वैशाख पौर्णिमा आणि चांदोबाशी संवाद ! (ललितलेख) : अरुण बोऱ्हाडे
वैशाख पौर्णिमा आणि चांदोबाशी संवाद !
(ललितलेख)
लेखक : अरुण तुकाराम बोऱ्हाडे
परवा सायंकाळची गोष्ट. मावळतीच्या तांबूस लाल छटा अधिकच गडद होत काळोखात अदृश्य झाल्या. तसे काही वेळातच पिवळसर तांबूस रंगावली पूर्वेकडील आकाशात साकारू लागली. सहज पाहिले तर अलगदपणे चंद्र उदयाला येत होता, काही क्षणांतच आकाशाचा तरल पडदा हलकेच बाजूला सारून, शांतपणे तो उगवून सामोरे आला. आजचा हा पौर्णिमेचा चंद्र नेहमीपेक्षा आकाराने बराच मोठा दिसला. त्याचा रंगही नेहमीपेक्षा अधिकच उजळ, पिवळा धमक आणि लालकेशरी छटांनी सजलेला वाटला. त्याचा शीतल प्रकाश आणि प्रभा काहीशी तेजस्वी वाटली. सभोवताली शांत निळेशार आणि चौफेर निरभ्र आकाश, त्या निरभ्र आकाशातील चांदण्याही अगदी लखलखीत होत्या. घराबाहेर अंगणात येरझऱ्या घालताना मी पुन्हा पुन्हा त्या निळ्या आकाशाकडे, प्रसन्न प्रभावी चंद्राकडे आणि उल्हसित चांदण्यांकडे निरखून पाहत होतो.
हे आल्हाददायी दृश्य पाहताना मला खूपच नवल वाटले. आज काही तरी विशेष आहे. मनातूनच उत्तर आले, अरे, आज तर वैशाखाची पौर्णिमा किंवा बुद्ध पौर्णिमा आहे. पण तरिही चंद्रामध्ये आज काही वेगळेपण होते. मनातून ते जात नव्हते. आता थांबण्यात अर्थ नव्हता, म्हटले आपण चंद्राशीच बोलूया ! पण तो बोलणार का ! मनातून उत्तर आले, बोलेल नक्की बोलेल..! लहानपणाची ओळख सांगूया त्याला. लहानपणी त्याला आपण 'चंदामामा' किंवा 'चांदोमामा' असे आपुलकीने म्हणायचो ! पण अलिकडे खूप वर्षे त्याच्याशी बोलणेच नाही. काय करणार ? आपण खूपच व्यस्त झालो ना ! पण काही हरकत नाही, मामाच आहे तो, घेईल सांभाळून !
मग मात्र निश्चय ठरला. आज चंदामामाशी गप्पा मारायच्या !
तोपर्यंत तो झाडाआड गेला होता आणि बराच वरती आला होता. आता तर तो खूपच अप्रतिम दिसत होता. एखादा गोरापान राजबिंडा देखणा 'वर' सजून सज्ज असावा, त्याहून अधिक रुपवान दिसत होता आजचा चंद्र, त्याचे अप्रतिम सौंदर्य ओसांडून वाहत होते.
त्या सौंदर्यवान रुपवान चंद्राकडे पाहत मी स्मितहास्य केले आणि हळू आवाजात बोललो, 'चंदामामा, ओळखले का मला ! मी लहान असताना भेटायचो नेहमी. कधीकधी शाळेच्या कवितेतूनही विचारायचो तुला, 'चांदोबा, चांदोबा भागलास का?' नंतर एकदा ' तुझ्या गाडीला हरणांची जोडी' पाहिली होती आम्ही ! तेही जावूदे, माझी आई तर, प्रत्येक महिन्याच्या संकष्टीला तुला ओवाळल्याशिवाय उपवास सोडत नव्हती.. हे आठवतेय का तुला ?'
