चार दशकांच्या मैत्रीचा प्रवास : "वेध सामाजिक जाणिवांचा" : अरुण बोऱ्हाडे
मी, विजय आणि सुहास :
चार दशकांच्या मैत्रीचा प्रवास
"वेध सामाजिक जाणिवांचा"
लेखक - अरुण बोऱ्हाडे : लेखांक (१)
![]() |
| (विजय भिसे, सुहास पोफळे, अमृत पऱ्हाड, अरुण बोऱ्हाडे) |
नुकताच दिनांक १५ जुलै रोजी माझा मित्र विजय भिसे याच्या वाढदिवसानिमित्ताने एक छोटेखानी लेख लिहिला होता. तेव्हाच मी, विजय आणि सुहास अशा तिघांच्या मैत्रीविषयी लिहायला हवे,असे मला वाटले. आमच्या तिघांची मागिल किमान ४० वर्षांची घट्ट मैत्री. तीही वैचारिक, सामाजिक, सांस्कृतिक आवडीनिवडी जपणारी. सामाजिक बांधिलकीने वैचारिक पातळीवर विविध उपक्रम राबवून योगदान देणारी आमची आगळीवेगळी मैत्री !
आमच्या तारुण्यासह आयुष्यातील बराच काळ आम्ही तिघांनीही विविध सामाजिक उपक्रमांसाठी खर्च केलेला आहे. एका विचाराने भारावलेले तीन तरुण एकत्र येतात, स्वतःची सर्व कर्तव्ये सांभाळताना, साधनांची कमतरता असूनही सामाजिक उद्दिष्टपूर्तीसाठी सातत्याने प्रयत्नशील राहिले. त्यामध्ये कोणताही अहंभाव नाही, प्रसिद्धीलोलूपता नाही, कुठलाही राजकीय स्वार्थ नाही की अर्थप्राप्ती नाही. हे तिघे जण म्हणजे मी, विजय आणि सुहास !
दिनांक दोन ऑगस्ट हा सुहासचा वाढदिवस असतो, नुकताच पंधरा जुलैला विजयचा वाढदिवस झाला, यानिमित्ताने कधीतरी गतआयुष्याकडे डोकावून पहायला हवे, म्हणून हा शब्दप्रपंच !
मागिल लेखात विजयविषयी लिहितानाच सुहासची व्यक्तिरेखा कुठेही टाळता येण्यासारखी नव्हती. म्हणून मी सुरुवातीलाच म्हटलेय, हा लेख तिघांविषयीच लिहायला हवा होता.
पिंपरी गावातील सोपानराव वाघेरे हे माझे आजोबा. माझ्या आजोळी वाघेरे वाड्यामध्ये पोफळे कुटूंब रहायला होते. सुहास, सुनिल आणि सुधीर हे तिघे भाऊ. लहानपणी सुट्टीमध्ये 'मामाच्या गावाला' जाण्याचा आनंद मी पुरेपूर घेतला. शाळेला सुट्टी लागली की मी पिंपरीला आजोळी जात असे. त्यामुळे लहानपणीच सुहासची आणि माझी मैत्री जुळली. म्हणून सुहास माझा बालमित्र आहे. पिंपरीतील शाळेत तो आणि मोशीतील शाळेत मी एकाच वेळी एकाच इयत्तेत शिकत होतो. पुढे दहावीनंतरच्या शिक्षणासाठी मी काही काळ पिंपरीत मामांकडेच होतो. तेव्हा अकरावीला असताना विजय माझा वर्गमित्र असल्याने, माझी त्याच्याशी मैत्री जमली. अर्थातच मी, विजय आणि सुहास अशी आमची तिघांची गट्टी जमली. हळुहळू आमच्यामध्ये विचारांची देवाण-घेवाण होऊ लागली. आम्ही वैचारिक पातळीवर तासनतास चर्चा करायचो. समाज, सामाजिक उत्कर्ष, समाजोन्नती, सामाजिक प्रबोधन, भारतातील युवापिढी, भारत-रशिया मैत्री, फ्रान्सची राज्यक्रांती, अमेरिकेची वाढती दहशत, जपानची प्रगती असे जागतिक विषय आम्ही बोलायचो. आपला देश पुढे जायला हवा तर आपली युवापिढी वैचारिकदृष्ट्या सक्षम, सुदृढ आणि समृद्ध असायला हवी, अशा निष्कर्षाप्रत आम्ही आलो. त्यासाठी, त्याकाळी आम्ही सतत फिरायचो.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेले आणि लढ्याच्या छटा अनुभवलेले, देशाच्या नवनिर्माणाचे स्वप्न पाहिलेले काही आदर्शवादी, ध्येयवादी लोकांची शेवटची पिढी ऐंशीच्या दशकात आम्हांला जवळून पाहता आली. त्यातील अनेकांना आम्ही समक्ष जावून भेटलो. त्यांच्या आदर्शवादाने आम्ही व्यापून गेलो होतो.
