गुरुदेव रविंद्रनाथ टागोर : मराठी मातीचा शौर्य गंध भाळी लावणारा महान साहित्यिक
गुरुदेव रविंद्रनाथ टागोर :
मराठी मातीचा शौर्य गंध भाळी लावणारा महान साहित्यिक.
@ लेखक : अरुण तुकाराम बोऱ्हाडे
विश्वविख्यात कवी रविंद्रनाथ टागोर यांचा जन्म पश्चिम बंगालमध्ये कोलकत्ता येथील ठाकूरवाडी (जोरासाँको ठाकूरबाडी) येथे प्रसिद्ध ठाकूर परिवारात दि.७ मे १८६१ रोजी झाला. महर्षी देवेंद्रनाथ हे त्यांचे पिता. धार्मिकता, परोपकार, सहिष्णूता, विद्वता, कलानिपुणता लाभलेल्या गर्भश्रीमंत कुटूंबात रविंद्रनाथांचा जन्म झाला.
रविंद्रनाथांचे व्यक्तिमत्व व साहित्याविषयी मला स्वतःला खूप वर्षांपासून एक ओढ, आवड आणि उत्सुकता आहे. शालेय वयात त्यांची एक कविता वाचली होती. त्यावेळी रविंद्रनाथ एक सर्वश्रेष्ठ कवी म्हणून माझ्या मनावर आरुढ झाले. त्यांच्या "गीतांजली" काव्यसंग्रहास जागतिक स्तरावरील नोबेल पारितोषिक मिळाले, ही आंम्हा भारतीयांच्या दृष्टीने फार अभिमानाची बाब आहे. पुढे रविंद्रनाथांच्या काही कविता मराठीत वाचावयास मिळाल्या, त्या मी समजून घेतल्या. मला त्याविषयी अधिकच ओढ निर्माण झाली. खरे तर त्यांचे साहित्य मुळ बंगालीत वाचण्यासाठी मी बंगाली शिकण्याचाही प्रयत्न केला. सन १९९० च्या सुमारास मी बंगालीची शिकवणीही लावली होती. काही कारणांमुळे ती पुर्णत्वास गेली नाही. पण मी त्यांच्याबाबत काही कुठे वाचायला मिळाले की सोडीत नसे. त्यापूर्वी मला मराठीतील वि.स.खांडेकर, ना.सी फडके, प्र.के.अत्रे, गो.नी.दांडेकर, शिवाजीराव सावंत, रणजित देसाई, व.पु.काळे, शंकर पाटील, साने गुरूजी यांच्या साहित्याचे वेड लावले होते, तसेच रविंद्रनाथ टागोरही माझ्या मनात सदैव घर करून राहिले. तोपर्यंत ते केवळ कवी नाहीत, तर कादंबरी, ललित, कथा आणि गीते यामध्येही त्यांची मजल फार पुढची असल्याचे कळाले होते. एकदा त्यांची "नौकाडुबी" ही मराठीत अनुवाद असलेली कादंबरी हाती पडली. नौकाडुबी आपल्याला कलकत्तापासून पुर्व भारतातील प्रवास घडवित वाराणसीपर्यंत आपल्याला घेऊन जाते. तेथील संस्कृती, चालीरिती यांची ओळख करून देत पुढे जाते. गोनीदांची 'मृण्मयी' त्याच धाटणीची कादंबरी आहे. अर्थात मृण्मयी मराठी मातीत अन् मराठी प्रांती आपल्याला लोकपरिचय करीत पुढे घेऊन जाते. रविंद्रनाथांच्या घरे बाईरे, चतुरंग, अशा अनेक कादंबऱ्या आहेत. "शेषेर कबिता" (शेवटच्या कविता) ही त्यांची कादंबरी कवितेनेच सजलेली आहे ! त्यांच्या कथा व लघुकथाही विपुल आहेत. त्यांच्या काही पुस्तकांचा इंग्रजी अनुवादही वाचनीय आहे. "गीतांजली" चा इंग्रजी अनुवाद त्यांनी स्वतःच केलेला आहे.
