एच.ए. मधील श्री शिवजयंती उत्सव..

आठवणीतील प्रतिमा :
एच.ए. मधील श्री शिवजयंती उत्सव.. 
🚩🚩🚩


----------------------
_हिंदुस्थान अँटिबायोटिक्स लिमी. (एच.ए.) मधील श्री शिव-स्मारक प्रतिष्ठानची (जुने नांव- श्री छत्रपती शिव स्मारक समिती) ची नुकतीच  बैठक झाली. येत्या दि.१९ फेब्रुवारी रोजी श्री  छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. प्रतिवर्षाप्रमाणे जयंतीच्या नियोजनाची ही बैठक होती. सल्लागार या नात्याने मी बैठकीस उपस्थित होतो. चर्चा झाली, नियोजन झाले, जमाखर्चाचा आढावा घेतला. प्रमुख पाहूणे, निमंत्रणे, वक्ता, पोवाडा, शिवज्योत, ढोलताशा पथक, मंडप, परिसर स्वच्छता, रोषणाई, चहापान अशी प्रत्येकाने आपापली कामे वाटून घेतलेली.. त्या प्रत्येक बाबीचा आढावा घेतला, चर्चा झाली आणि बैठक संपली.
_मात्र, माझ्या मनात मागिल अनेक वर्षांच्या या बैठका, धावपळ आणि शिवजयंती कार्यक्रमांची स्मृतीचित्रे नयनपटलांवर तरळून गेली, आठवणींचे सूर मनामध्ये तरंगत राहिले.
एच.ए.कॉलनीतील श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, हा या शहरातील शिवरायांचे पहिले स्मारक. एच.ए.च्या तत्कालीन कामगारांनी लोकवर्गणीतून निधी जमा करून, हवेली तालूक्याचे तत्कालीन आमदार कै.अण्णासाहेब मगर आणि देशाचे  नेते कै.यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या सहकार्याने हे स्मारक व पुतळा एप्रिल १९७१ मध्ये स्थापित केले. येथील श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अतिशय सुबक आणि रेखीव आहे. तेव्हापासून आधी नगरपालिका आणि आता महानगरपालिकेच्या वतीने शिवरायांच्या येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्याचा प्रघात आजही चालू आहे. माझा स्वतःचा या स्मारक संस्थेशी आणि या शिवजयंती आयोजनाशी जवळपास एकतीस वर्षांपासूनचा सक्रिय संबंध आणि सहभाग आहे. सन १९९० मध्ये अशाच एका बैठकीत त्यावेळच्या कार्यकर्त्यांनी या समितीच्या "सरचिटणीस"पदाची जबाबदारी माझ्याकडे सोपविली. तेव्हापासून आजपावेतो आम्ही अतिशय उत्साहाने आणि प्राधान्याने या शिवजयंती उत्सवाची व शिवस्मारकाची जबाबदारी सांभाळली आहे. माझ्यासोबत युवक सहकारी मित्रांचा मोठा संच होता. सर्वांना बरोबर घेऊन, कल्पकतेने विविध कार्यक्रम आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून अतिशय शिस्तबद्धरितीने आम्ही शिवजयंती साजरी करीत आलो.
