आलो जरी इथवर...(लेखक : अरुण बोऱ्हाडे )

        


एका सामान्य, पण संस्कारशील कुटूंबात वाढताना आणि घडताना लहानपणापासूनच काही वेगळे आणि चांगले अनुभव माझ्या वाट्याला आले. समाजात आपली वाढ होताना आपल्या आई वडिलांचा समाजातील चांगुलपणा आपल्याला किती बळ देऊन जातो, हे अनुभव मी घेतले आहेत. दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे चांगले मित्र लाभणे, तारुण्यात चांगल्या विचारांचा मित्रपरिवार मिळायलाही भाग्य लागते, मला ते लाभले. तरुण वयात चांगल्या मित्रांच्या सहकार्याने केलेल्या सामाजिक योगदानाची गोडी कशातही नाही.

सन १९८० च्या दशकात, त्याकाळी आमच्या तरुणाईला लागलेली समाजसेवेची गोडी, सोबतीला साहित्य-कलेची ओढ आणि राजकारणाची आवड..! कधीतरी प्राध्यापक होण्याचा घातलेला घाट, मध्येच पत्रकार होऊन केलेला लेखणीचा थाट आणि प्रत्यक्षात कामगार जीवनाची सापडलेली वाट..! अशा विविध अंगाने वळणे घेत माझी जीवनवाट येथपर्यंत येवून पोहोचली..!

आता वयाच्या पन्नाशीनंतर सहज सिंहावलोकन करताना, माझी वाट यशाची आहे की नाही हे मी ठरविणार नाही, मात्र इतर कोणाहीपेक्षा माझ्या वाट्याला खूप वेगळे, सुखद आणि समृद्ध अनुभव आले. विविध क्षेत्रातील लहानात लहान आणि मोठ्यांत मोठी माणसं मी अनुभवली, मला त्यांचा सहवास लाभला..! अनुभवसंपन्न आणि समृद्ध अशी माझी जडणघडण झाली, हे नक्कीच ! या वाटचालीत मला मिळालेला आनंद कशातही मोजता येणार नाही. 

अर्थात सर्वच गोष्टी मनाप्रमाणे घडल्या नाहीत, प्रत्येक ठिकाणी आपल्या विचारांचे लोक भेटले नाहीत. एवढया मोठ्या दुनियेत आपल्या मनाप्रमाणे वागणारे लोक प्रत्येक ठिकाणी कुठे भेटणार ! आपण ममत्व जपावे, स्वत्व टिकवावे आणि तत्त्व पाळावे. इतरांच्या रागाने डोक्यात गर्दी करण्यापेक्षा सद्विचार, स्वच्छंदीपणा आणि सकारभाव मनात ठेवून जीवन साकार करावे. आपले कर्तव्य करीत रहावे, हे मी शिकलो. तोच खरा आनंद आहे.

मी प्राध्यापक नाही झालो, पण आजपर्यंत अनेक महाविद्यालयांतून व्याख्याने देत विद्यार्थ्यांशी संवाद साधता आला. अनेक शिक्षक आणि प्राध्यापक याला साक्षीदार आहेत. पत्रकारितेत कायमचा रमलो नाही, पण तत्वनिष्ठ पत्रकारितेचा समृद्ध काळ आम्ही अनुभवला. साहित्यातही खरी मंतरलेली साहित्यिकांची मांदियाळी आम्ही जवळून पाहिली. राजकारणात चारित्र्यसंपन्न व नितीमान नेत्यांपासून, आजच्या गतीमान युगातील, केवळ  'सोशियल मिडीया' वरून प्रसिद्धीसाठी धडपडणाऱ्या नेत्यांनाही पाहतो आहे.

रोजीरोटीसाठी कामगार क्षेत्रात गेलो नि ध्यानीमनी नसताना कामगार चळवळीचा पाईक झालो. जवळपास पंचवीस वर्षांहून अधिककाळ तिथे नेतृत्व करण्याची संधी लोकांनी दिली. तीही मनापासून निभावली. कामगारांच्या प्रश्नांसाठी गल्लीपासून दिल्लीही गाजविली. 

