आठवणीतील दुर्गभ्रमंती : शिवरायांच्या दक्षिण मोहिमेच्या पाऊलखुणा (२)
आठवणीतील दुर्गभ्रमंती :
शिवरायांच्या दक्षिण मोहिमेच्या पाऊलखुणा : (२)
किल्ले : वेल्लोर, साजरा, गोजरा व तिरुवन्नामलाई
जानेवारी २०१८ मध्ये केलेल्या आमच्या दक्षिण दिग्विजय दुर्गभ्रमंती मोहिमेत तामिळनाडू राज्यातील वेल्लोरच्या किल्ल्याला आम्ही भेट दिली. मी, श्रीहरी तापकीर, सुमित दाभाडे, लखन घाडगे पांडुरंग शिंदे आणि कामेश जाधव असे सहा जण या मोहिमेत सहभागी होतो.
वेल्लोरचा किल्ला चेन्नई - बंगलोर महामार्गावर, वेल्लोर (वेल्लूर) शहरातच आहे. देशातील मोठ्या भुईकोट किल्ल्यांपैकी तो एक आहे. मात्र सर्वाधिक बळकट, बेलाग आणि देखणा असा हा किल्ला आहे. किल्ल्याची तटबंदी ग्रेनाईटच्या दगडात बांधल्याने तिला बळकटी तर आली आहेच, शिवाय बांधकामात प्रत्येक ठिकाणी कलात्मकता व सुबकता आढळून येते. त्यामुळेच या किल्ल्याला एक वेगळेच देखणेपण लाभले आहे. तटबंदी तीस ते चाळीस फुटांपेक्षा अधिक रुंद आहे. तटबंदीच्या बाहेरील बाजूला असलेले खंदक त्याहीपेक्षा रुंदीचे आहेत. आजही या खंदकामध्ये सर्वत्र पाणी खेळत असते. पूर्वीच्या काळात त्यामध्ये सुसरी मगरी सोडलेल्या असायच्या, जेणेकरून शत्रूला खंदकातून आत जाता येणार नाही. किल्ल्यात प्रवेशासाठी एकच मुख्य दरवाजा आहे. या किल्ल्याला पराकोटही आहेत. विजयनगरच्या साम्राज्यातील महत्वाचे ठाणे असलेला हा किल्ला सन १५६६ मध्ये बांधण्यात आला. पुढील काळात या किल्ल्याने बरीच सत्तांतरे पाहिली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंजीचे किल्ले आणि इतर मुलूख जिंकून घेतल्यानंतर वेल्लोरचा किल्ला घेण्याचे ठरविले. त्याकाळात हा किल्ला आदिलशाहीच्या ताब्यात होता. अब्दुल्लाखान हा हबसी सरदार किल्ल्याचा किल्लेदार होता. महाराजांनी त्याच्याकडे आपला वकील पाठविला, मात्र त्याने दाद दिली नाही. सन १६७७ च्या मे महिन्यात मराठ्यांच्या फौजेने किल्ल्याला वेढा दिला. नरहरी बल्लाळ (रुद्र) यांच्याकडे वेढ्याची जबाबदारी होती. त्यांनी निकराची शर्थ केली, मात्र खान दाद देत नव्हता, आतून तोफांचा मारा चालू होता.
या किल्ल्याच्या पूर्वेकडील बाजूस एक किलोमीटर अंतरावरील दोन उंच डोंगर वजा टेकड्या महाराजांच्या नजरेत भरल्या आणि महाराजांनी योजना आखली. या दोन्ही टेकड्या ताब्यात घेतल्या त्यावरती मोर्चे लावले, लांब पल्ल्याच्या तोफा चढविल्या. तेथून तोफांचा मारा सुरू केला. त्याचवेळी या दोन्ही टेकड्यांवर महाराजांनी किल्ल्याचे बांधकाम चालू केले. वेल्लोरचा वेढा मजबूत करून महाराज काही फौज घेऊन पुढील प्रदेशांत घुसले. मराठ्यांच्या फौजांनी जगदेवगड, कर्नाटकगड, त्रिवादी, आरणी इत्यादी किल्ले, शहरे आणि मुलूख ताब्यात घेतले. शिवाय शहाजीराजांच्या जहागिरीतील गेलेला मुलूखही पुन्हा हस्तगत केला.
