मराठा साम्राज्यातील सुवर्ण पान : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर (लेखक : अरुण बोऱ्हाडे )
मराठा साम्राज्यातील सुवर्ण पान :
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर
(लेखक : अरुण बोऱ्हाडे )
मराठ्यांच्या इतिहासातील कर्तबगार, नीतीमान आणि पुण्यवान स्त्रियांचा विचार केला तर राजमाता जिजाऊने महाराष्ट्राला दिलेला स्वाभिमान, संस्कार आणि क्रांतीची शिकवण पुढे घेऊन जाताना, महाराणी येसूबाई, महाराणी ताराबाई आणि त्यानंतर अठराव्या शतकात इंदूर संस्थानच्या अधिपती पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची नांवे व कर्तृत्व कधीही विसरता येणार नाहीत. तसे पाहिले तर, मल्हारराव होळकर हे पेशव्यांचे माळवा प्रांताचे सुभेदार, त्यांच्या सूनबाई आणि नंतर आदर्श राज्यकर्ती म्हणून अहिल्याबाईंचे कर्तृत्व शेकडो वर्षे इतिहासाच्या पानापानांवर कोरले गेले आहे. नव्हे, त्याच इतिहासाचे एक सुवर्णपान म्हणून कायम स्मरणात राहिल्या आहेत. मराठा साम्राज्यातील अतिशय कर्तबगार, दानशूर, धर्मपरायण व कार्यतत्पर राज्यकर्ती म्हणून त्यांचे नांव इतिहासात आदराने घेतले जाते.
अहिल्याबाईंचा जन्म महाराष्ट्रात जामखेड जवळ, चौंडी या गावात माणकोजी व सुशिलाबाई शिंदे यांच्यापोटी दिनांक ३१ मे १७२५ रोजी झाला. वयाच्या आठव्या वर्षी त्यांचे लग्न *सुभेदार मल्हारराव होळकर* यांच्या मुलाशी अर्थात खंडेरावांशी झाले. महाराष्ट्रातील एका खेड्यात तीनशे वर्षांपूर्वी, धनगर समाजात जन्मलेली ही कन्या, शिक्षणाची सुविधा नसतानाही लिहीण्या-वाचण्यास शिकली. त्या मुळातच जिद्दी आणि बुद्धिमान होत्या. म्हणूनच कुशाग्र बुद्धीची देणगी लाभलेल्या अहिल्याबाईंवर सासऱ्यांचा मोठा विश्वास होता. महत्त्वाची कामगिरी ते या सूनबाईंवरच सोपवित असत. त्यांना मालेराव हा मुलगा आणि कन्या मुक्ताबाई अशी दोन अपत्ये झाली. पती खंडेराव वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी कुंभेरी येथील लढाईत मरण पावल्याने, अहिल्याबाईंना वैधव्याला सामोरे जावे लागले. त्यांनी सती जाण्याचा निर्णय घेतला. पण सासरे मल्हारराव म्हणाले, “प्रजाहितासाठी तरी तुम्ही सती जाऊ नये. हे राज्य सांभाळायचे आहे.” सासऱ्यांच्या इच्छेचा मान राखला आणि सती न जाता त्यांनी राज्यकारभारावर आपले लक्ष केंद्रित केले.