आता मात्र चंदामामा हसला आणि म्हणाला,
"अरे, किती ओळखी सांगशील ! बोल, काय म्हणतोस आणि तू कसा आहेस ?" मामाचा प्रतिसाद मिळाल्यावर, मला फार आनंद वाटला. मग आमचा मनमोकळा संवाद सुरू झाला.
'मामा, मी खूप मजेत आहे. पण आज तूच वेगळा दिसतोस. म्हणजे, आकारानेही मोठा, नेहमीपेक्षा उजळ, आनंदी आणि प्रसन्न वाटतोस. काय रहस्य काय ?'
चंदामामा म्हणाला, "अरे ! आज बरी चौकशी करतोस माझी ! कुठे होतास एवढे दिवस ?" आता काय उत्तर देणार मी, फक्त हसलो. मग मामाच बोलू लागला,
" ऐकून घे ! तू विचारलेय म्हणून सांगतोय. आज वैशाख पौर्णिमा आहे. आज मी मोठा असतोच. पण मी प्रसन्न आहे, त्याला तुमची मानवजात कारण आहे ! मागिल तीन पक्ष (म्हणजे शुक्ल, कृष्ण, पुन्हा शुक्ल पक्ष) म्हणजे जवळजवळ ४५ दिवस झालेत. आम्ही आकाशातील सर्व ग्रह, तारे पृथ्वीवरील मानवप्राण्यांवर खूश आहोत. मला कळत नाही, हा माणूस अचानक असा शहाणा कसा झाला ? पृथ्वीवरून आकाशाकडे येणारे काळ्या धूरांचे लोट, असंख्य प्रकारचे विषारी वायू आता बंद झालेत. सर्वत्र रस्त्यांवर दिवसरात्र धावणारी वाहने एकदम दिसेनाशी झाली. कारखान्यांतील धूरांच्या चिमण्या एकाएकी थंडावल्या. एवढेच नाही, पृथ्वीवरील नद्या एखाद्या अल्लड बालिकेप्रमाणे निर्मळपणे धावू लागल्या, मोकळेपणानं बागडू लागल्या. सृष्टीभोवतीचे हवेतील काळेकुट्ट आवरण दिसेनासे झाले. अरे ! त्यामुळेच अंतरिक्षातील आम्ही सारे आनंदी झालो."
तो पुढे सांगू लागला, "कालच सृष्टी मला सांगत होती, पृथ्वीवर माणूस आता शहाण्यासारखा वागू लागलाय. रस्त्यावर विनाकारण फिरत नाही. त्यामूळे कुठेही प्रदुषण नाही. पर्यटन थांबले, त्यामूळे कुठेही प्लॕस्टीकचा कचरा नाही. नदीनाले कसे स्वच्छ झालेत, त्यामूळे त्यातील जलप्राणीही हसू खेळू लागले. चैत्र-वैशाख म्हणजे वसंत ऋतूचा उत्सव असतो. पण यावर्षी या उत्सवाला वेगळाच बहर आलाय. काळवंडलेली वृक्षवेली हिरव्या तांबूस पालवीने सजून गेली. जणू नवीन नवरी हळद लावून लग्नमंडपात नटून आली. लाल केशरी पिवळी जांभळी नाना रंगांची फुले बहरली. जणू सप्तरंगांनी सृष्टीवरती उधळण केलीये. अरण्यातील जीवसृष्टीही आनंदाने न्हाऊन निघाली. पक्षांची मंजूळगाणी दूरवर ऐकू येवू लागली. नभांगणी पक्षांचीही स्वच्छंदी स्वैर सुरू झाली. पाने फुले लता वेली नव्यानेच डोलू-बोलू लागली. सृष्टी सारी आनंदात गीत नवे गाऊ लागली." असे चंदामामाने मला सांगितले. आपले म्हणजे मानवाचे एवढे कौतुक कोणी करीत असेल तर मध्ये बोलण्यात अर्थ नव्हता. मी व्यवस्थित सर्व ऐकून घेतोय, हे मामाच्या लक्षात आले.