![]() |
| (मा.बाळासाहेब भारदे) |
तो काळ बहूतांशी सामाजिक संस्कारांचा, सामाजिक बांधिलकी शिकविणारा आणि समाजाविषयी आस्था आणि आपुलकी यांचे विचार रुजविणारा होता. त्या काळातील वर्तमानपत्रे वैचारिक मेजवानी देणारी होती. रेडिओ आणि टेलिव्हिजन अशी मर्यादित साधने होती. आजच्याप्रमाणे दूरदर्शनच्या वाहिन्यांनी तेव्हा जन्म घेतलेला नव्हता. एकमेव 'डीडी नॕशनल' किंवा 'दूरदर्शन' आणि नंतर आलेली 'सह्याद्री वाहिनी' चालू असायची. त्यावर काही मोजके कार्यक्रम आणि वस्तुनिष्ठ बातम्या दाखविल्या जात. स्वराज्य, लोकप्रभा अशी साप्ताहिके आणि किर्लोस्कर सारखी मासिके आमच्या वाचनात असायची. त्यांमधून पुष्कळ विचारप्रवण लेखन आम्ही वाचायचो. जवळच ग्रंथालय होते, नियमितपणे पुस्तके वाचायचो. ललित साहित्य, वैचारिक आणि ऐतिहासिक पुस्तकांचे वाचन आम्ही करायचो. एखादे पुस्तक वाचल्यानंतर आम्ही तिघे जण आवर्जून त्यावर चर्चा करायचो. मित्रांना वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणून एखादे पुस्तकच द्यायचो.
पुढे आंम्हाला नाटकाची गोडी निर्माण झाली. त्याकाळी मराठी रंगभूमीवर खूप दर्जेदार नाटके येत असत. मी आणि सुहास सायकल घेऊन पिंपळे सौदागरला विजयकडे जायचो, कधी तो पिंपरीत येत असे. पिंपळे सौदागरला जाताना पवना नदीवर त्याकाळी नाव असायची. सायकल उचलून नांवेत ठेवण्याचा चांगला सराव आंम्हाला झाला होता. विजयला बरोबर घेऊन आम्ही औंध मार्गे पुण्याला जायचो. जाताना वर्तमानपत्रांमध्ये 'आजचे स्थानिक कार्यक्रम' काय आहेत, याची आम्ही आवर्जून नोंद घेत असू. मग एखादे चांगले व्याख्यान, चर्चासत्र किंवा पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम, काव्यवाचनाची मैफिल यापैकी काही निश्चित करून आम्ही त्याचा आस्वाद घ्यायचो. पुण्यात गेल्यावर बालगंधर्व, साहित्य परिषद, टिळक स्मारक किंवा स्नेहसदन अशा विविध ठिकाणी आमच्या भेटी असायच्या. या सांस्कृतिक पुण्यामध्ये वैचारिक, साहित्य, कला, शैक्षणिक कार्यक्रमांना कधीही तोटा नव्हता. एखादे व्याख्यान ऐकले कि त्या व्याख्यात्याला समक्ष भेटायचे, त्यांच्याशी चर्चा करायचो, न समजलेला विषय समजावून घ्यायचो आणि त्यांचे मार्गदर्शन घ्यायचे. एखाद्या सायंकाळी 'मॅजेस्टिक' मध्ये साहित्यिक गप्पांचा कार्यक्रम असे. नामवंत साहित्यिकाला बोलावून त्यांचे विचार ऐकण्याची संधी मिळत असे. कधीकधी बालगंधर्वला एखादे चांगले नाटक असेल तर आम्ही ते नाटक पहायचो. मध्यंतराच्या काळामध्ये किंवा प्रयोग संपल्यावर त्यातील प्रमुख कलाकारांना आम्ही आवर्जून भेटायचो. जमल्यास दिग्दर्शकाला भेटून त्याला अभिप्राय द्यायचा. या आमच्या छंदातून अनेक कलाकारांशी आमचा वैयक्तिक परिचय जडला होता. डॉ. श्रीराम लागू, निळू फुले, शरद तळवलकर, राम नगरकर, प्रभाकर पणशीकर, नाना पाटेकर, कुलदीप पवार, प्रशांत दामले किंवा वर्षा उसगावकर, सविता प्रभूणे, विजया मेहता अशा असंख्य कलाकारांना समक्ष भेटून आम्ही चर्चा केलेली आहे. त्याचप्रमाणे प्राचार्य शिवाजीराव भोसले, प्राचार्य राम शेवाळकर, डॉक्टर प्र.