रविंद्रनाथांचा "गीतांजली" कवितासंग्रह म्हणजे, एखाद्या शालीन स्त्रीने सात्विक भावाने ईश्वरापुढे विविध सुवासिक फुलांची ओंजळ हळूवारपणे धरावी आणि त्याच्याकडे विश्वशांतीची मनोभावे प्रार्थना करावी. त्यातून प्रकटणारा मनोभाव म्हणजे 'गीतांजली' होय, असे मला वाटते. तिला साहित्याचे नोबेल मिळाले, हा केवढा मोठा सन्मान आहे. त्यांच्या विविधांगी साहित्याचा बंगाली भाषा, साहित्यावर मोठा प्रभाव आहे. मुळातच ते सृजनशील व संवेदनशील हृदयाचे कवी, साहित्यिक होते. ते परिवर्तनशीलही होते, कधीकधी त्यांचे विचार बंडखोर वाटतात. 'चार अध्याय' ही रवींद्रनाथांची कांदंबरी. 'राष्ट्रभक्ती' म्हणजे काय? राष्ट्र कसे बनते?, केवळ घोषणाबाजी, कठोर शिस्त यातून खरे स्वातंत्र्य शक्य आहे काय ? असे मत त्यांनी या कादंबरीत मांडले आहे. प्रचलित शिक्षण व्यवस्थेवरही त्यांनी वेळोवेळी फटकारे ओढले आहेत.
खरे तर त्यांच्या एकूणच साहित्याला आभाळाचे दान होते. रविंद्रनाथांचे अक्षरांचे मोती आणि शब्दांच्या धारा मानवी मनाला चिंब भिजवून सुखावून जातात. भारताचे राष्ट्रगीत "जन गण मन" आणि बांग्लादेशाचे राष्ट्रगीत " आमार शोनार बांग्ला" या दोन्हींचे गीतकार तेच. त्यांनी लिहीलेल्या 'एकला चलो रे' व 'चित्त जेथा भयशून्य' ह्या दोन कविता भारतीय स्वातंत्र्य संग्रामात स्फूर्ती- गीते म्हणून वापरण्यात आल्या. स्वतः अत्यंत गर्भश्रीमंत व व्यापार उद्दीमाची परंपरा असलेल्या, जमिनदार घराण्यातील असूनही रविंद्रनाथांना सामान्य जणांची कणव होती. त्यासाठी ते केवळ शब्दांत रमले नाहीत, तर कृतीतून अनेक गोष्टी करून दाखविल्या. खरे तर त्यांना खऱ्या अर्थाने समाजसेवक किंवा समाजशिक्षकच म्हणावे लागेल.
विशेष म्हणजे रविंद्रनाथ टागोर संगीतकारही होते. त्यांचे साहित्य, गीतरचना आणि संगीताचा फार मोठा प्रभाव पश्चिम बंगालच्या जनजीवनावर आहे.
आपली शिक्षणपध्दती व्यक्तीला कारकून बनविणारी आहे, माणूस घडविणारी नाही. ही त्यांची धारणा होती. शिक्षण हे मातीशी, निसर्गाशी, तुमच्या संस्कृतीशी, कलागुणांशी सुसंगत असावे. त्यातून ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे शिकायला मिळावे, ही त्यांची विचारसरणी त्यांनी 'शांतिनिकेतन' ही शाळा काढून प्रत्यक्षात उतरविली. शहरापासून खूप दूर स्वतःच्या फार मोठ्या जमिनीवर त्यांनी हा शैक्षणिक प्रयोग राबविला. "शांतिनिकेतन" म्हणजे वर्गखोल्यांच्या भींती नसलेली, शेतात, झाडाखाली, उघड्या निसर्गाशी संवाद साधणारी शाळा. रविंद्रनाथांची स्वतःची विचारधारा, समाज प्रबोधन, शिकवण किंवा अंधरुढींवर आघात यांमुळेच त्यांना "गुरूदेव" म्हणतात आणि मानतात. ते शिक्षणतज्ञ आणि विचारवंत म्हणूनही ओळखले जातात. ते एक चित्रकार आणि सृजनशील कलावंत होते. एवढेच नव्हे, पारंपरिक शेतीमध्ये सुधारणा करून, शेतीचे उत्पादन वाढले पाहिजे यासाठी ते आग्रही होते. त्याकाळात त्यांनी आधुनिक शेतीतज्ञांना पाचारण करून शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न केला.