जो जो येईल, त्याच्यासाठी काम करीत राहिलो. क्षेत्र कोणतेही असो, मी मनापासून काम केले, स्वतः आनंद लुटला आणि इतरांनाही वाटला..! सामाजिक जाणिवांचे भान मी कायम राखले. स्वतःच्या सुख-दुःखाचा विचार कधीच केला नाही. कधी यशापयशाचा हिशोब मांडला नाही.

माझीच एक कविता आहे, ती सांगते-

जीवनाचा सारीपाट, आहे मांडियेला पुढे,

कधी हार कधी जीत, असे आयुष्याचे कोडे..!

किंवा,

जीवनाच्या आकाशात, सुख दुःखाची वरात,

कधी साज पुनवेचा, कधी चंद्र ग्रहणात..!

याच विचारांप्रमाणे मी काम करित राहिलो. कधी निराश झालो नाही. सर्वच गोष्टी मनासारख्या होणार नाहीत. पण प्रामाणिकपणे केलेले प्रयत्न हाती काही दिल्याशिवाय राहणार नाहीत. स्वकर्मावर विश्वास ठेऊन वाट चालत राहिलो. विनाकारण कोणी दुखावणार नाही, याचीही काळजी घेत आलो. आवश्यक तिथे परखडपणे बोलूनही आलो. सत्याची कास धरताना, मनाची शुद्धता जपत आलो. मिळेल तेवढा आनंद लुटत आलो, जमेल तेवढा भोवताली वाटत आलो. माझी 'सामाजिक बांधिलकी'ची विण घट्ट करीत आलो.

हा जीवन प्रवास बराचसा चालत आलोय, अजूनही खूप अंतर चालायचेय..! चालताना कालपर्यंत मी आपले शोधीत होतो, आज मी स्वतःलाच आतमध्ये डोकावून शोधतोय ! शोधणे ही एक निरंतर प्रक्रिया आहे. पावले इथेच थांबणार नाहीत, प्रवास अजून चालूच आहे. याविषयी माझीच कविता मला सांगते-

आलो जरी इथवर, खडतर प्रवासात..

वेदना मुकीच माझी, आहे झाकल्या मुठीत ll

मला वाटते, आपण जगताना आपल्या प्रत्येकाच्या काही जीवननिष्ठा असाव्यात. काही उद्दिष्टे असावीत. माझ्या आठवणीतील मागिल ३५-४० वर्षांमध्ये आपल्या समाजात आणि एकूणच जगामध्ये अनेक गोष्टी झपाट्याने बदलल्या आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व आर्थिक घडामोडी, आरोग्य सुविधा, ज्ञान -विज्ञानातील प्रगती, माहिती तंत्रज्ञान, दळणवळणाची साधने, रोजगार विनिमय, व्यापार उद्दीम अशा जीवनातील प्रत्येक क्षेत्रात कल्पनेबाहेर प्रगती होताना झालेले समाधान शब्दातीत आहे. पण यामध्ये भारतातील सामान्य माणूस खरोखरच सुखावला आहे काय, याविषयी प्रश्न पडतो. समृद्धीचे मार्ग खुलले तरी माणूसकीच्या वाटा बुजल्या तर नाहीत ना, याची काळजी वाटते. जीवन शिक्षण मंदिरातील 'संस्कृती व संस्कार' आता आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळांमधून  'हद्दपार' तर होत नाही ना, असे नाना प्रश्न मनाला सतावत आहेत. 

सामान्य माणसाच्या रक्षणासाठी केलेले कायदे आता त्याच्याच शोषणासाठी बदलू पाहताहेत की काय असे वाटू लागले आहे. कामगार, श्रमिक, शेतकरी, शेतमजूर हे सर्व घटक आता नव्या गुलामगिरीकडे जाण्याची भीती आणि चिंता वाटू लागली आहे. सर्वाधिक कष्टकरी माथाडी कामगार, कै. यशवंतराव चव्हाण यांनी माथाडी कायद्याला मानवतेची किनार दिली. आज त्या क्षेत्रातील दलदल पाहून मनाला वेदना होतात. उद्याच्या पिढीला आपण काय देणार आहोत. कधीकाळी जगाला दिशा देणारे तत्ववेत्ते, विचारवंत, राजनितीज्ञ या देशाने पाहिले. पण आज काहीतरी चुकतेय, असे वाटतेय. राजकीय नेतृत्व हे समाजाला, देशाला पुढे घेऊन जाणारे असावे, सामाजिक जीवनमान उंचावणारे असावे, असे धुरिणांनी सांगितले  होते. 