चिं. शेजवलकर, प्रा.गं.बा. सरदार, यदुनाथ थत्ते, शंकर पाटील, डॉ. सरोजिनी बाबर, कवयित्री शांता शेळके, वसंत बापट, शिवाजीराव सावंत, सुधा नरवणे, डॉ. अनिल अवचट, कुमार सप्तर्षी अशा असंख्य साहित्यिक व विचारवंतांना वेळोवेळी भेटून आम्ही चर्चा करायचो. खरे सांगायचे तर त्याकाळी हे सर्व लोक विचारांनी जसे महान होते, तसेच आमच्यासारख्या तरुणांना वेळ देऊन, मोकळ्या मनाने चर्चा करण्यासाठी तत्पर असत.
त्या तारुण्याच्या मधुर काळात एकही दिवस असा नव्हता की, आमच्यातील मधमाशीने मधाचा घट प्राशन केला नाही. नित्य नवीन ज्ञान संपादन करण्याचा आमचा जगावेगळा उपक्रम होता.
यातूनच पुढे आपण समाजासाठी काही केले पाहिजे, असे तिघांनाही सातत्याने वाटत होते. तोच आमच्यातील *तारुण्याचा आविष्कार* होता. चांगल्या विचारांची शिदोरी, साहित्य-कलेचा झरा पिंपरी-चिंचवडमधील युवकांसाठी उपलब्ध करून दिला पाहिजे, असे आम्ही ठरविले. काय करता येईल यावर आम्ही नियमित भेटून चर्चा करायचो. वेळोवेळी काही ज्येष्ठ मंडळींचे मार्गदर्शन घेतले. आमच्यातील सामाजिक जाणिवा आता अंकुरल्या होत्या !
(पुढील लेखांकात वाचा.) ...✍
"सांस्कृतिक व सामाजिक चळवळ"
लेखक - अरुण बोऱ्हाडे : लेखांक (२)
![]() |
| (मा.बाबा आमटे - भारत जोडो अभियान) |
सन १९८५ युनोने (संयुक्त राष्ट्र संघटना - युनो) "आंतरराष्ट्रीय युवक वर्ष" म्हणून घोषित केले. देशातील आणि जगभरातील युवकांसाठी विविध कार्यक्रम व उपक्रम होणार होते. या युवावर्षामध्ये आपले भरिव योगदान असले पाहिजे ही भूमिका आम्ही निश्चित केली. आमच्या समविचारी मित्रांना ही कल्पना बोलून दाखवली. त्यातूनच मग आम्ही *"युवा कला संवर्धन"* या नावाची सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक चळवळीला वाहिलेली संस्था स्थापन केली. जगातील युवकांचा आदर्श असलेले स्वामी विवेकानंदांची जयंती साजरी केली. त्यांचे विचार समजावून घेतले. युवाविषयक विविध कार्यक्रमांना उपस्थित राहिलो. आज पस्तीस वर्षांनी सभोवताली सर्व सामाजिक अवधाने बदललेली दिसतात. समाजकार्याची आणि सामाजिक बांधिलकीची परिमाणे ही बदललेली दिसतात. मात्र, पस्तीस वर्षांपूर्वी स्वतःच्या खिशात एकही रुपया नसताना किंबहूना स्वतःचे शिक्षण चालू असताना आम्ही ध्येयवादी तरुणांनी "युवा कला संवर्धन" हे रोपटे लावले. त्या माध्यमातून अनेक साहित्यिक मैफिली, विचारवंतांची व्याख्याने, युवक शिबीरांचे आयोजन केले. एक महत्त्वाची बाब नमूद केली पाहिजे, पिंपरी-चिंचवड शहरातील जवळजवळ १२५ हून अधिक सुशिक्षित तरुण आमच्या या संस्थेचे रीतसर वर्गणी भरून सदस्य झाले होते. त्याकाळी दळणवळणाची फारशी साधने नव्हती. फोनही ठराविक लोकांकडेच असायचे. फिरण्यासाठी सायकल हेच मुख्य साधन होते. तरीही एकमेकांशी संपर्क साधून ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम असेल, बैठक असेल त्या त्या ठिकाणी हे सर्वजण न चुकता उपस्थित रहायचे.