मल्हारराव होळकरांना पेशव्यांनी इंदूर संस्थानची जहागीर दिली होती. दौलतीचा कारभार मोठा होता. मल्हारराव ज्यावेळी मोहिमेवर असत, तेव्हा त्यांच्या सल्ल्याने स्वतः अहिल्याबाई राज्याचा बंदोबस्त चोख राखीत असत. सन १७६६ मध्ये मल्हाररावांचे निधन झाले आणि अहिल्याबाईंचा पूत्र मालेराव यांना सुभेदारीची वस्त्रे मिळाली. मात्र त्यांच्यात ती कुवत नव्हती. अर्थातच राज्यकारभार सांभाळण्याची जबाबदारी अहिल्याबाईंकडे आली. पुढील काळात त्यांच्या पूत्राचेही निधन झाले. राज्यकारभार पाहण्यात निष्णात असलेल्या अहिल्याबाईंनी मल्हारराव व मुलाच्या मृत्यूनंतर, 'स्वतःलाच राज्यकारभार पाहू देण्याची अनुज्ञा देण्याची विनंती पेशव्यांकडे केली. त्यांनी शासन करण्यास माळव्यातील काही दरबारी मंडळींचा विरोध होता. पेशव्यांनी परवानगी दिल्यावर, सर्व दुःख उराशी बाळगून, प्रजाहितासाठी मोठ्या धैर्याने त्यांनी राज्यकारभार हाती घेतला. पुढील अठ्ठावीस वर्षे अतिशय कौशल्याने आणि सक्षमपणे त्यांनी राज्यकारभार सांभाळला. मल्हाररावांचा दत्तक पुत्र तुकोजीराव यांस सैन्याचा प्रमुख नेमला. स्वतःही त्या सैन्याची कवायत घेत. त्यांनी सैन्याचा आत्मविश्वास वाढविला. प्रसंगी युद्धाची तयारी ठेवून धाडसाने व व्यवहार चातुर्याने त्यांनी कारभार सांभाळला. संस्थानच्या तिजोरीचे उत्पन्न वाढविले. "या बाई कशा काय राज्य कारभार करणार" ही तत्कालीन काही मंडळींची अटकळ त्यांनी खोटी ठरविली.
अहिल्याबाईंचा हा प्रवास थक्क करणारा आहे. पती, पूत्र, सासरे, जावई, कन्या यांच्या दुर्दैवी निधनानंतरही ज्या धैर्याने व संयमाने त्यांनी दौलतीचा कारभार सांभाळला, त्याला तोड नाही. अहिल्याबाई एक चाणाक्ष, धैर्यवान आणि सुधारणावादी राज्यकर्ती होत्या. तत्कालीन रुढी, परंपरा व नियमांमध्ये त्यांनी परिस्थितीनुसार काही सुधारणा केल्या, बदल केले.
सन १७७२ मध्ये त्यांनी इंदूरहून महेश्वरला आपली राजधानी हलविली. तिथे प्रशस्त राजवाडा आणि अनेक वास्तू बांधल्या. नदीला घाट बांधले. मंदिरांचा जीर्णोद्धार केला. पूर्वजांच्या स्मरणार्थ छत्र्या बांधल्या. महेश्वरी राजधानी आणली तरी, इंदूरचा विकास करून त्याचे सुंदर मोठ्या शहरात रूपांतर केले. हे अहिल्याबाईंनी केलेले फार मोठे काम होते. त्यांनी माळव्यात रस्ते व किल्ले बांधले, अनेक उत्सव भरविले, अन्नदान केले. मंदिरांमध्ये कायमस्वरूपी पूजा सुरू रहावी म्हणून अनेक दाने दिली. शिवाय माळव्याबाहेरही त्यांनी मंदिरे, घाट, विहिरी, तलाव व धर्मशाळा बांधल्या. एवढेच नव्हे, महाराष्ट्रात आणि देशातील अनेक तीर्थक्षेत्रांत त्यांनी नदीचे घाट आणि धर्मशाळा बांधल्या. त्यांच्या धर्मपरायण आणि उदारवृत्तीमूळे त्यांचा लौकिक वाढला, लोकप्रियता वाढली. लोक त्यांना 'पुण्यश्लोक' म्हणू लागले.
महेश्वर हे विणकरांचे मध्यवर्ती केंद्र होते. अहिल्याबाईंनी वस्त्रोद्योगास उत्तेजन दिले. कोष्ट्यांची वसाहत स्थापन केली आणि उत्तम हातमाग पेठ केली. यांनी महेश्वरी एक कपड्याची गिरणीही सुरू केली. अहिल्याबाईंचा त्यांचा मूळ स्वभाव सौम्य असला, तरी राज्यकारभारात त्यांनी शिस्त आणली. गैरवर्तन करणाऱ्या गुन्हेगारांना त्यांनी कडक शासन दिले. राज्यावर आलेल्या संकटांनाही त्यांनी परतवून लावले. सर्व राज्यकारभार हा सुखी व धनाढ्य लोकांकडून नियमांतर्गत मिळालेल्या धनापासून चालविला होता.