आज नेमके काय घडतेय, हे सांगायला माझ्या शब्दांची गरज नाही. सध्याच्या राजकारणातील लाचारी, कामगार क्षेत्रातील हप्तेखोरी, शिक्षणातील लूटमारी, आरोग्य क्षेत्रातील बेईमानी, व्यापारातील मुजोरी, प्रशासनातील लाचखोरी या सर्वांमध्ये सामान्य माणूस कोसळून पडलाय. हे समाजजीवन आणि ही असत्याची लाट सर्वसामान्य माणसाची वाट लावणार असेल तर हे सारे कोणासाठी, कशासाठी हा प्रश्न मनाला  सतावतोय. एखाद्या चित्रकाराने नितांत सुंदर रेखाटने करावीत, त्यावर रंगीबेरंगी छटांचे कौशल्य उमटवावे, सुवर्णाचे लेपण द्यावे आणि त्या चित्राची चौकट गळून पडावी असे झाल्यावर काय वाटेल ! मलाही तसेच वाटते, माणूस नावाची चौकटच गळून पडणार असेल, तर हे सारे कशासाठी, कोणासाठी ! छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली स्वराज्याची प्रेरणा, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू यांनी दिलेली समता, बंधुता, मानवतेची शिकवण आम्ही विसरत चाललोय की काय असे वाटतेय. महापुरुष केवळ घोषणांसाठी आणि भाषणांसाठी वापरले जावू नये, एवढीच अपेक्षा. 

बुद्धांचे तत्त्वज्ञान आज आम्ही पुन्हा अभ्यासले पाहिजे. सत्य, अहिंसा, शांति आणि करुणा ही तत्त्वे लक्षात घेतली पाहिजेत. सत्याच्या शोधासाठी राजवैभवाचा, अष्टौदिशा ऐश्वर्याचा त्याग करून हा महात्मा मानवाच्या हृदयांत वास करू लागला. जगातील सुखदुःखाची कारणमिमांसा केली. भारतभूमीतील हे हजारो वर्षांचे मौल्यवान संस्कार व्यर्थ कसे ठरतील. आपल्या पूर्वजांनी दिलेली संस्कारांची शिदोरी अधुरी कशी ठरेल. खूप काही विचार करण्यासारखे आहे. तो विचार करणारे, मांडणारे, तो विचार ऐकणारे आणि मान्य करणारेही नक्कीच निपजतील, असे मला मनापासून वाटते. प्रश्न एखाद्या गावाचा, एखाद्या समाजाचा नाही, अवघ्या भारतभूमीचा आहे. 'सामाजिक जाणिवांचा वेध' घेताना प्रत्येक क्षेत्रात दिसणाऱ्या या उणिवा भरून काढल्यावर या समाजाचे सौंदर्य शतपटींनी खुलून दिसेल, असे मला वाटते. माणूस हा आशावादी आहे, तसा मीही आशावादी आहे.  कधीना कधी समाजातील हे मळभ दूर होईल आणि आपल्या आभाळात आशेचा पुर्ण चंद्र उगवेल, असा विश्वास वाटतो.

या सरत्या वर्षाच्या पूर्वार्धात जगावरती कोरोनाचे संकट आले होते, आजही ते पूर्णतः संपलेले नाही. डोळ्यांनाही न दिसणाऱ्या एका निर्जीव विषाणूमूळे जगाचा कारभार ठप्प झाला होता. हजारोजण एखाद्या कीडामुंगीप्रमाणे मृत्यूच्या तांडवात भरडले गेलेत. ना कोणाचा पैसा उपयोगात आला, ना कोणाची संपत्ती! ऐश्वर्याची झळाळी पुर्णतः काळवंडली ! 

