ताडोबाच्या जंगलात वाघोबांच्या सानिध्यात.. ! एक अविस्मरणीय जंगल सफारी..!


 (दिनांक २३,२४ आणि २५ जानेवारी २०२०)
..मध्यंतरी एकदा एव्हरेस्टवीर श्रीहरी तापकीरचा फोन आला, 'आपल्याला ताडोबा-अंधारी अभयारण्यात जायचेय ', पांडूरंगने सर्व बुकींग केलेय. माझा होकार त्यांनी गृहीत धरलेलाच होता.
बुधवारी (दि.२२ जानेवारी) ला सायंकाळी ५.०० वा. पुणे रेल्वे स्टेशनवर आम्ही सर्वजण जमलो आणि पुणे-नागपूर गरीबरथ एक्प्रेसने चंद्रपूरच्या प्रवासाला निघालो. खरे तर मी खुप वर्षांपासून या ताडोबा (चंद्रपूर) जंगल भटकंतीची संधी शोधत होतो. तो योग असा अचानक आला. मी, श्रीहरी, पांडुरंग शिंदे, सुमीत दाभाडे, वैष्णव तापकीर, हर्षल पगडे, अतुल कोतवाल, सोमदत्त काळभोर, विजय आंबोळकर आणि आदिराज (श्रीहरीचा चार वर्षांचा मुलगा) अशी आमची तुकडी जंगल भटकंतीला निघाली. वैष्णव आणि पांडुरंगने ताडोबातील सफारी आणि रिसॉर्टचेही अॉनलाईन बुकींग केलेले असल्याने, आमचे काम अधिक सोपे झाले होते. रेल्वेने वर्ध्यापर्यंत जावून, तेथून दुसऱ्या रेल्वेने चंद्रपूरला गेलो. स्टेशनबाहेर आंम्हाला घ्यायला विंजरगाडी (ट्रॕव्हलर) तयारच  होती. पदमापूर गेटमार्गे पुढील ३०-४० मिनीटांत आम्ही ताडोबा अभयारण्याच्या कक्षेतील मोहार्ली गावात पोहोचलो, तेव्हा दुपारचे १२ वाजले होते.
मोहार्लीतील 'रॉयल टायगर रिसॉर्ट'मध्ये एक डॉर्मिटरी आणि एक खोली बुक केलेली होती.
एक तासात आंघोळ आणि लगेचच जेवण आटोपले, तोच आमच्या सफारीसाठीच्या दोन जीप्सी व्हेईकल्स (उघड्या जीप) दारात उभ्या होत्या.
मी, श्रीहरी, सुमीत, विजय आणि आदिराज असा एक गट आणि उरलेल्यांचा दुसरा गट असे दोन गट करून, आम्ही दोन गाड्यांमधून पुढील सर्व सफारी पुर्ण केल्या.
पहिल्याच दिवशी दुपारी आमची पहिली सफारी सुरु झाली. मोहार्ली गेटमधून प्रवेश करताना आमच्या गाईडने स्वागत करून, ताडोबा प्रकल्पाची माहिती देण्यास सुरूवात केली. ताडोबा अभयारण्य १९५५ मध्ये जाहिर करण्यात आले. सुमारे १७५० चौरस कि.मी.चा परिसर यामध्ये समाविष्ट केला असून, त्यातील ६२५ चौ. किमी चा परिसर कोअर झोनमध्ये समाविष्ट आहे, असे त्यांनी सांगितले.
"ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प"

हे विशेषतः  वाघांसाठी राखीव जंगल असून चंद्रपूर शहरापासून ३०-३५ कि.मी. अंतरावर आहे. या प्रकल्पाच्या सभोवताली जंगलाचे मोहार्ली, जुनोनी, आगरझरी, कोलसा असे चार बफर झोन (संरक्षित क्षेत्र) असून, अनेक गावांचा परिसर यामध्ये समाविष्ट आहे. घनदाट जंगलात राहणाऱ्या आदिवासी गावाचे व तेथील देवाचे "ताडोबा" नांव, तर "अंधारी" या नदीच्या नावावरून या राष्ट्रीय प्रकल्पाला "ताडोबा-अंधारी" हे नांव दिले आहे. मुळ जंगलातील गांवे आता इतरत्र वसविण्यात आली आहेत.
