आठवणीतील गिरीभ्रमंती : हिरवाईत हरवलेला हरिश्चंद्रगड..

आठवणीतील गिरीभ्रमंती : 
हिरवाईत हरवलेला हरिश्चंद्रगड :
तुफान पाऊस आणि विजेचा कडकडाट


          सह्याद्रीतील भ्रमणवाटा पुन्हा पुन्हा खुणवितात. गेल्या तीस वर्षांत अनेक गड कोट किल्ले गिरीशिखरे दोन-तीनदा करूनही इच्छा तृप्त होत नाही. त्यापैकीच एक सदाहरित जंगलात दडलेला हरिश्चंद्रगड आणि सरळ उभा कोकणकडा ! 
डोळ्यांतही मावत नाही, मनही भरत नाही अशी स्थिती. ती देखणी टोलारखिंड, तारामती शिखरावरील गोड गारवा, हरिश्चंद्रेश्वराचे अप्रतिम मंदिर, त्यासमोरील  सप्ततीर्थ, त्यामागिल गुहा, रौद्रतेतही सौंदर्य लाभलेला उभा कोकणकडा, त्याचे वक्राकार विलोभनीय सृष्टीसौंदर्य, पाचनईची वळणदार वाट आणि समोर चौफेर निसर्ग सौंदर्याचा नयनमनोहर नजारा.. कसे मावणार एका नजरेत हे सर्व ! 
दिनांक २ अॉक्टोबर २०१५ रोजी पहाटेच मी, सोमनाथ साठे, श्रीकांत दळवी, शहाजी घाडगे आणि ज्ञानेश्वर भूमकर सॕग आवरून निघालो. नाशिकफाट्याहून लालपरीने (एस.टी.) आळेफाटा गाठले. "लई भारी मिसळ इथली" असे कौतुक ऐकून एका हॉटेलात मिसळ पावाची चव चाखली. अर्थात  'लई भारी' विशेषण व्यर्थ होते ! त्यानंतर सोमनाथ आणि श्रीकांतने जवळच्या दुकानातून दोन दिवसांसाठी लागणारी शिधासामग्री आणली. तेथून 'टमटम रिक्षा' ठरवून खिरेश्वरच्या दिशेने आम्ही निघालो. तोही प्रवास तसा पुष्कळ वेळेचा पण आनंददायी होता. वाटेमध्ये जागोजाग हिरवी-पिवळसर भातशेती मन वेधून घेत होती. चारही बाजूंनी आभाळाला भिडलेली उंच सह्याद्रीची शिखरे, निळेशार आकाश, हिरवा निळा परिसर.. मुळातच सुंदर असलेला येथील निसर्ग पिंपळगाव जोगा धरणाच्या पाण्यामुळे शतपटींनी खुलून दिसतो. त्या सौंदर्याला शब्द थिटे पडतील ! एक-दोन ठिकाणी थांबून मोबाईल कॕमेऱ्यात आठवणी टिपल्या आणि पुढे निघालो. गाडीवाल्याला विनंती करून खिरेश्वरच्या थोडे पुढे जावून उतरलो. सभोवतालच्या निसर्गाशी, झाडा-झुडपांशी हळुवारपणे मैत्री करीत आम्ही वाट तुडवित निघालो. 
खिरेश्वरला मागे टाकून गडाच्या दिशेने चालत गेलो की, येथूनही गडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक टोलार खिंडीतून आणि दुसरा मार्ग आहे त्याला राजमार्ग म्हणतात.! राजमार्ग म्हणाले तरी तो सोपा नाही, कठीण आहे. उंच कड्यावरून आलेल्या ओहोळाचा हा मार्ग आहे, तो गडावर जुन्नर दरवाजापाशी जातो. पण आम्ही टोलार खिंडीतून जाण्याचे निश्चित केले.
        यापूर्वी आलेलो असल्याने वाटाड्या घेतला नव्हता. डावी-उजवीकडे झाडांची गर्दी वाढत होती, त्या गर्दीतून आमची वाट पुढे चालत होती. मध्येच थांबून एखादा किस्सा सांगून किंवा ऐकून आम्ही टोलार खिंड गाठली. तसे खिरेश्वरपासून ही खिंड बरीच उंचावर आहे. येथून सरळ पुढे एक वाट जाते. डावीकडे डोंगर चढून गेलो की, गडाच्या खांद्यावर येतो. या खिंडीत एका पाषाणावर वाघोबाचे शिल्प कोरलेले आहे. त्यावर शेंदूर लावलेला आहे. तेथील आदिवासींचे ते दैवत. सह्याद्रीच्या डोंगररांगामध्ये आपल्याला अशी वाघोबाची शिल्पे आणि वाघजाईची मंदिरे जागोजाग पहावयास मिळतात. 
(खरे म्हणजे माझ्या घराण्याचेही दैवत वाघोबा आहे, देवता वाघजाई आहे. त्यामुळे मी सह्याद्रीत गिरीभ्रमण करताना मला वेगळाच आनंद आणि बळ मिळते. हे सारे वैभव आपलेच आहे, शिखर देवता आपल्या पाठीशी आहे, अशी माझी कायम भावना असते आणि मी ती सहकारी मित्रांना बोलून दाखवितो !)

