जागतिक महिला दिन : संघर्षातून हक्क व समानतेकडे..
" जागतिक महिला दिनाला काही पार्श्वभूमी आहे. महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, दिनांक ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत पुरुषप्रधान व्यवस्थेने जवळपास जगभरात सर्वत्रच महिलांना मतदानाचा हक्क नाकारलेला होता. या अन्यायाविरुद्ध स्त्रिया आपापल्या ताकदीने संघर्ष करीत होत्या. सन १८९० मध्ये अमेरिका व युरोपमध्ये महिलांच्या मतदानाच्या हक्कासाठी जोरदार मागणी होऊ लागली. दि. ८ मार्च १९०८ रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता अशा मागण्या केल्या. तसेच सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणीही केली. तेथून महिलांच्या हक्क व अधिकारांची सर्वत्र चर्चा सुरू झाली.
सन १९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत, दि. ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला.
अर्थात, युरोप व अमेरिकेत महिलांना मतदानाचा अधिकार प्राप्त होण्यासाठी सन १९१८-१९ साल उजाडले.
पुढे १९७५ मध्ये "जागतिक महिला वर्षाच्या" निमित्ताने संयुक्त राष्ट्र संघटनेने (यूनो) महिलांचे अधिकार आणि जागतिक शांतता या हेतूने "आंतरराष्ट्रीय महिला दिन" साजरा करण्याचे ठरविले.
संघर्षातून महिलांना हक्क आणि अधिकार प्राप्त झाले आहेत, हे खरे असले तरी, भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीशक्तीला प्राचीन काळापासूनच महत्त्वाचे स्थान असल्याचे दिसून येते. आमचा इतिहासही तेच सांगतो. अगदी अलिकडच्या काळातील इतिहासाचा मागोवा घेतला तरी हे स्पष्ट होईल. छत्रपती शिवाजी महाराजांना घडविणारी राजमाता जिजाबाई या स्वतंत्र अधिकार असलेल्या कर्तबगार स्त्री होत्या. स्वराज्यातील अनेक तंटेबखेडे त्यांनी स्वतःच्या अधिकारकक्षेत सोडविले. न्यायनिवाडे केले. आदिलशहाने शहाजीराजांना कैद केल्यानंतर स्वतः विजापूरच्या दरबारात जावून शहाजीराजांची वकिली केली, त्यांची बाजू मांडली आणि कैदेतून सुटका करविली.
खुद्द छत्रपती शिवरायांनी स्वराज्याच्या कुलमुखत्यार म्हणून स्वतःच्या सुनेला, येसूबाईंना अधिकार प्रदान केले होते. त्यांनीही अनेकदा कसोटीच्या क्षणी न्यायनिवाडे केल्याचे दिसून येते.
छत्रपती संभाजी राजांच्या बलिदानानंतर उद्भवलेल्या परिस्थितीशी महाराणी येसूबाईंनी धिरोदात्तपणे सामना केला, मुत्सद्दीपणे निर्णय घेतले. बलाढ्य मुघल सैन्याने रायगडाला वेढा दिला होता. पतीच्या मृत्यूनंतर विचलित न होता स्वराज्याची सूत्रे हाती घेतली, सुमारे आठ महिने रायगड निकराने लढविला.
राज्य कारभारात स्वतःला झोकून देऊन कर्तृत्व सिद्ध केल्याचे मराठ्यांच्या इतिहासात महाराणी ताराबाईंनीही दाखवून दिले आहे. त्यांनीही छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर स्वतः औरंगजेबाशी संघर्ष केला, सुमारे सात वर्षे मुघली सैन्याविरोधात लढल्या. मात्र स्वराज्याची मशाल विझू दिली नाही.
हा आमच्या महिलांचा दैदिप्यमान व शौर्याचा इतिहास आहे. पुढील काळात झाशीच्या राणीचा लढा आणि राजमाता अहिल्याबाई होळकरांचा राज्यकारभार इतिहासात वेगळाच ठसा उमटवून गेला आहे.
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातही अनेक शौर्यशाली महिलांचे योगदान आपल्याला पहावयास मिळते. स्वातंत्र्यानंतरच्या काळात श्रीमती इंदिरा गांधीनी पंतप्रधान म्हणून देशाचे दीर्घकाळ नेतृत्व केले. त्यांच्या नेतृत्वाखाली भारत-पाक युद्धातील त्यांच्या निर्णयक्षमतेने जगामध्ये भारताची ताकद दाखवून दिली. ही भारतीय स्त्रीशक्तीची उदाहरणे आहेत. राजकारणाशिवाय इतरही क्षेत्रांत भारतीय महिलांची कर्तबगारी मान उंचावणारी आहे. सामाजिक क्रांतीची ज्योत चेतवून महिलांना स्वत्वाची जाणिव करून देणाऱ्या सावित्रीबाई फुलेंचा संघर्षाचा इतिहास सदैव प्रेरणादायी आहे.