अहिल्याबाई सुधारणावादी वृत्तीच्या होता. त्यांनी प्रजेच्या काळजीपोटी अनेक गोष्टी केल्या. अनेक विधवांना पतीची मिळकत त्यांच्यापाशीच ठेवण्यात मदत केली. अहिल्याबाईच्या राज्यात कोणीही विधवा मुलाला दत्तक घेऊ शकत असे. एकदा त्यांच्याच एका मंत्र्याने दत्तक घेण्याच्या मंजुरीस नकार दिला, तेव्हा अहिल्याबाईंनी दत्तकविधानाचा कार्यक्रम स्वतः प्रायोजित करून, रीतसर कपडे व दागिन्यांचा आहेर दिला.
अहिल्यादेवींची महेश्वर येथील राजधानीत काव्य, संगीत, कला व उद्योग यांना सदैव प्रोत्साहन मिळत असे. साहित्यिक व कलाकारांचा सन्मान व आदर केला जात असे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध मराठी कवी मोरोपंत व शाहीर अनंतफंदी यांना व संस्कृत विद्वान खुशालीराम यांच्यासह अनेक कलाप्रेमींना अहिल्याबाईंनी आश्रय दिला. कारागीर, मूर्तिकार व कलाकारांना त्यांच्या राजधानीत सन्मान व मानधन मिळत असे.
आज लोकशाही व्यवस्थेमध्ये सर्व अधिकार असतानाही विकासाचा सर्वांगीण दृष्टिकोन ठेवणे आणि राबविणे सर्वांना जमत नाही. त्याऊलट संस्थानी काळातील तत्कालीन राज्यकर्त्यांची मनोवृत्ती पाहता, अहिल्याबाईंचे प्रजेसाठीचे कार्य, सुधारणावादी दृष्टी आणि दानशूर वृत्ती ही राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवरायांच्या कल्याणकारी राज्यकारभाराचा अवलंब करणारी आहे, असे दिसून येते.
अशा या अजातशत्रू, धाडशी, सुधारणावादी, प्रजाहितदक्ष, धर्मपरायण आणि सामान्य माणसाचा कळवळा असणाऱ्या अहिल्याबाईंची दिनांक १३ अॉगस्ट १७९५ रोजी वयाच्या सत्तराव्या वर्षी महेश्वर येथे प्राणज्योत मालविली. तरी त्यांचे तेजस्वी कर्तृत्व चिरंतन प्रकाश देत राहिल.
'पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर' हे नांव मराठ्यांच्या इतिहासात आणि संपूर्ण भारतात सुवर्णाचे पान म्हणून कोरले गेले आहे. इतका आदरभाव भारतीय भूमीत क्वचितच एखाद्या राज्यकर्त्यास किंवा राज्यकर्तीस मिळाला आहे. त्यांच्या कर्तृत्वातून उभ्या राहिलेल्या हजारो लोकोपयोगी वास्तू आजही भक्कमपणे उभ्या आहेत. तिच त्यांची जागती स्मृती किंवा स्मारके आहेत. भारत सरकारने अहिल्याबाईंच्या दोनशेव्या स्मृतीनिमित्त सन १९९५ मध्ये एक सुरेख टपाल तिकीट काढून त्यांना समर्पित केले आहे.
आज त्यांच्या जयंती निमित्ताने विनम्र अभिवादन.🙏
लेखक : अरुण तुकाराम बोऱ्हाडे...✍
(मोशी, ता.हवेली, जिल्हा पुणे )
Email : atborhade@gmail.com
Phone : 9881301339
(दिनांक : ३१ मे २०२०)

Nice article
ReplyDelete