" रामविलास पासवान : कामगारांविषयी आस्था जपलेला लोकनेता " [ लेखक : अरुण बोऱ्हाडे ]

 " रामविलास पासवान : कामगारांविषयी आस्था जपलेला लोकनेता " (लेखक : अरुण बोऱ्हाडे) 


    अनेक वर्षे केंद्रीय मंत्रिमंडळात राहून विविध जबाबदाऱ्या  सांभाळलेले नेते श्री रामविलास पासवान यांचे निधन झाल्याची बातमी ऐकली आणि हुरहूर वाटली. सामान्यांविषयी प्रामाणिक आत्मियता असणारे खूप कमी नेते आहेत. त्यापैकी श्री रामविलास पासवान हे देशपातळीवरील महत्त्वाचे नेते होते. ता केंद्रीय रसायनमंत्री असताना मी हिंदुस्थान अँटिबायोटिक्स कंपनीच्या कामगारांचे नेतृत्व करीत होतो. सन २००० पासून कंपनी अतिशय अडचणीतून मार्गक्रमण करीत होती. तत्कालीन सरकारने बी.आय.एफ.आर.च्या माध्यमातून कंपनी बंद करण्याच्या दिशेने पावले टाकलेली होती. दुसरीकडे खाजगीकरणाचा घाट बांधला जात होता. त्यामध्ये कामगारांच्या हिताचा कुठेही लवलेश नव्हता. सन २००३ च्या नोव्हेंबर महिन्यात आम्ही कामगारांनी सरकारच्या भूमिकेविरोधात मोठे आंदोलन ऊभे केले होते. अनेक दिवस चाललेल्या त्या आंदोलनाचा आवाज दिल्लीपर्यंत निनादला होता. माननीय शरद पवार साहेबांशी आम्ही नित्य संपर्कात होतो. त्यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य सतत मिळत होते. या पार्श्वभूमीवर २००४ च्या एप्रिल- मे महिन्यात देशात लोकसभेच्या निवडणूका झाल्या आणि सत्तांतर झाले.  मा. पवार साहेबांनी आंम्हाला सांगितले की, नवीन जे मंत्री होतील त्यांना घेऊनच मी एच.ए.मध्ये येईन.  श्री रामविलास पासवान यांनी रसायन आणि सार्वजनिक उद्योग मंत्रिपदाची जबाबदारी घेतली. मंत्रिपदाची जबाबदारी घेतल्यानंतर आठवडाभरात त्यांचा पहिलाच दौरा एच.ए. ला झाला.

    मा. शरद पवार साहेबांसमवेत दि.६ जून २००४ रोजी त्यांनी तातडीने एच.ए. कंपनीला भेट दिली. मा. पवार साहेबांनी त्यांना सर्व पार्श्वभूमी समजावून सांगितली होती. आता आमच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. आम्ही कामगारांनी दोन्ही नेत्यांचे ढोल-ताशांच्या निनादात जोरदार स्वागत केले. एका छोटेखानी समारंभात कामगारांना त्यांनी आश्वासित केले. कामगार संघटना आणि व्यवस्थापनाशी सविस्तर चर्चा करून त्यांनी परिस्थितीचे गांभिर्य समजावून घेतले. दोन्ही नेत्यांसमवेत अनेक उपायांवर चर्चाविनिमय झाला.