_एच.ए. अर्थात हिंदुस्थान अँटिबायोटिक्स लिमी. ही भारत सरकारच्या मालकीची कंपनी, व्यवस्थापनात आणि कामगारांमध्येही विविध प्रांतातील आणि विविध भाषांतील सहकारी असायचे. त्या सर्वांना आम्ही बरोबर घेतले. त्यावेळी तीन दिवसांची व्याख्यानमाला, एक दिवस शाहिरी-पोवाडे किंवा तत्सम सांस्कृतिक कार्यक्रम, कबड्डी, व्हॉलिबॉल, रस्सीखेच इत्यादी क्रिडास्पर्धा असे आठवडाभर भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करून आम्ही "शिवजयंती उत्सव सप्ताह" साजरा करीत असू. वेगवेगळ्या किल्ल्यांवरून शिवज्योत प्रज्वलित करून आणली जायची, तिचे जल्लोषात स्वागत व्हायचे. ढोल-ताशाच्या निनादात शिवप्रतिमेची मिरवणूकही बरेच वर्षे काढली. पुढील काळात शिवप्रतिमेची पालखीतून मिरवणूक काढली. कधीकधी दांडपट्टा, तलवारबाजी अशा मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. येथील व्याख्यानमालेत प्राचार्य शिवाजीराव भोसले, 'मृत्यूंजयकार' शिवाजीराव सावंत, कै.बाळासाहेब भारदे, श्री उल्हासदादा पवार, डॉ.सदानंद मोरे, डॉ.रामचंद्र देखणे, प्रा.अनिरुध्द देशपांडे, प्र.चिं.शेजवलकर, निनाद बेडेकर, दामोदरे सर, शाहीर योगेश, शाहीर हेमंत मावळे, प्रा.संभाजी देसाई, पांडुरंग बलकवडे,  डॉ.प्रमोद बोराडे असे महाराष्ट्रातील अनेक नामवंत वक्ते व अभ्यासक शिवजयंतीच्या निमित्ताने शिवचरित्राचे ज्ञानामृत देऊन गेले आहेत. तसेच अनेक दिग्गज व्यक्तींना या व्यासपीठावर आणण्याचे भाग्य आम्हांस लाभले आहे. एकदा तर शिवाजीराव सावंत यांनी पुण्यात शिवजयंती समारंभात बोलताना आवर्जून आमच्या "शिवजयंती सप्ताहाचे" आणि एकूणच नियोजनाचे जाहिरपणे कौतुक केले होते.
आता अलिकडे आम्ही एकच व्याख्यान आयोजित करतो. येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकावरील विद्युत रोषणाई, सजावट आणि परिसरातील सुशोभीकरण हा शहरात सर्वत्र कौतुकाचा व चर्चेचा विषय असतो. आम्ही सर्व कार्यकर्ते व सहकारी  दोन दिवस अगोदरच येथील तयारीत गुंतलेलो असतो. पुतळ्यासमोरची दरवर्षी आकर्षक व सुरेख रांगोळी हेही आमचे वैशिष्ट्य असते. अनेकदा वर्तमानपत्रांनी याची दखल घेत आवर्जून या रोषणाईची सुंदर छायाचित्रे प्रसिध्द केली आहेत. पुणे-मुंबई महामार्गावरून जाणारे असंख्य नागरिक येथे थांबून रोषणाई व सजावटीचे मनसोक्त फोटो काढतात. शिवजयंतीच्या दिवशी सकाळीच व्याख्यान असते. एच.ए. शाळेतील विद्यार्थी पोवाडा सादर करीत असतात. शहर व परिसरातील अनेकजण याचा आस्वाद व श्रवण आनंद घेतात. एच.ए. कॉलनीतील युवक सहकारी भक्तीशक्ती पासून शिवज्योत प्रज्वलित करून आणतात. अनेक वर्षांपासूनची आमची ही शिवप्रेमींची यात्रा तितक्याच भक्तीभावाने चालू आहे. एच.ए.च्या व्यवस्थापनाचाही या उत्सवासाठी भरीव सहकार्य व सहभाग असतो. कंपनीच्या वतीने सर्व कामगारांना शिवजयंतीनिमित्त "विशेष जेवण" देण्यात येते. अलिकडे पिंपरी चिंचवड महापालिकेचाही सहभाग आणि सहकार्य या उत्सवाला लाभले आहे.