        टोलार खिंडीतून डोंगराची चढाई तशी अवघड नाही. पण अरुंद वाट आणि निसरडा खडक, त्यामुळे काळजीपूर्वक पाय ठेवून चढाई करावी लागते. खडकाच्या खोबणीत पाय ठेवताना थोडी जरी कुचराई किंवा खट्याळपणा केला तरी, काय होईल ते सांगता येत नाही. हा टप्पा चढून आलो की मग धोक्याचे काही नाही. येथून चालत पुढे आले की तटबंदीचे एक बांधकाम आढळून येते. पावसाळ्यानंतरचा (अॉक्टोबर) कालावधी असल्याने सर्वत्र गुढघ्यापर्यंत किंवा अधिक वाढलेले गवत, कारवी आणि झुडपांनी व्यापलेला सर्व परिसर हिरव्याकंच शालूने गुंडाळल्यासारखा दिसतो. येथूनही दोन वाटा आहेत. डावीकडून गेलात की, गडावरील टेकड्या ओलांडून थेट हरिश्चंद्राच्या माथ्यावर पोहचता येते. अर्थात या वाटेने वाटाड्या किंवा माहितगाराशिवाय जाणे चुकीचे ठरेल. त्यापेक्षा सरळसोट वाटेने दोन टेकड्यांना वळसे घालून जाणारी वाट सोपी आहे.
डोंगराच्या माथ्यावर आलो की मन हरपून जाते. चोहोबाजूंना हिरवीगार सृष्टी आणि वेगात वाहणारे गार वारे जणू आपल्या स्वागतासाठीच आहे. क्षणभर आपण किल्ल्यावर आल्यासारखे वाटते, पण तसे नाही! येथून पुष्कळ पुढे चालायचे आहे. कधी उंच, कधी खोलगट, कधी ओढेनाले ओलांडून, कधी टेकड्यांना वळसा घालून ही वाट आपल्याला पुढेपुढे घेऊन जाते. जवळजवळ चार-साडेचार कि.मी. आपण चालत राहतो. या वाटेवरील अप्रतिम निसर्ग सौंदर्य, स्वच्छ पाण्याचे ओहोळ आणि ओढे, रंगीबेरंगी फुलांचे ताटवे, विविधरंगी फुलपाखरे, नाना पक्षांचे आवाज आणि वनस्पतींचे गंध हे सारे वैभव डोळ्यांत, कानांत, श्वासांत साठवत कधी क्षणभर थांबत, कधी झरझर चालत आनंदाच्या लहरींवर आरूढ होवून आपण चालत राहायचे.! सोबत वाटाड्या असेल तर चांगलेच, रुळलेल्या वाटा आहेत, तरीही अंदाज घेत चालावे लागते, नाहीतर जंगलात चुकण्याची शक्यता असते. अॉक्टोबर ते डिसेंबर दरम्यान आल्यावर हरिश्चंद्रगड हिरवाईत हरवलेला असतो. अर्थात हे जंगल सदाहरित आहे. येथील जंगलात गडावर आणि गडाखालील परिसरात साग, आइन, करंज, उंबर, बेहडा अशी नानाविध प्रकारची झाडे, वेली व वनस्पतींची दाटी आहे. गडाखालील रस्त्यात आंबा, जांभूळ, खैर आणि मोहाचीही झाडे दिसली. कित्येक झाडांची नांवेही आपल्याला ठाऊक नाहीत. अनेक प्रकारची फुलझाडेही दिसतात.