सुरुवातीला काही काळ पिंपरीतील कला वाणिज्य महाविद्यालय (आताचे महात्मा फुले महाविद्यालय) हेच आमच्या युवक चळवळीचे मुख्य केंद्र बनले होते. तेथील त्यावेळचे प्राचार्य आर.के. शिंदे सर यांनी आम्हाला कार्यक्रमांसाठी महाविद्यालयाचा हॉल विनाशुल्क उपलब्ध करून दिला होता. आम्ही आमच्याच वर्गणीतून साहित्यिक गप्पा, कधी कवितावाचन, कथाकथन किंवा व्याख्यानाचे आयोजन करत असू.
पिंपरी चिंचवड शहरातील तत्कालीन प्रमुख नेते कै.भिकू वाघेरे पाटील, कै.डॉ.श्री.श्री.घारे, श्री ज्ञानेश्वर लांडगे, श्री चिंधाजी गोलांडे मामा, ज्येष्ठ पत्रकार कै.भा.वि.कांबळे, कै.डॉ.द.वि.निकम, साहित्यिक श्री मधू जोशी, श्री अमृत पऱ्हाड इत्यादींनी आंम्हाला प्रोत्साहन दिले. वेळोवेळी मार्गदर्शन आणि निरपेक्ष सहकार्य केले. तत्कालीन हवेली तालुक्याचे तरुण व सुशिक्षित आमदार श्री अशोकराव तापकीर यांना आम्ही संस्थेचे सल्लागार म्हणून लक्ष देण्याची विनंती केली. आम्हां सर्वांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी आमची मागणी तात्काळ मान्य केली, वेळोवेळी सहकार्य व मार्गदर्शन केले. आम्ही अनेक लोकांना एकत्रित आणले तरी, आमची संस्था कोणत्याही राजकारणापासून अलिप्त होती. प्रत्येक कार्यक्रम आखीव-रेखीव, शिस्तीत आणि नियोजनबद्ध होत असे. सर्व कार्यक्रम कमीतकमी खर्चाचे असायचे.
माझे भोसरीतील साहित्य कलाप्रेमी मित्र श्री अमृत पऱ्हाड यांनी आम्हांला सुरुवातीपासून मार्गदर्शन केले. ते राष्ट्रप्रेम मंडळाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवित असत.
पिंपरी गावात नवमहाराष्ट्र विद्यालयाशेजारी, श्री बाळासाहेब वाघेरे यांचे 'रसिक संवाद' नावाचे ग्रंथालय होते. आम्हांला एकमेकांना भेटण्यासाठी अथवा निरोपासाठी ती जागा सोयीची होती. बाळासाहेब साहित्यप्रेमी असल्याने आम्हांला खूपच सहकार्य करायचे. समोरच श्री सुरेश कुदळे (मास्तर) यांचे 'हॉटेल वृशाली' होते. मास्तरांच्या हॉटेलमध्ये चहा घेत आमच्या चर्चा रंगायच्या. मास्तरही साहित्य व समाजप्रेमी असल्याने त्यांनी आम्हांला अखेरपर्यंत सहकार्य केले. वृशालीच्या चहाने नवनवीन तरुणांशी आमची मैत्री बहरत गेली.