    श्री रामविलास पासवान यांची कामगारांविषयीची आस्था , आत्मीयता आणि सकारात्मक विचार स्पष्टपणे जाणवत होते. सोबत मा.पवार साहेबांचे पाठबळ होतेच. पुढील काळात एच.ए.साठी सुमारे १४० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. दरम्यानच्या काळात या संदर्भात पाठपुरावा करण्यासाठी अनेकदा मंत्रिमहोदयांना भेटण्यासाठी जावे लागले. अर्थात ज्या ज्या वेळी आम्ही त्यांना भेटलो, त्या त्या वेळी त्यांच्यातील सामान्य माणसांविषयी असलेली प्रामाणिक कणव व आस्था आम्ही पाहिली, अनुभवली. 
दिल्लीतील मंत्रालयातील शास्त्रीभवनमधील त्यांचे कार्यालय असो अथवा उद्योग भवनमधील कार्यालय असो,  दोन्ही ठिकाणी यूपी, बिहारव इतर राज्यांतील सर्वसामान्य लोक लहानसहान कामांसाठी आलेले असायचे. कधी त्यांच्या १२ जनपथ या शासकीय निवासस्थानी गेलो तर तिथेही लोकांची अक्षरशः रीघ लागलेली असायची. पासवानजी प्रत्येकाला वेळ द्यायचे, विचारपूस करायचे. आम्हांलाही अनेकदा त्यांच्या आपुलकीचा अनुभव आला.
    एकदा कंपनीला तातडीने निधीची आवश्यकता होती. व्यवस्थापकीय संचालकांनी आंम्हाला विनंती केली. मंत्रिमहोदय खाजगी सुट्टीवर आहेत. मात्र त्यांच्या मान्यतेशिवाय दिल्लीतील फाईलवर निर्णय होणार नाही. आपल्याला वेळ कमी आहे. मग आम्ही माहिती घेतली, पासवानसाहेब कौटुंबिक कारणाने म्हैसूर आणि बंगलोरला गेलेले होते. आम्ही दोन-तीन प्रतिनिधी बंगलोरला गेलो. योगायोगाने त्याचदिवशी ते म्हैसूरहून बंगलोरला येणार होते. त्यांचे नेहमीचे खाजगी सचिव दिल्लीमध्ये असल्याने, शिवाय त्यांची खाजगी भेट असल्याने दौऱ्याची ठीकशी माहिती मिळत नव्हती. पण आम्ही प्रयत्नपूर्वक मागोवा घेत होतो. बंगलोरमधील अशोका हॉटेलमध्ये ते मुक्कामाला असल्याचे समजले. संध्याकाळी हॉटेलच्या प्रतिक्षादालनात आम्ही त्यांची वाट पाहत थांबलो होतो. मंत्री झाल्यापासून दिल्लीत त्यांना अनेकदा भेटल्याने ते आता प्रत्यक्षपणे ओळखत होते. बस्स ! तेवढ्याच भरवशावर आम्ही तिथे पोहोचलो होतो. नाहीतर तो शासकीय दौरा नव्हता, वेळ घेतलेली नव्हती. तरिही आम्ही भेटण्याचे धाडस करीत होतो. आम्ही प्रतिक्षादालनात असतानाच ते आले. सोबत त्यांची पत्नी, मुलगी आणि एक दोन सुरक्षारक्षक होते. ते येताच आम्ही काहीशा अंतरावर, पण नजरेच्या टप्प्यात थांबलो. आंम्हाला पाहताच ते क्षणभर थबकले आणि स्मितहास्य आणि आश्चर्यचकित मुद्रेने विचारले, "अरे ! आप यहाँ कैसे !" क्षणाचाही विलंब न लावता आम्ही सांगितले, "जरुरी काम के लिए, आपकोही मिलने आये थे l" तत्क्षणी त्यांनी आंम्हाला बरोबर घेतले आणि लिफ्टने सातव्या मजल्यावरील त्यांच्या सूटवर येण्यास सांगितले. आम्ही त्यांच्या दालनात गेलो. कुठलीही चिडचीड अथवा रागवैताग न करता त्यांनी आम्हांला पुरेसा वेळ दिला, विचारपूस केली, समस्या जाणून घेतली. तोपर्यंत त्यांच्यासाठी चहा-नाष्टा आला होता. आंम्हाला त्यांनी आग्रहाने चहा-नाष्टा घ्यायला लावले. त्यांनी त्याचवेळी दिल्लीला फोनवरून आवश्यक त्या सूचना  दिल्या, आमची भेट यशस्वी झाली, आंम्ही आनंदात परत निघालो. मात्र एक 'यशस्वी लोकनेता' कायमसाठी मनात घर करून राहिला. एक केंद्रीय मंत्री स्वतःच्या खाजगी दौऱ्यातही, वेळ न घेता, पूर्वकल्पना न देता, आगंतूकपणे आलेल्या आंम्हा कामगार प्रतिनिधींचा एवढा सन्मान ! हे कोणाचेही काम नाही ! त्यासाठी हृदयातच कणव पाझरावी लागते, कष्टकरी कामगार आणि सामान्य जनांविषयी ओतप्रोत आस्था असणारा नेताच अशी वागणूक देवू शकतो. असे अनेक प्रसंग व आठवणी मनात घर करून आहेत. सन १९९६ पासून मी एच.