पुढे चंदामामा सांगू लागला,"अरे पूर्वी तुम्ही माणसं खूप समंजस आणि विचारांच्या उंचीवर राहत होतात ! पर्यावरण सांभाळायचे, जीवसृष्टी सांभाळायचे. तू म्हणालास ना, मला ओवाळल्या शिवाय उपवास सोडत नसे. याचा अर्थ काय, सृष्टीतील, अंतराळातील प्रत्येकाला आदर देऊन , आपणही आनंदाने जगायचे, असे माणसाचे वागणे होते. जीवसृष्टीतील प्रत्येक प्राणी, पक्षी, अनेक वनस्पतींना माणसाने मित्र मानले होते. त्याचे महत्त्व सर्वांना पटावे म्हणून सणावारांना पूजा अर्चा करण्याची प्रथा होती. प्रत्येक वनस्पती माणसांच्या पूजेत असते. प्रत्येकाला कारण वेगळे, सणवारही वेगळे. तसेच वन्यप्राणी आणि पक्ष्यांचेही महत्त्व आहे. त्यातला मूळ गाभा निसर्गाचे रक्षण व्हावे, माणसाने प्राणी पक्षी झाडे वेली यांचा सांभाळ करावा, एवढाच होता. पण हल्ली काय झालेय पहा."
"माणूस हा बुद्धिमान प्राणी आहे. त्याने खगोल, भूगोल, ज्ञान-विज्ञानात केलेली प्रगती फार मोलाची आहे. बुद्धिमत्तेच्या बळावर मानवाने अवकाशातही भरारी घेतली आहे, हे कौतुकास्पद आहे. पण त्याच्या वागण्याला काही बाबतीत संयम, सौजन्य आणि शांतीची आवश्यकता आहे. प्रत्येक गोष्टीत तारतम्य बाळगले पाहिजे. पर्यावरणाचा ऱ्हास होतोय. जंगले तोडून मोठमोठे रिसॉर्टस् होताहेत, उद्योगधंदे वाढताना केवळ आर्थिक उन्नती पाहिली जाते. निसर्ग, भूतदया, माणूसकी आणि मानवता या संकल्पनांचा चक्काचूर झालाय. पैसा, संपत्ती, ऐश्वर्य याला काही मर्यादाच उरल्या नाहीत. दुसऱ्याच्या कल्याणासाठी राहू देत, किमान स्वतःसाठी तरी माणूस वेळ देतोय का ? स्वतःच्या अंतःकरणात माणूस कधी डोकावून पाहतो का?...!"
वैशाखी पौर्णिमेचा तो तेजस्वी देखणा चंद्र, वसंताचा गंधबहार, सृष्टीचा निर्मळपणा आणि मानवा.ची शांति पाहून प्रसन्न झालेला तो चंदामामा खूप महत्त्वाचा संदेश देऊन गेला. अंतःकरणात डोकावून पहा. मनाशी सुसंवाद करा, तुमचाही आपोआप चंद्राशी, सृष्टीशी सुसंवाद होईल, असा संदेशही त्याने सांगितला.
गप्पागोष्टी करता करता चंदामामाने मानवजातिविषयी बरेच काही सांगितले. 'माणसाने स्वतःच्या अंतःकरणात डोकावून पहावे', हे वाक्य महत्त्वाचे होते. चंदामामाला नमस्कार करून मी विचार करू लागलो. आज वैशाखी पौर्णिमा आहे. बुद्धाची प्रतिमा डोळ्यांसमोर आणून पहा. गौतम बुद्धांसारखा महामानव या पृथ्वीवरती जन्माला आला. त्यांच्या जीवनाचा काय संदेश आम्ही घेतला ? सत्याच्या शोधासाठी राजवैभवाचा, अष्टौदिशा ऐश्वर्याचा त्याग करून हा महात्मा मानवाच्या हृदयांत वास करू लागला. जगातील सुखदुःखाची कारणमिमांसा केली. बुद्धांचे तत्त्वज्ञान आज आम्ही पुन्हा अभ्यासले पाहिजे.सत्य, अहिंसा, शांति आणि करुणा ही तत्त्वे लक्षात घेतली पाहिजेत.