माझे भोसरीतील साहित्य कलाप्रेमी मित्र श्री अमृत पऱ्हाड यांनी आम्हांला सुरुवातीपासून मार्गदर्शन केले. ते राष्ट्रप्रेम मंडळाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवित असत.
पिंपरी गावात नवमहाराष्ट्र विद्यालयाशेजारी, श्री बाळासाहेब वाघेरे यांचे 'रसिक संवाद' नावाचे ग्रंथालय होते. आम्हांला एकमेकांना भेटण्यासाठी अथवा निरोपासाठी ती जागा सोयीची होती. बाळासाहेब साहित्यप्रेमी असल्याने आम्हांला खूपच सहकार्य करायचे. समोरच श्री सुरेश कुदळे (मास्तर) यांचे 'हॉटेल वृशाली' होते. मास्तरांच्या हॉटेलमध्ये चहा घेत आमच्या चर्चा रंगायच्या. मास्तरही साहित्य व समाजप्रेमी असल्याने त्यांनी आम्हांला अखेरपर्यंत सहकार्य केले. वृशालीच्या चहाने नवनवीन तरुणांशी आमची मैत्री बहरत गेली.
आम्ही युवकांनी पुढाकार घेऊन विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांना वेळोवेळी शहरामध्ये निमंत्रित केले.
अलीकडेच मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपद भूषविलेल्या ज्येष्ठ कवयित्री डॉक्टर अरुणा ढेरे या आमच्या १९८५ मधील काव्य मैफिलीच्या पहिल्या प्रमुख पाहूण्या होत्या. आंम्हा मुलांची धडपड पाहून त्यांनीही आमचे कौतुक केले होते.
पुढे ग्रामीण भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने आम्ही विविध उपक्रम राबविले. विद्यार्थ्यांसाठी नामवंतांची व्याख्याने आयोजित करणे, बौध्दिक स्पर्धा आयोजित करणे असे कार्यक्रम राबविले. सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रमांबरोबरच आम्ही सामाजिक दृष्टयाही अनेक कार्यक्रम राबविले. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिरे, नशाबंदी शिबिरे आणि समाजप्रबोधन पर व्याख्यानांचे आयोजन केले. त्याकाळी आम्ही कै.बाळासाहेब भारदे, ग.प्र.प्रधान, भाई वैद्य, यदुनाथ थत्ते, प्राचार्य शिवाजीराव भोसले, उल्हासदादा पवार अशा अनेक मान्यवरांना वेळोवेळी पाचारण करून व्याख्याने आयोजित केली.
सन १९८५ पासून पुढे अनेक वर्षे आमचे हे उपक्रम सातत्याने सुरू होते. दरम्यानच्या काळात मी आणि विजय प्रशिक्षणार्थी म्हणून एच.ए.कंपनीत रुजू झालो. एच.ए.मधील अनेक सहकारी आमच्या उपक्रमात सहभागी झाले होते.
कुष्ठरोग्यांची सेवासुश्रूषा आणि त्यांच्या आयुष्याला नवी उभारी देणारे थोर समाजसेवक डॉ.बाबा आमटे यांच्या 'भारत जोडो' अभियानात आम्ही पुणे पिंपरी चिंचवड मध्ये सहभागी झालो. त्यासाठी काही लोकवर्गणी जमा करून त्यांच्या कार्याला 'सलाम' केला.
आमच्या सर्वांची साहित्य-कला क्षेत्रातील धडपड पाहून त्या काळातील ज्येष्ठ नेते डॉ.श्री.श्री. घारे यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पिंपरी-चिंचवडमध्ये पुनरुज्जीवन करावयाचे आहे, तुम्ही तरुणांनी यामध्ये सहभागी व्हा, असे आंम्हास सांगितले. आम्ही आपसात चर्चा करून त्यांना प्रतिसाद दिला. सर्वांच्या सहमतीने १९८८ मध्ये माझ्यावर 'महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कार्यवाह' म्हणून जबाबदारी सोपविली. डॉ. रामचंद्र देखणे हे परिषदेचे अध्यक्ष होते. सन १९८९ मध्ये पिंपरीत झालेल्या विभागीय साहित्य संमेलनामध्ये आंम्हा सर्व सहकाऱ्यांचा कृतीशील सहभाग होता. पुढे दहा वर्षे मी साहित्य परिषदेचा कार्यवाह म्हणून जबाबदारी सांभाळली.
