महामारीच्या विळख्यात तरी माणूसपणाला कलंक लावू नका..! : अरुण बोऱ्हाडे, माजी नगरसेवक

🌿     गेले काही दिवस कोरोनाच्या महामारीने भयंकर रुप धारण केले आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेली रुग्णसंख्या, त्यांच्यासाठी लागणारे हॉस्पिटल्स, त्यानंतर लागणाऱ्या अॉक्सिजन आणि व्हेंटिलेटरच्या सुविधा, प्लाझ्मा, रेमडेसीव्हर सारखी इंजेक्शन्स इत्यादी सर्व बाबी मिळविता मिळविता आठवडा जातो. काहीवेळा कोव्हिडचा रुग्ण जग सोडून जातो. काही अपवाद वगळता हल्ली अनेक ठिकाणी फक्त पैसा लूटण्याचे काम चाललेले आहे. महामारीच्या विळख्यातही माणूसपणाला कलंक लावणाऱ्या गोष्टी सध्या घडत आहेत. अशी भयाण भयंकर परिस्थिती सध्या पुणे व पिंपरी चिंचवड शहरात निर्माण झाली आहे. 

काही लोकप्रतिनिधी व त्यांचे सहकारी यामध्ये प्रामाणिकपणे  काम करीत आहेत. मात्र तरिही काही हॉस्पिटलमधील संवेदनशून्य प्रशासन, बेदरकार यंत्रणा आणि लाचखोर प्रवृत्ती बळावल्या आहेत. यामध्ये शासकीय यंत्रणा नसल्या तरी, शासनाचा वचक नसल्याचे हे द्योतक आहे. त्याचा मनस्ताप कोव्हिडचा रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांना भोगावा लागत आहे. ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे.

सध्या कोणीही अचानक 'पॉझिटीव' असल्याचे कळते. पाठोपाठ कुटूंबात दोन-तीन जणांना याची लागण होते. मग एखादा खूपच ढासळत जातो. मार्गदर्शन म्हणून किंवा परिचयाचे म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला फोनवरून सांगितले जाते. मग आमचा सुरू होतो शोध ! आधी बेडसाठी, एकदोन दिवसांत अॉक्सिजन किंवा थेट व्हेंटिलेटरसाठी ! प्रयत्न करून तेही करता येते किंवा मिळविले. विशेष म्हणजे शासकीय यंत्रणांचे जाहिर केलेल्या संपर्क क्रमांकावरून संपर्क होणे मुष्कील झाले आहे. व्हॉटसॲप वरून अनेक सहकारी शासनाचे आदेश आणि सुचनांचे मसुदे पाठवित असले तरी प्रत्यक्षात अनुभव वेगळेच आहेत. काल रात्री एका व्हेंटिलेटर बेडसाठी दहा हॉस्पिटलमध्ये फोन केले. एकाही फोनकॉलला प्रतिसाद मिळाला नाही. एकतर फोन लागतच नाही, लागला तर उचलला जात नाही आणि उचलला तर सांगितले जाते माहिती घेऊन कळवितो. प्रत्यक्षात कोणीही कळविले नाही. जर माहिती द्यायचीच नाही, तर हे मोबाईल क्रमांक प्रसारित करायचेच नाहीत.

मागिल वर्षी एवढी परिस्थिती विदारक नव्हती. महत्त्वाचे म्हणजे महानगरपालिकेची किंवा वायसीएमची यंत्रणा खूपच गांभिर्याने काम करीत होती. यावेळी वायसीएममधून पूर्वीप्रमाणे प्रतिसाद मिळत नाही. रुग्णसंख्या वाढलेली आहे हे मान्य केले तरी, कोरोना संदर्भात खाजगी रुग्णालयांशी समन्वयाचा अभाव लक्षात येतोय.

बेडपेक्षाही त्रासदायक झालेय रेडमेसीव्हर इंजेक्शन मिळविणे. गेले तीन दिवस कुठेही रेडमेसीव्हर उपलब्ध होत नाही. याबाबतीत गेले काही दिवस प्रचंड स्वैराचार माजला आहे. भ्रष्टाचार आणि काळाबाजाराने माणसाच्या मृत्यूशी खेळ मांडला आहे. ही इंजेक्शन्स फक्त हॉस्पिटलमध्येच उपलब्ध होतील, हा शासनाने काढलेला आदेश फक्त व्हॉटसॲपवर फिरत राहिला. प्रत्यक्षात अनेक रुग्णांच्या नातेवाईकांना खूपच मनस्ताप सहन करावा लागला. वास्तविक प्रत्येक हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाने त्यांच्याकडे असलेल्या रुग्णांसाठी वायसीएम अथवा संबंधित विभागाकडून रितसर नोंदणी करून ही इंजेक्शन्स मिळवायला हवी होती. पण त्यांनी कोणीही ही जबाबदारी घेतली नाही. रुग्णांच्या नातेवाईकांना यासाठी सर्वाधिक त्रास मागिल तीन चार दिवसांत झाला. मी स्वतः अनेक खाजगी हॉस्पिटलशी संपर्क साधून ही नोंदणी करण्याबाबत विचारणा केली.

