शिवरायांच्या दक्षिण मोहिमेच्या पाऊलखुणा : जिंजी

शिवरायांच्या दक्षिण मोहिमेच्या पाऊलखुणा : 
जिंजीचे किल्ले : राजगिरी, कृष्णगिरी आणि चंद्रायण 

         मनात योजलेल्या काही गोष्टी वर्षानुवर्षे पुर्णत्वास जात नाहीत आणि वेळ आली की नकळत घडूनही जातात, प्रत्येकाच्या आयुष्यात असे अनुभव येतच असतात.  छत्रपती शिवरायांच्या दक्षिण दिग्विजयाचे कुतूहल अनेकांच्या मनात असेल, तसे माझ्याही मनात होते. कसे असतील तिकडचे किल्ले, कसे लढले असतील महाराज, भाषेची अडचण आली असेल का ? त्यावर कशी मात केली असेल ? दक्षिणेकडील किल्ले आणि प्रदेश जिंकल्यावर तिकडे व्यवस्था कशी लावली असेल ? असे अनेक बाळबोध प्रश्न मागिल अनेक वर्षांपासून माझ्या मनात घर करून होते. 

      सन १६७४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर त्यांनी स्वराज्याच्या विस्तारासाठी सन १६७६-७८ या दोन वर्षांच्या काळात अतिशय नियोजनबद्ध अशी "दक्षिण दिग्विजय मोहिम" आखली होती. 
सुमारे बावीस महिन्यांच्या या मोहिमेमुळे स्वराज्याचा मोठा विस्तार झाला. स्वराज्याच्या सीमा खऱ्या अर्थाने दक्षिणेत दूरपर्यंत विस्तारल्या. मोठा मुलूख सामिल झाल्याने स्वराज्याचे बळ वाढले. यामध्ये विशेषत्वाने नोंद घ्यावी लागेल ती स्वराज्याची तिसरी राजधानी.. अर्थात जिंजीच्या किल्ल्याची..! ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये काही ठिकाणी या किल्ल्याचा "चंदीचा किल्ला" असाही उल्लेख आहे. तामिळी लोक याला "सेंजी" किंवा "चेंगी" असेही म्हणतात.

      दक्षिण मोहिमेत महाराजांनी जिंजी, वेल्लोर या दोन बळकट किल्ल्यांसह आसपासचा वीसबावीस लाख होन उत्पन्नाचा मुलूख व सुमारे शंभर किल्ले काबीज केले होते. त्यानंतर स्वराज्यात राज्यकारभाराच्या सोयीच्या दृष्टीने एकूण चौदा प्रांतांची रचना केलेली होती. (संदर्भ : कृ.अ.केळूसकर लिखित शिवचरित्र)

      त्यातील प्रांत वतनगड, प्रांत फोंडे बिदनूर, प्रांत श्रीरंगपट्टण, प्रांत कर्नाटक, प्रांत वेलूर, प्रांत चंदी म्हणजे स्वराज्यातील निम्म्याहून अधिक मुलूख आताच्या कर्नाटक, गोवा, तेलंगणा, आंध्र, तामिळनाडू इत्यादी राज्यांत समाविष्ट आहेत. यातील प्रमुख किल्ले आणि त्या भोवतालचा परिसर आपण एकदातरी पहायला हवा. तिरुवण्णामलाई आणि इतर अनेक मोठी मंदिरे यौवनी सत्ताधिशांनी वर्षानुवर्षे बंद केलेली होती. महाराजांनी ती मंदिरे जनतेसाठी खुली करून, योग्य ती व्यवस्था लावली. तिरुपती बालाजी मंदिरालाही महाराजांनी भेट दिल्याची इतिहासात नोंद आहे. तसेच महाराजांचे बंधू व्यंकोजीराजे यांनी निर्माण केलेले तंजावरचे राज्य, तेथील मराठ्यांची गादी या ठिकाणीही एकदा जायला हवे, तंजावरमधील मराठी संस्कृती, तेथील राजप्रासाद, बृहद्देश्वर मंदिरात दगडी भिंतींवर कोरलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र, श्रीशैल्यम मधील छत्रपती शिवरायांचे मंदिर अशा ठिकाणांना भेटी दिल्या पाहिजेत, असे मला सतत वाटायचे. जवळजवळ १९९०-९१ पासून मी याबाबतीत ठरवित होतो. पण योग येत नव्हता किंवा संधी मिळत नव्हती. 

      सुदैवाने अचानकपणे ती संधी व वेळ आली, जानेवारी २०१८ मध्ये ! एव्हरेस्टवीर श्रीहरी तापकीर यांच्या पुढाकाराने, सागरमाथा गिर्यारोहण संस्थेच्या वतीने स्वतः श्रीहरी, सुमित दाभाडे, पांडुरंग शिंदे, लखन घाडगे, कामेश जाधव आणि मी असे सहाजण छत्रपती शिवरायांच्या या दक्षिण मोहिमेच्या प्रमुख  ठिकाणांना भेटी देण्यासाठी गेलो. 