दरम्यान आम्ही विद्यापीठ पातळीवर काव्यलेखन स्पर्धा, निबंध स्पर्धांचेही आयोजन केले. एकंदरीत आंम्हा युवकांची सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील चळवळ चांगलीच रुजत होती.
हे सर्व घडत असताना माझी पत्रकारिताही चालू होती. त्याचबरोबर मी प्रकाशन व्यवसाय सुरू केला होता. माझ्या मामांनी मला कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून दिली. पहिल्या दोन वर्षातच मी सहा पुस्तके प्रकाशित केली. "खंबीर" नावाचे मासिक मी काही काळ प्रकाशित केले. विजय आणि सुहास तिथेही मला सहकार्य करायचे.
खरे तर मला या सर्व क्षेत्राबरोबर राजकारणाची तीव्र ओढ होती. मात्र मी कोणाही सहकाऱ्याला कधीही माझ्याबरोबर राजकारणात काम करा, असा आग्रह धरला नाही. साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रातील कामगिरी निकोपपणे व्हावी, हा आमचा हेतू होता. सन १९९५-९६ पासून मी एच.ए. मधील कामगार चळवळीत कार्यरत झालो. तेथील कामगार संघटनेचा सरचिटणीस म्हणून निवडून आलो. तिथे अधिक वेळ देणे आवश्यक होते. त्यानंतर हळुहळू माझी साहित्य सांस्कृतिक क्षेत्रातील कामगिरी कमी होत गेली. विजय आणि सुहास इतर सहकाऱ्यांसमवेत त्या क्षेत्रात कार्यरत राहिले. पुढे मी पिंपरी-चिंचवड शहराच्याही कामगार चळवळीमध्ये लक्ष घालू लागलो. मी राजकीय क्षेत्रातही जबाबदारी घेऊन काम करू लागलो. सुरुवातीस काँग्रेस पक्षाच्या आणि नंतर १९९९ पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मी पक्षसंघटनेत काम करू लागलो.
(पुढील लेखांकात वाचा.) ...✍
"माणूसवेडा, सुसंस्कृत सुहास"
लेखक - अरुण बोऱ्हाडे : लेखांक (३)
हे लेखन करीत असताना खरे तर आमच्या इतरही सहकाऱ्यांचा उल्लेख करायला हवा. पण ती यादी मोठी आहे. मुळ आमच्या तिघांची मैत्री, आमचे झालेले विचारमंथन, त्यातून राबविलेल्या संकल्पना त्यावर मी प्रकाश टाकला आहे. साथ दिलेल्या प्रत्येकाची आम्हांला जाणिव आहेच. या लेखामध्ये काही निवडक व्यक्तींचाच उल्लेख केला आहे. आम्ही घेतलेले साहित्यविषयक कार्यक्रम खूप भव्य किंवा मोठे नव्हते, पण शहराच्या विविध भागात चळवळ पोहोचविण्यासाठी छोटेखानी कार्यक्रम घेत राहिलो. त्याच धर्तीवर पुढे महाराष्ट्र साहित्य परिषदेही कार्यक्रम आम्ही शहरात सर्वत्र राबविले.
विजयविषयी मी लिहिलेल्या लेखात त्याच्या वाटचालीबाबत व व्यावसायिक प्रगतीबाबत सांगितले आहेच. तो 'लायन्स क्लब इंटरनॅशनल' पुणे (चतुःश्रृंगी) चा सेक्रेटरी म्हणून जबाबदारी पाहत आहे. त्याचीही कला, साहित्याची ओढ कमी झालेली नाही.
माझे कामगार चळवळीमध्ये आणि राजकीय क्षेत्रामध्ये थोडेबहूत नाव असले, तरी माझा मुळ पिंड साहित्य-सांस्कृतिक चळवळीचा आणि सामाजिक कार्याचाच आहे.
मागिल पस्तीस-चाळीस वर्षांच्या वाटचालीत आमच्या तिघांच्याही कार्याचे व्याप वाढले, जबाबदाऱ्या वाढल्या. तरीही आमची वैचारिक बैठक आणि अंगीकृत सामाजिक, सांस्कृतिक ओढ तीच आहे.