ए. कामगार संघटनेच्या माध्यमातून अनेक वर्षे दिल्लीमध्ये किमान डझनभर केंद्रीय मंत्री व राज्यमंत्र्यांना भेटलो, असंख्य बैठका झाल्या, चर्चा केल्या. मात्र पासवान साहेबांमधील आस्था, सकारात्मक विचार आणि ऊर्जा क्वचितच कोणाकडे पहावयास मिळाली. 
    त्यांच्याकडे असलेल्या रसायन मंत्रालयाचा त्यांनी देशातील सामान्य जनतेसाठी खूप गांभिर्याने विनियोग करून घेतला. अनेकांना माहिती नसेल किंवा स्मरणात नसेल, भारत सरकारच्या "जनऔषधी योजनेचे" ते शिल्पकार आहेत. त्यांच्याच कारकिर्दीत सामान्य जनतेसाठी ही स्वस्त औषधयोजना त्यांनी सुरू केली. त्याचप्रमाणे खाजगी औषधकंपन्यांना वारंवार औषधांच्या किंमती वाढविण्यावर निर्बंध घातले. सरकारच्या पूर्वपरवानगीशिवाय आणि योग्य कारणांशिवाय औषधांच्या किंमती वाढविता येणार नाहीत, असे आदेश काढले. पुढे जवळजवळ दहा वर्षे म्हणजे २०१६ पर्यंत  देशामध्ये हे निर्बंध लागू होते. यातील अभ्यासू मंडळींना हे लक्षात येईल. मला वाटते रसायन मंत्रालयाचा सामान्य जनतेच्या हितासाठी प्रथमच असा वापर झाला असेल. ते रसायनमंत्री असताना एच.ए.च्या पुनर्वसन योजनेबाबत आमच्या सतत बैठका होत, प्रत्येकवेळी कामगार प्रतिनिधींना बैठकीत सहभागी करून घेण्याचा त्यांचा आग्रह असे. एकदा ते दिल्लीहून विमानाने बंगलोरला निघाले होते. ते विमान पुण्यामध्ये दीड-दोन तास थांबणार होते. त्यांनी दिल्लीतून निघतानाच कंपनीचे  व्यवस्थापकीय संचालक (एम.डी.) श्री एम.सी.अब्राहम यांना फोनवरून निरोप दिला की पुण्याच्या विमानतळावर भेटायला या. व्यवस्थापनाचे दोघेजण आणि कामगार संघटनेचे दोघेजण मिळून आम्ही विमानतळाच्या व्ही.आय.पी. लाॕऊंजमध्ये त्यांना भेटण्यासाठी गेलो. सकाळी नऊ-साडेनऊची वेळ होती. मंत्रीमहोदयांना चहा- नाष्टा करायचा होता. त्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी त्यांनी आंम्हाला बोलावून घेतले होते. त्यांच्या सवयीप्रमाणे आंम्हालाही चहा- नाष्टा करण्याचा आग्रह झाला. सुरुवातीला एच.ए.संदर्भातील बोलणे झाले. त्याचवेळी खाजगी कंपन्यांच्या भरमसाठ वाढणाऱ्या औषधांच्या किंमतींबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली होती. तेव्हाच त्यांनी श्री अब्राहम यांना याबाबतीत अभ्यास करून एक रिपोर्ट तयार करायला सांगितले होते. मला वाटते, जनऔषधी योजना आणि औषधांच्या किंमतीवरील नियंत्रण ठेवणाऱ्या निर्णयांचे आम्ही साक्षीदार आहोत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
    एच.ए.च्या १४० कोटी रुपयांच्या पुनरुज्जीवन प्रस्तावास केंद्र सरकारने मान्यता दिल्यानंतर आम्ही कामगार संघटनेचे सर्व सात पदाधिकारी दिल्लीला मा.शरद पवार साहेब आणि मा. पासवान साहेब यांचे आभार व्यक्त करण्यासाठी दिल्लीला गेलो. तेव्हाही त्यांनी खूप आस्थेने कामगारांच्या भवितव्याच्या दृष्टीने मार्गदर्शन केले. आम्ही दोन्ही मान्यवरांना कामगारांच्या वतीने आयोजित कृतज्ञता समारंभाला उपस्थित राहण्याची विनंती केली. 