या जंगलात सध्या सुमारे ८५-८६ वाघ असल्याचे सांगण्यात आले. शिवाय १६० हून अधिक रानगवे, तसेच अस्वल, बिबटे, जंगली कुत्री (कोळसून), रानमांजरी, तरस, उदमांजर, हरणांसह नीलगायी,  सांबर, चितळ, चौशिंगा, भेकर, कोल्हे, तसेच असंख्य  सुसरी व मगरी आढळून येतात. तसेच शेकडो पक्षांच्या विविध जाती येथे आढळून येतात.
दुपारी दोन वाजता सुरु केलेली आमची सफर जंगलातील मुख्य रस्ता सोडून लालमातीच्या देखण्या वाटेवरून पुढे पुढे जात होती. वाट मध्येच वळणे घेत होती. दोन्ही बाजूंनी हिरवीगर्द झाडी आणि बांबूच्या बनांची गर्दी दाटली होती. पक्षांचे नानाप्रकारचे आवाज कानावर येत होते. आमची गाईड ( ) हलक्या आवाजात शक्य तेवढी माहिती देत होती. सांबर, चितळ, हरणींचे कळप आमच्या गाडीचा आवाज घेत टकमका आमच्याकडे पाहत होते. मध्येच एका गवताळ परिसरात मोर-लांडोरींचा थवा लक्ष वेधून घेत  असे. काही अंतरावर मजबूत अंगाची रानडूकरे मातीत तोंड घालून काही शोधताना दिसत होते.  आमच्या नजरा मात्र 'कुठे वाघ दिसतोय का ' याकडे खिळलेल्या होत्या. मध्येच पाणवठा किंवा तळे दिसले की गाडी हळू करून ड्रायव्हर आणि गाईड दोघेही  सुक्ष्मपणे नजर टाकून काही दिसतेय का पाहत असायचे. वेगवेगळ्या रस्त्यांना मागे टाकत आम्ही कोअर झोनच्या प्रवेशद्वाराजवळ आलो. गाईडने नियमानुसार तेथील नोंदवहीत नोंद केल्यावर आम्ही  आतमध्ये प्रवेश केला.
कोअरझोन मध्येही दुतर्फा अनेक वाटा निघतात. त्यातीलच एका वाटेने गाडी पांढरापौनीच्या दिशेने पुढे गेली. तेथील एका झाडाखाली हरणे आणि पाडसांची शाळाच भरलेली दिसली. झाडावर आणि झाडाखाली असंख्य वानरे होती. जणू काही आपसांत छान खेळ चाललेले होते. गाईडने माहिती दिली की, ही काळ्या  ठिपक्यांची हरणे (ब्लॕक स्पॉटेड डीयर्स) आणि या वानरांची मैत्री असते. काही धोका संभवत असेल  किंवा वाघ वगैरे दिसला तर ही वानरे विशिष्ट आवाज करून हरणांना सावध करतात. पुढे बराचसा गवताळ परिसर होता. त्यामध्ये पाण्याचा मोठा तलाव आहे. याठिकाणी दहा-बारा जीप्सी उभ्या होत्या, त्यातील अनेक पर्यटक तलावाच्या दिशेने आपापले कॕमेरे सरसावून उभे होते, काहीजण दुर्बिणी रोखून लक्ष  ठेवून होते. प्रत्येक गाडीतील गाईड माहिती देत होता. आमच्याही गाईडने सांगितले, ही 'मायाची टेरिटरी'. माया म्हणजे या परिसरातील प्रसिद्ध वाघीण, हल्ली या वाघांना नावांऐवजी कोड नंबरने ओळखतात. मायाचा कोड (टी- १२) असा आहे. तीचा खूपच बोलबाला आहे. तेवढ्यात कोणीतरी कुजबूजले, समोर पहा, ती आली. पाण्याच्या पलिकडे उजव्या बाजूकडून ऐटीत निघून, आस्ते कदम, दमदार पावले टाकीत ती डावीकडील गवतात घुसली. उघड्या डोळ्यांनीही ती थोडावेळ दिसत होती, नंतर तिथेच एका झाडाखाली बसली. बराच वेळ तिथेच बसून राहिली. अंतर बरेच होते, सूर्याने पश्चिमेकडे कलायला  सुरुवात केलेली होती. काही अंतरावरून वाघिणीचे दर्शन झाले, ती समोरून जाताना