"पाण्यावरती तरले जीवन" अविस्मरणीय दल सरोवर !✍ @ लेखक : अरुण बोऱ्हाडे

 🍃


     श्रीनगर, काश्मिरची राजधानी. तेथील सुप्रसिद्ध "दल लेक" अर्थात दल सरोवर काश्मीर मधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक मोठे सरोवर आहे. जवळपास चोवीस चौरस किलोमीटर परिसरात पसरलेला जणू हा अथांग सागरच. श्रीनगरला आणि या सरोवराला तीनही बाजूंनी आकाशी भिडलेल्या हिमालयीन झबरवन पर्वतरांगांनी वेढलेले आहे. झेलम नदीच्या किनारी वसलेल्या श्रीनगरमधील इतिहास प्रसिद्ध शालिमार, चष्मेशाही, नसीमबाग, निशात अशी मुघलनिर्मित सुप्रसिद्ध उद्याने याच सरोवराच्या किनारी बहरलेली दिसतात. याशिवाय चिनार, देवदार इत्यादी डौलदार आणि हिरव्यागर्द वृक्षांची दाटी पाहावयास मिळते. याच सरोवरात सोनलंका आणि रुपलंका अशी दोन छोटी बेटे आहेत. शहराच्या एका बाजूस श्री शंकराचार्यांचे मंदिर असलेली वृक्षाच्छादित टेकडी, तर दुसरीकडे हरी पर्वतावरील डौलदार किल्ला सर्वांचे लक्ष वेधून घेतो. मूलतःच निसर्गाचे सर्वांगसुंदर वैभव लाभलेला हा आसमंत आणि येथील हे नितांत सुंदर सरोवर याविषयी काय लिहावे आणि काय वर्णावे ! 


अर्थात, येथील अप्रतिम सौंदर्य आणि सुखद वातावरण यापेक्षाही मला या सरोवरातील आगळ्यावेगळ्या जनजीवनावर भाष्य करावेसे वाटले, म्हणून हा शब्दप्रपंच !

      जवळपास पंधरा किलोमीटरचा सुरेख किनारा लाभलेले हे दल सरोवर जगात प्रसिद्ध आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे स्टार हॉटेल्सलाही लाजवतील अशा सुंदर "हाऊस बोट" पर्यटकांना आकर्षित करतात. म्हणूनच हजारो पर्यटक याचा लाभ घेतात. खरे तर काश्मीरच्या जनजीवनामध्ये या दल लेकचे आणि त्याच्या बाजूलाच असलेल्या नगीन लेकचे (सरोवराचे) महत्त्व अनन्यसाधारण आहे. येथील सृष्टीसौंदर्य, जलविहार आणि शुभ्र बर्फाच्छादित गिरीशिखरांइतकेच मला भावले ते येथील लोकांचे पाणीदार जीवन ! पाणी म्हणजे जीवन, पाणी म्हणजे पारदर्शकता, मोकळेपणा, नितळता ! अशा या पाण्यातच जीवन असेल तर कधी जीवनात पाणी खेळते, तर कधी जीवनाचे पाणी पाणी होते ! पाण्यामध्येच आपले जीवन व्यतीत करीत येथील हजारोजण आपल्या संसाराच्या वेली फुलवितात. त्यांच्यासाठी जल हीच धरती, शेती आणि माती. पाण्यातच राहणे, पाण्यातच राबणे, पाण्यातच कमविणे आणि पाण्याबरोबरच जीवन व्यतीत करणे ! जीवन जगण्याचा एक वेगळा आनंद आणि वेगळाच प्रवास या ठिकाणी पाहायला मिळतो. 

श्रीनगर सारख्या राज्याच्या राजधानीच्या शहरात शेकडो वर्षांपासून अनेक राजे राजवाडे व शाह्यांच्या साक्षीने शेकडो वर्षे फुलत आलेल्या आणि भारताच्या स्वातंत्र्यानंतरही काश्मीरने आपले निसर्ग वैभव जपले आहे. अलिकडे काही वर्षांत अगणित संकटांच्या धक्क्यांतून सावरताना आणि  भळभळत्या जखमा भरताना, काश्मीर पुन्हा पुन्हा उभा राहत आहे. त्यातूनही दल सरोवर मधील हे जीवन वैभव आणि त्यातील नितळता आपले स्थान टिकून आहे ! काय आहे हे वेगळे पण ते थोडे जाणून घेतले पाहिजे. 


निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या सरोवराच्या पाण्यावरच काही छोटी छोटी गावे वसलेली आहेत. देशभरातील व जगातील पर्यटक हेच त्यांचे उत्पन्नाचे साधन आहे. याठिकाणी हजारो हाऊस बोटी पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. एक हाऊस बोट बनवायला काही कोटी रुपये खर्च येतात. त्यामध्ये अतिशय सुबक नक्षीदार कोरीवकाम आणि रंगीबेरंगी कपड्यांची सजावट केलेली असते. देवदार वृक्षापासून बनवलेल्या या हाऊस बोटी जवळपास शंभर वर्षे टिकतात. त्यातील कलाकुसर आणि देखणेपण साहजिकच मनाला भुरळ घालतात. अर्थात या हाऊसबोटी बनविणे हा सामान्य माणसाचा व्यवसाय नाही, आर्थिक सफलता असलेल्या काही ठराविक घराण्यांनी या बोटींचा व्यवसाय चालविला आहे. त्यामध्ये असंख्य हातांना रोजगार उपलब्ध झाला आहे. अनेक चितारी, कातारी आणि सुतारी हात यावर निर्भर आहेत. येथील काश्मिरी माणसं म्हणजे  मधाळ गोडवा. पर्यटकांचं मनापासून स्वागत करणे, हसत मुखाने आदरातिथ्य करणे, त्यांची सेवा पुरविणे हे जणू त्यांचे उद्दिष्टच असते. 

पण खरी गंमत आहे या पाण्यावर तरंगणाऱ्या हजारो लहान लहान शिकाऱ्यांची ! 'शिकारा' अर्थात छोट्या टोकदार होड्या किंवा नांवा ! 

           

या शिकारा केवळ पर्यटकांना फिरविण्यासाठीचे साधन नव्हे, तर या सरोवराच्या किनाऱ्यावर वसलेल्या असंख्य गावकऱ्यांच्या जीवनातील तो अविभाज्य घटक आहे. तो जणू त्यांचा श्वास आहे.  त्यांच्या जीवनाचे साधन आहे. पर्यटकांसाठी आकर्षक आणि रंगीबेरंगी कपड्यांनी शिकारा सजविली जाते, उन्हासाठी छोटेसे आकर्षक छत तयार केले जाते. तीन-चार तास फिरताना पर्यटकांचे मन प्रसन्न होते. शांत नितळ पाण्यावरून भोवतालच्या निसर्गाचे सौंदर्य न्याहाळत हळूवारपणे शिकाऱ्यातील नावाडी शिकारा वल्हवित आपल्याला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो. या सरोवराच्या एका बाजूला मुख्य रस्ता, उद्याने मोठी हॉटेल्स आहेत. त्याच वेळी दुसऱ्या किनाऱ्यावर पिढ्यानपिढ्या त्या निसर्गाशी एकरूप होऊन पाण्यामध्येच जीवन जगणारी एक वेगळी जीवनशैली आहे ! येथील घराघरांमध्ये लहान-मोठ्या शिकारा असल्याचे जाणवते. आपण सरोवरातून फेरफटका मारत असताना अलगदपणे आपल्या शिकारा जवळ दुसरी शिकारा येऊन थांबते. " बाबूजी चाय ले लो, नहीं तो कावा पिजीए ! कुछतो ले लो गरम है टेस्टी है, मजा आयेगा !" अशा विनवणीच्या सूरांत, आतिथ्यशील शब्दांमध्ये तो चहाचा व्यवसाय करत असतो. काही वेळाने पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या विशेषतः  महिलांसाठी लागणाऱ्या प्रसाधन पूरक चीजवस्तू आणि  आभूषणे, अलंकार विक्री करणारा शिकारा शेजारी येऊन थांबतो. मोठी गंमत वाटते, विस्तीर्ण पाण्याच्या पृष्ठभागावर हा व्यवसाय शांतपणे चाललेला असतो. एकाशी व्यवहार करून तो शिकारा, दुसऱ्या ग्राहकाच्या शोधात निघून जातो. आपण रमत गमत पुढे पुढे जातो. तेवढ्यात एखादा दुसरा शिकारा येतो, तो तुमची सुंदर छायाचित्रे काढून देतो. काश्मिरी आभूषणे- वेशभूषा करून सहजगत्या सुंदर छायाचित्रे काढली जातात आणि काही वेळातच पाण्यातल्या प्रवासात आपल्या हाती त्याच्या प्रतिमा मिळतात. एक वेगळीच अनुभूती असते ही ! असे सर्व क्षण अनुभवत असताना मी ज्या शिकाऱ्यातून  चाललो होतो त्या नावाड्याला बोलते करून, त्याच्याकडून माहिती घेत होतो. तो म्हणाला, या व्यवसायात जवळपास दहा हजार शिकारा आहेत. कित्येक हजार हाऊस बोटी आहेत. उन्हाळ्याच्या सहासात महिने हा व्यवसाय करतात. देशाच्या आणि जगाच्या विविध भागातून येणारे पर्यटक हाच त्यांचा आधार आहे. बरं ते मागे लागत नाहीत, ग्राहकाला विचारणा करतात, हो म्हणालात तर व्यवहार करतात आणि पुढील ग्राहकांसाठी ते निघूनही जातात. त्याने सांगितले या पाण्यामध्येच शेतीही केली जाते ! काठावरची माती आणि  गवतावर तरंगणाऱ्या काही वनस्पती यांचा एखादा तरंगता बेटाचा पुंजका निसर्गतः तयार होतो आणि किनाऱ्यावरील गावकरी त्या तरंगत्या बेटावर विविध प्रकारच्या भाज्यांची बियाणे टाकून त्याचे उत्पन्न घेतात ! अर्थात कधीकधी पाण्याच्या लाटेबरोबर एखाद्याने लावलेल्या भाजीचे बेट अलगदपणे पुढे निघूनही जाते, दुसऱ्याच्या हाती ते लागते ! निसर्गाच्या लहरीपणावर मात करीत तेथील गावकरी सहा महिने या पर्यटनावर अवलंबून जगतो. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये येथील तापमान अनेकदा शून्याच्या खालीच असते. सरोवर गोठून जणू एखादे खेळाचे मैदान तयार होते. अशावेळी येथील गावकरी आपल्या घरामध्ये विविध प्रकारच्या वस्तू आपल्या हाताने बनवतात. एकूणच काश्मिरमध्ये कुटीर उद्योग मोठा आहे. अलंकार, खेळणी, शॉल्स, लोकरीच्या वस्तू, ड्रायफ्रुटस इत्यादी. पर्यटकांचा ओघ सुरू झाला की याच वस्तू विक्रीसाठी बाजारात येतात. 

