पिंपरी चिंचवड महानगरीचे शिल्पकार : कर्मयोगी अण्णासाहेब मगर


पिंपरी चिंचवड महानगरीचे शिल्पकार

कर्मयोगी अण्णासाहेब मगर




           पुणे जिल्ह्याच्या आणि विशेषतः पिंपरी-चिंचवड शहराच्या जडणघडणीतील प्रमुख शिल्पकार, दिवंगत खासदार, कै. अण्णासाहेब मगर यांची बदलत्या राजकीय परिस्थितीत कदाचित अनेकांना आठवण नसेलही. पण स्वातंत्र्योत्तर काळामध्ये, राष्ट्रनिष्ठा आणि समाजसेवेने प्रेरित होऊन जे नेते उदयास आले, त्यामध्ये कै.अण्णासाहेब मगर हे महत्त्वाचे नेते होते. कै.अण्णासाहेब म्हणजे सार्वजनिक विकासासाठी एक झपाटलेले व्यक्तिमत्व होते. पुण्याजवळ हडपसर येथे एका सधन शेतकरी कुटुंबात दिनांक २६ एप्रिल १९१९ रोजी त्यांचा जन्म झाला. 'मार्तंड धोंडीबा मगर' हे त्यांचे पूर्ण नाव. बी.एस्सी. (अग्रीकल्चर ) झाल्यानंतर त्यांनी समाजकार्यात झोकून दिले. भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे ते एक सुजाण साक्षीदार होते. काँग्रेसच्या चळवळीचा, गांधी-नेहरूंच्या विचारांचा पगडा त्यांच्यावर होता. सन १९४८ मध्ये ते जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून काम करू लागले. काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणजे सामाजिक बांधिलकी असणारा, देशभक्त, समाजसेवक अशी त्याकाळी ओळख असायची, असे जुने लोक सांगतात. सन १९५२ मध्ये ते हवेलीचे आमदार झाले, विधानसभेवर निवडून गेले. त्याकाळी हवेली तालुक्याचा आणि मतदार संघाचा विस्तार मोठा होता. १९५७ चा अपवाद वगळता ते सातत्याने विधानसभेवर निवडून गेले. त्यांचे कार्यक्षेत्र केवळ पिंपरी-चिंचवड परिसर नव्हते. हवेली तालुक्यातील अनेक गावांतील शेतजमिनी ओलिताखाली आणण्यासाठी, त्यांनी गावोगावी सिंचनाच्या योजना राबविल्या. पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उलाढालीत आमुलाग्र उत्कर्ष घडवून आणणाऱ्या दोन संस्था त्यांनी पुढाकार घेऊन उभ्या केल्या. थेऊरचा यशवंत सहकारी साखर कारखाना आणि पुण्याच्या गुलटेकडीवर संपूर्ण आशिया खंडात आगळीवेगळी अशी "कृषी उत्पन्न बाजार समिती". त्या आगळ्या-वेगळ्या बाजार संकुलाचे निर्माते आणि शिल्पकारही अण्णासाहेबच. पिंपरी चिंचवड मधील आर्थिक विकासाला साथ देताना त्यांनी "पवना सहकारी बँकेची" स्थापना केली. त्यांनी सुरु केलेल्या सर्व संस्था नावारूपाला पोहोचल्या. त्यांनी अविकसित परिसरामध्ये दूरदृष्टीच्या हत्याराने, कर्तृत्वाचे लेणे कोरून, नेतृत्वाचे सोने केले. शेती, सहकार, शिक्षण, नागरी विकास, ग्राम विकास अशा विविध क्षेत्रात त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला. तत्कालीन ज्येष्ठ नेते कै. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रयत्नांतून पिंपरी-चिंचवड परिसरामध्ये अनेक मोठ-मोठे कारखाने आले, उद्योगधंदे आले. त्यामुळे परिसरात कामगार, रहिवासी वाढले. त्यांच्या मुलभूत नागरी सोयी-सुविधांच्या गरजेतून तत्कालीन हवेली तालुक्याचे आमदार कै. अण्णासाहेब मगर यांनी पिंपरी-चिंचवड परिसरात नगरपालिका व्हावी म्हणून पाठपुरावा केला. राज्यसरकारने दि. ४ मार्च १९७० रोजी पिंपरी वाघेरे, चिंचवड, भोसरी आणि आकुर्डी-निगडी या गावांच्या ग्रामपंचायती बरखास्त करून पिंपरी-चिंचवड नव-नगरपालिका स्थापन केली. शासन नियुक्त नगराध्यक्ष म्हणूनच नव्हे, तर एखाद्या कुटूंबप्रमुखाच्या भूमिकेतून अण्णासाहेबांनी या शहराच्या जडणघडणीमध्ये लक्ष घातले. राज्याच्या आणि देशाच्या विविध भागांतून आलेल्या प्रत्येक नागरिकास या शहरात सुखाने राहता यावे, या दृष्टीने स्वच्छ पाणीपुरवठा, सार्वजनिक आरोग्य, दवाखाने, शाळांसाठी चांगल्या दर्जेदार इमारती, रस्ते, उद्याने, क्रीडांगणे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था (पी.