संवेदनशील देशभक्त : साने गुरुजी [ लेखक : अरुण बोऱ्हाडे ]
संवेदनशील देशभक्त : साने गुरुजी © लेखक : अरुण बोऱ्हाडे ✍
माझ्या लहानपणी वडिलांनी एकदा "श्यामची आई " हे पुस्तक वाचावयास दिले होते. मला ते पुस्तक खूप आवडले. वडिलांनी मला त्या पुस्तकाचे लेखक पांडुरंग सदाशिव ऊर्फ साने गुरुजी यांच्याविषयी माहिती दिली. साने गुरुजींवर त्यांच्या आईच्या संस्कारांचा खूप प्रभाव होता. ते स्वातंत्र्य चळवळीतही सहभागी झाले. ते विचारवंत आणि समाजसुधारक होते. अस्पृश्यता निवारणासाठी त्यांनी कार्य केले. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर अस्पृश्यांसाठी खुले करावे, या मागणीसाठी त्यांनी प्राणांतिक उपोषण केले. लहानपणापासूनच मला साने गुरुजींचे व्यक्तिमत्व खूपच भावले आहे. पुढील काळात साने गुरुजींची श्यामची आई सह अनेक पुस्तके मी वाचली आहेत. मोलकरीण, मोरी गाय, भारतीय संस्कृती, कला म्हणजे काय ? इत्यादी.
आम्ही शाळेत असताना साने गुरुजींची एक प्रार्थना दररोज म्हणायचो.
"खरा तो एकची धर्म,जगाला प्रेम अर्पावे
जगी जे दीन पददलित, तया जाऊन उठवावे,
जगाला प्रेम अर्पावे ll
हे गीत आमच्या प्रत्येकाच्या ओठी होते. आचार्य प्र.के.अत्रे यांनी काढलेला "श्यामची आई" चित्रपट पहावयास मिळाला. प्रत्येकाच्या जीवनामध्ये आईचे संस्कार किती महत्त्वाचे आहेत हे समजले. श्यामची आई पाहतांना किंवा पुस्तक वाचताना आजही जागोजाग मन ओलावते, डोळे पानावतात ! सानेगुरुजी म्हणजे साक्षात मातृहृदयी, संवेदनशीलता म्हणजे साने गुरुजी ! त्यांची लेखणी जशी तसेच त्यांचे जीवनही ! किती साधे सरळ व्यक्तिमत्त्व. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये २४ डिसेंबर १८९९ मध्ये जन्मलेले. साने गुरुजींचे शिक्षण दापोली व पुणे या ठिकाणी झाले. जळगाव जिल्ह्यामध्ये अमळनेरला गेले, विद्यार्थ्यांना घडविण्यात काही वर्षे शिक्षकाची नोकरी केली. बालमनावर संस्कार करणारा उत्तम शिक्षक म्हणून त्यांची ख्याती झाली. तिथेच त्यांनी तत्वज्ञानाचा अभ्यास केला. त्यांच्यावर महात्मा गांधींच्या विचारांचा मोठा प्रभाव होता. त्यांनी गांधीवादाचा प्रसार आणि प्रचार केला. एक संवेदनशील साहित्यिक, ज्यांच्या साहित्यामध्ये मानवतावाद, समाजसुधारक, देशभक्त पदोपदी प्रकट होतो. सन १९३० साली महात्मा गांधी यांच्या आदेशानुसार त्यांनी सविनय कायदेभंगाच्या चळवळीत उडी घेतली आणि साने गुरुजी हे देशसेवेसाठी सार्वजनिक जीवनामध्ये प्रगटले. पुढील काळात सुमारे अठरा महिने ते तुरुंगात होते. तुरुंगात त्यांना आचार्य विनोबा भावेंचा सहवास लाभला. भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी गुरुजींनी दिलेले योगदान शब्दातीत आहे. तुरुंगात त्यांनी विपुल काव्ये लिहिली, पुष्कळ लेखन केले.
"बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो."
हे त्यांचे देशभक्तिपर गीत आमच्या तरुण पिढीला सदैव प्रेरणादायी ठरले. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या साक्षीने हरिजनांना मंदिर प्रवेशासाठी त्यांनी केलेल्या उपोषणातून त्यांच्यातील मानवतेचा विचार प्रकट होतो. प्रांतियता, जातियता, अस्पृश्यता या सर्व प्रकारांनी माणूस परस्परांपासून दूर जातो. यासाठी त्यांनी जनतेचे प्रबोधन केले. या देशातील जनतेने विविध भाषा शिकाव्यात, परस्परांच्या भाषा, कला, संस्कृती, चाली-रिती शिकाव्यात आणि त्यांची देवाणघेवाण करावी. भारतीय म्हणून आपण सर्वांनी एक व्हावे. तेव्हा कुठे देश एकत्रितपणे नांदू शकेल, असा विचार त्यांनी मांडला. म्हणूनच त्यांनी "आंतरभारती" सारखे प्रयोग राबविले. स्वतः बंगाली, तमिळी भाषा शिकले.