याच प्रेरणेने भारतीय महिलांनी साहित्य, कला, क्रिडा, विज्ञान, संशोधन, प्रशासन, सामाजिक कार्य इत्यादी अनेक क्षेत्रांत कर्तृत्व दाखवून दिले आहे. लता मंगेशकर, कल्पना चावला, पी.टी.उषा, सिंधूताई सपकाळ यांच्यापासून तर कालपरवा राष्ट्रपतींनी गौरविलेल्या बीजमाता राहीबाई पोपेरेपर्यंत ही कर्तृत्वाची परंपरा अखंडपणे चालू आहे."
अलिकडे महिलांचे सक्षमीकरण किंवा सबलीकरणाचा विचार जेव्हा मांडण्यात येतो, तेव्हा ज्येष्ठ गांधीवादी नेते बाळासाहेब भारदेंची आठवण येते. ते म्हणाले होते, आमच्या ग्रामीण लोकजीवनामध्ये किंवा शेतकऱ्यांच्या जीवनशैलीमध्ये घरातील वृद्ध आईकडे किंवा घरातील मोठ्या सुनेकडेच आर्थिक व्यवहार असायचे. घरोघरी शेळ्या, कोंबड्या, गाई, म्हैशी असायच्या. दुध, दही यांचे येणारे पैसे किंवा कोंबड्यांची अंडी विकून येणारे पैसे कुटूंबातील त्या प्रमुख महिलेकडेच असायचे. शेतात काय पिके घ्यायची याबाबतीत 'तिचे' अर्थात घरातील कारभारणीचे मत विचारात घेतले जायचे. ती साक्षर नसेल पण सक्षम आणि सबलाही होती.
अर्थात ही परिस्थिती सदासर्वकाळ किंवा सर्वत्रच असेल असेही नाही. मात्र याला एक चांगली परंपरा म्हणता येईल. या चांगल्या परंपरेतूनच प्रेरणा घेऊन, बदलत्या काळास अनुसरून आम्ही पुढे जायला हवे.
सावित्रीबाई फुल्यांचा शिक्षणाचा मंत्र स्विकारला, तरिही शिक्षण घेऊनही महिलांना सर्वच क्षेत्रांत संधी मिळाली असे नाही. उदा. संरक्षण क्षेत्र. अगदी काही वर्षांपूर्वी संरक्षण विभागात महिलांना संधी देण्यात आली. राजकीय क्षेत्रात पुरुषांचेच वर्चस्व कायम होते. मागिल वीस-पंचवीस वर्षांपासून किमान महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण मिळाले आहे. नागरी विकासाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये महिलांचा सहभाग असावा, त्यांची मते व दृष्टिकोन विचारात घेतली जावीत हा हेतू. मात्र आजही निवडून येणाऱ्या महिला प्रतिनिधींना कायद्याने अधिकार मिळाले असले, तरी कुटूंबाने पूर्णपणे दिलेत असे म्हणता येत नाही. काही अपवाद सोडता, महिलांचे पतीराजच अधिक सक्रिय असल्याचे दिसून येते. ही परिस्थिती बदलणे गरजेचे आहे.
गेल्या काही वर्षांत महिला संघटन व उद्यमशिलता यातून सबलीकरणाचा एक चांगला विचार 'महिला स्वयंसिद्ध बचत गटांच्या' माध्यमातून करण्यात आला. खरे तर ती एक सक्षम चळवळ व्हायला हवी होती, पण त्यालाही आता शिथीलता आल्यासारखे वाटते. अर्थात काही महिलांनी यातूनच आपली उद्योजगता सिद्ध केली आहे. मागिल काही दशकांमध्ये अनेक आस्थापना व संस्थांच्या व्यवस्थापनामध्ये महिलांनी कुशल नेतृत्व केल्याचे दिसत आहे. सुधा मुर्तींसारखे अनोखे उदाहरण पाहिले की, या नेतृत्वाला किती कंगोरे असू शकतात हेही कळते.
प्रगतीच्या व विकासाच्या मार्गावरील महिलांचा सहभाग, स्वतंत्र निर्णयक्षमता या गोष्टींची चर्चा करतानाच समाजातील काही घटक आजही स्त्रीकडे ज्या नजरेने पाहतो, त्यामध्ये बदल होण्याची गरज आहे. कुटूंबामध्ये, समाजामध्ये पुरुषांनी स्त्रीच्या कर्तृत्वाचा मनापासून स्वीकार करायला हवा, सन्मान करायला हवा. तोच संस्कार घराघरात घडायला हवा. महिलांनीही आत्मविश्वासाने आणि धाडसीपणे या दुष्ट प्रवृत्तींचा प्रतिकार करायला शिकले पाहिजे, असे मला वाटते.
समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात महिलांनी केलेल्या कर्तबगारीचे केवळ कौतुक नव्हे, तर अभिमान समाजाने बाळगायला हवा. महिलांनीही इतिहासातील कर्तबगार महिलांची प्रेरणा घेऊन येणाऱ्या अडथळ्यांवर मात करावी. संघर्षातून संघटन आणि संघटनेतून समानतेकडे वाटचाल करणाऱ्या या कर्तृत्वशाली स्त्रीशक्तीला जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.
🙏
@ अरुण बोऱ्हाडे ...✍
(मोशी, ता.हवेली, जिल्हा पुणे.)
atborhade@gmail.com

Comments
Post a Comment