आज जगावर आलेल्या या संकटातून माणूस नक्की बाहेर पडेल, यात शंका नाही. पण आपण सर्वांनीच जीवनाकडे आता नव्याने पाहायला शिकले पाहिजे, असे मला वाटते. सत्य, सत्व व स्वत्व यांचा आपण विचार करायला हवा. जगण्यातील आनंद घेताना सर्वठायी होणारे नुकसान टाळता येईल. नका करू कोणी त्याग, किमान मोहाला आवर घाला. नका करू दानधर्म, किमान लूटमार करू नका. गीता काय सांगते, सुखी जगण्याचा आणि जीवनाचा सारांशच गीतेत आहे. ऐश्वर्याचा आनंद घेताना, त्याचे नाहक प्रदर्शन कशासाठी ? सत्याग्रह, विवेक, सात्विक ता यांचे अस्तित्व कुठे आहे ? अंतःकरणात पहा म्हणजे समजेल, आज दीड-दोन महिने सारे जग घरात बसलेय.
डोळ्यांनाही न दिसणाऱ्या एका निर्जीव विषाणूमूळे जगाचा कारभार ठप्प झाला आहे. हजारोजण एखाद्या कीडामुंगीप्रमाणे मृत्यूच्या तांडवात भरडले गेलेत. ना कोणाचा पैसा उपयोगात आला, ना कोणाची संपत्ती! ऐश्वर्याची झळाळी पुर्णतः काळवंडली ! यातूनच आम्ही सर्वांनी बोध घ्यायला हवा. फार मोठी शिकवण निसर्गाने दिली आहे. माणसाला जगण्याची नवी दिशा मिळाली आहे. पण हे ज्याच्याकडे संवेदनशीलता आहे, त्याला कळेल. जो सत्वशील आहे, त्याला रुचेल. प्रत्येकालाच कळायला हवे. आपल्या मर्यादांची जाणिव ठेवावी. पौर्णिमेच्या चांदण्यात विहरताना, उद्या येणाऱ्या अवसेचेही भान असू द्यावे. माणसांतला 'माणूस' ओळखायला शिकावे, त्याच्या वैभवाचा विचार करू नका. हे वैभव, ही संपत्ती, हे ऐश्वर्य किती कामाचे आहे, ते क्षणिक आहे, हे कळाले असेलच. सत्याची व स्वत्वाची श्रीमंती, नैतिकतेचे ऐश्वर्य आणि भूतदयेची संपत्ती अधिक सुवासिक असते. एवढे जरी समजले तरी पुष्कळ झाले.
"भूतां परस्परे पडो l मैत्र जीवांचे l"
... अखेरीस श्री ज्ञानदेवांचे पसायदान आपण सर्वांनी समजावून घ्यावे. त्यातील प्रत्येक ओवीचा अर्थ समजावून घ्यावा. गीतेचा जीवनरस अंगिकारावा, आयुष्य सफल संजीवन करावे. जीवन हे सकलांच्या सुखाचे साधन व्हावे, कोणाच्याही दुःखाचे कारण घडू नये. अवघ्या जगताचे सुख जपावे. एवढेच सविनय सांगणे.
धन्यवाद.
🙏@ लेखक : अरुण तुकाराम बोऱ्हाडे ...✍
(मोशी, ता.हवेली, जिल्हा पुणे)
Email : atborhade@gmail.com
Phone No. : 9881301339.
दि. ०९ मे २०२०


This comment has been removed by the author.
ReplyDelete