अस्पृश्यता निवारणासाठीही गुरुजी खूप आग्रही होते. पददलितांची सेवा केली पाहिजे, गरिबांचा सन्मान झाला पाहिजे, आदर्शवादी आणि ध्येयवादी जीवन जगले पाहिजे ही साने गुरुजींची शिकवण होती आणि तसाच त्यांचा प्रयत्न होता. सामाजिक-आर्थिक आणि धार्मिक बंधुभाव वाढीला लागला पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. आंतरभारती आणि राष्ट्र सेवा दल या माध्यमातून ते सतत प्रयत्नशील होते. या दोन्ही संस्थांचे संस्थापक साने गुरुजी आहेत.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्यांनी समाजवादी पक्षाचे कार्य केले. त्यांनी 'साधना' साप्ताहिक सुरू केले. त्यांनी स्थापन केलेल्या "राष्ट्र सेवा दलाच्या" शिकवणूकीतून अनेक ध्येयवादी कार्यकर्ते महाराष्ट्रभर उभे राहिले. 'राष्ट्र सेवा दल' आणि 'साधना' चे कामकाज आजही चालू आहे.
आचार्य प्र.के.अत्रे यांनी लिहिलेले 'मृत्यूचे चुंबन घेणारा महाकवी' वाचताना साधे, सरळ राहणीमान असलेल्या गुरुजींची महती पटते. आचार्य प्र.के. अत्रे यांनी साने गुरुजींविषयी लिहिले आहे, "गरीब आणि श्रमजीवी जनतेची सर्व दुःखे आणि दुखणी दूर व्हावीत ही गुरुजींच्या जीवनातली एक तळमळ होती. ती तळमळ गुरुजींनी आपल्या वाड़्मयात ओतली आहे. म्हणून त्यांनी लिहिलेल्या प्रत्येक अक्षरा-अक्षरात आणि ओळी-ओळीत त्यांचे हृदय प्रकट झाले आहे. 'माझ्या वाड़्मयाला हात लावाल तर माझ्या हृदयाला लावाल' असे ते म्हणत. असे फार थोडे आणि भाग्यशाली कवी आणि लेखक जगात असतात की, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे दर्शन त्यांच्या काव्यात आणि वाड़्मयात होते. साने गुरुजींचे वाड़्मय मात्र असे आहे की, वाक्या-वाक्यात आणि कडव्या कडव्यात तुम्हाला गुरुजींच्या निर्मळ आणि पवित्र मूर्तीचे दर्शन होईल. समाज पुरुषाशी साने गुरुजी इतके समरस झाले होते की, सागराप्रमाणे सर्व नद्या, झरे आणि ओहोळ त्यांनी आपल्या विशाल व्यक्तिमत्त्वामध्ये शोषून घेतले होते."
"समाजातील भेदाची, द्वेषाची आणि सूडाची सर्व भावना नष्ट व्हावी आणि परस्परात 'जीवांचे मैत्र जडावे, स्नेहभाव उत्पन्न व्हावा, निर्भयता आणि स्वाभिमान निर्माण व्हावा' या एकाच ध्येयाने प्रेरित होऊन गुरुजींनी आपल्या वाणीची पेरणी केली."
साने गुरुजींचे जगणे एक काव्यच होते. जगण्या इतकेच मरणावरही त्यांचे प्रेम होते. जीवनातील सौंदर्य आणि रमणीयता केवळ मरणामुळेच निर्माण झाली आहे, असे ते म्हणत. दिनांक ११ जून १९५० रोजी या हळव्या मनाच्या महान गुरुजींनी या जगाचा निरोप घेतला आणि मरणाला आलिंगण दिले. साने गुरुजी हे सर्वार्थाने देशभक्त होते. भारत बलशाली घडवायचा असेल तर, मुलांवर सुसंस्कार व्हावेत, तरुणांच्यात राष्ट्रप्रेम जागृत व्हावे, सर्व जातिधर्माच्या जनतेने एकोप्याने आणि आनंदाने जगावे अशी त्यांची उत्कट भावना होती. त्यांच्या हळव्या स्वभावामुळे मातृहृयी अशी त्यांची ओळख झालेली होती.
आईला परम वंदनीय स्थान देताना गुरुजी आपल्या काव्यात लिहितात. -
आई माझा गुरू, आहे कल्पतरू
सुखाचा सागरू आई माझी..
प्रीतीचे माहेर, मांगल्याचे सार
अमृताची धार, आई माझी l
अशा या मातृहृयी देशभक्त, समाजसुधारक, स्वातंत्र्य सेनानी आणि जनतेचे शिक्षक असलेल्या संवेदनशील साहित्यिकाच्या 'सामाजिक जाणिवेस' अंतःकरण पूर्वक प्रणाम.
🙏
(वेध सामाजिक जाणिवांचा : लेखक - अरुण बोऱ्हाडे)

#Mother is all ........।।।।
ReplyDeleteवरील वाचनातून मला वाटते..तीन लोकांचा स्वामी.आई वीना भीकारी. झाडाचे अवयव,त्याचे जिवनमान जगाला देऊन जाते.त्याच प्रमाणे “आई “
ReplyDelete