   सहा-सात दिवसांच्या या आमच्या मोहिमेत आम्ही जिंजीच्या संकुलातील कृष्णगिरी, राजगिरीसह, वेल्लोरचा किल्ला, साजरा-गोजरा हे जुळे किल्ले,  तंजावर येथील भव्य राजवाडा, सरस्वती महल ग्रंथालय, शिवगंगादुर्ग अर्थात बृहद्देश्वर मंदिर, तिरुवण्णामलाई मंदिर, तसेच कर्नाटकातील सिराचा भुईकोट, चेन्नागिरीचा किल्ला, होदेगिरी येथील शहाजी राजांची समाधी,  इत्यादी ठिकाणी भेटी दिल्या. तंजावरच्या भेटीमध्ये तेथील मराठा गादीच्या विद्यमान वारसांनाही आम्ही भेटलो. या प्रत्येक ठिकाणची सखोल माहिती घेतली आणि छत्रपती शिवरायांनी बुध्दीचातुर्याने, शौर्य आणि पराक्रमाने मिळविलेल्या मराठी दौलतीला डोळे भरून पाहिले आणि राजांच्या त्या पाऊलखुणांना मुजरा करून आलो.

       योगायोग असा की, डिसेंबर २०१९ मध्ये मला पुन्हा त्या सर्व ठिकाणी जाण्याची व अभ्यासाची संधी मिळाली. एच.ए. मधील माझ्या बारा सहकाऱ्यांसह मी जिंजी, वेल्लोर, तिरुवण्णामलाई, तंजावर इत्यादी ठिकाणी पुन्हा गेलो. लागोपाठ झालेल्या दोन भेटींमुळे मला प्रत्येक ठिकाणी पहिल्या भेटीपेक्षा अधिक तपशिलवार माहिती घेता आली. त्यामुळेच आमची ही दक्षिण मोहिम शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केलाय.

" स्वराज्याची तिसरी राजधानी : जिंजीचे किल्ले "

बेलाग व अभेद्य : राजगिरी 

       छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेतील सर्वात महत्त्वाची कामगिरी होती जिंजीच्या किल्ल्याची. पुढील काळात इतिहासाच्या वावटळीत छत्रपती संभाजी राजेंच्या बलिदानानंतर, छत्रपती राजाराम राजेंनी जिंजी ही स्वराज्याची राजधानी केली. सन १६८९ ते सन १६९८ या कालावधीत स्वराज्याचा कारभार जिंजीतून पाहिला. त्यांनी तब्बल नऊ वर्षे मोघलांशी संघर्ष केला आणि संपुष्टात येणारे स्वराज्य हिंमतीने राखले. स्वराज्याची राजधानी म्हणून सुरुवातीला राजगड, नंतर रायगड आणि तिसरी राजधानी म्हणून जिंजीचे महत्त्व तितकेच महत्त्वाचे आहे.

      जिंजी हे ठिकाण तामिळनाडू राज्यात, दक्षिण आर्कट जिल्ह्यातील एक शहर आहे. तिरुवण्णामलाई - जिंजी हा महामार्ग या किल्ल्यामधूनच जातो. जिंजीचे एकूण पाच किल्ले आहेत. राजगिरी, कृष्णगिरी, चंद्रगिरी उर्फ चिक्कीली इत्यादी. त्यापैकी राजगिरी हा सर्वात प्रमुख मोठा व उंच किल्ला. भव्य आकाराचे मोठमोठे दगडच जणू एकावर एक रचून ठेवावेत, अशी येथील डोंगरांची रचना. त्यावर केलेली तटबंदीची भक्कम बांधकामे. खालपासून वरपर्यंत प्रत्येक टप्प्यावर मिळून एकूण पाच तटबंद्या आणि तेरा दरवाज्यांनी किल्ला मजबूत आणि बेलाग केलेला. त्यामध्ये निसर्गाने दिलेली साथ, डोंगराच्या खांद्यावरील गर्द झाडींनी किल्ल्याच्या दुर्गमतेत भर पडलेली. मुख्य किल्ल्यावर रंगास्वामी मंदिर, खलबतखाना, धान्याची कोठारे, राहण्याचा वाडा, टेहळणी चौक्या, पाण्याची टाकी, हवेशीर मनोरा अशा अनेक वास्तू आहेत. त्या सर्व आम्ही समक्ष जावून पाहिल्या. राजगिरीच्या समोर उभे राहून एक नजर टाकताच आपल्याला सर्वप्रथम  महाराष्ट्रातील देवगिरी किल्ल्याची आठवण येते.