दरम्यान महाराजांची त्यांचे बंधू व्यंकोजीराजे यांची तिरुमलवाडी येथील ऐतिहासिक भेटही झाली. बराच कालावधी लोटला. बघता-बघता टेकड्यांवरील किल्ल्यांचे बांधकाम पूर्ण झाले. या दोन किल्ल्यांना महाराजांनी 'साजरा' आणि 'गोजरा' अशी मराठमोळी नांवे दिली.
मराठ्यांच्या वेढ्यामूळे वेल्लोर किल्ल्यात अब्दुल्लाखान आणि त्याचे सैनिक बेजार झाले होते, किल्ल्याबाहेरून होणाऱ्या माराला वैतागले होते. पण तो चिवटपणे लढत होता. महाराजांनी किल्लेदाराला निरोप पाठवला, त्याला काही लाच देण्याचाही प्रयत्नही केला, मात्र तो बधला नाही. महाराजांच्या दक्षिणेतील मोहीमेत फक्त वेल्लोरला निकराची झुंज द्यावी लागली. इतर शंभरावर किल्ले, गडकोट आणि फारमोठा भूप्रदेश त्यांनी सहज जिंकला. अखेर वेल्लोरचा वेढा चालू ठेवून नरहर बल्लाळच्या बरोबर मातब्बर मंडळी ठेवून महाराज महाराष्ट्रात दाखल झाले. त्यानंतर वेल्लोरचा किल्ला ताब्यात आला असा निरोप मिळाला. मराठ्यांनी चौदा महिने या किल्ल्याला वेढा दिला होता, निकराची झुंज दिली होती. किल्ल्याची मजबूती कळण्यासाठीच हा इतिहास सांगणे आवश्यक वाटले.
दक्षिणेकडील सर्व किल्ल्यांमध्ये जिंजी प्रमाणेच हाही सर्वात मजबूत आणि महत्वाचा किल्ला आहे. भक्कम तटबंदी हेच वेल्लोरच्या किल्ल्याचे वैशिष्ट्य आहे. त्याचा परिसर प्रचंड मोठा आहे. किल्ल्याला जवळपास अठरा मोठे बुरुज आहेत. त्या तटबंदीवरून एकावेळी दोन मोठी वाहने जातील एवढी त्याची रुंदी आणि तेवढीच मजबूती आहे.
या किल्ल्यामध्ये जलकंठेश्वराचे मोठे शिवालय आहे. दाक्षिणात्य पद्धतीने बांधलेल्या या मंदिराचे गोपूरही प्रचंड मोठे आहे.
भारतात ब्रिटिशांचा अंमल सुरू झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील सर्व किल्ले तोफा लावून उध्वस्त केले. वेल्लोरच्या किल्ल्याचा त्यांनी सैनिकी कामकाजासाठी वापर केला. टिपू सुलतान, राजा विक्रमसिंह असे शाही कैदी या किल्ल्यामध्ये ठेवले होते. ब्रिटिशांच्या विरोधी सैनिकांत बंडाची ठिणगी याच किल्ल्यात पडली होती.
देशाच्या स्वातंत्र्यानंतर पोलिस प्रशिक्षण व पोलिसांच्या प्रशासकीय कामकाजासाठी या किल्ल्याचा वापर केला आहे. या किल्ल्यामध्ये शासनाने ऐतिहासिक शस्त्रे, वस्तू आणि शिल्पांचे संग्रहालय केलेले आहे. किल्ल्यामध्ये संगीत-ध्वनि-प्रकाश (लाईट - म्युझिक) शो दाखविण्यात येतो. त्यामुळे सायंकाळी स्थानिक पर्यटकांची वर्दळ असते.
या किल्ल्याच्या सभोवती असलेल्या खंदकामध्ये आजही पाणी सोडलेले असते. त्याच्याही बाहेरील फार मोठा परिसर हिरवळ व झाडी लावून सुशोभित केलेला आहे. किल्ल्यामध्ये जागोजाग माहितीचे फलक आहेत. सर्वत्र स्वच्छता व व्यवस्थितपणा आहे. लांब रुंद तटबंदी, बाहेरील खंदकातील स्वच्छ पाणी, त्याबाहेरील हिरवाई आणि मोठाल्या झाडांची दाटी मनाला सुखवून जाते. त्यामुळे तटबंदीवरून फिरताना क्षणभर आपण एखाद्या विशाल उद्यानात फिरायला आल्याचा भास होतो. येथील पुरातत्व विभागाला आणि शासनाला मनापासून दाद दिली पाहिजे.