शांतिनिकेतन शिक्षणपध्दती, विश्वभारती विश्वविद्यालय आज जगभर सर्वमान्य आणि सुपरिचित आहे. काही वर्षांपूर्वी मी स्वतःही शांतिनिकेतनला जावून आलो. दोन दिवस मुक्काम केला. रविंद्रनाथांनी लावलेला तो विचारांचा वृक्ष बहरलेला पाहून आलो, त्यांनी रेखाटलेली चित्रे 'वाचण्याचा' प्रयत्न केला. ग्रामीण संस्कृतीतून आभाळाएवढी माणसं उभी राहू शकतात, हे पाहून आलो. शिक्षण, कला, संस्कृती, स्वावलंबी जीवन आणि मानवता याचे धडे देताना पाहिले.
लेखाच्या सुरुवातीलाच मी शीर्षक दिले आहे. 'मराठी मातीचा शौर्य गंध भाळी मिरविणारा साहित्यिक.'
सुमारे दीडशे वर्षांपूर्वी बंगालच्या भूमीत जन्मलेला हा अवलिया, माणूस वाचताना जगाचाही अभ्यास करू लागतो. त्यातून त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्यकर्तृत्व, शौर्य, पराक्रम आणि राष्ट्रप्रेम यांनी गुरुदेव प्रभावित झाले. त्यांनी शिवरायांवर खंडकाव्य लिहीले, बंगालवासियांना वेळोवेळी छत्रपती शिवराय समजावून सांगितले. संत तुकारामांच्या अभंगांचा अभ्यास केला. त्यांचे तत्त्वज्ञान अभ्यासले. काही अभंग बंगालीत अनुवादीत केले, दोन्ही व्यक्तिमत्त्वे बंगालच्या भाषेत त्यांनी शब्दबद्ध केली. शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वी दूरवरच्या दुसऱ्या प्रांतातील, दुसऱ्या भाषेतील एका जगविख्यात साहित्यिकाने या दोन महान व्यक्तिरेखांवर प्रकाश टाकताना केलेला शब्दयज्ञ खूपच महत्त्वाचा आहे. म्हणूनच मी म्हटलेय मराठी मातीतील छत्रपती शिवरायांच्या शौर्याचा आणि संत तुकोबांच्या तत्त्वज्ञानाचा गंध भाळी लावणारा महान साहित्यिक रविंद्रनाथ टागोर. खरे तर हा मोलाचा सांस्कृतिक अनुबंध आहे, त्याला खूप मोठा अर्थ आहे.
रविंद्रनाथांविषयी मराठीतील अनेक मान्यवर साहित्यिकांनी लिहीलेले आहे. पूज्य साने गुरूजींनीही त्यांच्याविषयी लिहीले. थोर साहित्यिक पु.ल.देशपांडेंनी पुणे विद्यापीठात गुरुदेवांवर व्याख्याने दिली होती. अलिकडे विचारवंत डॉ.नरेंद्र जाधव यांनीही रविंद्रनाथांवर लिहीले आहे. शिवाय अनेकांनी त्यांची पुस्तके मराठीत अनुवादीत केली आहेत.
रविंद्रनाथ समजून घेताना आज त्यांच्या जन्मदिनी चार शब्द लिहीण्याचा माझा हा प्रयत्न म्हणजे, बंद दरवाजाच्या लहानशा फटीतून येणाऱ्या किरणांवरून सूर्याचे वर्णन केल्याप्रमाणे आहे. मला अजूनही रविंद्रनाथ खूप वाचायचे आहेत. भाषेच्या कमतरतेमूळे मर्यादा आल्या, तरी आता मराठीत साहित्य उपलब्ध आहे.
मागिल वीस-पंचवीस वर्षांत मी तीनवेळा कोलकत्याला गेलो आहे. गुरुदेव रविंद्रनाथ टागोर, स्वामी विवेकानंद, नेताजी सुभाषचंद्र बोस अशी विविध क्षेत्रांत विश्वविख्यात कामगिरी असणाऱ्या या महान विभूतींच्या जन्मस्थानी जावून मी विनम्र भावाने नतमस्तक झालो. मला फार विशेष वाटते ते याचे, ही तिनही व्यक्तीत्वे श्रीमंत कुटूंबातील, सुसंस्कारीत, बुद्धिमत्ता व ज्ञानसंपन्न वातावरणात जन्माला येवून त्यांनी "आता विश्वात्मके देवे l" या ज्ञानदेवांच्या विश्वात्मक प्रार्थनेप्रमाणे जगासाठी मागितले. संपन्न जीवनाचा, ऐश्वर्याचा आणि सर्वस्वाचा त्याग करून, मायभूमीसाठी उन्हात तळपणं स्विकारलं ! कर्तृत्वाच्या सीमा, नावलौकिक सातासमुद्रापार पोहोचविल्या. या महान व्यक्तिमत्त्वांच्या कर्तृत्वाकडे पाहताना धर्म, भाषा, प्रांत यांच्या सीमा आपोआपच गळून पडतात. प्रत्येक महापुरुषाकडे आपण याच विशाल नजरेतून पाहिले पाहिजे. प्रत्येकाने चार शब्द अशा व्यक्तीत्वाचे वाचले पाहिजेत, असे मला वाटते. रविंद्रनाथांनी आनंदाचीही खूपच छान व्याख्या सांगितली आहे. सर्वात महत्त्वाचे आनंद हा नेहमी भयमुक्त असतो आणि तो नैसर्गिक असावा, असे ते म्हणतात.