सी.एम.टी.) इत्यादी विकासकामे त्यांनी स्वतः जातीने लक्ष घालून करून घेतली. निःस्वार्थी भावनेतून आणि एखाद्या ध्येयवेड्या माणसाप्रमाणे अहोरात्र काम करून कै. अण्णासाहेबांनी या शहराला नावलौकिक मिळवून दिला. त्यांनी केलेल्या पायाभूत कामांवरच आज बदलत्या काळानुसार आणि गरजेनुसार आवश्यक त्या बदलांसह विकासाचा कळस डोलतो आहे. सन १९७७ मध्ये देशात सर्वत्र काँग्रेसविरोधी लाट असताना, खेडमधून अण्णासाहेब मगर खासदार म्हणून, लोकसभेवर निवडून गेले. त्यांच्या कार्य-कर्तृत्वाचा प्रभाव संपूर्ण जिल्हाभर होता. ते काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि आमदार- खासदार असले तरी अजातशत्रू होते. मुळातच निःस्वार्थी आणि मनापासून लोकसेवा करण्याचा त्यांचा पिंड होता. राजकारणापेक्षा समाजकारण त्यांना प्रिय होते. सत्तेपेक्षा सेवेमध्ये ते रमत असत. सर्वांगीण विकासासाठी, सर्वांना बरोबर घेऊन काम करणे. सार्वजनिक हितासाठी त्याग करणे आणि त्यायोगे गरिबांचे अश्रू पुसणे हे त्यांचे ध्येय होते. शहरात कारखाने स्थिरावले पाहिजेत आणि त्यासाठी त्यांना नगरपालिकेचे व शासनाचे योग्य ते सहकार्य दिले पाहिजे, त्याचबरोबर कामगारांचे व कष्टकऱ्यांचे हित जपले पाहिजे अशी त्यांची धारणा होती. कामगार चळवळीशीही त्यांची नाळ जुळलेली होती. म्हणूनच त्यांनी "इंटक"च्या माध्यमातून कामगारांचेही नेतृत्व केले. समाजकारण, राजकारण करताना त्यांनी सदैव सामान्य माणूस मध्यवर्ती ठेवून काम केले. त्यांनी जिल्हाभर कार्यकर्ते घडविले. खरे तर अण्णासाहेब म्हणजे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची चालती फिरती कार्यशाळाच होती. त्यांनी घडविलेले अनेकजण पुढे विविध पदांवर जावून पोहोचले.दिनांक २५ जून १९७९ रोजी अण्णासाहेबांची प्राणज्योत मालविली. पुणे जिल्हाभर काम केले असले तरी, पिंपरी-चिंचवड शहरासाठी त्यांनी केलेले काम अद्वितीय स्वरूपाचे आहे. या परिसराच्या विकासासाठी ते अहोरात्र आणि निस्वार्थ भावनेने झटले आहेत. एकाअर्थी ते कर्मयोगीच होते, अविवाहित होते. त्यांच्या कुटुंबातील कोणीही राजकारणात नाहीत. समाजालाच त्यांनी कुटुंब मानले. आज सार्वजनिक जीवनात त्यांच्या नंतरची तिसरी पिढी समाजकारणात, राजकारणात कार्यरत आहे. त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने सार्वजनिक जीवनात कार्यरत असणाऱ्या प्रत्येकानेच त्यांचे स्मरण करणे गरजेचे आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे जिल्हा परिषद, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, जिल्हा मध्यवर्ती बँक, कृषी उत्पन्न बाजार समिती या सर्वच संस्थांनी विविध उपक्रम हाती घेऊन या महान नेत्याची जन्मशताब्दी साजरी करायला हवी. त्यांच्या कर्तृत्वातून उभ्या राहिलेल्या सर्वच संस्था या त्यांचे स्मारक आहेत. त्या संस्थांनी आपला नावलौकिक वाढविताना कै.अण्णासाहेबांची योगदानाची जाणिव ठेवणे अपेक्षित आहे. त्यांच्या कर्तृत्वाचा वसा आणि विचारांचा वारसा जपणे हीच त्यांना जन्मशताब्दी निमित्ताने आदरांजली ठरेल.
© लेखक : अरुण तुकाराम बोऱ्हाडे,
बोऱ्हाडेवाडी, मोशी, ता.हवेली, जिल्हा- पुणे.
(मोबाईल - ९८८१३०१३३९)

Comments

Popular posts from this blog

श्री नागेश्वर महाराज भंडारा : भक्तिमार्गातील शक्ती स्त्रोत [लेखक : अरुण बोऱ्हाडे]

'शरद पवार : दुःखातही मनाला उभारी देणारा अलौकिक लोकनेता'' : अरुण बोऱ्हाडे

"कष्टकरी कामगारांची, एक अधुरी कहाणी..! सामाजिक चिंतनाचा विषय" लेखकः अरुण बोऱ्हाडे