शक्य तेवढे फोटो काढले. त्यातच अनेकांचे समाधान झाले. आम्हांलाही आनंद वाटला. सफारी वाया गेली नाही. आता थांबता येणार नव्हते. आम्ही पुन्हा रिसॉर्टकडे जाण्यासाठी निघालो. येताना ताडोबा तलावाशेजारून आलो. पुढे आल्यावर गाईडने अचानक गाडी डावीकडून घेण्यास सांगितले. हा 'चितळ मार्ग', येथून अर्धा मिनीटच पुढे आलो, तर गाईडने शांत राहण्याचा इशारा केला. सरळ रस्त्यावरून एक मजबूत शरीरयष्टीचा पुर्ण वाढ झालेला रुबाबदार वाघ आमच्या दिशेने येत होता. ड्रायव्हरने गाडी थांबविली. उत्सुकता, कुतूहल आणि थोडीबहूत भीती अशी मनःस्थिती सर्वांचीच. झपाझप पावले टाकीत समोर आला, पुन्हा रस्ता सोडून डावीकडे उतरला. पायाने थोडी माती उकरली, शेजारील झाडाला पंजा मारला. पुन्हा रस्त्याच्या कडेनेच पुढे पुढे आला. पक्षांचा किलबीलाट चालूच होता. तो गाडीसमोर येवून थांबला. तो आमच्याकडे आणि आम्ही त्याच्याकडे एकटक पाहत होतो आणि आम्ही फोटोही काढीत होतो. गाईडने माहिती दिली. याचे नांव "रुद्र" (टी-१०३).. रुबाबदार आणि दमदार वाघ, ही रुद्रची टेरिटरी. काही क्षण थांबून रुद्र डावीकडील उताराने नाल्याकडे गेला. बराचवेळ आमच्या नजरा त्याच्या पाठमोऱ्या आकृतीचा वेध घेत होत्या. तोच झाडोऱ्यांतून सांबराचा मोठा आवाज दुमदूमला. त्याने सर्व प्राण्यांना जागृत केले, जंगलचा राजा येत आहे, सावध व्हा ! वाघ आम्हांला निवांत दर्शन देवून गेला. आमचा आनंद गगनात मावेनासा  झाला.! तोच आनंद मनाशी बांधून आम्ही रिसॉर्टवर आलो.

ताडोबातील मनमोहक वनसंपदा.. -
काल आमची पहिलीच सफारी वाघाच्या जवळून झालेल्या भेटीने आनंददायी  झाली, याचे विलक्षण समाधान आम्हां सर्वांना होते. रात्री रिसॉर्टवर माया आणि रुद्रच्याच गप्पागोष्टी करीत, आम्ही जेवणावर ताव मारला आणि पहाटे लवकर उठण्याच्या इराद्याने झोपी गेलो.
आज दुसऱ्या दिवशीही सकाळी सहा वाजताच दोन्ही गाड्या येवून उभ्या राहिल्या. सकाळचा चहा-बिस्कीट घेऊन आम्ही तयारच होतो. आज गाडी वेगळी, गाईडही वेगळा. फिरण्याचा मार्ग आणि झोनही वेगळा होता. आनंद आणि उत्सुकता तेवढीच होती. बांबू आणि सागवृक्षाच्या दाट गर्दीतून आमची वाट पुढेपुढे सरकत होती. विजय आंबोळकर आणि पांडुरंग शिंदे यांचे कॕमेरे मध्येच एखाद्या झाडावर बसलेल्या पक्षावर रोखले जायचे, कधीकधी ड्रायव्हर गाडी पाठीमागे घेऊन फोटोला सोयीस्कर अशी गाडी थांबवायचा. एव्हरेस्टवीर श्रीहरी देखील हल्ली पक्षांच्या प्रेमात पडलेला दिसून आला. या विशालकाय जंगलात मोर-लांडोर आणि रानकोंबडे तर आहेतच. या जंगलात गरुड, करकोचे, ससाणे, भृंगराज, शिवाय अनेक प्रकारचे पोपट, वेडा राघू, दयाळ, पिंगळा, खंड्या, हळद्या, बगळे, राखाडी बगळे, राखी धनेश, बुलबूल, हडबुड्या, सुतार, टिटवी, घार, सर्पगरुड, कोकीळ, भारद्वाज, सुर्यपक्षी अशा २४० हून अधिक पक्षांच्या जाति आढळतात. पक्षांचे वेगवेगळे आवाज आणि रंगछटा मन वेधून घेतात.