       मध्येच एका सपाटीवर सॕग टाकून थोडा भेळीचा आस्वाद घेतला. नंतर झपाझप चालू लागलो. अंधारून जाण्याआधी पोहोचायचे होते. पुढे जावून डावीकडे वळण घेतले, धुक्यात हरवलेले हरिश्चंद्राचे मंदिर दिसू लागले. मंदिराच्या परिसरात पर्यटकांची किंवा गिरीप्रेमींची थोडी अधिक गर्दी दिसून आली.
मग आम्ही परत मागे येवून तारामतीकडे जाणाऱ्या रस्त्यानजिक काहीशा उंच पण सपाट केलेल्या सुरक्षित जागेवर तंबू लावायचे ठरविले. उन्हाळ्यात बांबू आणि कारव्यांनी बांधलेले एखादे दुकान असावे. त्याच दुकानाच्या जागी तंबू लावायचे ठरले. आजूबाजूलाही सपाट जागा होती. तिथे सोमनाथ साठे आणि मी तंबू लावत असतानाच, श्रीकांत व भूमकरने शेजारीच वाळवणासह असलेल्या चुलीचा ताबा घेतला. शहाजीने मंदिराच्या समोरील टाक्यातून पिण्यासाठी व स्वयंपाकासाठी पाणी आणले. परिसर जमेल तेवढा स्वच्छ केला. ज्याला जे जमेल ते काम सुरू झाले आणि तासाभरातच अॕल्युमिनीयमच्या पातेल्यात शेंगदाणे, बटाटा, कांदा घातलेला खमंग मसालेभात तयार झाला. थंडी कमी, पण गार वारा अंगाला झोंबत होता. तंबूचा व चुलीचा थोडा भाग वगळला तर सर्वत्र काळोखाचेच राज्य होते. घरून आणलेली भाजी, चपाती, लोणचे आणि मसालेभात यांची मेजवानी उरकून घेतली. चूल विझवून भांड्यांची स्वच्छता झाली. 

       आता मस्त गप्पांची मैफिल सुरू होणार होती,  तोच त्या काळोखात अनाहूतपणे विजेचा लखलखाट सुरु झाला. पाठोपाठ घों-घों वाहणारे वारे, जोरजोरात हजारो ढोल बडवावेत असा ढगांचा प्रचंड आवाज आभाळातून येत होता..! नंतर विजही कडकडाट करू लागली. संपूर्ण दिवसभरात आकाश तसे स्वच्छ होते, रिमझिम पाऊस आला तर आश्चर्य नव्हते, पण हे काय ? आभाळात हे सारे मेघांचे सैन्य कुठून जमा झाले ? काहीच कळेनासे झाले ! यालाच तर निसर्ग म्हणतात ! विजेचा लखलखाट आणि कडकडाट याने आसमंत दुमदुमून गेला. हळुहळू पाऊस सुरू झाला, आता जोराचा पाऊस येणार हे स्पष्ट झाले होते. आम्ही सर्वजण तंबूमध्ये जीव मुठीत धरूनच बसलेलो. खरे तर तंबू तीन जणांनाच पुरणारा होता. आमचे दोघाजणांनीच तंबूत झोपण्याचे नियोजन होते, तिघेजण बाहेर झोपणार होतो. पण गिरीभ्रमंतीमध्ये असेल त्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची किंवा वेळ चालवून घेण्याची आंम्हाला चांगलीच सवय लागलेली !