       जिंजी शहरातून या रस्त्याने एक कि.मी. अंतर पुढे  आलो की उजव्या बाजूच्या टेकडीवर दिसतो तो कृष्णगिरी, डाव्या बाजूस दिसतो तो चंद्रायण आणि समोरच पश्चिमेस दिसणारा, मुख्य रस्त्याच्या डावीकडे उंच डोंगरावर असलेला राजगिरी किल्ला. या तीनही किल्ल्यांच्या भोवती पुन्हा तटबंदी आहेत. जिंजी शहरातून गेल्यावर समोरच पश्चिमेस दिसणारा, उंच डोंगरावर वसलेला बेलाग आणि अभेद्य राजगिरी किल्ला आपल्याला जणू खुणावत असतो. या तीन किल्ल्यांना एकत्रित गुंफणारी तटबंदी फोडून जिंजी- तिरुवण्णामलाई (एन.एच.७७) महामार्ग गेला आहे. 

     रस्त्यापासून डावीकडे वळून आत आले की, किल्ल्याच्या सखल भागातील हिरवीगार भातशेती आपले लक्ष वेधून घेते. पुढे काही अंतर चालत आल्यावर डाव्या बाजूस एक पुरातण शिवमंदिर आहे. मोठमोठ्या पाषाण शिळांवर तरलेले हे मंदिर पाहूनच पुढे जावे. पुरातत्व विभागाने याची निगा व स्वच्छता ठेवलेली दिसते. भोवताली हिरवळ राखलेली आहे. पुढे गेल्यावर उजव्या मजबूत बाजूची तटबंदी आणि मोठमोठे बुरुज दिसतात. आणखी पुढे गेल्यावर डाव्या बाजूस एक मशिद दिसते. सादत उल्लाह खान मशिद. मशिदीशेजारून जाणारा रस्ता किल्ला परिसरातीलच वेंकटरमण मंदिराकडे आणि पूर्वीच्या पाँडिचेरी गेटकडे जातो. आपण तिकडे न जाता मशिदीच्या विरुद्ध दिशेला, म्हणजे रस्त्याच्या उजवीकडे वळायचे. खंदकावर बांधलेला पूल ओलांडून किल्ल्यामध्ये जाणारे पहिले प्रवेशद्वार आपले स्वागत करते. याचठिकाणी आपण दुसरी तटबंदीही ओलांडत असतो.

     महाराष्ट्रात किल्ले पहायचे असतील तर आपण अगदी सकाळीच सुरुवात करतो. त्याच सवयीप्रमाणे लवकरच उरकून आम्ही गेलो, पण इथे पुरातत्व विभागाने सकाळी नऊ ते पाच अशी वेळ ठेवलेली आहे. त्यामुळे आमच्याकडे वेळ होता. तोपर्यंत वेंकटरमण मंदिराककडे जावून यावे म्हणून गेलो, तर तेही नऊ वाजताच उघडले जाते. मग थोडावेळ त्यासमोरच्या हिरवळीवर गप्पा मारीत वेळ काढला, महाराजांच्या दक्षिण दिग्विजयाची चर्चा केली आणि पुन्हा राजगिरीच्या प्रवेशद्वारावर आलो. 

      राजगिरीचे हे दुसरे प्रवेशद्वार गोमुखी संरक्षण रचनेप्रमाणे बांधलेले आहे. रस्त्यावरून थेट सरळ प्रवेशद्वारात जाता येत नाही. या परिसरात वानरसेनाही मोठ्या प्रमाणात आहे. या प्रवेशद्वारातच तिकीट खिडकी आहे. पिण्याच्या पाण्यासाठी कुलरची व्यवस्था आहे. येथूनच पाण्याच्या बाटल्या भरून घेणे श्रेयस्कर ठरते. याठिकाणी जुन्या ऐतिहासिक व पुरातन मुर्त्या, शिल्प, काही विरगळ इत्यादी व्यवस्थित मांडून प्रदर्शनाची मांडणी केलेली आहे. ती पाहत पाहतच आपण किल्ल्यामध्ये प्रवेश केलेला असतो. याठिकाणी आणखी एक प्रवेशद्वार आहे. येथून डावीकडे काही अंतर गेल्यावर मोठा गोलाकार टेहेळणी बुरुज आहे. 

    या चवथ्या प्रवेशद्वारातून आतमध्ये आलो की, राजगिरीच्या पायथ्यापासूनच किल्ल्याची अनेक बांधकामे पहावयास मिळतात. उजवीकडे सुप्रसिद्ध कल्याण महाल ही सात मजली इमारत आहे. त्यातील पुष्कर्णीचे बांधकाम व स्थापत्यशास्त्र वैशिष्ट्यपूर्ण आहे. ती पाहून पुन्हा रस्त्यावर यावे लागते. डावीकडे काही अधिकाऱ्यांची निवास किंवा कचेरीचे बांधकाम दिसते.