ताडोबा जंगल हे उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी प्रकारात मोडते. येथे अनेक प्रकारचे वृक्ष, वृक्षांना लपेटून प्रचंड उंचीवर पोहचलेल्या वेली पहावयास मिळतात. विशेषतः साग, बांबू, ऐन, खैर, मोहा, तेंदू, बिबळा, धावडा अशा नानाविध प्रकारच्या वृक्षांची मुबलकता येथे आढळून येते. त्या वृक्षांचा, वेलींचा, पाना-फुलांचा मनमोहक गंध, दरवळणारा सुगंध याचे वर्णन करायला शब्दच नाहीत. ही सर्व अनमोल वनसंपत्ती चालत्या गाडीतून, दिलेल्या वेळेत नजरेने वेचून, मनाच्या गाभाऱ्यात साठवायची असते. काही भागात तर रंगीबेरंगी फुलपाखरे अगणित प्रकारांत पहावयास मिळाली. असे वाटते, पुन्हा पुन्हा यावे आणि ही समृद्धी अनुभवावी.
फुलपाखरांचे सौंदर्य न्याहळतानाच, मध्येच दोन अस्वले डोकावून आत झाडीत गेले. पुढे आलो तर भल्या मोठ्या गव्याने झाडींतून बाहेर डोकावले, रस्ता ओलांडून तो भर्रकन आत निघून गेला. अशावेळी गाईड गाडी थांबवून फोटोची संधी देतो, पण कधीकधी डोळ्यांनी पाहण्यातच अधिक मजा असते. ताडोबा गांव आता इतरत्र गेले आहे, मात्र गावाचे अवशेष शिल्लक आहेत. तिथेच गावचा देव ताडोबाचे लहानसे देऊळही दिसते. ताडोबाचा जलाशय मात्र खूपच विशाल आहे. तलावाच्या बाजूच्या रस्त्याने येताना, गाईडने पाण्याच्या कडेला असलेली भली मोठी मगर आम्हांला दाखविली. मात्र अधिक वेळ न दवडता आम्ही पुढे निघालो.
आज सकाळची सफारी आणि दुपारच्या सफारीतही  वाघोबांचे दर्शन झाले नाही. पण जंगलातील इतर बरीचशी मांदियाळी कुठेना कुठे भेटत राहिली. कधी पावलांचे ठसे पाहून, तर कधी हरीण, सांबर, वानरांच्या विशिष्ट आवाजाचा   मागोवा घेत आमची गाडी जायची. लालमातीचा  धुराळा उडायचा. आज एका नवीनच मोठ्या तेलिया  तलावाकडे आम्ही आलो होतो. त्या तलावाच्या चोहोबाजूंनी गेलेली वाट खूपच आनंद देऊन गेली. गाडीची चाहूल लागताच सांबर, चितळ कावरेबावरे होतात. वानरेही सावध होवून झर्रकन फांदीवर झेपावतात. एकेठिकाणी तर एक मोठे वानर रस्त्यातच बसून राहिले. 'जा तुम्हांला जायचे तर, नाहीतर थांबा ' .. त्याची ही भूमिका पाहून मला क्षणभर, भीमाच्या गर्वहरणाची गोष्ट आठवली ! अर्थात याने शेपटी उचलण्याची वेळ नाही आणली. काही वेळाने त्याने रस्ता मोकळा करून दिला. अशी गाडी थांबली की, रस्त्यावर असलेले वाघांच्या पावलांचे ठसे कसे पहायचे ते गाईडने सांगितले. तलावाच्या परिसरात एका नाल्याबाहेर एक मगर उन्हात तापत पडलेली होती. दुपारी एके ठिकाणी, रस्त्याच्या बाजूस काळ्या रंगाचा बिबट्या असल्याचे आम्हांला सांगण्यात आले. बराच वेळ आम्ही प्रतिक्षा केली. तो कुठे गायब झाला कळाले नाही. सफारीची वेळ संपत आल्याने आम्ही सायंकाळी रिसॉर्टवर परतलो.