यातूनच आम्ही सर्वांनी बोध घ्यायला हवा. फार मोठी शिकवण निसर्गाने दिली आहे. माणसाला जगण्याची नवी दिशा मिळाली आहे. अर्थात ज्याच्याकडे संवेदनशीलता आहे, त्याला हे कळेल. जो सत्वशील आहे, त्याला रुचेल. पण हे सर्व प्रत्येकालाच कळायला हवे. प्रत्येकाने आपल्या मर्यादांची जाणिव ठेवावी. पौर्णिमेच्या चांदण्यात विहरताना, उद्या येणाऱ्या अवसेचेही भान असू द्यावे. माणसांतला 'माणूस' ओळखायला शिकावे, त्याच्या कृत्रिम वैभवाचा विचार करू नये. हे वैभव, ही संपत्ती, हे ऐश्वर्य किती कामाचे आहे, ते क्षणिक आहे, हे कळाले असेलच. सत्याची व स्वत्वाची श्रीमंती, नैतिकतेचे ऐश्वर्य आणि भूतदयेची संपत्ती अधिकच सुवासिक असते.एवढे जरी समजले तरी पुष्कळ झाले.

'जे खळांची व्यंकटी सांडो l  तया सत्कर्मी रती वाढो l

भूतां परस्परे पडो l मैत्र जीवांचे ll'

... अखेरीस श्री ज्ञानेश्वर माऊलींचे पसायदान आपण सर्वांनी समजावून घ्यावे. त्यातील प्रत्येक ओवीचा अर्थ समजावून घ्यावा. गीतेचा जीवनरस अंगिकारावा, आयुष्य सफल संजीवन करावे. जीवन हे सकलांच्या सुखाचे साधन व्हावे, कोणाच्याही दुःखाचे कारण घडू नये. अवघ्या जगताचे सुख जपावे. एवढेच सविनय सांगणे. 

पुन्हा माझे मन सांगू लागते, तुला थांबून चालणार नाही, सामाजिक जाणिवांची शिदोरी घेऊन, तुला चालावेच लागेल.


नित्य नव्या समरात, नव्यानेच उभा राही..

पाऊलवाट ही माझी, थांबण्यास मुभा नाही ll


@(अरुण तुकाराम बोऱ्हाडे )

पूर्वप्रसिद्धी : वेध सामाजिक जाणिवांचा

दि. २७/१२/२०२०

Comments

  1. सकाळ प्रसन्न झाली!
    काहीतरी चांगलं आणि सकस वाचल्याचा आनंद मिळाला. तुमच्याच शब्दात सांगायचं म्हटलं तर अवसेचा अनुभव घेतल्याशिवाय पौर्णिमेची मजा घेता येणार नाही, त्याचं महत्व समजणार नाही. या जगामध्ये संपूर्ण काळ असं काहीच नाही आणि संपूर्ण पांढरं असंही काहीच नाही. शेवटी सत्याचा विजय होतो. आर्थिक प्रगती म्हणजेच प्रगती असं मला तरी वाटत नाही. आपला सर्वांगीण विकास झाला पाहिजे. आणि आपले तयार झालेले सर्वांगीण व्यक्तिमत्व समाजाच्या हितासाठी उपयोगात आले पाहिजे असे मला मनोमन वाटते. ज्याप्रमाणे माझे विचार आहेत त्याप्रमाणे तुम्ही जीवन जगत असल्याचे मी प्रत्यक्ष पाहिलेले आहे. यासाठीच मला तुमचा खूप अभिमान वाटतो. तुमचे आचार, विचार आणि लेखणी अशीच कायमस्वरूपी सदोदित सकारात्मक दिशेने मार्गक्रमण करतच राहो हीच सदिच्छा!

    ReplyDelete
  2. प्रेरणादायी अनुभव, खुप छान सर.

    ReplyDelete
  3. ��������Nice

    ReplyDelete
  4. मस्तच

    ReplyDelete

Post a Comment