      खरे तर किल्ल्याचा हा सपाटीचा भूभाग फार महत्वाचा आहे. यालाच बालेकिल्ला म्हणता येईल. थोडेसे पुढे आलो की, उजवीकडे राजसदर दिसते. एका मोठ्या दगडी ओट्यावर, भला मोठा पाषाणाचा लोड किंवा तख्ख्या दिसतो. त्यासमोर दरबाराची रचना दिसते. या इमारती पडलेल्या किंवा पाडलेल्या असल्या तरी दगडी बांधकामातील उरलेले अवशेष सर्व इतिहास डोळ्यांसमोर उभे करतात. आम्ही त्या सिंहासनाच्या किंवा सदरेच्या जागेला नतमस्तक झालो. प्रत्येक क्षण मोगलांशी झुंजण्यात गेलेल्या छत्रपती राजारामांचे हे तख्त, खरे तर एका महान कर्तृत्वाची साक्ष आहे... त्या काळातील वेगवान राजकीय वावटळीत इतिहासाची पानेच विसकटली आणि या पराक्रमी राजाचे कर्तृत्व कायम काळोखातच राहिले.
        या सदरेला लागूनच डावीकडे काहीशा उंचीवर राजवाड्याचे भक्कम अवशेष दिसतात. राजवाड्यातून राजसदरेवर येण्यासाठी अंतर्गत दगडी जिना आहे. या राजवाड्यासमोरच अश्वशाळा किंवा घोड्यांची पागा आहे. खास राखीव शिबंदी येथे तैनात असावी. तसेच समोर निवडक सैन्याची निवासस्थाने, बराक्या यांचीही बांधकामे दिसतात. ही सर्व बांधकामेही सुस्थितीत आहेत. 

    आपण पुन्हा रस्त्यावर येतो. या परिसरात मोठमोठे तीन-चार वृक्ष आहेत. त्याखाली सावलीत बसण्यासाठी ओटे बांधलेले आहेत. अवतीभवती दोन-तीन एकर जागेत सुरेख हिरवळ जपलेली आहे. स्थानिक पर्यटक या हिरवळीपर्यंतच येतात, किल्ला पहायला सहसा कोणी जात नाहीत. येथील हिरवळ, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, परिसराची स्वच्छता पाहून कौतुक तर वाटतेच. पण आश्चर्य वाटते ते याचे, की महाराष्ट्रात हा पुरातत्व विभाग कुठे लुप्त झालाय समजत नाही. याठिकाणी प्रत्येक ठिकाणी दिशादर्शक पाट्या लावलेल्या आहेत.

     मुख्य रस्त्याच्या डावीकडे आपल्याला हत्तीतलाव पहावयास मिळतो. या चौकोनी तलावाच्या चौफेर आकर्षक, कमानयुक्त व नक्षीदार दगडी बांधकाम केलेले आहे. हत्तींना पाण्यात उतरण्यासाठी खास मार्गिका तयार केलेली आहे. हा तलाव आजही स्वच्छ पाण्याने भरलेला असतो. येथून पुढे किल्ल्याच्या दिशेने पुढे पुढे जावे लागते.

  याठिकाणी भव्य तालिमखाना किंवा व्यायामशाळा राजाराम महाराजांनी बांधल्याचे सांगतात. त्यापुढे बारुदखाना आहे. त्याच्याही पुढे अद्यापही  सुस्थितीत असलेली प्रचंड मोठी धान्याची कोठारेही आहेत. ही सर्व बांधकामे खुप आखीव रेखीव आणि कलाकुसरीत केलेली दिसतात.   

     या परिसरातील तटबंदीच्या बाहेरील बाजूस पाण्याचे दोन तलाव आहेत. त्यासमोर मारुतीचे मंदिर आहे. त्यासाठी प्रवेशद्वाराबाहेरून रस्ता आहे.  राजगिरी किल्ल्याच्या मुख्य दरवाजापासून अखेरपर्यंत प्रत्येक वास्तू पहावयाची तर संपूर्ण दिवस लागतो. किल्ला म्हणून भव्यता आणि बेलागपणाही निश्चितच आहे. वेळेचे व्यवस्थित नियोजन केले तर, राजगिरी व कृष्णगिरी एका दिवसात पाहता येतात. आमच्या पहिल्या भेटीत आम्ही ते दोन्हीही पाहिले, अर्थात थोडी घाई होतेच. त्यापेक्षा एक पुर्ण दिवस राजगिरीला देणेच सोईस्कर ठरेल.

