कोरोना : एकवीस दिवसांचे लॉकडाऊन.

कोरोना : एकवीस दिवसांचे लॉकडाऊन. 
' वाटते तेवढे सोपे नाही, पण आवश्यक '

# कोरोना विषाणूने जगभर थैमान मांडलेले आहे. भारतातही वेगाने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसतोय. आपल्या राज्यात आणि शहरातही त्याने छावणी टाकलीये. हे कोणा एका कुटूंबाचे नाही तर अखिल भारताचे नि जगताचे संकट आहे. आमच्या उभ्या आयुष्यात एवढे भयंकर संकट आम्ही पाहिले नाही. लहान असताना भारत-पाकच्या युद्धाचे वेळी "ब्लॕक-आऊट" म्हणजे रात्रीच्या वेळी घरातील लाईटस बंद करणे, तेवढेच आठवते. त्यापाठोपाठ १९७२ च्या दुष्काळाच्या थोड्याफार पुसटशा छटा आहेत. त्यानंतरच्या आणीबाणीतील काही आठवणी डोकावतात. मात्र देशापुढे उभे राहिलेले विद्यमान "कोरोनाचे युद्ध " हे खूपच भयाण आहे, त्याचे परिणामही भीषण असतील, असे वाटतेय.
यातून अनेक गोष्टी शिकायला आणि पहायला मिळत आहेत. त्यातूनच केलेले हे एक मुक्त चिंतन.

यानिमित्ताने आठवण होतीये, ती किल्लारीच्या भूकंपाची.. हजारोजण अगदी क्षणार्धात धरतीच्या विकोपात गेले. पुढे गुजरातमध्येही तेच घडले. चक्रीवादळ, त्सुनामी याही संकटांना ऐकले आणि पाहिले. मागिल वर्षी सांगली- कोल्हापूरला आलेला महापूरही पाहिला. निसर्गाने ठरविले की क्षणात होत्याचे नव्हते होते. हे अनेकदा अनुभवले आहे, आपण सर्वांनी. पण या कोरोनाची भानगड खूपच वेगळी आहे. काहीतरी भयाण होणार आहे, कळतेय पण दिसत नाही. आघात होतोय पण जाणवत नाही. दूरदर्शनवर जगभरातील बातम्या पाहिल्या की मन विषण्ण होतेय, घाबरायलाही होतेय. त्याचबरोबर मानवाच्या मागासलेपणाची जाणिवही होतेय. मानवाने प्रत्येक क्षेत्रात एवढी प्रगती केली, पण याबाबतीत का मागे राहिला ?
हा विषाणू नवीन आहे का, तर नाही ! या पाहूण्याचे नांव अगोदरच माहिती आहे. बारावीच्या अभ्यासक्रमातही तो डोकावून गेला. डेटॉलच्या बाटलीवरही भेटून गेला. पण तो कागदावरच चिकटून राहिला. जगात कोणीही त्याला गांभिर्याने घेतले नाही, असे दिसतेय ! मी मी म्हणणारे प्रगत, अतीप्रगत चीन, अमेरिका, इटली सर्वत्र या कोरोनाने हाहाकार माजविला, हजारोंच्या संख्येने, अक्षरशः कीडामुंगीप्रमाणे माणसं धरतीवर कोसळून पडताना दिसत आहेत. सातशे कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या आणि येथून चंद्राला, मंगळाला कवेत घेणारा माणूस हतबल होवून निपचित पडलाय ! हेच खरे वाटत नाही ! जगातील सर्व संशोधन प्रयोगशाळा, सर्व डॉक्टर्स, संशोधक, विचारवंतांची बुद्धी कुंठीत करणारा हा विषाणू किती भयंकर असेल, याची कल्पनाच न केलेली बरी.!

