला कोणाविषयी आदर, आस्था, आदर्श दिसत नाही की कळत नाही हेच समजत नाही. किंवा कळत असूनही ऐकावेसे वाटत नाही, हेच समजत नाही. समाजापुढे ही मोठी चिंतनाची बाब आहे

शिक्षणाने समाज सुधारला तरी संस्कार चांगले असतील, तर प्रगल्भता येते. पालकांची अगतिकता आणि मुला-मुलींचा आततायीपणा या दोन्ही बाबी संसारवेलीला त्रासदायक आहेत. सावित्रीच्या लेकी म्हणताना केवळ शिक्षणा पुरताच विचार करून कसे चालेल ? परिस्थितीला सामोरे जाण्याचे धारिष्ट्य आणि अडचणींतून मार्ग काढण्याचे कौशल्य दोघांनीही अवगत करायले हवे. संवादातून समन्वय साधण्याची कला अवगत व्हायला हवी. आयटीत नोकरी करणारांचा परस्परांशी संवाद कमी पडतो की काय, अशी शंका येते. नाहीतर आपल्या शिक्षणाचा, नोकरीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा अहंकारही कुठेतरी डोकावत असावा, असे वाटते. उच्च शिक्षण आणि मोठ्या पगाराची नोकरी यातून जगण्याचा आनंद आणि आत्मविश्वास निर्माण होण्याऐवजी अहंकार जन्माला येत असेल, तर सांसारिक वाटचालीमध्ये तो अडथळा ठरेल, हे सांगायला नको. 

आजच्या शिक्षणामध्ये काही कमतरता आहे का हाही प्रश्न निर्माण होतो. केवळ तांत्रिक शिक्षण देऊन समाज घडणार नाही. या शिक्षणाला संस्कारांची जोड हवी, नितीमूल्ये समजायला हवीत. स्वामी विवेकानंदांनी शिक्षणाची व्याख्या करताना असे म्हटले होते, 'शिक्षण म्हणजे केवळ पदव्यांच्या भेंडोळ्यांनी घर भरणे नव्हे, तर त्या शिक्षणामध्ये व्यवहारी जगामध्ये उभे राहण्याचे सामर्थ्य असायला हवे.' हे सामर्थ्य निर्माण करणारी शिक्षण यंत्रणा किंवा शिक्षण पद्धती असायला हवी. आजच्या शिक्षण पद्धतीत ही उणिव असेल तर त्यामध्ये सुधारणा आवश्यक आहेत.

मला एकदा दिल्ली ते पुणे विमान प्रवासामध्ये सोलापूर जिल्ह्यातील अत्यंत ग्रामीण भागातील एक तरुण मुलगा भेटला होता. तो आयटी इंजिनियर झालेला होता. पुण्यातील हिंजवडी मध्ये नामांकित आयटी कंपनीमध्ये तो नोकरीला होता. दिल्लीहून ज्या विमानाने मी येत होतो, त्याच विमानामध्ये तो मला भेटला. त्याच्याबरोबर आठ दहा ग्रामीण भागातील महिला व पुरुष आलेले होते. त्याचे आई-वडील, चुलते, काकू, मावशी व काका होते. सर्व नातेवाईकांना घेऊन विमान प्रवास घडवून आणण्याची त्याची इच्छा होती. विमानामध्ये बसल्यानंतर सुरक्षा बेल्ट कसा लावायचा, सीट मागे कसे घ्यायचे, हे तो प्रत्येकाला समजावून सांगत होता. तो माझ्या बाजूलाच बसलेला होता. चौकशी केली तेव्हा त्याने आपण अतिशय ग्रामीण भागातील असल्याचे सांगितले. मला त्या मुलाचे खूप कौतुक वाटले. आपण ज्या जगात वावरतो, ते जग आपल्या कुटूंबियांना दाखविण्याचा त्याचा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद होता. हाही आजच्या शिक्षणातून आलेला संस्कारच म्हणायला हवा ! अर्थात ही जाणिव आणि प्रगल्भता प्रत्येकामध्ये उत्पन्न झाली तर समाजातील अनेक समस्या आपोआपच संपुष्टात येतील.

शिक्षणाने समाज बहरतो आहे, पैशा पाण्याने समृद्ध होत आहे. परंतु त्यातील काही उणिवा आणि अहमभावाने किंवा संस्कारांची कमतरता असल्याने, अगतिक झालेली मने जुळून येण्यापूर्वीच दूर होताना दिसत आहेत. कारणे काहीही असोत, मुले - मुली शिकलेली आणि दोघेही कमावते असूनही संसार टिकवण्यात अपयशी ठरत आहेत. समाजाने यातून वेळीच धडा घ्यावा आणि योग्य ती काळजी घ्यावी. 

मुला-मुलींच्या स्वातंत्र्याचा आदर करतानाही योग्य ती काळजी घ्यावी. कुठे त्यांना संस्कारांची शिदोरी कमी पडत असेल, तर ती देण्याची भूमिका घ्यावी. शिस्तीचा बडगा उगारण्याची गरज नाही, पण किमान शिस्तीची सवय त्यांना लावणे गरजेचे आहे. पूर्वी एकत्र कुटूंबपद्धती होती. त्यावेळी थोरामोठ्यांचा दबदबा आणि धाक होता. आता 'हम दो, हमारे दो' या चौकटीतील मुला-मुलींना वाढविताना पालकांनी अगतिक होऊ नये. किमानपक्षी शिस्त आणि संस्कार त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी उपयुक्त ठरतील. जीवनात निर्माण होणारे धोके व येणाऱ्या अडचणी  याची माहिती त्यांना देणे गरजेचे आहे. लग्नसंस्था व कुटूंब व्यवस्था म्हणजे निकोप समाजव्यवस्थेचे प्रतिक आहे. हे नवीन पिढीला सांगायला हवे. माझ्या जवळच्या चार-पाच मित्रांच्या बाबतीत मी जवळून पाहिलेल्या या घटना, त्याचे मला स्वतःला अतिशय दुःख व वेदना होत आहेत. अशा किती घटना समाजामध्ये घडत असतील माहिती नाही, त्या घडू नयेत. प्रत्येकाने वेळीच योग्य ती काळजी घ्यावी, म्हणून हा शब्दप्रपंच!!


(अरुण तुकाराम बोऱ्हाडे )

दिनांक : १८ जून २०२२

Comments

  1. भाऊ तुम्ही जे वर्तमान काळामध्ये चालू आहे ते सत्य सर्वांसमोर मांडत आहात

    ReplyDelete
  2. Khare Ahai bhau

    ReplyDelete

Post a Comment