  सपाटीवरील हा बालेकिल्ला पाहून डोंगरावरील किल्ल्यावर जाण्यासाठी भक्कम पायऱ्यांची वाट तयार केलेली आहे. पायऱ्या चढायला तशा सोप्या आहेत. एक-दोन ठिकाणी थोडी सरळ चढण आहे. मात्र मोठमोठे खडक असल्याने उन्हाने परिसर तापतो. मोठ-मोठ्या अजस्त्र दगडगोट्यांची जणू रास पडावी, असे ते खडक एकावर एक पडलेले आहेत. अर्थात रस्त्यावर सर्वत्र सावली देणारी झाडी आहेत. दोन्ही बाजूंस कुरू अथवा कहाडळ्याची झाडी आहेत. त्यातून ही वाट आपल्याला किल्ल्यावर घेऊन जाते. त्यामुळे चढण सुखावह वाटते.

      आम्ही दुसऱ्यांदा गेलो तेव्हा, प्रथम डोंगरी किल्ला पाहून घेतला, त्यानंतर सपाटीवरील वास्तू पाहिल्या. जवळपास सहा-सात दरवाजे ओलांडून ही वाट वर जाते. देवगिरीच्या किल्ल्यालाही असेच  एकापाठोपाठ अनेक दरवाजे आहेत. सातवा दरवाजा ओलांडून थोड्या पायऱ्या चढून वरती आले की, एक सपाट टप्पा आहे. येथे एक तोफ आहे. या तोफेसह छायाचित्र घेण्याचा प्रत्येकाला मोह होतोच ! शिवाय येथून खालील बालेकिल्ला आणि आजूबाजूचा परिसर दृष्टीक्षेपात घेता येतो. राजगिरी ते कृष्णगिरी आणि कृष्णगिरी ते चंद्रायण अशी संपूर्ण तटबंदी, खंदक आणि जागोजाग असलेले बुरुज येथून एका दृष्टीपथात पाहता येते. सातमजली कल्याणमहल आणि इतर वास्तूही नजरेत भरतात. यापुढील मोठ्या व उंच भिंतीला आणखी एक प्रवेशद्वार किंवा दरवाजा आहे. आतमध्ये देवड्या आहेत. वाटल्यास क्षणभर विसावता येते. 

        येथून वरच्या टप्प्यात चढून आल्यावर डोंगराचा उभा कडाच समोर आहे. मात्र डावीकडे वळून सपाट रस्त्याने दाट जंगलातून ही वाट गडाकडे जाते, या भागात मोठमोठे अनेक प्रकारचे वृक्ष आपल्याला दिसतात. गोलाकार खडकांमुळे दगडांच्या मध्ये अनेक विवरे किंवा बोगदे तयार झालेले दिसतात. येथे उजवीकडे थोडेसे आत एक मंदिर आहे. ते पाहून दुसऱ्या मिनिटात रस्त्यावर यावे. याठिकाणी चुकामूक झाली तर मनस्ताप देणारी ठरू शकते. म्हणून आपापल्या गटाला किंवा ग्रुपला सोडू नये. झाडींच्या वाटेने पुढे जाताना उजवीकडे एक छोटेखानी मंदिर आहे.

       येथून डावीकडे झाडींतून एक वाट जाते. याठिकाणी एक नैसर्गिक विवर किंवा बोगदा आहे. मोठमोठया गोलाकार खडकांतून सहज आतमध्ये चालत जाता येते. खाली पाणी साचलेले आहे, तसे ते स्वच्छ पाणी आहे.  कदाचित तो पाण्याचा झराही असू शकतो. या बोगद्यात उतरायला पायऱ्या बांधलेल्या आहेत, तरिही याची भीषणता किंवा भयाणता जाणवते. असे म्हणतात या विवरातून गडाबाहेर जाणारी गुप्तवाट किंवा चोरवाट आहे. तेथून पुन्हा रस्त्यावर यावे लागते. थोडे पुढे आल्यावर पुन्हा डावीकडे झाडांच्या गर्दीत निवासस्थानांची किंवा वाड्यांचे पडलेले  बांधकाम दिसते. याच झाडांमध्ये पाण्याचा एक तलाव असल्याचे सांगण्यात आले. 

     येथून पुढे एक प्रवेशद्वार आहे, देवडीही आहे. याला लागूनच पुन्हा काही पायऱ्या चढून जावे लागते. पुढे डोंगराच्या कड्याला समांतर असा पुन्हा एक दरवाजा लागतो. तो ओलांडण्याआधी क्षणभर थांबून थंड हवेची झुळूक घेतली की मनाला ताजेतवाणे वाटते..या पायऱ्या चढून येताना काय झाले समजले नाही. पण काही वानरे चिर्रचिर्र करीत आमच्या मागे लागली. अशावेळी घाबरून पळून चालत नाही, आम्ही बाराजण होतो. सर्वजण जागेवर थांबून मागे वळून पाहिले. वानरेही होती तिथेच थांबली. आमच्या वायकरांनी बाजूला पडलेला एक वाळलेल्या फांदीचा पडलेला फोक हातात घेतला आणि आम्ही पुढे निघालो. वानरांचे ओरडणे थांबले, पण पुढील दरवाजापर्यंत ते पाठीमागे येतच राहिले.

