वाढत्या गर्दीबाबत आता सामाजिक कार्यकर्त्यांनीच लोकजागृती करण्याची गरज [लेखक : अरुण बोऱ्हाडे]

वाढत्या गर्दीबाबत आता  सामाजिक कार्यकर्त्यांनीच लोकजागृती करण्याची गरज..


एकीकडे राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढतानाचे आकडे प्रसिद्ध होत आहेत. तर दुसरीकडे लोकांनी स्वतःच्या वागण्यावरील निर्बंध बिनदिक्कतपणे सोडून दिले आहेत. प्रत्येक गोष्ट अगदी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठीही सरकारने पोलिसांना सांगण्याची आवश्यकता आहे काय ?

मागिल वर्षीच्या कोरोना संकटातून काहीअंशी बाहेर येताना गेल्या दीड दोन महिन्यांत अनेक ठिकाणी गर्दी ओसांडून वाहत आहे. हे चित्र आनंददायी नव्हे, तर संभाव्य धोक्याची सूचना देणारे आहे. शासकीय कार्यालयांत संबंधित अधिकारी काचेच्या आवरणात बसत असले तरी, त्यांच्या केबीनबाहेरील जागेत दाटीवाटीत लोक उभे असल्याचे दृश्य पहावयास मिळते. किराणा, कपडे, स्टेशनरी अशा सर्व प्रकारच्या  दुकानांत आणि विशेषकरून भाजीमंडईत ग्राहकांची गर्दी उसळलेली दिसून येते. मध्यंतरी पिंपरी कँपमधील एका दुकानात जायचे होते, भरदुपारी जावूनही अक्षरशः रस्त्याने चालता येत नव्हते. एवढी गर्दी पाहून अवाक झालो. वाहन चालविणारे अनेक वाहनचालक केवळ पोलिसांच्या धाकाने 'मास्क' वापरताना दिसतात. मात्र अन्य गर्दीच्या ठिकाणी बिनधास्तपणे आणि बेफिकीरीने फिरत असल्याचे दिसून येते. सर्व रेस्टाॕरंट, हॉटेल्स सुरू झालेली आहेत, तिथेही तीच परिस्थिती ! 'आता कोरोना पूर्णपणे गेलाय' अशा थाटात लोकांचे जनजीवन पहावयास मिळत आहे. मागिल आठवड्यात चिंचवड येथील प्रेक्षागृहात एका कार्यक्रमासाठी गेलो होतो. प्रवेशद्वाराजवळच शंभराहून अधिक लोक गर्दीत गप्पागोष्टी करीत होते. मी आवर्जून  'मास्क'बाबत निरिक्षण केले. तेव्हा अक्षरशः पाच-सहा जणांच्याच तोंडाला मास्क असल्याचे पाहिले. म्हणजे पाच टक्क्यांहून कमी लोक याबाबतीत सतर्क राहून स्वतःची काळजी घेताना दिसतात. याठिकाणी केलेली सर्व चर्चा ही पुणे व पिंपरी चिंचवड शहरी भागातील आहे. मात्र या शहरांच्या परिघातील व शेजारील ग्रामीण किंवा निमशहरी भागातील सार्वजनिक जनजीवन अतिशय गर्दीमय झालेले किंवा गर्दीत हरवलेले दिसून येत आहे. 

साधारणपणे डिसेंबर अखेरपर्यंत किंवा जानेवारीच्या मध्यापर्यंत जनतेने काळजी घेतली, दक्षता घेतली. पण हळुहळू सर्व बंधने अथवा निर्बंध सैल होत गेले आणि नागरिक महापूराप्रमाणे बाहेर पडले आहेत. 

विशेषतः साखरपुडा व लग्नसोहळ्यांतील गर्दी पुन्हा कोरोनापूर्व स्थितीत गेली आहे.  हीच खूप चिंतेची बाब आहे. प्रत्येक विवाह व साखरपुड्याला सध्या सरासरी हजार- बाराशे पर्यंत गर्दी दिसते. यावर कोणाचेही, कसलेही नियंत्रण असल्याचे दिसत नाही. अर्थात अशा गोष्टी जनतेनेच स्वयंशिस्त म्हणून का पाळायला नको ? लग्नकार्यात हजार हजार लोक एकत्रितपणे गर्दी करतात, कुठेही सॕनिटायझर नाही, की सुरक्षा मास्क घातले जात नाहीत. उलटपक्षी जे लोक असे मास्क वापरतात, त्यांच्याकडे 'आला मोठा शहाणा' अशा आविर्भावातून पाहतात ! मग कोरोना रुग्णांचे आकडे वाढताना दिसतात, यात आश्चर्य ते काय ? त्यात नुकत्याच शाळा व महाविद्यालये सुरू झालेली आहेत, तीही चिंतेची बाब आहे.