आम्ही भारतीय, विशेषतः महाराष्ट्रातील लोक मात्र कमाल आहोत. सरकारने घरात बसायला सांगितले तरी बसवत नाही. पाच मिनीटे टाळ्या वाजवायला सांगितले तर, बँड लावून ढोल वाजवून वराती काढल्या. दिवसभर घरात बसले  नि सायंकाळी शेकडोजण एकत्रित आले. याला अतिउत्साही म्हणायचे की वेडेपणा म्हणावे कळत नाही. परिस्थितीचे गांभिर्य मात्र नाही. राज्याचे मुख्यमंत्री, देशाचे पंतप्रधान यांनी कळकळीने सांगूनही आम्हांला कळत नाही. आपल्या काळजीपोटी घरात बसणेही जमत नाही. पोलिसांना काठ्या चालविण्याची वेळ यावी, किती  दुर्दैवी आहोत आपण सर्वजण ?
सोशल मिडीयावर तर सुचनांचा सुळसूळाट चाललाय. बरेच 'डॉक्टर्स 'अनेक सुचना देत आहेत, खरे कोणाचे मानायचे, विश्वास नेमका कोणावर ठेवायचा ? हा प्रश्न पडतो. असो, त्यांच्या योग्य सुचनांचेही स्वागतच आहे.
पण या कोरोनामूळे अनेक गोष्टी लक्षात येताहेत. पहिले म्हणजे उगाचच आपण फार विद्वान आहोत, हा मानवाचा भ्रम गळून पडला. देश, राज्य, प्रांत, जाती, जमाती यापलिकडेही काही असते. एखादे संकट आले की भेदाच्या या भिंती गळून पडाव्यात. सुधारणांच्या नावाखाली आम्ही अनेक परंपरा, संस्कृती व अनुभवसिद्ध गोष्टी विसरून गेलो आहोत, त्याची जाणीव व्हावी. विज्ञानाच्या मागे धावताना विध्वंसाचा विसर पडला, या घटनेने तरी आम्ही सावध व्हावे.

आता एकवीस दिवसांचे लॉकडाऊन..! सारे विसरून आपापल्या घरात बसून राहणे, घरातूनच काम पाहणे, एकमेकांच्या स्पर्शातून संसर्गातून विषाणू पसरतात म्हणून हे social distancing किंवा सामाजिक अंतर आपण पाळणार आहोत. हे होणे खरोखरच गरजेचे आहे. आम्ही  कधीतरी शांत बसून बालपण आठवावे, जुन्या आठवणींना उजाळा द्यावा. आपल्या कुटूंबियांसमवेत निवांतपणे वेळ घालवावा. संगीत, गाणी, वाचन, लेखन, बुद्धिबळ, योगा इत्यादी प्रकारे छान वेळ कारणी लावावा.
मराठी साहित्य विश्व खूप समृद्ध आहे. हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात वेळ कुठे काढतो आपण. विशेषतः युवापिढीने जुन्या लेखकांची कसदार पुस्तके जरूर वाचावीत. हल्ली नेटवर सर्व उपलब्ध आहेच. संकटांना सामोरे जाण्याचे धारिष्ट्य आणि आनंदातही बेहोष न होता, संतुलन ठेवण्याची किमया मराठी साहित्यात आहे.
शक्य झाल्यास ज्ञानेश्वरी, तुकोबांची गाथा यामध्ये नजर टाकावी. संत तुकोबांची 'वृक्षवल्ली आंम्हा सोयरे..' किंवा 'भेदाभेद भ्रम अमंगळ ' या संकल्पना किंवा संत ज्ञानेश्वरांनी संपूर्ण विश्वासाठी मागितलेले "पसायदान " समजावून घ्यावे. ज्ञानेश्वर, तुकाराम हे विज्ञानवादी,  सुधारणावादी संत होते हे तरी लक्षात येईल. अध्यात्म आणि विज्ञान दोन्ही समजावून घेऊन जगाची प्रगती व्हावी.
पुढील एकवीस दिवसांत आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टींकडे पुन्हा नव्याने पाहता येईल. उरलेल्या आयुष्याचे सुंदर चित्र रेखाटता येईल.
असो, या कोरोनाचे जगावरिल आणि भारतावरिल संकट लवकर दूर व्हावे, त्यासाठीच्या प्रयत्नांना यश लाभो, अशी विश्वप्रार्थना करूया आणि आपण सर्वजण या *'महा लॉकडाऊनला '* सामोरे जावूया..!!
🙏
@ अरुण बोऱ्हाडे  ... ✍
_( दि. २५/०३/२०२०)_
Email : atborhade@gmail.com

Comments

Popular posts from this blog

श्री नागेश्वर महाराज भंडारा : भक्तिमार्गातील शक्ती स्त्रोत [लेखक : अरुण बोऱ्हाडे]

'शरद पवार : दुःखातही मनाला उभारी देणारा अलौकिक लोकनेता'' : अरुण बोऱ्हाडे

"कष्टकरी कामगारांची, एक अधुरी कहाणी..! सामाजिक चिंतनाचा विषय" लेखकः अरुण बोऱ्हाडे