थंडीच्या दिवसांमध्ये येथील अनेक पुरुष मंडळी देशाच्या विविध भागांमध्ये अगदी महाराष्ट्रातील पुणे कोल्हापूर पर्यंत मिळेल ते काम धंदा शोधत उदरनिर्वाह करीत असतात. चार पैसे जमवून ते  कुटूंबासाठी घेऊन जातात. घरातील लहान मुले, महिला, वयोवृध्द या प्रत्येकाचे जनजीवन आश्चर्यकारक आहे. आपल्या शहरी जीवनामध्ये कितीही पैसा आला तरी आपण सुखी नसतो. पैसा आला की बुद्धीला नको त्या गोष्टी सुचतात. मोठमोठे बंगले, महागड्या गाड्या, महागडे मोबाईल्स, हॉटेल्स, करमणुकीची विविध साधने आणि वादविवादाची विविध कारणे शोधत आम्ही जीवन जगतो. पण येथील हजारो लोकांचे जनजीवन निसर्गाशी जुळवून घेत शांतपणे जगताना पाहिले की त्यांच्या जगण्याची उंची समजते. त्यांच्या गरजाही कमी, उद्दिष्टही कमी. कदाचित त्यातून मिळणारा जीवनाचा आनंद हा मात्र निश्चितच मोठा असेल. हसत खेळत निसर्गातील संकटाना सामोरे जाताना त्या निसर्गाशी एकरूप होऊन जगतात. सर्व घरांसमोर फुलणारी विविध रंगाची विविध आकाराची फुले आणि तेथील मुले दोन्हीही सारखेच वाटतात ! आनंदी, सुगंधी आणि उत्साही !


