साहेबांना का म्हणतात.. "लोकनेता"
आठवणीतील प्रतिमा :
साहेबांना का म्हणतात.. "लोकनेता"
🌿
नवी दिल्लीतील ६ ,जनपथ, अर्थात देशाचे माजी कृषीमंत्री मा.श्री.शरद पवार साहेब यांचे निवासस्थान.!
..सहसा सत्ता नसेल तर नेत्यांच्या बंगल्यांना एकाकीपणाचे वरदान असते. पण साहेबांचा बंगला या वरदानाला अपवाद आहे. त्या दिवशी आम्ही सकाळी साहेबांना भेटायला गेलो तेव्हा तेथील प्रतिक्षा दालनात थांबायलाही जागा नव्हती. जेजुरी, सातारा, सोलापूर, मराठवाडा, मुंबई, मध्यप्रदेश, राजस्थान, हिमाचल अशा विविध ठिकाणांहून आलेले लोक साहेबांना भेटण्यासाठी थांबलेले होते. अर्थात विविध भागांतील लोकांची साहेबांकडे सदोदीत वर्दळ असतेच.
भेटायला येणाऱ्यांमध्ये सामान्य माणसांपासून, देशभरातून विविध क्षेत्रातील मान्यवर लोक येत असतात. प्रत्येकाला माहिती आहे, साहेबांची सध्या कुठेच सत्ता नाही. तरीही लोक "दिल्लीमध्ये ६ जनपथ" ला येतच असतात. कारण सत्ता कोणाचीही असो, असलेल्या सत्तेकडून काम करून घेण्याची कुवत आणि कौशल्य अवगत असलेला नेता हीच तर साहेबांची ओळख आहे.
साहेबांचे वय आणि त्यांच्या कामाचा उरक व उत्साह पाहिला तर तरुण कार्यकर्ते व नेत्यांसाठी साहेबांची कार्यपद्धती, जनसामान्यांशी संवाद साधण्याची सहजता आणि कोणत्याही विषयाची आकलनशक्ती हे सारे गुण प्रेरणादायी आहेत.
सकाळी पूर्वनियोजित वेळा घेऊन आलेले लोक, त्यांच्या मागोमाग आगंतुकपणे येणारे लोक, त्या प्रत्येकाची समस्या जाणून घेणे, लेखी निवेदन असेल तर ते काळजीपूर्वक वाचणे, संबंधिताला योग्य दिशा देणे, गरज पडल्यास योग्य त्या ठिकाणी दुरध्वनीवरून संपर्क साधणे किंवा आपल्या सचिवांना सांगून पत्र देणे. आलेल्या प्रत्येकाच्या समस्येची सोडवणूक करणे.. सर्व प्रक्रिया विनाविलंब चालू असतात. आलेल्या सर्व अभ्यागतांना भेटून संसदेचे अधिवेशन चालू असेल तर तिथेही वेळेत पोहोचायचे असते.
दिवसभरातील विविध बैठका व कामकाज आटोपून सायंकाळी पुन्हा वेळा दिलेल्या अभ्यागतांना भेटणे.. प्रक्रिया निरंतन चालूच असते..! कंटाळा नाही कि थकवा नाही. म्हणूनच साहेबांना डोळ्यांनी पाहिले तरी कार्यकर्त्यांमध्ये एकप्रकारची ऊर्जा संचारते. *लोकनेता" म्हणजे नेमके काय तर *आदरणीय पवार साहेब. त्यांची दृष्टी, त्यांची काम करण्याची हातोटी आणि सत्ता असो अथवा नसो "आपले काम साहेबच करू शकतात, हा प्रत्येकाच्या मनात असणारा दृढविश्वास " ..यालाच तर "लोकनेता" म्हणतात.
..मागिल आठवड्यातील गोष्ट, डिसेंबर महिन्यातील दिल्लीतील थंडी म्हणजे मी मी म्हणणाराला हुडहूडी आणणारी..! आम्ही साहेबांकडे गेलो तेव्हा सायंकाळी सात वाजलेले होते. एव्हाना दिल्ली कडाक्याच्या थंडीत गारठली होती. आम्ही साहेबांसमोर बसलो होतो. आमच्या कामासंदर्भात मंत्र्यांशी फोनवरून बोलत असतानाच ते प्रत्येकाला निरखून पाहत होते. त्यांचे लक्ष आमच्या तिघांपैकी काहीशा पैलवानी थाटात असलेल्या श्री अरुण पवार यांच्याकडे गेले, त्यांनी डोळ्यांनीच मला खूणावत विचारणा केली, मी त्यांचे नांव-गांव सांगून, ते आमच्या कमिटीत असल्याचे सांगितले. मग अरुण पवारांकडे पाहत साहेब म्हणाले, "पिंपरी चिंचवडची पैलवानकी इथे कामाची नाही. स्वेटर किंवा काही घालत चला, दिल्लीतील थंडी आजारी पाडते..!" ..क्षणभरात वातावरण हास्यविनोदात पालटले.
त्याचवेळी तिथे राष्ट्रवादीचे नेते श्री प्रफुल्ल पटेल आणि त्यांच्यासह गुजरातचे एक माजी मुख्यमंत्री व एकदोन नेते आले, साहेबांनी त्यांना आतील दालनात बसण्यास खूणविले. बाहेरील प्रतिक्षा दालनात अजून काही लोक होतेच.
एवढ्या कामाच्या गडबडीत आपल्याकडे येणाऱ्या सामान्य माणसांची एवढी बारकाईने काळजी घेणारा हा नेता.. म्हणूनच तर अशा या सदैव कार्यमग्न, कृतीशील, विचारशील, देशामध्ये सर्वाधिक अनुभवी, जाणत्या नेत्यास, आपसुकच, विनम्रपणे "लोकनेता" म्हणतात ते उगीच नाही._
अरुण तुकाराम बोऱ्हाडे...✍
(दि.२४ डिसेंबर २०१८)
मोशी, ता.हवेली, जिल्हा पुणे

👌👌🙏🙏
ReplyDelete