    दि. ३१ अॉगस्ट २००६ रोजी व्यवस्थापनाच्या सहकार्याने एक शानदार समारंभ आम्ही आयोजित केला होता. त्याहीवेळी आम्ही खास मराठमोळ्या पध्दतीने ढोल ताशाच्या निनादात, तुतारीच्या ललकारीत स्वागत केले होते. मा.पासवान साहेबांनी नम्रपणे आमच्या सन्मानाचा स्विकार केला. त्याचवेळी आम्ही थकलेल्या वेतनवाढीचा प्रश्न सोडविण्याची मागणी केली होती. त्याचा सातत्याने पाठपुरावा चालू होता. पुढे पुन्हा एकदा एच.ए.च्या सिफोलोस्फोरीन प्लँटच्या उदघाटन प्रसंगी, मा.शरद पवार साहेबांच्या उपस्थितीत त्यांनी वेतनवाढीची घोषणा केली. कामगार सुखावले, आनंदात न्हाले. आजही मा.रामविलास पासवान यांचे नांव प्रत्येकाच्या मनात कायमचे घर करून राहिलेले आहे. हे तर झाले, आमचा संबंध असलेल्या एच.ए. कंपनीचे. पण त्यांनी ज्या ज्या ठिकाणी मंत्री म्हणून जबाबदारी पाहिली, त्या त्या ठिकाणी कामगारांच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेतले. रेल्वे कामगार, कोळसा खाणीतील कामगार असे प्रत्येक ठिकाणी त्यांच्या निर्णयाचे प्रतिबिंब उमटले आहे.
    सन २००९ नंतर श्री पासवान साहेब आमच्या खात्याचे मंत्री नव्हते. पण पण आम्ही ज्या ज्या वेळी दिल्लीला गेलो, तेव्हा त्यांच्या निवासस्थानी त्यांना भेटत असे. प्रत्येकवेळी त्यांच्यातील माणूसकीचा ओलावा आम्ही अनुभवला आहे. तो शिडकावा कायम स्मरणात राहणारा आहे. आम्ही त्यांच्या स्वागताच्या वेळी दिलेली छत्रपती शिवाजी महाराजांची पुर्णाकृती प्रतिमा त्यांच्या निवासस्थानी त्यांच्या उजव्या हाताला कायम विराजमान होती. दोन-तीनदा त्यांनी आमच्या समक्ष त्यांना भेटायला आलेल्यांना ही बाब आवर्जून सांगितली. 
 असा हा लोकनेता. त्यांचे वेगळेपण म्हणजे बिहारसारख्या राज्यात त्यांना असलेला जनाधार कायम टिकून राहिला. मला आठवतेय, सन १९८४ च्या लोकसभा निवडणूकीमध्ये देशभरात दोन युवानेते  लोकसभेत सर्वाधिक मतांनी निवडून गेले, त्यांनी देशाचे लक्ष वेधून घेतले होते. त्यापैकी  एक होते मा. शरद पवार साहेब आणि त्याचवेळी बिहारमधून सर्वाधिक मतांनी निवडून आलेले युवा नेतृत्व होते, रामविलास पासवान साहेब ! दोन्ही नेत्यांमध्ये काही साम्य आहे. दोघांनाही जनाधार चांगला आहे. दोघेही दीर्घकाळ लोकसभेत निवडून आले आहेत. दोघांच्यात समन्वय व सामंजस्य कायम टिकून राहिले. आमच्या दृष्टीने पाहिले तर २००३ ला बंदकडे निघालेल्या एच.ए. कंपनीला या दोघांमधील सांमजस्यामूळे संजीवनी मिळाली. 
सामान्य माणसाला सन्मानित करणारे, त्यांचे सुखदुःख जाणणारे, कष्टकरी कामगारांना आस्थेने जपणारे लोकनेते म्हणून श्री रामविलास पासवान यांचे कामगार वर्गात कायम स्मरण राहील. 
हीच त्यांना भावपूर्ण शब्द सुमनांजली. 
#

( अरुण तुकाराम बोऱ्हाडे)
माजी सरचिटणीस, एच.ए.कामगार संघटना.
(पिंपरी चिंचवड, पुणे)
मेल : atborhade@gmail.com

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

श्री नागेश्वर महाराज भंडारा : भक्तिमार्गातील शक्ती स्त्रोत [लेखक : अरुण बोऱ्हाडे]

'शरद पवार : दुःखातही मनाला उभारी देणारा अलौकिक लोकनेता'' : अरुण बोऱ्हाडे

"कष्टकरी कामगारांची, एक अधुरी कहाणी..! सामाजिक चिंतनाचा विषय" लेखकः अरुण बोऱ्हाडे