हा किल्ला व्यवस्थित पाहण्यासाठी अडीच-तीन तास लागतात.
महाराष्ट्राने दैदिप्यमान इतिहास घडविला, मात्र ऐतिहासिक स्मारकांची जपणूक व स्वच्छता याबाबतीत आपण खूप पाठीमागे आहोत, हे प्रकर्षाने जाणवते. डिसेंबर २०१९ मध्ये मला दुसऱ्यांदा हा किल्ला पाहण्याची संधी मिळाली. तेव्हा माझ्याबरोबर एच.ए.मधील बारा सहकारी होते. अर्थातच त्यावेळी अधिक बारकाईने वेल्लोरचा किल्ला पहावयास मिळाला.
किल्ला पाहून झाल्यावर वेल्लोरमध्ये दाक्षिणात्य शैलीतील कडक उकळणारा चहा किंवा अस्सल कॉफीची लज्जत अविस्मरणीय मजा आणते.
दक्षिणप्रांती मराठमोळा साजरा - गोजरा..
वेल्लोर शहराच्या पूर्व दिशेला असलेल्या साजरा आणि गोजरा हे किल्ले पाहण्यासाठी आम्ही सकाळी लवकरच गेलो. अर्थातच हे जुळे किल्ले आहेत. राजमाचीच्या 'श्रीवर्धन व मनरंजन' ची आठवण येते. शहराच्या गल्लीतून रस्ता विचारत आम्ही किल्ल्याच्या पायथ्याला पोहोचलो. पायथ्याशी असलेल्या घरांच्या गर्दीतून अगदी लहानशा गल्लीतून वाट काढत चालावे लागते. तेथून थोड्याफार पायऱ्या चढून गेले की, एक भला मोठा निसरडा खडक पार करावा लागतो. त्यानंतर थोडावेळ मातीची पायवाट अधुन मधून असलेल्या झाडांमधून आपल्याला किल्ल्याकडे घेऊन जाते. खरे तर ही टेकडी तशी फार उंच नाही.
मात्र अर्धा डोंगर चढून आल्यावर उजव्या हाताने सरळ पुढे जावे लागते, हे आंम्हाला समजले नाही. आम्ही डावीकडे दिसलेल्या एका पाऊलवाटेने वरती चढत गेलो. दोन किल्ल्यांमध्ये असलेल्या खुबीत प्रवेशद्वार असेल असाही एक अंदाज होता. तसे आम्ही थेट तटबंदी पर्यंत गेलो. जवळपास कुठेही दरवाजा किंवा आतमध्ये जायला वाट दिसेना. कोणालाही निश्चित माहिती नसल्यामुळे समोर तटबंदी असूनही प्रवेशद्वार मिळत नव्हते. किल्ल्यात वाढलेले गवत आणि तटबंदीच्या बाहेरूनही वाढलेले गवत त्यामूळे काय कुठे हेच समजत नव्हते.
आम्ही सर्व सहा जण प्रवेशद्वाराचा शोध घेत होतो. अखेर तटबंदी चढून जाण्याचा विचार आम्ही केला. एके ठिकाणी तटबंदीशेजारी एक मोठा दगड होता. त्यावरून लखन घाडगे तटबंदीवर चढला, आम्ही सर्वांनी त्याला आधार दिला. लखनच्या उंचीमूळे त्याला ते शक्य झाले, इतरांना ते अवघड होते. दुसऱ्या ठिकाणी तटबंदीला लागूनच एक झाड वाढलेले होते, त्या झाडाच्या आधाराने तटबंदीवर जाण्याचा एक पर्याय पुढे आला. पण ते धोक्याचे ठरले असते. लखनने तटबंदीवरून पाहून सांगितले की, प्रवेशद्वार बरोबर विरूद्ध दिशेला आहे. म्हणजे आम्ही होतो पश्चिमेकडे आणि दरवाजा होता पूर्वेकडे !