     खुपवेळ चाललेला विजेचा आणि ढगांचा आवाज काही क्षण थांबला. गार वारा आला आणि  क्षणभरातच अचानक  "कडकडकडकडाट" असा अतिप्रचंड आवाज आणि त्या काळोखाला छेदून जाणारा प्रचंड प्रकाशाचा लोळ आमच्या जवळच काही अंतरावर जमिनीत लुप्त झाला ! क्षणभर आमच्या तंबूतही मोठा प्रकाश डोकावून गेला. अंगावर काटा उभा राहिला, काही क्षण सर्वांचा श्वास रोखला. प्रत्येकाने काहीही न बोलता, निःस्तब्धपणे फक्त एकमेकांच्या डोळ्यांत पाहिले ! निसर्गाचे तांडव चालूच होते. हरिश्चंद्राच्या मांडीवर आणि तारामतीच्या पदराखाली बसून आम्ही हे भयाण तांडव अनुभवत होतो ! काहीही घडले तरी आता याठिकाणी कोणीही काहीही करू शकणार नव्हते. काहीवेळाने वारा कमी झाला, वीज कमी झाली आणि क्षणार्धात प्रचंड पाऊस सुरू झाला. धो धो धो ! काय कोसळत होता तो पाऊस ! डोळ्यांना दिसत नव्हता, पण तंबूवर कोसळणारी प्रत्येक धार त्याची तीव्रता सांगून जात होती. एकूणच सर्व अनाकलनीय होते.
     जवळजवळ रात्रभर कमीअधिक पाऊस कोसळत होता, पुन्हा अधुन-मधून विजेचे तांडव चालू होते, ढगांचा गडगडाट ऐकू येत होता. आम्ही आळीपाळीने एकदोघेजण अंग आडवे करीत होतो, झोप अशी नव्हतीच कोणालाही ! पहाटे हे तांडव थांबले. वीज-वारा-पाऊस तिघेही जणू थकून भागून विसावले होते. काहीवेळाने तंबूतून बाहेर डोकावून पाहिले, तर अजून उजेडाने डोळे उघडले नव्हते ! पाऊस पुर्णतः थांबला होता, सर्वत्र फक्त पाणीच पाणी खळखळा वाहत होते. आवाजावरून आम्ही ते ताडत होतो, अंदाज येत होता. 
     सकाळी लवकर उरकून तारामती शिखरावर जाण्याचे नियोजन होते. पण रात्रभर झालेल्या पावसामुळे रस्ता निसरडा झाला असेल म्हणून आम्ही थांबलो. आता चूल पेटणे अशक्यप्राय होते. सकाळचे विधी उरकून, मंदिरासमोर सप्ततीर्थाच्या बाजूला असलेल्या एकमेव  चहानास्ता वाल्याकडे जावून चहा घेतला. नंतर घरच्याच शिदोरीतून नाष्टा केला. हलकेसे कोवळे ऊन भेटीला आले होते. जणू रात्री काय काय घडले याची ते विचारपूस करीत होते. आम्ही चहाला गेलो तेव्हा तिथेही रात्री पडलेल्या विजेचीच चर्चा चालू होती. मंदिराच्या जवळच रात्री विजेने उडी घेतली होती. केवळ हरिश्चंद्रेश्वराची कृपा म्हणून गडावरील सर्वजण सुखरुप होते.

     गडकिल्ल्यांवर हल्ली मुंबई पुण्यात राहणारे, परप्रांतिय तरुण-तरुणीही येवू लागलेत. विशेषतः आय.टी. क्षेत्रात नोकरी करणारे, शनिवार रविवारच्या सुट्टीत आता पायथ्याशी गाड्या घेऊन किल्ल्यांवर जाताना दिसतात. त्यांच्या गडावर येण्याविषयी मुळीच आक्षेप नाही. मात्र आपल्या सर्वांच्या मनात सह्याद्रीच्या गिरीशिखरांविषयी जे प्रेम आहे, मनाच्या गाभाऱ्यात मराठ्यांच्या शौर्यशाली पराक्रमाचा, छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाचा एक विलक्षण आदरभाव व अभिमान आहे. या मातीविषयी जी ओढ आणि आत्मियता आहे, ती त्यांच्यात असेल का, असे वाटते. दुसरे असे की, गडावरिल किंवा गडाखालील काही स्थानिक लोक आता व्यावसायिक रितीने वागू लागलेत. त्यांनीही व्यवसाय जरूर करावा, पण त्यांच्याकडून चार पैसे अधिकचे मिळतात, त्याचा फटका आणि त्रास गिर्यारोहकांनाही ( ट्रेकर्स ) होवू लागला आहे. ही तक्रार नाही, हे माझे निरीक्षण आहे. हरिश्चंद्रगडासह काही ठिकाणी आम्ही ते अनुभवले आहे.