रात्र सफारीचा थरारक अनुभव -
आज दिवसभरातील दोन्ही सफारींच्या दरम्यान वाघोबा भेटले नाहीत. अर्थात जंगल भटकंतीत केवळ वाघच दिसावेत असेही नाही. इतरही खुप काही पाहण्यासारखे आणि अनुभवण्याजोगे असते. ताडोबातील समृद्ध वनसंपदेविषयी मी कालच्या लेखांकात सांगितलेच आहे. आज रात्रीची सफारी बुक केलेली होती. त्यानुसार सायंकाळी सात वाजता आमच्या दोन्ही गाड्या आम्हांला घेऊन गेल्या. आज जुनोनी बफर झोनमध्ये जाणार होतो. जुनोनी गेटवरील सर्व प्रक्रिया पुर्ण करून आमची सफारी सुरू झाली. हवेतील गारठा वाढलेला होता. पौष अमावस्येची रात्र, झाडांमधून जाताना आधीच अंधारलेल्या जंगलात काळोख मावेनासा झाला होता. गाईडने दोन मोठ्या विजेऱ्या (बॕटऱ्या ) आमच्या हाती दिल्या होत्या. दोन्ही बाजूस झाडांच्या गर्दीत प्रकाशझोत टाकीत, तीक्ष्ण नजरांनी निरीक्षण करीत हळुहळू आम्ही पुढे चाललो होतो.  गाईड थोडीफार माहिती सांगत असतानाच, 'आज तशी साईटींग होण्याची शक्यता कमीच वाटते.' असे म्हटले. आम्ही म्हणालो, तसे नाही, आज वाघोबाचे साईटींग होणारच ! सफारी व्यर्थ जाणार नाही.
एक सांगायला हवे की, आमच्या बरोबर चार वर्षांचा आदिराजही असायचा. त्याला सर्वांच्या मधोमध ठेवलेला होता, नाही म्हटले तरी काळजी वाटायची. तो मात्र जंगल सफारीचा पुरेपूर आनंद घ्यायचा. बरेचदा त्याच्या बालसुलभ प्रश्नांना त्या-त्या क्षणी उत्तरे देता येत नव्हती. उलट काही प्रसंगी त्याला शांत रहा, असे नाईलाजाने सांगावे लागे !
आज काळोखात चांदण्यांची चमक काही औरच होती. जंगलवाटेत अधूनमधून निळ्याशार आकाशात त्यांचेही दर्शन झाले. काळोखातील ती निरव शांतता, हळूहळू पुढे चाललेली गाडी, आमचे लक्ष दोन्ही बाजूंच्या झाडोऱ्यांत असतानाच एकाक्षणी श्रीहरी दबक्या आवाजात म्हणाला, "अरे पहा, समोरून वाघ येतोय.!" ड्रायव्हरने तत्क्षणी गाडी थांबविली, हेडलाईट कमी केली. सर्वांच्या नजरा समोरून येणाऱ्या वाघावर खिळल्या. त्या लालमातीच्या अरुंद वाटेवरून झपाझप पावले टाकीत तो आमच्या दिशेने जवळ येत होता. श्वास रोखून आम्ही पाहत होतो. एक राजबिंडा, देखणा, रुबाबदार वाघ, गाडीच्या सौम्य हेडलाईटमध्येही त्याचे  चमकदार डोळे अधिकच तेज ओकत होते.! तो जसजसा गाडीच्या जवळ आला, तसा गाईडने ड्रायव्हरला गाडी हळुहळू मागे घ्यायला आणि लाईटस कमी करायला सांगितले. ड्रायव्हरने गाडी हळुहळू मागे घेतली, वाघोबा पुढे पुढे येत राहिले. वाघ पुढे पुढे येताना, दोन-तीनदा डावीकडे जावून रस्त्यालगतच्या झाडांना मार्किंग करीत होता. मध्येच युरीन-स्प्रे करून बहूधा हद्द निश्चित करीत असावा. त्याच्या गळ्यातील कॉलरही स्पष्ट दिसत होती. तो खुपच जवळ असल्याने विजयच्या कॕमेऱ्यात फोटो येत नव्हते. फोटोसाठी आमची मदार श्रीहरीच्याच कॕमेऱ्यावर होती. वाघोबाला आम्ही जवळजवळ चारशे मीटरपर्यंत आणि सुमारे पंधरा मिनीटे बरोबर घेऊन आलो. अर्थात, 'जंगलचा राजा' किंवा 'खरा वाघ' काय असतो हे आम्ही अनुभवत होतो. त्याची ऐट, त्याचा रुबाब आणि त्याचा आवेश.. काय लिहावे त्याविषयी..!