आपल्या गाव खेड्यांमध्ये मोठ्या चौकातून आत मध्ये विविध गल्ल्या जातात. त्याप्रमाणे या विशाल सरोवराच्या पोटातून किनार्‍याकडे जाताना छोट्या छोट्या गल्ल्यांप्रमाणे पाण्याचे छोटे छोटे प्रवाह आत मध्ये जातात. त्या प्रत्येक प्रवाहाच्या कडेला एखादी हाऊस बोट असते. या  हाऊसबोटीमध्ये पर्यटक नव्हे, तर येथील गावकरीच राहतात. अशा शेकडो घरांची वस्ती या पाण्यामध्ये वसलेली आहे. प्रत्येकाच्या दारात दोन-तीन छोट्या-मोठ्या शिकारा असल्याचे दिसते. ज्यांना शिक्षणाची आवड आहे त्या महिला स्वतः शिकारा चालवत आपल्या लहानग्यांना सरोवराच्या दुसऱ्या किनारी शाळेसाठी सोडायला जातात. विविध प्रकारचा भाजीपाला घेऊन त्या हाऊसबोटी समोर छोट्या शिकाऱ्यातून  गृहिणींना विकणारे भाजीवाले पाहिले. किराणामाल विकणाऱ्या शिकारा पहावयास मिळतात. एवढेच काय, या गावांसाठी टपाल सुविधा देणाऱ्या शासकीय छोट्या पोस्टल बोटीही पाहिल्या आणि त्याही पुढे जाऊन पाण्यात तरंगणाऱ्या रुग्णवाहिकाही पाहायला मिळाली ! अरे बापरे ! कुठे आहोत आपण, हे जनजीवन किंवा जलजीवन वेगळ्याच दुनियेत आपण आहोत. मी माहिती घेतली,  एवढी वस्ती पाण्यावरती राहत असताना घरातील केर कचरा कुठे जमा होतो, तेव्हा समजले केर कचरा जमा करणारीही शासकीय शिकारा प्रत्येकाच्या दारात सकाळी येऊन जाते. श्रीनगर मधील या दल सरोवराला भेट द्यावी, निसर्गाचा निखळ आनंद घ्यावा. 'चार चिनारला' भेट द्यावी, तेथील वेगळेपण सांगणाऱ्या अवीट चवीचा गरम 'कावा' जरुर घ्यावा. निसर्गाचे मनमुराद छायाचित्रण करावे, पाण्यावरती चार तास शांतपणे भटकंती करावी. सर्वबाजूंनी वेढलेल्या पर्वतरांगांच्या आणि त्यातून डोकावणाऱ्या सफेद बर्फाच्या दुलई डोळ्यांमधे साठवून घ्याव्यात. निळ्याशार आकाशाशी रममाण व्हावे. कधी मध्येच येणाऱ्या पाऊसधारा नयनांत भरून घ्याव्यात. हिरवाईत रमतानाही लालसर उंच चिनार वृक्षाशी, सोनेरी पॉप्लर वृक्षाशी एकरुप व्हावे. सुरूसारखी दिसणारी हिरवीगर्द झाडे आकाशी भिडताना पाहावीत. रंगीबेरंगी अगणित फुलांशी  फुलपाखरू होऊन गाणे गावे. मात्र त्याच वेळी या सरोवराच्या दुसऱ्या किनाऱ्यावर एक आगळेवेगळे जीवन जगत असलेल्या या मानवी मनाच्या निसर्ग वेलीनांही आवर्जून भेटावे. त्यांचे जीवन अनुभवावे, त्यांच्या जीवनशैलीतील आनंदक्षण टिपायचे कि त्यांच्या व्यथा वेदनांचा शोध घ्यायचा, हे ज्याच्या त्याच्यावर अवलंबून आहे. 

निसर्गराजा तू खूप मोठा आहेस. तुझ्या पोटामध्ये मानवाला सामावून घेण्याची खूप शक्ती आहे. तू दिलदार आहेस तुझ्याकडे मोठे औदार्य आहे. अरे, धरती वरती, अरण्यामध्ये, डोंगर शिखरांवरती, दऱ्या-खोऱ्यांमध्ये जगणारी माणसे मी अनेकदा पाहिली. पण पाण्यामध्ये राहून, पाण्यावरती जगणारी ही माणसं, तू त्यांनाही आनंदी ठेवतोस. त्या माणसांचे कौतुक करावं, ते मी करीनच ! पण निसर्गराजा तुझी मात्र कमाल वाटते, तुझ्या अंगाखांद्यावर, तळहातावर, डोक्यावर आणि जलपृष्ठावरही तू माणसाला जीवन देतोस ! कधी जीवनाचे पाणी होते, पाणी हेच जीवन ठरते ! पाण्यावरती तरले जीवन ! वेगळ्या अनुभूतीचे हे दल सरोवर सदैव स्मरणात राहिले, ते याच कारणे !!

**

© अरुण तुकाराम बोऱ्हाडे 

मोशी, ता. हवेली, जिल्हा- पुणे.(पिन- ४११०७०)

मोबाईल : 9881301339 , ई-मेल : atborhade@gmail.com

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

श्री नागेश्वर महाराज भंडारा : भक्तिमार्गातील शक्ती स्त्रोत [लेखक : अरुण बोऱ्हाडे]

'शरद पवार : दुःखातही मनाला उभारी देणारा अलौकिक लोकनेता'' : अरुण बोऱ्हाडे

"कष्टकरी कामगारांची, एक अधुरी कहाणी..! सामाजिक चिंतनाचा विषय" लेखकः अरुण बोऱ्हाडे