        हरिश्चंद्रगड हा माळशेज घाटाच्या उत्तरेकडील सह्याद्रीच्या पर्वतरांगेत डांग डोंगरमाळेत अक्राळविक्राळ पसरला आहे. विशेषतः त्याचे पश्चिमेकडील उभे सरळसोट कडे गडाची दुर्गमता आणि भीषणता अधोरेखित करतात. समुद्रसपाटीपासून सुमारे ४६७० फूट उंचीवर असलेल्या या गडाला हरिश्चंद्र, तारामती आणि रोहिदास अशी तीन शिखरे आहेत. या पर्वतावर आणि बाजूच्या मुळा व काळू नदीच्या खोऱ्यांमध्ये घनदाट सदाहरित जंगल पसरले आहे. गडावर जायला माळशेज घाटरस्त्यावरिल खुबीतून खिरेश्वर शिवाय, नगर जिल्ह्यातील पाचनई येथूनही जाता येते. पाचनईची वाट फार कठीण नाही, उलट सृष्टीसौंदर्याने बहरलेली आहे. नैसर्गिकरित्या तयार झालेली, पण जणू डोंगराच्या पोटातून कोरल्याप्रमाणे असणारी ही वाट मनाला मोहित करते. याच आसमंतात भोवताली  आजोबाचा डोंगर, रतनगड आणि सह्याद्रीतील सर्वाधिक उंच शिखर कळसूबाई येथून जवळच आहे. सह्याद्रीच्या डोंगरदऱ्या आणि नदीखोऱ्यांचे नैसर्गिक सौंदर्य येथे पुरेपूर अनुभवास येते.

       गडावर हरिश्चंद्रेश्वराचे पुराणकालीन मंदिर असून ते काळ्या पाषाणातील नक्षीदार कोरीव घडणीचे आहे. मंदिराचे शिखरही अत्यंत रेखीव आणि उंच आहे. मंदिराच्या शिखराची उंची सुमारे ६० फूट आहे. या शिखरामध्ये हिरे माणकांची सजावट होती असे सांगितले जाते. मंदिर परिसर तसा बंदिस्त आणि ऐसपैस आहे. मंदिरासमोरील नंदीही सुबक आहे. मंदिर आवारात गणेश व इतर देवतांच्या मुर्ती पहावयास मिळतात. तेथील एका बाजूस खडकात कोरलेली मोठी गुहा आहे. त्यामध्येही महादेवाचे मोठे शिवलिंग असून, त्याच्या भोवती किमान कमरेएवढे पाणी असते. दर्शन घ्यावयाचे असेल तर पाण्यात उतरून लिंगापर्यंत जावे लागते. याच गुहेमध्ये योगी चांगदेवांनी तप साधना केली, असे म्हणतात. तसा याठिकाणी शिलालेखही कोरलेला आहे. येथूनच मंगळगंगा नदी उगम पावते आणि पर्वतावरून उतरून पुढे मुळेला भेटते. 
 
 
 मंदिराच्या समोरील भागात, तारामती शिखराच्या पायथ्याला सप्ततीर्थ नावाने मोठे पाण्याचे कुंड बांधलेले आहे. त्यामध्ये नेहमी पाणी भरलेले असते. या कुंडाच्या एका बाजूस सरळ रेषेत एकूण १४ लहान मंदिरे नक्षीदार दगडात बांधलेली आहेत, त्यामध्ये विष्णूच्या खूप सुबक मुर्ती आहेत. या शेजारील सपाट भागात खूप रंगीबेरंगी फुलपाखरे विविधरंगी गवतफुलांशी हितगूज करताना आढळले. त्यांच्यात जावून छायाचित्रे टिपण्याचा मोह आवरेना, त्या फुलपाखरांना कसे सांगणार, अरे बाबांनो क्षणभर थांबा आमच्याजवळ ! पण मकरंदाच्या शोधात निघालेल्या मधुंना आमची जवळीक कशी आवडणार..! ते भर्रकन दूर जायचे, पुन्हा लगेचच यायचे, हवे त्या फुलावर बसायचे ! अखेर त्यांना अडथळा नको म्हणून आम्ही पुढे निघालो !