       या दरवाजाने आत गेल्यावर पायऱ्या खाली उतरून सपाट वाट लागते.याठिकाणी किल्ल्याला तिहेरी तटबंदी आहे. किल्ल्याच्या पूर्व दिशेने सुरु केलेली चढाई, वरती आल्यावर आपल्याला डावीकडे, म्हणजे दक्षिणेकडे घेऊन जाते. पुन्हा पश्चिमेकडील बाजूने किल्ल्याला जवळजवळ पुर्ण वेढा घालूनच आपण किल्ल्यामध्ये प्रवेश करतो. त्याआधी दोन दरवाजे ओलांडून आणि थोड्या पायऱ्या चढून आपण वरती येतो. मुख्य बालेकिल्ल्यात प्रवेश करण्यापूर्वी निसर्गतःच एक खोल दरी निर्माण झालेली आहे. याठिकाणी उंच दगडी बांधकाम करून लोखंडी पूल बांधण्यात आलेला आहे, पूर्वी येथे लाकडी पूल होता, असे जाणकारांनी सांगितले. पूलावर जाण्यासाठी सरळसोट दगडी जिना बांधलेला आहे. पुलाच्या अगोदर सभोवार नजर टाकली तर किल्ल्याची अभेद्यता आणि दुर्गमता लक्षात येते. शिवाय येथून दूरवरचा निसर्ग नजरेला सुखावतो. गडाखालील गावांमधील हिरवी-पिवळी भातशेती, शेतातील विहीरी, तळी व झाडी पाहताना नेत्रांना जाणवणारे सुख शब्दातीत आहे.

   लोखंडी पूल ओलांडून आपण किल्ल्यामध्ये प्रवेश करतो. आत गेल्यावर उजव्या हाताला लगेचच फार मोठे धान्यकोठार आहे. हेही छतासह चांगल्या स्थितीत आहे. ते पाहून डाव्या बाजूने पुढे जाताना थोड्याफार पायऱ्या चढून किल्ल्याचे शेवटचे म्हणजे तेरावे प्रवेशद्वार लागते. येथून आत गेल्यावर उजव्या बाजूला एक उंचवटा असलेले छत आणि खांब शिल्लक असलेले एक बांधकाम आहे. हा किल्ल्याचा सर्वोच्च भाग. थंडगार हवा घेत येथे थोडावेळ विसावलो. पुढील काही वास्तु म्हणजे बारुदखाना, जवाहिर खाना, तीनमजली हलामहलची वास्तू आणि रंगनाथ स्वामी मंदिर इत्यादी सर्व फिरून पाहिले. अर्थात वेगवेगळ्या सत्ताकाळात यावरील बांधकामे झालेली दिसतात. किल्ल्यावर एक मोठी तोफ आहे, ती व्यवस्थित जागी ठेवलेली आहे. तिथेच सावलीत थोडावेळ विश्रांती घेतली. गडावर पोहोचल्यावर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता. सर्व किल्ला प्रत्येकजण डोळेभरून पाहत होता. थंडगार हवा आणि चौफेर दिसणारा प्रसन्न निसर्ग यामुळे अधिक उत्साह वाढत होता. सर्वत्र मनसोक्त छायाचित्रे काढली. काहीजण घरच्या मंडळींना मोबाईलवरून हा किल्ला दाखवित होते.

      येथून डाव्या बाजूस असलेल्या कृष्णगिरीवरील सर्व वास्तू स्पष्टपणे दिसतात. तसेच उजवीकडे पुढील बाजूस असलेला चंद्रायण किंवा चिक्कीली दुर्गावरिल मंदिर व इतर वास्तूही स्पष्ट दिसतात. चिक्कीलीच्या पाठीमागे दूरवर जाणारी डोंगररांग हाही किल्ल्याचाच भाग आहे. तसेच राजगिरीच्या उजवीकडे मागिल बाजूस एका डोंगरावर जंगलातील गर्दीत तटबंदी व वास्तूंचे अवशेष दिसतात. जिंजीचा किल्ला म्हणजे याच पाच किल्ल्यांचे हे संकुल आहे. एकूण अकरा चौरस कि.मी.चा हा परिसर आणि १३ कि.मी.ची बेलाग तटबंदी असलेला हा किल्ला महाराजांनी राजधानी म्हणूनच अधिक बेलाग, अभेद्य बनविला होता. साडेचार ते पाच वर्षे वेढा घालून बसलेल्या झुल्फिकार खानाला अखेरीस वेढा सोडावा लागला होता. दुर्दैवाने शेजारील दोन किल्ल्यांची नावे कोणालाही माहिती नाहीत. स्थानिक पातळीवर इतिहासाबद्दल फारशी ओढ किंवा आवड लोकांमध्ये दिसत नाही. त्यातही कोणाशी बोलायचा प्रयत्न केला तरी भाषेची मोठी अडचण येते.