सन १९८० च्या दशकापासून सुरु झालेला आमच्या मैत्रीचा प्रवास शहराच्या साहित्य, सांस्कृतिक, वैचारिक व कामगार चळवळीत अनेक सहकाऱ्यांना बरोबर घेऊन आजतागायत चालू आहे. आम्ही स्वतःसाठी काय मिळविले, यापेक्षा समाजासाठी जे जे देता येणे शक्य आहे, ते प्रबोधनाच्या माध्यमातून देण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले एवढे मात्र नक्की.
आजही आम्ही तिघे जण मध्येच वेळ काढून भेटतो. कधी कधी मुद्दामहून लहान होण्याचा प्रयत्न करतो. एकमेकांचे ठरलेले कार्यक्रम रद्द करायला लावतो आणि तिघे मिळून कुठेतरी मोकळेपणाने फिरतो. एखादे चांगले नाटक पाहतो, चांगला सिनेमा पाहतो. पुण्यात अमृततुल्य गाठून गरमागरम चहाचा फुरका मारतो. निवांत कुठेतरी मनसोक्त जेवण करतो. पोटभर गप्पागोष्टी करतो आणि मैत्रीचा सुखद मोरपीस गालावरून फिरवून, पुन्हा आपापल्या उद्योगाला लागतो. आमच्या तिघांच्या मैत्रीबाबतीत एखादे पुस्तकही कमी पडेल !
काही वर्षांपूर्वी सुहास चिंचवडमध्ये स्थायिक झाला. साहित्य आणि समाजप्रबोधनाची चळवळ जनमाणसांत रुजविण्यासाठी तो सदोदीत कार्यरत राहिला आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचीही त्याने जबाबदारी सांभाळली. पुढील काळात शहरातील व्याख्यानमालांच्या आयोजनात सुहास अधिक लक्ष देऊ लागला. व्याख्यानमाला समन्वय समितीची जबाबदारी त्याच्याकडे आली. त्याशिवाय काळेवाडी येथे आदिवासी व भटक्या विमुक्त मुलांसाठी असलेल्या "महर्षी दयानंद वसतिगृहाचा संचालक" म्हणूनही तो जबाबदारी पाहत आहे.
चिंचवडमधील गांधीपेठ तालीम मंडळाच्या वतीने, गेली पाच वर्षांपासून डॉ. संजय उपाध्ये यांचे दरमहा अध्यात्मिक प्रवचन अथवा प्रबोधनपर व्याख्यानांचे आयोजन करण्यात येते. यामध्ये श्री राजाभाऊ गोलांडे आणि सुहास पोफळे यांचा विशेष पुढाकार असतो. सुहास तिथेही पुर्णवेळ कार्यरत आहे. याचे मला विशेष कौतुक वाटते.
आपली खाजगी क्षेत्रातील नोकरी सांभाळून, प्रपंच पाहून आयुष्यभर समाजात कार्यरत राहणे, हे एवढे सोपे नाही आणि सहजशक्य होत नाही. एकवेळ राजकारण करणे सोपे आहे. तिथे अनेक घटक मदतीला धावतात, काही लाभाच्या आशेने लोक अवतीभोवती असतात. मात्र सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात केवळ त्याग, निष्ठा आणि कष्टच असतात.
आज सुहासच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लिहिताना सन १९८५ मध्ये हाती घेतलेली साहित्य, सांस्कृतिक सेवेची आणि समाजप्रबोधनाची ही पताका आजही आम्ही खाली ठेवलेली नाही. शहरातील अनेक मान्यवर आणि साहित्यप्रेमी याचे साक्षीदार आहेत.
तारुण्यापासून सुरु झालेल्या सुहासच्या या वाटचालीत आणि धडपडीत त्याला लाभलेले त्याच्या आई आणि वडिलांचे (दादा) आशिर्वाद लाखमोलाचे आहेत. मध्यंतरी दादांचे छत्र हरपले. आईची प्रेमळ सावली आणि पाठबळ आजही त्याला प्रेरणादायी आहे. त्याचे दोघे बंधू सुनिल आणि सुधीरही आपापल्या नोकरी व्यवसायात स्थिरावले आहेत. सर्व कुटूंबाचा कणा बनून, मनापासूनचा एकोपा सुहासने जपलेला आहे.