आमची दुसरी गाडी अजून मागे आलेली नव्हती. त्या भयाण अंधारात आणि अरुंद वाटेवरून गाडी व्यवस्थितपणे मागे घेणाऱ्या ड्रायव्हरचीही कमालच होती. मी आदिराजला सुरक्षितपणे सांभाळून पकडलेले होते. पुढील क्षणी काय घडेल याचा अंदाज येत नव्हता. तेवढयात पाठीमागून आमची दुसरी गाडी आली. त्यामध्ये पांडुरंग, वैष्णव, अतुल आणि हर्षल होते. त्यांच्या पाठोपाठ आणखी एक गाडी आली. त्यांना आम्ही गाडी थांबविण्याचा आणि मागे घेण्याचा इशारा केला. त्यांनी गाडी मागे घेतली, पण लाईटस कमी केल्या नाहीत. त्यात प्रत्येकाचा फोटो काढण्याचा प्रयत्न.. बराच वेळ झाल्याने किंवा रस्ता अडविल्याने  वाघाने डोळे लाल केले, गुरगुरायला सुरुवात केली. आमची गाडी आणि वाघोबामध्ये बराचवेळ दहा-बारा फुटांचे अंतर होते. ते आणखी कमी झाले आणि नेमका वाघ आक्रमक होण्याची चिन्हे दिसू लागली. घाबरून कि काय ड्रायव्हरने एकदम गाडी मागे घेतली, ती मागच्या गाडीवर आदळली. थोडासा आवाजही भेदरलेल्या शांततेला तडा देणारा ठरला. माणसांचा गलका वाढला आणि वाघ बिथरतोय की काय, अशी स्थिती निर्माण झाली. आता तो काही चाल करणार.. असे वाटत असतानाच.. किंचित गुरगुरत तो हळूवारपणे डाव्या बाजूच्या झाडीत घुसला, काहीक्षण तेथूनही बाहेर डोकावला. ..आणि प्रत्येकाने रोखून धरलेला श्वास मोकळा झाला. भयाण अंधारातील वाघोबाचा हा सहवास आम्ही जवळपास पंधरा- वीस मिनीटे अनुभवला. वाघ झाडीत गेल्यावर आम्हीही पुढे निघून गेलो. या वाघाला अद्याप नांव दिलेले नाही. पण येथील "लारा" या वाघिणीचा तो 'सबअॕडल्ट' असावा, असे सांगण्यात आले. साधारण तीन वर्षे वयाचा, तरणाबांड वाघ आहे तो !
सफारी अजून संपली नव्हती,  आम्ही पुढे जायचे ठरविले. रात्रीच्या अंधारात या अरण्याचा मागोवा घेत आम्ही जवळपास पंधरावीस कि.मी. दूर पदमापूर गेटपर्यंत गेलो. एकदोन ठिकाणी रानमांजरी दिसल्या. या मांजरींचे काळ्याकुट्ट काळोखात चमकणारे डोळे म्हणजे जणू आकाशातील चार-दोन तेजस्वी चांदण्याच खाली उतरल्यात..!  पदमपूरहून परत येताना उजव्या बाजूला काहीशा विरळ झाडीत गव्यांचा कळपच उभा असलेला पाहिला. बफर झोनच्या बाहेर जंगलाला लागूनच लहान लहान गावे आहेत. थोडीबहूत शेतीही दिसली. या गावकऱ्यांचे   मुठीत जीव घेऊन राहणे काय असेल, याचा अंदाज बांधत आम्ही रात्री साडेदहा वाजता जुनोनी गेटवर परतलो.
एक अविस्मरणीय अनुभव, एक थरार स्मृतीपटलांवर कायमचा कोरून आम्ही रिसॉर्टवर आलो. उद्या पहाटे पुन्हा सफारी करण्यासाठी..!