        गडावरील बरीच मंडळी सकाळी पाचनईमार्गे परतीच्या वाटेला लागली. आम्ही कोकणकड्याच्या दिशेने निघालो. जवळच एका ओहोळातून खळखळ वाहणाऱ्या शुद्ध पाण्यामध्ये आंघोळी केल्या, ताजेतवाने झालो. पावसाने ओल्या आणि निसरड्या झालेल्या वाटेने पायांचे रिचकीच आवाज घेत आम्ही कोकणकड्याकडे आलो. ही वाटही अर्थातच झाडोऱ्यांतूनच जाते. या परिसरात घनदाट धुके पसरावे असे, सर्वत्र ढग ऊतरलेले होते. समोर चार-सहा फुटापर्यंतच दिसायचे. बराचवेळ थांबून प्रतिक्षा केली. एखादी हवेची झुळूक आली की, क्षणभर विरळ व्हायचे, थोडे दिसायचे कि पुन्हा ढगांची दुलई..! अखेर कोकणकड्याच्या जवळ जावून काही मिनीटे थांबलो आणि जेवढे दिसले तेवढेच डोळ्यांत साठवून आम्ही परत फिरलो. 

       हा कोकणकडा म्हणजे निसर्गाचा एक आश्चर्यकारी  आविष्कार आहे. जमिनीपासून तुटलेला जवळपास अर्धा किमी अंतराचा भूभाग अंतर्वक्र होवून उभ्या तासीव कड्यांनी खोलवर सुमारे १५०० ते १८०० फुट उतरला आहे. त्याचे अप्रतिम सौंदर्य आणि भीषणता, रौद्रता एकाचवेळी येथे पहावयास मिळते. त्यात वातावरणात कधी इंद्रधनुष्य असेल तर काय वर्णावे त्यास ! म्हणूनच कोकणकडा आवर्जून पहावाच, अर्थात सुरक्षितता आणि स्वयंशिस्तीचे भान ठेवूनच !
खरे तर कोकणकड्याहून निघून आता आंम्हाला हरिश्चंद्र शिखरावर जायचे होते. पण चिखल व घसरडा रस्ता यांमुळे आम्ही गेलो नाही. तिकडे जुन्नर दरवाजाचे व इतरही काही भग्न अवशेष पहावयास मिळतात.
कोकणकड्याहून आम्ही तंबूकडे परत आलो तेव्हा दुपार टळून गेलेली होती. हवेत गारवा होताच. कोणास चहाची आठवण झाली, तर कोणी गरम काही खाऊ म्हणाले. अखेरीस कांदापोहे आणि चहाचे नियोजन ठरले. चुकून थोडाफार वाळलेला काडाकुडा मिळाला. पण सुरुवातीला पेट घेईपर्यंत प्रत्येकाच्या डोळ्यांना आळीपाळीने धुरामध्ये फुंकर मारावी लागली. अखेरीस सोमनाथच्या चिवट प्रयत्नांनी चूल पेटली. कांदापोहे आणि पाठोपाठ चहा बिस्कीटे खाऊन थोडावेळ गप्पागोष्टी करीत बसलो.