अखेर सुरक्षिततेच्या दृष्टीने आम्ही अर्ध्यापर्यंत टेकडी उतरून खाली आलो आणि प्रवेशद्वाराच्या दिशेने उजवीकडून पुढे चालत गेलो. अनोळखी भागात तेही क्वचितच कोणाचा वावर असलेल्या ठिकाणी माघार घेणेच योग्य असते. एका घळीतून पुन्हा चढण सुरु झाली आणि आम्ही प्रवेशद्वारावर पोहोचलो. याठिकाणी पहिले प्रवेशद्वार आणि आतील बाजूस काटकोनात दुसरे प्रवेशद्वार बांधण्यात आलेले आहेत या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे खूप कमी जागेमध्ये याच्या वरती बांधकामे करण्यात आलेली आहेत. किल्ल्याच्या सर्वोच्च भागात गेल्यानंतर वेल्लोर शहर तर दिसतेच, त्याचबरोबर शहराच्या बाहेर कित्येक किलोमीटरचा परिसर नजरेच्या टापूत येत होता. झाडाच्या सुकलेल्या फांदीच्या दोन काठ्या हाती घेऊन आम्ही गवतातून वाट शोधून एकएक बाजू पाहत होतो. गडावरती रुंद भिंतींचे दोनमजली इमारतीचे अवशेष पाहण्यास मिळाले. उन्हाचा तडका होता, मात्र गार हवेचे झोत येत होते.
मुख्य इमारतीच्या बाहेरील भागात एक दगडी पायऱ्यांचा जिना जमिनीत उतरलेला दिसला. विजेरीच्या सहाय्याने आम्ही खाली उतरून गेलो. त्या पायऱ्या आंम्हाला किल्ल्यामध्येच असलेल्या विहीरीत घेऊन गेल्या. अप्रतिम मजबूत सुबक आणि घडीव चिरेबंदी बांधकाम केलेली ती विहीर पहिल्या पायरीपासून शेवटपर्यंत सुस्थितीत आहे. विहीरीतील बांधकामात श्रीगणेश, मारुती, शिवलिंग यांची शिल्पे तसेच काही फुलांची शिल्पेही दगडात कोरलेली दिसली. किल्ले बांधताना पिण्यासाठी पाणी हवेच, पण तेही इतके सुरक्षित पाहून विशेष वाटले.
मुख्य इमारतीच्या बाहेरील भागात एक दगडी पायऱ्यांचा जिना जमिनीत उतरलेला दिसला. विजेरीच्या सहाय्याने आम्ही खाली उतरून गेलो. त्या पायऱ्या आंम्हाला किल्ल्यामध्येच असलेल्या विहीरीत घेऊन गेल्या. अप्रतिम मजबूत सुबक आणि घडीव चिरेबंदी बांधकाम केलेली ती विहीर पहिल्या पायरीपासून शेवटपर्यंत सुस्थितीत आहे. विहीरीतील बांधकामात श्रीगणेश, मारुती, शिवलिंग यांची शिल्पे तसेच काही फुलांची शिल्पेही दगडात कोरलेली दिसली. किल्ले बांधताना पिण्यासाठी पाणी हवेच, पण तेही इतके सुरक्षित पाहून विशेष वाटले.
आता भूकेने लक्ष वेधून घेतले. किल्ल्यावरती एका झाडाच्या सावलीत जागा साफ करून आम्ही बसलो. घरून नेलेली शिदोरी साजरा किल्ल्यावर गार हवेच्या झुळूकीत आम्ही संपविली.
याच किल्ल्याच्या शेजारील डोंगरावर गोजरा किल्ला आहे, त्याची उंची याच्या पेक्षा थोडी कमी आहे. त्यावरही काही बांधकाम केलेले आहे. त्या किल्ल्यामधील बांधकामात एकेठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारुढ शिल्पाकृती कोरलेली असल्याचे आंम्हाला तिसऱ्या दिवशी समजले. दुर्गमहर्षी श्री प्रमोदभाऊ मांडे यांनी श्रीहरीला फोनवरून हे सांगितले, तेव्हा आम्ही कर्नाटकात आलेलो होतो ! एवढ्या दूरवर जावूनही महत्वाची बाब नजरेतून सुटली की, मनाला खूप हळहळ वाटते. ती हुरहूर अजूनही मनाला लागलेली आहे.
