माझी कविता : शोध कृष्णाचा..! : अरुण बोऱ्हाडे

 माझी कविता : 

शोध कृष्णाचा..!



🌿

कृष्णा,

तू नेमका कोण आहेस..

कितीदा शोध घेतला मी तुझा,

पण कधीच झाला नाही उलगडा मला..!

तू देवकी-वसुदेवाचा बाळ होतास, 

जन्मताच मातेपासून अलग झालास !

ही कहाणीच हृदयाला पाझर फोडणारी,

पण पुढे अलगद विस्मरणात गेलेली..! 

तू माता यशोदेचा नंदलाल म्हणून 

मला खूप भावलास,

तिथेही तू सर्वांचा कान्हा झालास !

तुझ्या बालपणीच्या खोड्या

कधी ऐकल्या की तू खूप  खोडकर वाटतोस..!

तसा तू गोकुळातही छान रमलास,

तू म्हणजेच 'गोकूळ' झालास.. 

गायी वासरांचा धनी झालास..!

तिथेच तू गोपाळ झालास !

किसन अन् मुरारी झालास,

शाम, गोविंद आणि नंदकिशोरही झालास..! 

यमुनेच्या तिरी गोवर्धन गिरीधारी झालास..!

गोपिकांचा तू लाडका झालास, 

कितीजणींचा तू कन्हैया झालास..!

स्वरांच्या हिंदोळ्यावर बसून मुरलीधर झालास,

राधेला समजून घेताना तू विवेक दाखविलास !

राधेचा तू कृष्ण झालास,

कृष्णा तू राधा झालास, 'राधा-कृष्ण' झालास..!

भक्ती, प्रीती, समर्पणाचा अविरत झरा झालास..!

रुक्मिणी, सत्यभामा, कालिन्दी

या अष्टौपत्नींचा पती झालास..!

सोळासहस्त्र नारींचाही

तू संजीवनी बनलास..! 

तू यमुनेच्या डोहात डुंबलास..

कालियाच्या डोईवर नाचलास !

किती असूरांचा नायनाट केलास,

तुझ्या पराक्रमाच्या कथाही ऐकल्यात..!

तू द्वारकेचा राणा झालास, 

गरीब 'सुदाम्याचा' जिवलग सखा झालास !

योद्धा अर्जुनाचा प्राणप्रिय श्रीहरी झालास.!

तू पांडवांचा न्यायदाता झालास..! 

सुभद्राचा होतासच,

द्रौपदीचाही तू बंधू झालास..! 

पार्थाचे सारथ्य करताना तर,

तू महाभारताचा नायक झालास..!

तू "सुदर्शन चक्र" धारण केलेस,

तेव्हा जगाने तुझ्यातला राजनितीज्ञ पाहिला..!

धर्मनिती, राजनिती, युद्धनिती आणि 

जीवन जगण्याची रिती-भाती सांगणारा, 

तू गीताकारही झालास..! 

तूच गीतार्थ झालास !

'ज्ञानी हा तुझा आत्मा आहे' असेही तू म्हणालास.!

सारे विश्व तुझ्यात असूनही तू विवेकी आहेस,

सत्यासाठी तू धावतोस, अनितीशी लढतोस.

तू परमात्मा आहेस,

तूच परमार्थ सांगितला आहेस !

तरिही मला प्रश्न पडतो कृष्णा,

ब्रम्हांडाला कवेत घेणारा 

तू नेमका कोण आहेस..!

तू वृंदावनी आहेस, मथूरेतही आहेस,

तू पुरीत आहेस आणि पंढरीतही आहेस..!  

कृष्णा,

अजूनही बरेच काही सांगणार आहे,

राधेने दिलेली ती वैजयंती माळ

अजूनही तुझ्या गळा शोभते आहे,

समुद्रमंथनातील कौस्तुभ मणी 

कंठी तुझ्या विराजला आहे !

तुझ्या आवडीचा पारिजातक

आजही अंगणी माझ्या अविरत फुलतो आहे !

तू तिथे कधी येतोस, हेही मी पाहतो आहे.

कृष्णनिती नेमकी काय आहे,

मला अजून जाणायचे आहे.

तिचाही शोध मी घेतो आहे..!

तू नेमका कोण आहेस..! 

अजूनही मला कळला नाहीस..

माझ्या परम प्रिय श्री कृष्णा, 

तुझा शोध मी घेतो आहे ! 

तुझा शोध घेतो आहे !!

🙏

@ अरुण तुकाराम बोऱ्हाडे.. ✍

( दि.११ अॉगस्ट २०२०, श्रीकृष्ण जयंती, कृष्णाष्टमी )

Comments

  1. खूप छान श्री कृष्णा मी तुझा शोध घेत आहे श्री कृष्णा च जीवन कवितेत मांडणी केली आहे

    ReplyDelete
  2. खूप छान कृष्ण पट कृष्ण शोध

    ReplyDelete

Post a Comment