वाघिणीचे डोहामध्ये, पोहणे पाहूनी आलो..! -
आज आमची ताडोबा अभयारण्यातील शेवटची सफारी होती. पहाटे लवकर उठून सहा वाजताच गाडीत बसणे आता जणू सवयीचे झाले होते. त्याप्रमाणे आम्ही गाडीत बसलो. आज रिसॉर्टपासून दूर आगरझरी गेटवरून आतील जंगलात जायचे होते. रस्त्यात इरई धरणाचा तुडूंब भरलेला फुगवटा (बॕकवॉटर) ओलांडून पुढे जावे लागते. त्यातच गारठा अधिकचा होता. आज भेटलेला गाईड कदाचित अधिक अनुभवी आणि प्रगल्भ होता. कमी शब्दात मोजकी माहिती देत होता. कोणत्या वाटेने जावे, हे त्याने ठामपणे ठरविले आणि जंगलातील आगरझरी तलावाभोवतीच्या कच्च्या रस्त्याने गाडी घातली. तलावाच्या सर्व बाजूंनी फेरफटका झाला. जागोजागी वाघाच्या पावलांचे ठसे दिसले. इकडच्या जंगलातही बांबू आणि साग मोठ्या प्रमाणात असले तरी, इतर वृक्षही भरपूर दिसले. बराचवेळ वाघांचा मागोवा घेत आम्ही थोडेफार बाजूला आलो. बफर झोनच्या बाहेर,  हद्दीवरील एका शेतातील झोपडीवजा जागेत स्थानिक आदिवासीने चहाची सोय केलेली होती. आजचा बोचणारा गारवारा आणि थंडीमुळे आम्ही तिथे चहा प्यायलो. गाईडने पुन्हा गाडी आगरझरी तलावाच्या बाजूस आणली. शांतपणे अंदाज घेत आम्ही पुढे जात होतो. सर्वांच्या नजरा आता चौफेर एकच लक्ष्य शोधीत होत्या. या शेवटच्या सफारीत वाघ भेटावा, असेच प्रत्येकाला वाटत होते. तेवढयात सांबराचा विशिष्ट आवाज, सकाळच्या शांततेला चिरून भवताली घुमला. तो ऐकून गाईडने इशारा केला, तशी ड्रायव्हरने गाडी पाठीमागे घेऊन, आल्या रस्त्याच्या एका वळणावर उभी केली. कमरेएवढे वाढलेले गवत, मोठमोठी झुडपे, मोठाले वृक्ष यांच्या गर्दीतून जाणारी ओबडधोबड एकच गाडी जाईल अशी मातीची वाट. आम्ही येवून थांबलो, तेवढयात समोरच्या  झुडूपाआडून आमच्या अगदी समोरच ऐटीत आगमन  झाले.. अर्थात वाघाचे !
कालच्या प्रमाणेच समोरून वाघ पंधरावीस फुटांवर आलेला आणि ड्रायव्हरने गाडी हळुहळू मागे घेतली. काय योगायोग म्हणायचा, तीन दिवसांत तिसऱ्यांदा असे घडले की, वाघाच्या स्वागताला फक्त आमचीच गाडी आणि फक्त आम्हीच चारपाच जण तो आनंद घेतोय किंवा थरारही पचवतोय ! समोरून आलेला वाघ थोडे अंतर चालून आला आणि पटकन डावीकडे  वळाला. तेव्हा गाईडने सांगितले, ही "शर्मिली" वाघिण   आहे, तिचा कोड नंबर (टी- ६०) आहे. तिची दोन बछडी आहेत, त्यांना ठेवून ती आलेली आहे. ती  डावीकडे वळून पुढे चालू लागली, तसे गाईडने गाडी वळविण्यास सांगून पुढे जायला सांगितले. आम्ही अशा ठिकाणी थांबलो, की ती बरोबर आमच्या गाडीच्या उजवीकडे येवून थांबली. आम्ही शांतपणे तिला न्याहाळली, अर्थातच तिनेही निरखून आम्हांला पाहिले. जणू काही विचारतेय ! या वातावरणात क्षणभर भीती विरून गेली आणि आमची जुनी ओळख असावी, असेच वातावरण तयार झाले. थोडावेळ ती उभी राहिली आणि तिने जागेवरच बैठक मारली. आता मात्र कमाल झाली. आम्हीही गाडीत बसून राहिलो. कॕमेऱ्यांतून फोटोंची सरबत्ती चालू होती. तिच्यात आणि आमच्यात पाच-सहा फुटांचेच अंतर होते. नांव शर्मिली असले तरी ती ताकदवर आणि बिनधास्त होती. आमचा आदिराज तर म्हणाला , 'बघा ना, ती मला