_सन २०१८ च्या शिवजयंतीला प्रमुख पाहूणे म्हणून छत्रपती शिवरायांचे बंधू व्यंकोजीराजे यांचे वंशज आणि दक्षिणेतील तंजावर येथील मराठा गादीचे अधिपती 'श्रीमंत शिवाजीराजे भोसले महाराज' यांना आम्ही खास तंजावर (तामिळनाडू) येथून पाचारण केले होते. तर व्याख्याते म्हणून इतिहास संशोधक श्री पांडुरंग बलकवडे यांना निमंत्रित केले होते. तंजावरच्या महाराजांच्या उपस्थितीने या समारंभाला मोठीच उंची प्राप्त झाली. आम्ही त्यांना भक्तीशक्ती भेटीचे शिल्प असलेले, खास बनवून घेतलेले वैशिष्ट्यपूर्ण स्मृतीचिन्ह आणि शिवशाही जरीपटका देऊन केलेला स्वागत सोहळा आणि शिवजयंतीचा कार्यक्रम पाहून तेही खूपच भारावून गेले होते. नुकताच माझ्या काही सहकारी मित्रांसमवेत मी पुन्हा तंजावरला जावून आलो, तर या दोन्हीही वस्तू महाराजांनी त्यांच्या महालात सुरक्षित ठेवलेल्या दिसून आल्या. महाराष्ट्रातील गडकोटांची छायाचित्रे व माहिती  असलेले एक पुस्तक आम्ही त्यांना भेट दिले आणि भेट अधोरेखित केली. या शिवस्मारक समितीच्या निमित्ताने यापूर्वीही आंम्हाला अनेक नामवंत व्यक्तींना भेटण्याची, चर्चा करण्याची वेळोवेळी संधी मिळाली. चांगला विचार आणि चांगल्या परंपरा या माध्यमातून निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न केला. शिवचरित्र आणि शिवविचारांतून सर्वांना एकजूटीचा संदेश मिळतो, संघटन कौशल्य शिकावयास मिळते, अडचणींवर मात करण्याची प्रेरणा मिळते. आम्ही ते अनुभवलेले आहे. माझ्यासारखा कार्यकर्ता एच.ए. आणि संपूर्ण जिल्ह्यातील कामगार चळवळीत गेली पंचवीस वर्षांहून अधिककाळ कार्यरत आहे, अनेक लढे आम्ही यशस्वी केले आहेत, त्याची स्फूर्ती व प्रेरणा या शिवभक्तीत, शिवविचारांत आहे.
_त्यातूनच गडकोट पाहण्याची, गिर्यारोहणाची आवड निर्माण झाली. आम्ही मित्रांनी मिळून "एच.ए. ट्रेकिंग क्लब"ची स्थापना केली. त्या माध्यमातून अनेकांना किल्ल्यांवर घेऊन जाण्याचा एक उपक्रम क्लबने राबविला. गिर्यारोहणाने मला अनेक ठिकाणी नवीन मित्र आणि मार्गदर्शक मिळाले. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत मनमुराद भटकंती करता आली, कित्येक जंगलवाटा पादाक्रांत केल्या. अनेक अवघड सुळके व शिखरे सर केली. महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेर इतर प्रांतातील शेकडो किल्ले व कोट अभ्यासता आले. कित्येक जलदुर्ग, गिरीदुर्ग, वनदुर्ग डोळ्यांत साठवून ठेवले. शिवचरित्रातील अनेक योद्धे व शिवरायांच्या शिलेदारांची पवित्र  स्मृती त्या-त्या ठिकाणी जागृत झाली, तेथील पावन माती कृतज्ञभावनेने भाळी लावली.
_शिवचरित्र वाचणे, संदर्भग्रंथ अभ्यासणे आणि पुन्हा त्यावर भाष्य करणे या गोष्टी आयुष्यात आत्मसात करता आल्या. आता मलाही कधीकधी  शिवचरित्रावर बोलण्याची संधी मिळते. हे सारे केवळ शिवभक्तीतून घडले.
_छत्रपती शिवरायांच्या जयंतीशिवाय इतरही अनेक उपक्रम आम्ही राबवित असतो. विशेष प्राविण्य मिळविलेल्या कामगारांच्या मुला-मुलींना प्रोत्साहन  म्हणून गौरव करण्यात येतो. पूर्वी आम्ही पाणपोई सुरू केलेली होती. आषाढीवारीच्या वेळी वारकऱ्यांना फराळवाटप करण्यात येते. असे एक ना अनेक सामाजिक उपक्रम आम्ही या माध्यमातून राबविले आहेत. लोकवर्गणी, देणगी यांचा जमाखर्च वेळचेवेळी जाहिर केला जातो. इथे काम करणारा प्रत्येक कार्यकर्ता मोठ्या निष्ठेने व श्रद्धेने काम करतो. कितीही चढउतार आले तरी ही शिवभक्तीची ज्योत चेतलेलीच राहिली.
_एकोणीस फेब्रुवारी 'शिवजयंती' झाली की, चौदा एप्रिलला 'डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती' आणि त्याअगोदर अकरा एप्रिलला महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती असते. नियोजन करणारी कार्यकारिणी वेगळी असली तरी, आम्ही सर्वजण मिळून तोही जयंती उत्सव तेवढ्याच उत्साहात, एकोप्याने साजरा करतो. त्याहीवेळी विचारप्रवण व्याख्याने आयोजित केली जातात. अनेक नामवंत, विचारवंत व्याख्यात्यांनी याठिकाणी येवून समाजमनावर विचारांचे सिंचन केले आहे. ज्या महापुरुषांच्या महान विचारांतून समाज घडला, राष्ट्र घडले, त्या विचारांची जपणूक करणे, विचारांची शिदोरी घेऊन पुढे जाणे, हीच तर खरी  महापुरुषांना आदरांजली असते.
_श्री शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने सहज मनात आलेल्या या आठवणी व भावना मी शब्दबद्ध केल्या आहेत.




🙏
@ अरुण बोऱ्हाडे.. ✍
मोशी, ता.हवेली, जिल्हा पुणे.
(दि. १५ फेब्रुवारी २०२०)

Comments

Popular posts from this blog

श्री नागेश्वर महाराज भंडारा : भक्तिमार्गातील शक्ती स्त्रोत [लेखक : अरुण बोऱ्हाडे]

'शरद पवार : दुःखातही मनाला उभारी देणारा अलौकिक लोकनेता'' : अरुण बोऱ्हाडे

"कष्टकरी कामगारांची, एक अधुरी कहाणी..! सामाजिक चिंतनाचा विषय" लेखकः अरुण बोऱ्हाडे