वेल्लोरच्या किल्ल्याला वेढा घातलेला असताना, त्याचवेळी लगोलग त्याच गावात दुसरे किल्ले बांधावेत, ही सहज साधी बाब नव्हे. असे अनेक किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिणेकडे नव्याने बांधलेत. जिंकलेल्या किल्ल्यांच्या दुरुस्तीची कामे करून घेतली. जागोजाग मुलकी आणि लष्करी अधिकारी नेमले. फार मोठ्या प्रमाणात महसूल निर्माण केला. जिंजी ते तंजावर या सुपिक भूप्रदेशात भाताचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात होते. स्वराज्याचा पाया सर्व भारतभर मजबूत करण्यासाठी चाललेल्या प्रयत्नांचा तो कृतीशील आविष्कार होता. विशेषतः मावळ्यांना डोंगरी किल्ल्यांची सवय होती. वेळप्रसंगी डोंगरी किल्ल्यांच्या आधारे पराक्रम गाजवता येणार होता. दक्षिणेत डोंगरी किल्ले बांधण्यामागे तोही एक विचार होता.
वेल्लोर, साजरा, गोजरा या किल्ल्यांच्या रुपाने छत्रपती शिवरायांच्या आणि त्यांच्या लढाऊ मावळ्यांच्या शौर्याची गाथा डोळ्यांमध्ये साठवत आम्ही पुढील प्रवासाला निघालो.
तिरुवन्नामलाई (अरुणाचलेश्वरम) मंदिरास भेट :
तिरुवन्नामलाई हे मद्रास प्रांतातील (तामिळनाडू) सुप्रसिद्ध शिवालय. सुमारे एक हजार वर्षांपूर्वी बांधलेले अरुणाचलेश्वरम शिवमंदिर सुप्रसिद्ध आहे. त्याच्यासह पेरूमल मंदिर आदिलशाही अंमलदारांनी अनेक वर्षे बंद करून, त्याचे मशिदीत रुपांतर केले होते. महाराजांकडे ही कैफियत आल्यानंतर जिंजीवरून महाराज थेट तिरुवन्नामलाईस गेले. त्यांनी शिवालय मुक्त केले. तेथील दोन्ही मंदिरांमध्ये शिवलिंगे स्थापित केली. तसेच या प्रचंड मोठ्या मंदिरामध्ये भव्य गोपुर बांधण्याची आज्ञा केली. या मंदिराच्या समोरील उंच डोंगरावर कार्तिक दीपोत्सवासाठी महाराजांनी प्रोत्साहन दिले आणि तशी व्यवस्था लावून दिली. भव्य-दिव्य सात गोपुरांनी बहरलेले हे मंदिर म्हणजे एखादा किल्लाच आहे. आजही तेथील उंच टेकडीवर कार्तिकातील दिपोत्सव अव्याहत सुरू आहे. आम्ही आवर्जून या तिरुवन्नामलाई जाऊन अरुणाचलेश्वरम मंदिरास भेट दिली.
खरे तर दक्षिण मोहिमेत छत्रपती शिवरायांनी श्रीशैल्यम, तिरुपती बालाजी, वृद्धाचलम अशा अनेक मंदिरांनाही भेटी दिल्या, दानधर्म व आवश्यक व्यवस्था करून दिल्या.
मराठ्यांच्या पराक्रम व शौर्याची गाथा सांगणाऱ्या व इतिहासाला कलाटणी देणाऱ्या दक्षिणेतील या ऐतिहासिक किल्ल्यांच्या बाबतीत तिकडील जनतेमध्ये फारशी आस्था किंवा आवड दिसून येत नाही, हे माझ्या दोन्ही भेटींमध्ये मला जाणवले. वेल्लूरचा किल्ला शहरात असल्याने केवळ त्याठिकाणी असलेले जलकंठेश्वराचे मंदिर आणि संग्रहालय पाहण्यासाठी नागरिक जातात. त्यांना इतिहासाविषयी फारशी आवड दिसली नाही. साजरा गोजरा हे किल्ले तर शहराला लागून असूनही तिकडे स्थानिक फारसे कोणी फिरकतही नाहीत !