सदैव जनसामान्यांचा विचार करणारे, त्यांच्यासाठी विविध प्रयोग करणारे, निसर्गात खरा माणूस शोधणारे गुरूदेव रविंद्रनाथ टागोर यांनी सन १९४१ मध्ये दिनांक ७ अॉगस्ट रोजी वयाच्या ऐंशीव्या वर्षी या जगाचा निरोप घेतला.
खरे तर मला रविंद्रनाथांविषयी खूप लिहावयाचे आहे. त्याआधी त्यांना अजून जाणून घ्यायचे आहे. जगण्याचे असे कोणतेही क्षेत्र नाही, त्यास त्यांचा स्पर्श नाही. अशा सर्वस्पर्शी महान व्यक्तित्वाबाबत भविष्यात नक्कीच लिहीणार आहे.
त्यांच्या जन्मदिनानिमित्त मनोभावे विनम्र अभिवादन.
🙏@
लेखक : अरुण तुकाराम बोऱ्हाडे
( मोशी, ता.हवेली, जिल्हा-पुणे)
मोबाईल : 9881301339.
मेल : atborhade@gmail.com
कविश्रेष्ठ रविंद्रनाथ टागोर
यांची कविता -
ll प्रार्थना ll
विपत्तीमध्ये तू माझे रक्षण कर
ही माझी प्रार्थना नाही..
विपत्तीमध्ये मी भयभीत होऊ नये
एवढीच माझी इच्छा l
दुःखतापाने व्यथित झालेल्या माझ्या मनाचे
तू सांत्वन करावेस अशी माझी अपेक्षा नाही..
दुःखावर जय मिळवता यावा
एवढीच माझी इच्छा l
जगात माझे नुकसान झाले
केवळ फसवणूक वाट्याला आली..
तर माझे मन खंबीर व्हावे
एवढीच माझी इच्छा l
माझे तारण तू करावेस वा
मला तारावेस ही माझी प्रार्थना नाही..
तरून जाण्याचे सामर्थ्य माझ्यात असावे
एवढीच माझी इच्छा l
माझे ओझे हलके करून
तू माझे सांत्वन केले नाहीस तरी माझी तक्रार नाही..
ते ओझे वाहायची शक्ती मात्र माझ्यात असावी
एवढीच माझी इच्छा l
सुखाच्या दिवसांत नतमस्तक होऊन
मी तुझा चेहरा ओळखावा..
दुःखांच्या रात्री जेव्हा,
सारे जग फसवणूक करील..
तेव्हा तुझ्याविषयी माझ्या मनात
शंका मात्र निर्माण होऊ नये,
एवढीच माझी इच्छा ll
*** 👏


It is very good article on the GURU RAVINDRANATH TAGORE. I FIRST TIME READ ABOUT THEIR CONNECTIONS WITH OUR MAHARASHTRA HERO SHIVAJI MAHARASHTRA AND SAINT TUKARAM MAHARAJ
ReplyDeleteफारच सुंदर लेख आहे. किती थोर व्यक्तिमत्व आहेत रविंद्रनाथ टागोर!! त्यांच्याविषयी आणखीन जाणून घेण्यास आवडेल. असेच लिहित रहा. तुम्हांस शुभेच्छा. धन्यवाद. कविता अप्रतिम. Cherry on the cake.
ReplyDeleteफारच अप्रतिम लेख लिहिलात. तसे तुमचे लिखाण वचनिय असतेच, आज फारच जास्त आनंद दिलात. पुढील लिखाणासाठी शुभेच्छा.
ReplyDeleteअप्रतिम लेग
ReplyDeleteअप्रतिम लेख
ReplyDeleteखूप छान सर
ReplyDeleteVery informative
ReplyDelete