आकर्षक कृष्णगिरी व वनातील चंद्रायण :

     जिंजीच्या किल्ल्यामध्ये जाताना उत्तर दिशेला, अर्थातच उजव्या हाताला असलेल्या एका पहाडावर अलिप्तपणे वसलेला कृष्णगिरी किल्लाही प्रेक्षणीय आहे. तटबंदीवरून घेऊन जाणारी वाट थोड्याफार झाडीतून किल्ल्यावर घेऊन जाते. राजगिरीप्रमाणेच ही वाटही भक्कम पायऱ्यांचीच आहे. येथील डोंगरही मोठ-मोठ्या अजस्त्र खडकांनीच बनलेले आहेत. किल्ल्यावर तीन-चार दरवाजे ओलांडून आपण सहज चढून किल्ल्यावर येतो. येथेही मोठे धान्याचे कोठार आहे, कोठाराच्या आतही आणि छतावरही पायऱ्या चढून जाता येते. पुरातन बाळकृष्ण मंदिरही आहे. येथील दगडी स्तंभावर विविध मुर्त्या कोरलेल्या आहेत. याही किल्ल्याला संरक्षणासाठी दुहेरी तटबंदी दिसते. मुस्लीम संस्कृतीतील 'बारादरी' वास्तू आहे. उंचावर सुरेख 'वायूविजन' केलेली विश्रामकक्ष वाटावी अशी वास्तूदेखील आहे. क्वचित काही बांधकामे अगदी अलिकडे इंग्रज व फ्रेंच शैलीतील आहेत. दोन्हीही किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याच्या टाक्या खोदलेल्या आहेत. या किल्ल्याला स्थानिक लोक 'राणीचा किल्ला' तर,  राजगिरीला 'राजाचा किल्ला' म्हणतात. हा किल्ला दोन अडीच तासात पाहून होतो. किल्ल्याच्या पायथ्यालाच तिकीट खिडकी आहे. तिथे बरीचशी हिरवीगार झाडी आहेत.

      याच संकुलातील तिसरा किल्ला म्हणजे चंद्रायण दुर्ग, याला चक्कीली दुर्ग असेही स्थानिक नांव आहे. राजगिरीच्या साधारणपणे दक्षिणेस असणाऱ्या एका विस्तीर्ण डोंगरावर हा किल्ला आहे. वनखात्याच्या अखत्यारित असल्याने यावर जाण्यास परवानगी मिळत नाही. कृष्णगिरी आणि राजगिरीवर दिसणाऱ्या वास्तू यावर नाहीत. एक मोठा सभामंडप भग्नावस्थेत आहे, एक मंदिरही दिसते. इतर सर्व वास्तू कालौघात जमिनदोस्त झालेल्या दिसतात. या डोंगरावरील वनराई आणि झुडूपे यामुळे नैसर्गिक सौंदर्य उठून दिसते. 

        याच परिसरात आणखी दोन किल्ले शेजारीच दक्षिणेकडील बाजूस दिसतात. एक चंद्रायणच्या पाठीमागे आणि दुसरा राजगिरीच्या दक्षिणेकडे. राजगिरीवरून पाहिले तर स्पष्टपणे दिसतात. त्यावरिल बांधकामांचे अवशेष व तटांचेही बांधकाम दिसते. ते किल्लेही याच समूहातील किंवा प्रभावळीतील असावेत, मात्र स्थानिक पातळीवर याची कोणास माहिती सांगता आली नाही. शिवाय वनखात्याची तिकडे फिरकण्यास परवानगी नाही. खरे सांगायचे तर आपल्याकडे जशी गडकोट किल्ल्यांविषयी उत्सुकता व कुतूहल दिसते, तेवढी ओढ व आवड दक्षिणेतील लोकांमध्ये दिसून आली नाही. 