या रेडमेसीव्हर इंजेक्शनचा तुटवडा ही कृत्रिम बाब असल्याचे दिसते. यासाठी मोठे रॕकेट कार्यरत असण्याची शक्यता आहे. मुळात अकराशे रुपयांचे हे इंजेक्शन पंधराशेपासून पंधरा हजारापर्यंत विकले जावे ? मेडिकल स्टोअर्स मधून उपलब्ध नसताना, काळ्या बाजारात 'कोणाही' व्यक्तीकडे हे उपलब्ध झालेच कसे ? ही  अतिशय लाजिरवाणी आणि किळसवाणी गोष्ट आहे. संपूर्ण राज्याला आणि देशाला या महामारीने वेढलेले असताना, एकमेकांना मदत करण्याऐवजी जीवनमरणाच्या वाटेवरील रुग्णांना छळण्याचे आणि पिळण्याचे पापकृत्य आम्ही करीत आहोत. मुळात शासनाचा वचक, कायद्याची भीती आणि वागण्याची नीती यापैकी काहीच शिल्लक राहिलेले नाही असे वाटते. रुग्णसंख्या वाढल्यामुळे झालेला औषधांचा तुटवडा समजू शकतो, मात्र शंभरपटीने झालेला काळाबाजार आणि अशा प्रवृत्तींकडे झालेली उपलब्धता या गोष्टी खूपच गंभीर आहेत. 

आमचे लोकप्रतिनिधी, शासकीय यंत्रणा, पोलिस यंत्रणा, रुग्णालय व्यवस्थापन या सर्वांच्या तोंडाला काळे फासण्याचा हा प्रकार आहे.

बेड, व्हेंटिलेटर आणि रेडमेसीव्हर पाठोपाठ रुग्णांना लुटण्याचा प्रकार म्हणजे रुग्णवाहिका आणि शववाहिका. किती पैसे घ्यावेत. कधीकाळी रुग्णवाहिका ही समाजसेवेची बाब होती. नाममात्र पैशांमध्ये किंवा माफक दरामध्ये 'रुग्णसेवा' होत होती. आता आनेक माननीयांचे फोटो आणि नांवे टाकून ही रुग्णवाहिका आणि शववाहिका मन मानेल तेवढे पैसे लूटत आहेत. दोनतीन किलोमीटर जाण्यासाठी पाच हजार कशाच्या आधारे घेतात, हेच समजत नाही. महानगरपालिका अथवा आर.टी.ओ. यांचा कोणाचाही यावर धरबंद नाही. ऐनवेळी 'अडला हरी..' अशा भूमिकेतून लोक पैसे देतात. 

एकूणच "कोरोना पॉझिटीव्ह" म्हणजे आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी शिक्षा समजावी, असे झाले आहे. हॉस्पिटलच्या बीलांपासून, रेडमेसीव्हरच्या काळ्याबाजारापासून, रुग्णवाहिका आणि रुग्णाच्या मृत्यूनंतर लागणाऱ्या शववाहिकेपर्यंत रुग्णाने किंवा त्याच्या नातेवाईकांनी पावलागणिक फक्त रांगेत उभे राहणे, मिनतवाऱ्या करणे आणि भरमसाठ पैसे घालविणे एवढेच काम करायचे !!

महामारीच्या विळख्यात तरी माणूसपणाला कलंक लागतील अशा प्रवृत्ती आपण सुधारायला हव्यात. शासन, महापालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी, पोलिस यंत्रणा आणि सामाजिक कार्यकर्ते सर्वांनी मिळून ही प्रवृत्ती हाणून पाडली पाहिजे, एवढीच अपेक्षा.

अरुण बोऱ्हाडे, माजी नगरसेवक

Comments

  1. छान लेख , खरंच सरकारचे डोळे उघडले पाहिजे आता तरी

    ReplyDelete
  2. खरी परिस्थिती आहे ही...

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

श्री नागेश्वर महाराज भंडारा : भक्तिमार्गातील शक्ती स्त्रोत [लेखक : अरुण बोऱ्हाडे]

'शरद पवार : दुःखातही मनाला उभारी देणारा अलौकिक लोकनेता'' : अरुण बोऱ्हाडे

"कष्टकरी कामगारांची, एक अधुरी कहाणी..! सामाजिक चिंतनाचा विषय" लेखकः अरुण बोऱ्हाडे