एकीकडे पुढील आठवड्यात होवू घातलेल्या शिवजयंती उत्सवावर शासनाने मर्यादा घातली आहे. त्यासाठी मार्गदर्शक सूचना व नियमावली तयार केली आहे. मग वर उल्लेख केलेल्या सर्व ठिकाणच्या गर्दीबाबत शासन  डोळेझाक का करीत आहे ? आश्चर्य म्हणजे नुकत्याच सर्वत्र ग्रामपंचायतीच्या निवडणूका पार पडल्या, वृत्तवाहिन्यांमधून गावोगावींच्या कारभारी निवडीचा सोहळा पहावयास मिळाला. त्यावेळी गर्दीबाबत कुठे किती निर्बंध पाळले गेले, हे सर्वजण जाणतात !


या सर्व पार्श्वभूमीवर जनतेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शासन, प्रशासन व पोलिस यंत्रणा यांपेक्षा ज्या त्या भागातील लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांनीच आता पुढाकार घेऊन लोकप्रबोधन व लोकजागृती करण्याची जबाबदारी घ्यायला हवी. याचा अर्थ शासन व पोलिस यंत्रणांवर विश्वास नाही, असे नाही. पण प्रत्येकवेळी कायद्याचा बडगा उगारण्यापेक्षा स्वयंशिस्त आणि लोकप्रबोधनाच्या माध्यमातून योग्य तो परिणाम साधता येवू शकतो. आपण प्रत्येकाने आपापल्या भागातील लोकांना व संबंधितांना हे समजावून सांगितले पाहिजे. कोरोनाचा धोका कमी झालेला असला तरी पुर्णतः संपलेला नाही, त्यामुळे गर्दी टाळायलाच हवी. लग्न, साखरपुडे दीड-दोनशे जणांमध्येच आटोपून घ्यावेत. सुरक्षा साधनांचा प्रत्येकाने वापर करावा. ही जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे, याची जाणीव सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी करून दिली तर गर्दीला काही प्रमाणात आळा बसू शकेल. नाहीतर २०२० ची परिस्थिती पुन्हा उभी राहू शकते, याचे स्मरण करून द्यावे लागेल.


हे लेखन करीत असतानाच 'कोरोनाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी सरकार पुन्हा कठोर पावले उचलण्याची शक्यता असल्याची' बातमी दूरदर्शनवर ऐकण्यात आली.

खरोखरच पुन्हा असे घडले तर किती नुकसानीस सामोरे जावे लागेल, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. व्यापार, उद्योग, कंपन्या, नोकऱ्या, रोजगार आणि नित्याचे अन्य सर्व  व्यवहार यावर पुन्हा निर्बंध येवू शकतात. त्यापेक्षा आपणच सजग आणि सावध होवून ही काळजी घेतली तर, पुढील सर्वच धोके टळू शकतात. मागिल वर्षातील अनुभवाने आपल्याला आयुष्यभर पुरेल एवढी शिकवण दिलेली आहे. त्यातूनच आपण धडा घेतला तर जीवनातील आनंद वाढण्यास निश्चितपणे मदत होईल.

लेखक : अरुण बोऱ्हाडे 

मोशी, ता.हवेली, जिल्हा- पुणे(

मोबाईल - ९८८१३०१३३९)

Comments

  1. बरोबर आहे सर, लोकांची ढिलाई म्हणजे पुन्हा रोगाणु निमंत्रण.हलगर्जईपणआ दुर व्हायला पाहिजे... खूप छान सांगितले सर.... 🙏🏻

    ReplyDelete
  2. खरे आहे साहेब. आजच पिंपरी ला जायची वेळ आली होती पण गर्दी पाहून परत फिरलो.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

श्री नागेश्वर महाराज भंडारा : भक्तिमार्गातील शक्ती स्त्रोत [लेखक : अरुण बोऱ्हाडे]

'शरद पवार : दुःखातही मनाला उभारी देणारा अलौकिक लोकनेता'' : अरुण बोऱ्हाडे

"कष्टकरी कामगारांची, एक अधुरी कहाणी..! सामाजिक चिंतनाचा विषय" लेखकः अरुण बोऱ्हाडे