आधी फुले समजावून घ्या, मग खुशाल दगड मारा.. - अरुण बोऱ्हाडे..
आधी फुले समजावून घ्या, मग खुशाल दगड मारा..!
एक आठवण : अरुण बोऱ्हाडे..
महात्मा ज्योतिबा फुले :
द्रष्टा समाजक्रांतिकारक
👏
आजच्या दिवशी (दि.११ एप्रिल) सन १८२७ मध्ये कटगुण (ता.खटाव, जि. सातारा) येथे महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म झाला. त्यांनी महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाचा पाया घातला. पुण्यामध्ये मुलींची शाळा सुरू केली. पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिकवून, त्यांनाही आपल्या कार्यात सहभागी करून घेतले. ते समाजसुधारक होते. शेतकरी आणि बहूजन समाजातील लोकांच्या अज्ञान व दारिद्रय याची कारणे शोधून, त्यांच्या प्रबोधनासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हा मंत्र त्यांनी दिला. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. ते विज्ञानवादी नेते होते. समाजातील अनेक अनिष्ट प्रथा व रुढींच्या विरोधात त्यांनी संघर्ष केला. ते विचारवंत होते. 'शेतकऱ्यांचा आसूड', 'गुलामगिरी' इत्यादी पुस्तके त्यांनी लिहीली. समताधिष्ठित समाजनिर्मितीसाठी ते झटले.
मुंबईतील गिरणी कामगारांच्या हक्क व न्यायासाठी लढणारे नारायण मेघाजी लोखंडे यांना त्यांनी पाठबळ दिले. अशा या द्रष्ट्या समाजक्रांतिकारकास जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन.
📌११ एप्रिल, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त नेहमीप्रमाणे पोष्ट लिहीत असताना, एक जुनी आठवण डोळ्यांसमोर उभी राहिली. ती सांगायला हवी, असे वाटले म्हणून लिहीत आहे.
खेड तालुक्यातील वरूडे येथे महात्मा फुले पुण्यतिथीचा कार्यक्रम तेथील स्थानिक कार्यकर्त्यांनी आयोजित केला होता.
त्याकाळी आम्ही अनेक युवक कार्यकर्ते पिंपरी चिंचवड परिसरात सामाजिक प्रबोधन व सांस्कृतिक क्षेत्रात मनापासून काम करीत होतो. आजच्या प्रमाणेच तेव्हाही माझी जागोजाग भाषणे व्हायची.
चाकणला महंमद नैसर्गी हे माझे चांगले साहित्यिक मित्र होते. (ते आता हयात नाहीत.) त्यांनी सांगितले की, आपल्याला वरूडे येथे महात्मा फुले पुण्यतिथी कार्यक्रमासाठी निमंत्रित केले आहे. इतरही मान्यवर मंडळी येणार आहेत. मी होकार दिला. त्यावेळी महात्मा फुलेंचे अभ्यासक हरि नरकेंचा माझाही नुकताच परिचय झाला होता. मी, नैसर्गी, हरि नरके, ज्ञानेश्वर कांबळे असे सर्वजण कार्यक्रमाला गेलो. काही मान्यवर आले नाहीत. गावातील चौकातच व्यासपीठ बांधले होते. कार्यक्रम सुरू झाला, भाषणे सुरू झाली. कोण बोलत होते, आता आठवत नाही. पण तेवढयात व्यासपीठावर दोन-तीन दगड येवून पडले. संयोजकांचा गोंधळ उडाला. आता काय करायचे ? कार्यक्रम थांबवायचा का ? आम्ही ठरविले, कार्यक्रम चालू ठेवायचा. काही लोक निघून जावू लागले. रात्रीची वेळ, लाईटस कमी, बाजूला काळोख आणि पुन्हा दगड आले. मग मी माईक हाती घेतला, लोकांना समजाविण्याचा प्रयत्न केला. एका कोपऱ्यात गडबड चालूच होती, काय बोलताहेत कळत नव्हते. पण त्यांना उद्देशून स्पीकरमध्ये ओरडून सांगितले,
"ऐका, मी सुद्धा याच परिसरातील आहे. माझे नांव अरुण बोऱ्हाडे, मोशीचा आहे मी. या गावात आणि परिसरात माझे पुष्कळ नातेवाईक आहेत.. कोणाची शंका असेलच, तर समोर येवून चर्चा करा. आम्ही महात्मा फुले सांगायला आलोय, आधी फुले समजावून घ्या. मग दगड मारायचे की काय तुम्ही ठरवा. मी भाषण चालू करतोय, व्यत्यय आणला तरी बंद करणार नाही.!"
माझे भाषण झाले. इतरही वक्त्यांची भाषणे झाली. रात्री अंधारातच रस्ता शोधित घरी आलो.
मित्रहो, आश्चर्य वाटेल. ही घटना आहे, नोव्हेंबर १९८६ मधील..! म्हणजे ३४ वर्षांपूर्वीची.!
या आठवणी बरोबरच, तेव्हाची कार्यक्रम पत्रिकाही मी अजून जपून ठेवली आहे..🙏
#अरुण बोऱ्हाडे... ✍
(मोशी, ता.हवेली, जि. पुणे)

Excellent !
ReplyDeleteतुमचे लिखाण छानच असते. तुमचे वक्तृत्व, सामाजिक कार्यामुळे असलेला जनसंपर्क, त्यामुळे आलेले अनुभव म्हणजे मोती आहेत, ते सुंदर पद्धतीने शब्दबद्ध होतायेत आणि आम्हाला वाचायला मिळतायत यातच आनंद आहे.
ReplyDeleteनाम साधर्म्य आहे त्यामुळे आता पत्ता लिहावा लागेल, अरुण बबन बोऱ्हाडे (शिवतेजनगर, चिंचवड)
Delete