      जिंजीचा किल्ला जिंकल्यावर महाराजांनी तेथे सर्व महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या नेमणूका करून, तटबंदी, बुरुज नव्याने बांधून भविष्यात वेळ पडली तर राजधानी करता येईल, अशी व्यवस्था केली. योगायोगाने पुढील काळात छत्रपती संभाजीराजांच्या वधानंतर, सन १६८९ मध्ये छत्रपती राजाराम महाराजांना युवराज्ञी येसूबाईंनी निवडक कारभारी आणि फौजफाट्यासह रायगड सोडून, दक्षिणेत जिंजीच्या किल्ल्यात जाण्यासाठी सुचविले. मोगलांच्या विळख्यातून सुटण्यासाठी तो एक राजकीय रचनेचा भाग होता. पुढील सुमारे नऊ वर्षे राजाराम राजेंनी येथूनच स्वराज्याचा कारभार पाहिला आणि मोघलांशी जागोजागी सामना केला. औरंगजेबाचा सरदार झुल्फिकारखान याने जिंजीला दोनवेळा वेढा दिला. मराठ्यांच्या सैन्यांनी विशेषतः धनाजी जाधव यांनी गनिमी काव्याने त्यास बेजार केले. अखेरीस झुल्फिकार खानाने सन १६९४ मध्ये वेढा उठविला. दरम्यान राजाराम महाराज वेढ्यातून नकळत बाहेर पडून, दुसरीकडे  औरंगजेबाच्या फौजांवर तुटून पडायचे. मात्र सन १६९८ मध्ये मोगलांनी जिंजी ताब्यात घेतला. औरंगजेबाच्या मगरमिठीतून स्वराज्य सहीसलामत राखण्यासाठी राजाराम महाराजांना जिंजीच्या किल्ल्यानेच साथ दिली.  म्हणूनच मराठ्यांची वा स्वराज्याची राजगड आणि रायगडानंतर तिसरी राजधानी म्हणून जिंजीची नोंद इतिहासाला घ्यावी लागली. 

       विजयनगर साम्राज्यातील या किल्ल्यावर अनेक सत्तांनी राज्य केले. याठिकाणी आनंद कोन, चोला, नायक, मराठा, मुघल, नवाब, फ्रेंच व इंंग्रजांनी राज्य केले. किल्ल्यावर अनेक प्राचीन अवशेष पहावयास मिळतात. 

      किल्ल्याच्या मुख्य तटबंदीला पाँडेचरी गेट व वेल्लोर गेट अशी दोन प्रवेशद्वारे भक्कमपणे बांधलेली आहेत. पण तटबंदी फोडून मधूनच महामार्ग गेल्याने आता या दोन्ही प्रवेशद्वारांशी संबंध येत नाही.
हे किल्ले भारतीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारित आणि काही भाग वनविभागाच्या नियंत्रणाखाली आहेत. किल्ल्यामध्ये जागोजाग कॕप्सूलच्या आकाराचे टेहेळणी बुरुज किंवा चौक्या आहेत. त्या फ्रेंच राज्यकर्त्यांनी बसविल्या आहेत. त्याच्यात विशेष काहीच वाटत नाही.

     दि.२० जानेवारी ते २६ जानेवारी २०१८ दरम्यान आमची पहिली मोहिम झाली. पुणे ते वेल्लोर जवळजवळ ११०० कि.मी.चा प्रवास इनोव्हाने करताना, सुमीत दाभाडेच्या अथक आणि कुशल ड्रायव्हिंगचे आम्ही कौतुक केले. वेल्लोर ते जिंजी ९५ कि.मी. तसेच जिंजी ते तंजावर २२० कि.मी.चे अंतर आहे. जाता येता बहुतांश सर्व ड्रायव्हिंग सुमीतनेच केले. या मोहिमेत आमचा एकूण प्रवास २७०० कि.मी. झाला. 

      आम्ही डिसेंबर २०१९ मध्ये गेलो तेव्हा माझ्यासह ज्ञानेश्वर वायकर, प्रकाश थोरात, तानाजी चोरगे, कुमार बोरगे, गणेश ढमढेरे, रमेश पाडळे, घनःशाम निम्हण, संभाजी सस्ते, मोरेश्वर थिटे, शंकर नढे, सोमनाथ घोडके आणि अशोक गुरुमुखी असे बाराजण होते.
छत्रपती शिवरायांच्या तेजस्वी कर्तृत्वाला आणि छत्रपती राजाराम राजेंच्या धैर्यशील पराक्रमाला मुजरा करून आम्ही पुढील प्रवासासाठी जिंजीचा निरोप घेतला.
* * *

@ लेखक - अरुण तुकाराम बोऱ्हाडे,
(बोऱ्हाडेवाडी, मोशी, ता. हवेली, जिल्हा- पुणे.)
mobile- 9881301339
email- atborhade@gmail.com
....

Comments

Popular posts from this blog

श्री नागेश्वर महाराज भंडारा : भक्तिमार्गातील शक्ती स्त्रोत [लेखक : अरुण बोऱ्हाडे]

'शरद पवार : दुःखातही मनाला उभारी देणारा अलौकिक लोकनेता'' : अरुण बोऱ्हाडे

"कष्टकरी कामगारांची, एक अधुरी कहाणी..! सामाजिक चिंतनाचा विषय" लेखकः अरुण बोऱ्हाडे