स्माईल देतेय..!' आम्ही कसेबसे हसू आवरले. मधूनच ती गवताच्या पाती तोंडात घेऊन सोडून देत होती. जणू दात स्वच्छ करीत होती..! आम्हांला शांत राहण्याची सुचना असूनही, हळुहळू आमची कुजबूज वाढली आणि आदिराजची चिवचिव सुरू झाली. तिला व्यत्यय वाटला की काय, पण सुमारे दहा मिनिटांनी ती उठली, उठण्यापूर्वी चक्क गवतावर लोळली, जणू आळस घालविला आणि झटकन उठून पुन्हा पुढे चालू लागली. तिची वाट सरळ होती, आमची काहीशी नागमोडी होती. ड्रायव्हरने त्याच्याही पुढील एका वळणावर जावून गाडी उभी केली. आज  वाघिणीचा वेगळाच अनुभव आम्ही घेतला होता. भीती आणि कुतूहल असतानाच आम्ही एकप्रकारे मैत्रीयोग अनुभवला होता.! आम्ही पुढील बाजूस रस्त्यावर येवून थांबलो, तेवढयात तिथे अजून तीन-चार गाड्या आल्या. आम्ही सर्वांना थांबायला सांगितले, सर्वांचे लक्ष तिच्या वाटेवर लागले. तलावाचा फुगवटा बाजूच्या डोहात आल्याने डोहही पाण्याने भरलेला होता. काही मिनिटांतच गवतामधून सळसळ आवाज आला. त्यातून शर्मिली बाहेर आली, इकडे तिकडे न पाहता, थेट डोहात उतरली. तसे सर्वांचेच कॕमेरे सटाफट वाजू लागले. अलगदपणे पाण्यावर तरंगावे तशी फक्त डोके आणि पाठीच्या कण्याचा भाग पाण्यावर दिसत होता. सुमारे पन्नास फूट रुंदीचा तो पाण्याचा डोह काठोकाठ भरलेला होता. काही क्षणांतच हळूवारपणे ती पाण्यातून पोहतच बाहेर आली. इकडे तिकडे न पाहता, झपझप पावले टाकत, सरळ तिच्या वाटेने पुढे जंगलात, घनदाट झाडोऱ्यांत शांतपणे निघून गेली, ... शर्मिली क्षणार्धात दिसेनाशी झाली.!
मी फार पूर्वी कोकणच्या पावसावर एक कविता लिहीली होती. त्यातील दोन ओळी मला आठवल्या.
"झाडाआड डोकाविती, कोणी लाजरी नवती,
नवतीचे पावसात, नहाणे पाहूनी आलो..ll"
तसे, आता म्हणावे लागेल -
"ताडोबाच्या जंगलात, वाघिण पाहूनी आलो,
वाघिणीचे डोहामध्ये, पोहणे पाहूनी आलो..!!"
खरे तर एवढा वेळ शर्मिलीने तिच्या विविध अदा दाखविल्या, पोहणेही दाखविले आणि ती तिच्या बछड्यांकडे घाईतच निघून गेली. तिची ही एवढी शांत नि निवांत भेट आयुष्यभर आमच्या स्मरणात राहील.
..आम्हांलाही आज पुण्याला परतायचे होते, सफारीची वेळही संपत आलेली होती. शर्मिलीच्या सानिध्यातील वीस-पंचवीस मिनिटांची आठवण मनाच्या तळाशी कायमची साठवत आम्ही आगरझरीतून बाहेर आलो. पुन्हा मोहार्लीला रिसॉर्टवर परतलो. तिथे पोटपूजा वगैरे आटोपून आणि तेथील सर्व वन्यजीवांना रामराम करून, आम्ही पुण्याला जाण्यासाठी चंद्रपूरच्या दिशेने निघालो.
***
@अरुण बोऱ्हाडे, मोशी, ता.हवेली, जिल्हा- पुणे
(मोबाईल- ९८८१३०१३३९)
Email - atborhade@gmail.com

Comments

  1. सुंदर लेख अरुणजी ताडोबातील आठवण जागृत झाली धन्यवाद💐💐
    श्री विकास ब.चिथडे बदलापुर २९/०३/२०१

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

श्री नागेश्वर महाराज भंडारा : भक्तिमार्गातील शक्ती स्त्रोत [लेखक : अरुण बोऱ्हाडे]

'शरद पवार : दुःखातही मनाला उभारी देणारा अलौकिक लोकनेता'' : अरुण बोऱ्हाडे

"कष्टकरी कामगारांची, एक अधुरी कहाणी..! सामाजिक चिंतनाचा विषय" लेखकः अरुण बोऱ्हाडे