सदैव समाजासाठी वाहून घेतलेल्या सामाजिक कार्यकर्त्याला घरातून योग्य साथ मिळाली तरच ते व्यक्तिमत्त्व बहरत जाते. समाजाच्या वैचारिक आणि सांस्कृतिक जडणघडणीसाठी अहोरात्र झिजणाऱ्या कार्यकर्त्याच्या वाट्याला सहसा लक्ष्मीची डोळेझाकच असते. अशावेळी कार्यकर्त्याच्या सहचारिणीला बीज होवून मातीखाली रुजून घ्यावे लागते. अनेकदा स्वतःचे सुख, दुःख, अडचणी, परवडी आणि आवडीनिवडी बाजूला ठेवूनच पतीच्या यज्ञात आपल्या त्यागाची समिधा द्यावी लागते. हे ज्या गृहिणीला जमते, तिथेच सुहाससारखे व्यक्तिमत्त्व घडते, फुलते, बहरास येते. मुळात शिक्षिका असलेल्या अत्यंत प्रेमळ, सोशिक व शांत स्वभावाच्या सौ.सुजाता वहिनींची सुहासला असलेली खंबीर साथ म्हणजे, वादळवाऱ्यात फडफडणाऱ्या दिव्याला विझू न देता ठामपणे तेवणारी निश्चल ज्योत आहे. अबोल आणि सस्मितपणे सुहासच्या पाठीशी सदैव उभ्या असलेल्या वहिनींनी नोकरी सांभाळून, संसाराची वेल सदैव आनंदी व टवटवीत ठेवली.
त्यांच्या संसारवेलीला दोन सुमधुर फुले उमलली आहेत. मोठी कन्या मिनल नुकतीच आय.टी. इंजिनियर झालीये, तर धाकटी स्नेहल अप्लाईड आर्टच्या चौथ्या वर्षात शिकत आहे. दोघीही हुशार, सुशील आणि सुसंस्कृत कन्या आहेत.
एक सुसंस्कृत, माणूसवेडा, रसिकमनाचा, निर्मळ स्वभावाचा, स्वच्छंदी मित्र.. म्हणून सुहास सुपरिचित आहे. जुनी मैत्री निभावतानाच विविध क्षेत्रातील नवनवीन मित्रांना भेटण्यात व नवीन मैत्री जुळविण्यात तो सदैव तत्पर असतो. मुळातच तो सुसंस्कृत आणि माणूसवेडा आहे. एखादा चुकीचा वागला तर त्याच्यातील माणूसपण जागे करणे त्याला जमते. असा हा 'माणूसवेडा' आणि 'सुसंस्कृत' मित्र नावाप्रमाणेच 'सुहास्यवदनी' आहे.
अशा या बालपणापासूनच्या माझ्या प्रामाणिक मित्राला त्याचे पुढील आयुष्य अधिक भरभराटीचे, उत्तम आरोग्याचे आणि सर्वार्थाने सौख्याचे जावो. निकोप समाजमन घडविण्याच्या त्याच्या अंगीकृत कार्यात तो यशस्वी होवो. आमचा सर्व मित्रपरिवार आणि माझ्या कुटूंबियांच्या वतीने मनापासून सदिच्छा व्यक्त करतो.
@ लेखक : अरुण बोऱ्हाडे✍
(मोशी, ता.हवेली, जि.पुणे)
रविवार, दि. ०२ अॉगस्ट २०२०.
Email : atborhade@gmail.com
* * *




Perfect friendship
ReplyDeleteखूप छान व सुंदर विवेचन...समोर तंतोतंत उभे केले.. धन्यवाद, आपणाला खूपखूप शुभेच्छा.....
Deleteछान लेख आहे सर
Deleteमैत्री दिनाच्या दिवशी छान लिखाण वाचायला मिळाले. धन्यवाद. असेच भरपूर वाचायला मिळावे.
ReplyDeleteChan lekh
ReplyDeleteChan lekh.Asech lekh vachanat yet raho he sadichha.Dhanyawad.
ReplyDeletenice
ReplyDelete