साडेपाच वाजण्याच्या सुमारास आम्ही तारामती शिखरावर जाण्यासाठी निघालो. पुर्णतः अंगावर येणारी ही चढण, कारव्यांच्या आणि इतर झाडांच्या दाटीतून आपल्याला शिखराकडे घेऊन जाते. मंदिरापासून हे शिखर अंदाजे ६०० फूट उंचीवर आहे. जाताना वाटेत एक सरपटणारा जीव आडवा आला, त्याला सरळ जावू दिले, मग आम्ही पुढे गेलो. तारामतीवर पोहोचल्यावर आपसुकच होणारा आनंद मोठा असतो. तेथील गारव्याला सुखद गोडवा असतो. धुक्याच्या किनारीत सूर्य मावळताना पाहिला. आजूबाजूच्या डोंगरशिखरांवर दूरवर चौफेर निरीक्षण केले. खरेतर सर्वत्रच धुक्याची एक पट्टी किंवा चादर जणू आकाशात तरंगत होती. तरिही अंधूकपणे काही गिरीशिखरे डोके वर काढताना दिसत होती. येथून रतनगड, कळसूबाई, आजोबा, वगैरे शिखरे दिसतात. माळशेज घाटाचाही परिसर येथून स्पष्टपणे दिसतो. एकमेकांना माहिती देईपर्यंत अंधारून आले. सहज खाली नजर टाकली तर, हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर, सप्ततीर्थ हे अप्रतिम दिसत होते. रात्र होण्याआधी आम्ही तंबूकडे परतलो. तारामतीच्या डोंगर उतरणीला आठ-दहा लेणी किंवा गुहा आहेत. अनेकजण तिथेच मुक्काम करतात. 

   आज आमचा मुक्कामाचा दुसरा दिवस होता. पण कालच्यापेक्षा आज एकदम छान वातावरण होते, पाऊस किंवा वाराही नव्हता. मंदगतीने थंड हवेच्या लहरी वाहत होत्या. कालच्या जागरणाने आज लवकर झोपावे असा विचार प्रत्येकाने बोलून दाखविला. एकमेकांना सांभाळून घेत, दाटीवाटीने हळुहळू सर्वजण झोपी गेले.

      तिसरे दिवशी सकाळी उठून चहा घेतला आणि आपापल्या सॕग भरून निघण्याची तयारी केली. आम्ही निघालो तेव्हाच पाचनईमार्गे सहा सात जणांचा एक गट गडावर आला. आम्हीही त्याचमार्गे गड उतरण्यास सुरूवात केली. नदीमध्ये हातपाय स्वच्छ करून ताजेतवाणे झालो आणि वाट चालू लागलो. या वाटेने येताना उजवीकडील बाजूचा एवढा मोठा डोंगर जणू त्याच्या पोटाशी कोणीतरी कोरून ही वाट केली आहे, असे वाटते. डाव्या हाताच्या दरीतील सौंदर्य न्याहळत उजवीकडून निसर्गतःच कोरलेल्या रस्त्याने कधी खाली उतरलो कळलेही नाही. 
      सह्याद्रीच्या गिरीकंदरी जवळजवळ तीस वर्षे फिरतोय, चालतोय. अनेक ठिकाणे पाहिली, पण हरिश्चंद्राचा हा परिसर अत्यंत देखणा, विशालकाय ! प्रत्येकवेळी नवीन काही आनंद आणि अनुभव पदरात देणारा ! पाचनईत आल्यावर चहा नाष्टा घेतला आणि लालपरीने वळणदार रस्त्याने, दोन्ही बाजूंच्या अप्रतिम निसर्गसौंदर्याचा अनोखा बाज पाहत पुढे पुढे येत राहिलो. 

      हरिश्चंद्रगडाची गिरीभ्रमंती, आनंदयात्रा मनाच्या कोंदणात कायमसाठी कोरून ठेवली आहे. आजही क्षणभर डोळे मिटले की ती हरिश्चंद्राची  मोहिम, वाघोबाची टोलार खिंड, तो तुफान पाऊस, ती विक्राळ विज, ती अप्रतिम हिरवाई, सुखद तारामती, सौंदर्यखणी रौद्र कोकणकडा, सुबक स्वच्छ मंदिर आणि पाचनईची सुंदर सुरेल वाट डोळ्यांसमोर येवून थांबते. जणू पुन्हा पुन्हा गडभेटीचे आवतणं देतात !

@अरुण बोऱ्हाडे ...✍
(दि. ७ जून २०२०)
* * *

Comments

  1. अप्रतिम भाषाशैली !
    चित्ताकर्षक रचना !!
    एकूणच भन्नाट !!!
    प्रणिपात.

    ReplyDelete
  2. सुरेख वर्णन ..
    खुप सुंदर।

    ReplyDelete
  3. अंगावर शहारे आणणारा प्रसंग परंतु छान वर्णन केल्यामुळे स्वतः गेल्यासारखे वाटले.धन्यवाद

    ReplyDelete

Post a Comment