आमच्या "दक्षिण दिग्विजय दुर्गभ्रमंती मोहिमेत" सर्वात शेवटी आम्ही तंजावरच्या मराठी तख्ताला भेट देण्यासाठी गेलो. छत्रपती शिवाजी महाराजांचे बंधू व्यंकोजीराजांनी निर्माण केलेले तंजावरचे मराठा तख्त ! ते राजवैभव, तंजावरचा राजवाडा, तेथील संस्कृती संवर्धन, सरस्वती महल ग्रंथालय, छत्रपती शिवरायांच्या 'शिवभारत' ग्रंथाची हस्तलिखित प्रत, लाखो ऐतिहासिक कागदपत्रे, जगातील अनेक प्रकारची लाखो पुस्तके, विशाल बृहद्देश्वर मंदिरातील दगडी भिंतीवर कोरलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे मराठीतील चरित्र..! तंजावरच्या गादीचे विद्यमान वारसदार श्री शिवाजीराजे भोसले यांची झालेली भेट आणि केलेली चर्चा..!
या सर्व गोष्टी एका लेखात सामावणाऱ्या नाहीत. ते यथावकाश विस्तृत ग्रंथातून मांडावे लागेल.
तंजावरहून परत येताना आम्ही कर्नाटक मधील सिराचा कोट पाहिला आणि चेन्नागिरी किल्लाही पाहिला. आकाराने लहान असलेला आणि केवळ दगडगोट्यांत बांधूनही सुस्थितीत असलेला हा किल्ला निश्चितच वैशिष्ट्यपूर्ण आहे.
कर्नाटकातून परत येताना चित्रदुर्ग किल्लाही पाहण्याचा आमचा विचार होता. कला, संस्कृती, इतिहास, शौर्य आणि उत्कर्ष जपणारा हा डोंगरी किल्ला अतिभव्य आहे. तो आमच्या नियोजनात पाहून झाला नाही. मात्र किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर जावून पुढे गेलो. किल्ल्याशेजारील रस्त्याने प्रवास करताना या किल्ल्याची भव्यता नजरेत भरून घेतली.
दिनांक तेवीस जानेवारी सोळाशे चौसष्ट रोजी कर्नाटकातील होदेगिरीच्या जंगलात महाराजा शहाजीराजे यांचा अपघाती मृत्यू झाला होता. परतीच्या प्रवासात चोवीस जानेवारी २०१८ रोजी होदेगिरी येथे त्यांच्या समाधीस्थळी आम्ही पोहोचलो. त्यांच्या समाधीला पुष्प अर्पण करून आम्ही पुण्याकडे निघालो.
ही मोहिम करताना स्वतंत्र वाहन असेल तर अधिक सोयीचे ठरते. सर्वत्र रस्ते खूप चांगले आहेत, मात्र भाषेची अडचण त्रासदायक वाटते. अगोदर वेल्लोर, तेथून पुढे तिरुवन्नामलाई आणि मग जिंजीला जावे. प्रत्येक शहरात मुक्काम करता येईल. जिंजीचे किल्ले पाहून तंजावरला जावे. तंजावरसाठी दोन दिवस आवश्यक आहेत. तंजावर नजिकच त्रिचीचा किल्ला पाहता येईल. दाक्षिणात्य खाद्यपदार्थ आणि लज्जतदार चहाचा आस्वाद जरुर घ्यावा.
पुणे, वेल्लोर, तिरुवन्नामलाई, जिंजी, तंजावर, बंगलोर, कोल्हापूर मार्गे पुणे असा सुमारे २७०० कि.मी.चा आमचा प्रवास झाला.
( मोशी, ता.हवेली, जिल्हा पुणे )
email : atborhade@gmail.com
mobile : 9881301339
* * *












����
ReplyDeleteअप्रतिम शब्दांकन, कधीही वाचनात न आलेली माहिती किंवा इतिहास प्रत्यक्ष आपल्याला पाहायला व अनुभवायला मिळाला हेच मोठे थोर भाग्य
ReplyDeleteतुमचं लिखाण आणि अभ्यास यातुन खुप काही छान शिकण्यासारखं आहे सर
ReplyDelete👌👌